Wednesday, November 9, 2016

पालघर वार्तापत्र ०९ नोव्हेंबर

पालघर वार्तापत्र ०९ नोव्हेंबर

============

डहाणू विरुद्ध विरार संघर्ष सुरूच!
(प्रतिनिधी, वसई ,लोकसत्ता)
विरारच्या महिला प्रवाशांना लोकलमध्ये चढू देण्यास प्रतिबंध; प्रवाशांमधील वाद शिगेला
पश्चिम रेल्वेच्या डहाणू-पालघर आणि विरारच्या प्रवाशांमधील वाद मंगळवारी सकाळी पुन्हा उफाळून आला. डहाणूहून सुटलेल्या चर्चगेट लोकलमधील महिला प्रवाशांनी विरार स्थानकात ट्रेनचे दरवाजे आतून बंद केले आणि विरारच्या महिलांना प्रवेश करण्यास मज्जाव केला.

‘तुम्ही विरार ट्रेन पकडा, या ट्रेनमध्ये तुम्हाला प्रवेश नाही,’ असे सांगत या प्रवाशांनी उद्दामपणा केला. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आणि गाडी स्थानकावरच थांबली. पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवले, पण या वादाची मोठी ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

डहाणू रेल्वे स्थानकातून सुटलेली डहाणू-चर्चगेट लोकल सकाळी ८ वाजून ३६ मिनिटांनी विरारच्या फलाट क्रमांक चारवर आली. विरार स्थानकातील महिला नेहमीप्रमाणे या लोकलमधील डब्यात चढण्यासाठी सज्ज झाल्या, परंतु महिलांच्या दुसऱ्या श्रेणीतील डब्याचे दार आतील महिलांनी बंद केले. या अनपेक्षित प्रकाराने विरार स्थानकातील महिला भांबावल्या. ‘आम्ही तुम्हाला आत येऊ  देणार नाही, तुम्ही विरार-चर्चगेट लोकल पकडा,’ असे आतील महिलांनी सांगितले. दरम्यान, आतल्या महिलांनी साखळी खेचल्याने ट्रेन फलाटावरच थांबली होती. या प्रकाराची माहिती मिळताच विरार रेल्वे सुरक्षा बल तसेच वसई रेल्वे पोलिसांचे बंदोबस्तावरील पोलीस तात्काळ घटनास्थळी गेले. त्यांनी मध्यस्थी करून दार उघडण्यास सांगितले. या वेळी मोठा वाद निर्माण झाला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दार उघडण्यात आले आणि विरारच्या महिला प्रवाशी ट्रेनमध्ये चढल्यानंतर ट्रेन ८ वाजून ४४ मिनिटांनी रवाना झाली.

प्रवाशांच्या मनातील संतापाची धग कायम
विरारमधील प्रवासी डहाणू लोकलमध्ये चढतात याचा डहाणू, पालघरच्या प्रवाशांना प्रचंड राग आहे. याचा भडका १८ ऑक्टोबर रोजी उडाला होता. विरारच्या एका प्रवाशाला चर्चगेट-डहाणू लोकलमधून विरारला उतरू न देता सफाळ्यापर्यंत नेले होते. त्याने केलेल्या तक्रारीवरून १८ ऑक्टोबर रोजी रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस कारवाईसाठी ट्रेनमध्ये शिरले. या वेळी रेल्वे सुरक्षा बलाच्या प्रवाशांनी पालघर डहाणूच्या प्रवाशांना बेदम माराहण केली आणि १५ जणांना अटक केली. मुळात आमच्या ट्रेनमध्ये विरारचे प्रवाशी शिरतात आणि वर आम्हालाच मारहाण करून अटक होते. यामुळे पालघर डहाणूचे प्रवासी संतापले आहेत. त्यांच्या मनातील रोष अद्याप शमलेला नसून या वादाचे पडसाद पुन्हा उमटण्याची शक्यता आहे.

गोंधळामुळे डहाणू-चर्चगेट लोकल सहा मिनिटे विरार स्थानकात खोळंबली होती. आमच्याकडे अद्याप तक्रार दाखल झाली नाही.  – महेश बागवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रोड रेल्वे पोलीस ठाणे.

तात्काळ माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी गेलो आणि दोन्ही बाजूच्या प्रवाशांमधील वाद मिटवून ट्रेन रवाना केली. अद्याप कुणी तक्रार दाखल केली नाही. विरारच्या प्रवासी महिला संध्याकाळी कामाहून परतल्यानंतर तक्रारी देणार आहेत. तक्रार आल्यानंतर आम्ही कारवाई करू. – एस. एस. यादव, विरार रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख

मारहाणीचा बदला?
विरारच्या काही महिला प्रवाशांनी सोमवारी पालघरच्या महिला प्रवाशांना मारहाण केली होती. त्याचा राग म्हणून पालघर, डहाणूच्या महिलांनी दार बंद केले, असा आरोप डहाणूच्या महिला प्रवाशांनी केला. विरारच्या कुठल्या महिलांनी मारहाण केली याबाबत त्या काही सांगू शकल्या नाही, तसेच त्या महिलांना ओळखूही शकल्या नाहीत, अशी माहिती विरार रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख एस. एस. यादव यांनी दिली.

विरारच्या प्रवाशांचा अजब व्यवहार
विरारचे प्रवासी हक्काने डहाणूहून सुटणाऱ्या लोकलमध्ये चढतात. असा कुठलाही लिखित नियम नसल्याचा दावा ते करतात. पण याच विरारच्या प्रवाशांना चर्चगेट लोकल पकडून वसई किंवा बोरिवलीला उतरणाऱ्या प्रवाशांना विरोध असतो. याच विरोधामुळे विरारच्या महिलांनी वसईत उतरणाऱ्या ऋतुजा नाईक या विद्यार्थिनीला बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात ऋतुजाच्या तक्रारीनंतर चार महिलांना अटक करण्यात आली होती.
============

तर डहाणू लोकल बंद करावी लागेल!
प्रवासी वादावरून वनगा यांचे वक्तव्य
प्रतिनिधी, वसई लोकसत्ता
डहाणू लोकलमधून प्रवास करण्यावरून पालघर आणि विरारच्या प्रवाशांमध्ये वाद सुरू असल्याच्या पाश्र्वभूमीवर पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दोन्हीकडील प्रवाशांनी हे वाद थांबवले नाहीत तर डहाणूकडील लोकल बंद करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
डहाणू लोकलमधून विरारचे प्रवासी प्रवास करीत असतात. त्यावरून पालघर आणि विरारच्या प्रवाशांमध्ये वाद आहे. गेल्या महिन्यात विरारच्या एका प्रवाशाने केलेल्या तक्रारीवरून डहाणू-पालघरच्या १५ प्रवाशांना अटक करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी डहाणू लोकल विरार स्थानकात आली असता पालघरच्या महिला प्रवाशांनी दरवाजे उघडलेच नव्हते. यामुळे पुन्हा मोठा वाद निर्माण झाला होता.
पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांना या वादाबाबत विचारले असता, दोन्हीकडील प्रवाशांनी हा वाद थांबवला नाही तर डहाणू लोकलच चालू ठेवायची की नाही याबाबत विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. डहाणू लोकल माझ्या प्रयत्नांमुळे सुरू झाल्याची त्यांनी या वेळी आठवण करून दिली. वसई विरार महापालिकेत वनगा आले असता त्यांना पत्रकारांनी याबाबत विचारले होते. यापूर्वी कुपोषणाच्या मुद्दय़ावरून आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
============

वसईतील शेतकर्‍यांची सुगी
(लोकमत)
भाताच्या कापण्या दिवाळीमुळे मंदावल्या होत्या. परंतु भाऊबीज संपल्याबरोबर वसईच्या ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनी मजुरांची जुळवाजुळव करून पुन्हा जोमाने त्या सुरु केल्या आहेत.
येथील मजूर १५ दिवसांनी वीट भट्टी, बांधकामव्यवसाय, वसई पश्‍चिमेतील वाड्या, सागरी भागात मासेमारी करण्यासाठी जात असल्याने पुढील दोन आठवड्यात कापण्या पार पडल्या पाहिजेत. नाहीतर मजूर टंचाई निर्माण होईल म्हणून कापण्या सुरू केल्याचे शेतकरी सांगत

आहेत. चालू वर्षी निसर्गराजाने बळीराजाला योग्य साथ दिल्याने चांगले पीक हाती लागले आहे. यामुळे येथील बळीराजा जोमाने कामाला लागला आहे .कापणी करून भारे बांधणी झालेले पीक खळ्याच्या सभोवताली उडवी रचून ठेवण्यात येत असून एक खळे साधारणत: तीन ते चार शेतकरी मिळून करत आहेत. यामुळे झोडणी पर्यंत पिकाचे संरक्षण सांघिक पद्धतीने करता येते. यातून येथील शेतकर्‍यांमध्ये सांघिक भावना रुजत असून पुढे काळाची गरज बनलेल्या सांघिक शेतीसाठी योग्य वातावरण ग्रामीण भागात तयार होत असल्याचे कृषी सहाय्यक अधिकारी अनिल मोरे यांनी सांगितले. यासाठी या भागातील शेतकर्‍यांना एकत्न आणण्याचे प्रयत्नही सुरु झाले असून खानिवडे येथे शेतकर्‍यांचा एक गट बनवण्यात आला आहे .


 या पिकांना खास मागणी
शेतकरी रब्बी पिके घेत असून त्यात चणा, पावटा, तूर, मूग, आदी द्विदल पिके घेत असून वाडी पिके म्हणून चवळी, भेंडी, वांगी, टोमॅटो, मुळा व येथील प्रसिद्ध पांढरा कांदा अशी पिके प्रामुख्याने घेतली जातात. यामध्ये द्विदल पिके ही दवबिंदूवरील ओलाव्याने घेत असल्याने त्यांची चव ही निराळी असते. त्यामुळे या पिकांना बाजारात खास मागणी असते.
============

ठाणे जिल्ह्य़ात बाराशे किलोची तूरडाळ सडण्याची शक्यता
(श्रीकांत सावंत, ठाणे लोकसत्ता)
बाजारभावापेक्षा जास्त दराने विक्री आदेशामुळे साठा पडून
खुल्या बाजारापेक्षा शिधावाटप केंद्रात शासनाकडून स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात येत असल्या तरी तूरडाळीच्या बाबतीत उलटे चित्र दिसून आले आहे. शासनाच्यावतीने खुल्या बाजारात केवळ ९५ रुपयाने प्रतिकिलो तूरडाळीची विक्री सुरुवात केली असताना शिधावाटप केंद्रात १०३ रुपये प्रतिकिलो दराने तूरडाळ विक्री करण्याचा अजब प्रकार राबवण्यात आला आहे. खुल्या बाजारात स्वस्त तूरडाळीची विक्री होत असल्यामुळे अंत्योदय आणि बीपीएल शिधापत्रिकाधारकांनीही खुल्या बाजाराकडे धाव घेत शिधावाटप केंद्रातील तुरडाळीकडे पाठ फिरवली.

त्यामुळे सप्टेंबरपासून आत्तापर्यंत १२०० किलो तुरडाळीचा साठा जिल्ह्य़ातील विविध शिधावाटप केंद्रामध्ये पडून राहिला आहे. पुढील काही दिवस हा साठा असाच पडून राहिल्यास तो सडून जाण्याची शक्यता शिधावाटप केंद्रातील अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
तूरडाळीच्या महगाईच्या पाश्र्वभूमीवर गरीब नागरिकांना त्याचा लाभ घेता यावा यासाठी शासनाच्यावतीने ऑगस्ट महिन्यात शिधावाटप केंद्रातून अंत्योदय आणि बीपीएल शिधापत्रिकाधारकांसाठी १०३ रुपये प्रतिकिलो दराने तूरडाळ विक्रीस सुरुवात करण्यात आली होती. खुल्या बाजारात १८० ते १०० रुपयांनी विक्री होत असलेली तूरडाळ शिधावाटप केंद्रात १०३ रुपयांना मिळत असल्याने या केंद्रात सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र त्यानंतर शासनाने खुल्या बाजारामध्येही तूरडाळ विक्री करण्याचा निर्णय घेऊन ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या खाजगी ठिकाणी तूरडाळ विक्री केंद्र सुरू केले. त्यामध्ये रिलायन्स फ्रेश, बिग बाजार अशा बडय़ा ३३ मॉल्समध्ये ही तूरडाळ विक्री केंद्र सुरू केले. या तूरडाळीची किंमत अवघी ९५ रुपये इतकी होती. त्यामुळे खुल्या बाजारामध्ये स्वस्त दरात तूरडाळ विक्री सुरू झाली. त्यामुळे ग्राहकांनी खुल्या बाजारातून तूरडाळीची खरेदी सुरू केली. त्यामुळे शिधावाटप केंद्रातील तूरडाळ पडून राहण्यास सुरुवात झाली. ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे, वाशी, भाईंदर, अंबरनाथ, बदलापूर आणि मुंब्रा या भागामध्ये सुमारे १२१७ किलो तूरडाळीचा साठा पडून आहे.
============
वसई : गस्तीच्या दुचाकी इंधनाअभावी पडून
सुहास बिऱ्हाडे, वसई, लोकसत्ता
मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली वसई-विरार शहरातील बीट मार्शलची गस्त तीन महिन्यांपासून बंद आहे. कारण काय तर पोलिसांना मोटारसायकली मिळाल्या, पण त्यात पेट्रोल भरण्यासाठी पैसे नसल्याने त्या वापराविना पडून आहेत. बंद पडलेल्या मोटारसायकली गंजून खराब झाल्या असून नऊ गाडय़ा तर भंगारात काढण्यात आल्या आहेत. तीन महिन्यांपासून गाडय़ा बंद असल्या तरी त्याची अद्याप कुणी दखल घेतलेली नाही.
वसई-विरार शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी बीट मार्शल ही संकल्पना राबविण्यात आली. त्यासाठी स्वतंत्र बीट मार्शल पोलीस ठाणेही तयार करण्यात आले. या बीट मार्शलच्या ताफ्यात १९ मोटारसायकली होत्या. त्यावर प्रत्येकी दोन पोलीस याप्रमाणे दोन बीट मार्शल शहरात गस्त घालत होते. वसई-विरार पोलिसांकडे ३७ बीट मार्शल आहेत. पण गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल नसल्याने या मोटारसायतली बंद पडल्या आहेत. १९ मोटारसायकलींपैकी १४ पेट्रोलअभावी बंद पडल्या आहेत. त्यातील ९ तर पूर्णपणे गंजून खराब झाल्या आहेत. केवळ ५ मोटारसायकली सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बीट मार्शल विरार आणि तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पेट्रोल भरतात. विरार पोलिसांचे ५ लाख रुपये, तर तुळिंज पोलीस ठाण्याचे ४ लाख रुपयांचे पेट्रोलचे बिल थकीत आहे. यामुळे पेट्रोल मिळणे बंद झाल्याची माहिती वसई बीट मार्शल नियंत्रण कक्षाचे प्रमुख बी. एच. यादव यांनी सांगितले. आम्ही पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठांना याबाबत वेळोवेळी पत्र देऊन कळविले असल्याचेही ते म्हणाले. सध्या केवळ ५ मोटारसायकलींवरून गस्ती सुरू आहेत. उर्वरित बीट मार्शल हे पोलीस ठाण्यात पडेल ती कामे करत असतात, असे यादव यांनी सांगितले.

‘दामिनी पथक’ही थंड
पुरुष बीट मार्शल्सप्रमाणे महिला पोलिसांची गस्त ठेवण्यासाठी ‘दामिनी’ नावाचे पथक स्थापन करण्यात आले होते. वसईत सात पोलीस ठाणी असून प्रत्येत पोलीस ठाण्यातील एक महिला पोलीस अधिकारी आणि ६ महिला पोलीस कर्मचारी यांचे मिळून हे दामिनी पथक होते. प्रत्येक मोटारसायकलवर एक महिला अधिकारी आणि एक महिला कर्मचारी असे हे दामिनी पथक कार्यरत होते. पण पेट्रोलअभावी दामिनी पथकही बंद पडले आहे.

पेट्रोलच्या बिलाअभावी बीट मार्शल बंद आहे. आम्ही वेळोवेळी पत्र पाठवलेली आहेत. लवकरच या बीट मार्शलच्या गस्ती सुरू होतील, अशी आशा आहे.  – अनिल आकडे, विभागीय पोलीस उपअधीक्षक, वसई

वरिष्ठांना याबाबत कळवले आहे. आमचे बीट मार्शल पोलीस ठाण्यात पाठवून देतो. तेथे ते काम करत आहेत.  – बी. एच. यादव. वसई-विरार बीट मार्शल नियंत्रण कक्ष प्रमुख


    एकूण बीट मार्शल : ३७
    एकूण मोटारसायकल : १९
    पेट्रोलअभावी बंद : १४

दामिनी पथक
    एकूण मोटारसायकल : ७
    पेट्रोलअभावी बंद : ७
============

विरार :  तोतया महिला पोलिसाविरोधात गुन्हा दाखल
गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस अधिकारी असल्याचे सांगून दहशत निर्माण करणार्‍या एका तोतया महिला पोलीस अधिकार्‍याविरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसई पूर्वेकडील मधुबन टाउनशीप या परिसरात मागील काही महिन्यांपासून हर्षला लाड ही महिला गुन्हे अन्वेषण विभागात अधिकारी असल्याचे सांगून रहिवाशांना शिवीगाळ करणे, दादागिरी करणे या पद्धतीने आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती.
स्थानिक रहिवाशांनी वारंवार या महिलेविरोधात पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. या तोतया महिला पोलीसाविरोधात अखेर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका रहिवाशाने तिच्या विरोधात आवाज उठवला असता त्या व्यक्तीला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी तिने दिली होती. हर्षला लाड ही महिला सोसायटीतील रहिवाशांना आणि कमिटी मेंबर्स यांना सतत धमकावत होती.
सोसायटीच्या नियमांच्या विरोधात जाऊन शिविगाळ व दमदाटी करीत होती. सोसायटीतील पीडित रहिवाशी राजेंद्र बलराज यादव यांनी सदर महिलेच्या विरोधात फिर्याद नोंदवली असता त्याअनुषंगाने वालीव पोलिसांनी सदर महिलेची सविस्तर चौकशी केली असता ती महिला पोलीस अधिकारी नसल्याचे समोर आले. वालीव पोलीसांनी हर्षला लाड हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
(वार्ताहर,लोकमत)
============

वसई स्टेशनात अर्भक सोडणार्‍या जोडप्यास अटक
वसई : रेल्वे स्टेशनवर अनैतिक संबंधातून जन्मलेल्या दोन दिवसांच्या नवजात बालकाला सोडून पळालेल्या भाऊजीला तिच्या मेहुणीसह वसई रेल्वे पोलिसांनी सात महिन्यांनी अटक करून गुन्हा उघडकीस आणला. ३१ मार्च २0१६ रोजी संध्याकाळी वसई रोड रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर एका कपड्यात गुंडाळलेले दोन दिवसांचे नवजात बालक सोडून देण्यात आले होते. सी.सी. टीव्ही फुटेजमध्ये मुलाला सोडून जाणार्‍या जोडप्याचे चित्रण झाले होते. याप्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी सी.सी. टीव्ही फुटेज आणि मोबाईल कॉल वरून छडा लावून राशीदा आणि कालीत शाह या दोघांना उत्तर प्रदेशातून अटक केली. (प्रतिनिधी,लोकमत)
============

मोखाडा : कुपोषणाचा अजून एक बळी
(महाराष्ट्र टाईम्स)
'पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात कुपोषणाने आणखी एका लहानग्याचा बळी घेतला आहे. येथील बलद्याचा पाडा येथे शीतल निखडे या चार वर्षीय बालिकेचा कुपोषणाने मृत्यू झाला असून गंभीर बाब म्हणजे याबाबत शासकीय यंत्रणेकडे अद्यापि कोणतीही माहिती उपलब्ध नाही.'; शीतल ही कुपोषणाने खंगली होती. तिच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. मात्र हे उपचार अपुरे पडले आणि शीतलचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. गेल्या तीन महिन्यांत कुपोषणाने गेलेला हा तिसरा बळी असून शासकीय पातळीवर चाललेल्या अनास्थेबद्दल तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे
============

वसई पंचायत समितीच्या सभापतींना कोकण आयुक्तांचे अभय?
वार्ताहर,पुढारी
वसई पंचायत समितीच्या वादग्रस्त महिला सभापती चेतना मेहेर यांनी पदाचा गैरवापर करून आपल्या पतीस जलवाहतुकीचा ठेका मिळवून दिल्याबद्दल अनेक तक्रारी जिल्हाधिकार्‍यांना प्राप्त झाल्या आहेत. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी कारवाई करून सभापती मेहेर यांना बडतर्फ करण्याबाबत कोकण आयुक्तांना चार महिन्यांपूर्वीच लेखी अहवाल सुपूर्द केला आहे. मात्र, तरीही मेहेर यांच्यावर कारवाई होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
 वसईतील पाणजू बेट व अर्नाळा बेट येथे जाण्यासाठी जलवाहतुकीचा ठेका पंचायत समिती तर्फे काढला जातो. मार्च 2015 रोजी पंचायत समितीच्या दालनात झालेल्या बैठकीत संबंधित ठेका सभापती मेहेर यांचे पती रामचंद्र मेहेर यांना देण्यात आला. मात्र हा ठेका नियमबाह्य पद्धतीने मिळवून दिल्याचे सिद्ध झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी याप्रकरणी सखोल चौकशी केली असता, त्यांना सभापती चेतना मेहेर दोषी आढळल्या. त्यांनी  मेहेर यांना पदमुक्त करा, असा अहवाल कोकण आयुक्त देशमुख यांना चार महिन्यांपूर्वी दिला. मात्र याबाबत राजकीय दबावापोटी कोणतीही कारवाई होत नसल्याचे आढळून आले आहे. याबाबत आमदार आनंद ठाकूर यांनी विभागीय आयुक्तांची भेट घेऊन पाठपुरावा केला असता कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी नियमानुसार त्वरित कारवाई करू, असे आश्‍वासन दिले आहे.
============

नालासोपारा छटपूजा प्रकरणी गुन्हा
वसई : नालासोपारा येथील छट पूजेत अश्लील वर्तन केल्या प्रकरणी आयोजकासह २ जणांवर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत हिंदी भाषिक विकास महामंडळच्यावतीने मोरगाव येथे छटपूजेचे आयोजन करण्यात आले होते. स्टेजवर अश्लील हावभाव करून महिलांसह तृतीयपंथीनी नाच केला होता. याप्रकरणी आयोजक सुरेंद्र कृपाशंकर सिंग, महिलेला उचलून घेणारा अमरसिंग रघुवंशी आणि नृत्य केलेल्या एका महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (लोकमत)
============

वसईत दोन दिवसात दोन नवजात अर्भके आढळली
वसईत गेल्या दोन दिवसात दोन नवजात बालके आढळून आली आहेत. ती दोन दिवसांची व मृत होती. रविवारी संध्याकाळी विरार पूर्वेकडील रामवाडी येथे दोन दिवसाचे नवजात बालक मृतावस्थेत आढळून आले. तर सोमवारी रात्नी नालासोपारा जवळील धानीव बाग येथील तलावाशेजारी दोन दिवसाचे नवजात बालक मृतावस्थेत आढळून आले. अनैतिक संबंधातून ही बालके जन्मलेली असल्याने ती टाकून देण्यात आली असावीत असा पोलिसांचा अंदाज असून पुढील तपास सुरू आहे.
============

जव्हार: ग्रामसेवक कोरडेंवर कारवाई
हितेन नाईक, पालघर, लोकमत
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जव्हार तालुक्यातील ४२ मजुरांनी कामाची मागणी करूनही चांभारशेत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जगदीश कोरडे यांनी काम उपलब्ध करू न दिल्याबद्दल त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांना दिले आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत राज्यात मागेल तिथे रोजगार निर्माण करून देण्याचे शासनाचे आदेश आहेत. असे असताना जव्हार तालुक्यातील चांभारशेत येथील ४२ मजुरांनी तत्कालीन ग्रामसेवक जगदीश कोरडे यांच्याकडे कामाची मागणी करूनही त्यांना काम उपलब्ध करून देण्यात संबंधित ग्रामसेवकानी चालढकल केली होती. परिणामी रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या कामगारांना बेरोजगारीचा सामना करावा लागला होता. कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांनी या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी आणि जव्हारच्या तहसीलदारांना दिले होते. त्यानंतर लोबो यांनी घेतलेले आक्षेपाचे मुद्दे, मजुरांचा जबाब, ग्रामसेवक, पालक तांत्रिक अधिकारी, ग्रामरोजगार सेवक यांचे स्पष्टीकरण मागविले होते. त्या नुसार मजुरांनी काम मागितल्याच्या आदल्या दिवशी त्यांना नमुना क्र ं.७ पुरविणे गरजेचे असतांना तो उशिरा पुरवणे, कामाची आउटलाईन वेळेवर आखून न देणे, मजुरांनी कामाची मागणी केल्यानंतर पंचायत समिती मार्फत ऑनलाईन काम देऊ केले होते. त्या प्रमाणे घटनास्थळी मजूर कामावर गेलेही परंतु ग्रामसेवकाच्या वैयक्तिक चुकीमुळे ते स्वत: त्या ठिकाणी उपस्थित राहू न शकल्याचा जबाब मजुरांनी नोंदविला त्यामुळेच सकाळी काम (रोजगार) उपलब्ध होऊ शकला नाही, ज्या ठिकाणी काम सुरु करणे अपेक्षित होते त्यांची कुठलीही परवानगी ग्रामसेवकाने घेतली नव्हती. असा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना मिळाला. बेरोजगार भत्ता नियम, २0१२ मधील तरतुदी नुसार ४२ मजुरांना मागणी करूनही काम उपलब्ध करून दिले नसल्याचे स्पष्ट झाले. ग्रामसेवक यांच्या वैयक्तिक चुकी मुळे संबंधित मजूराना मागणी प्रमाणे विहित कालावधीत काम उपलब्ध करून देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यामुळे या अनियमिततेसाठी ग्रामसेवक जबाबदार असल्याने त्याच्या विरोधात प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश अभिजित बांगर यांनी दिले.
============

डहाणू : कर्मचार्‍यांबद्दल नागरिकांत नाराजी
तहसीलदार प्रीतीलता कौरथी या चांगले काम करीत असतांना दुसरीकडे त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांकडून नागरिकांना असभ्य वर्तणूक मिळत असल्याने नागरिकामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्याबाबत डहाणू प्रांत अंजली भोसले यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे. विविध योजनांसाठी लागणार्‍या दाखल्यांसाठी अनेक जण दूरदूर अंतरावरून येत असतात. मात्न तहसीलमध्ये असलेले कर्मचारी त्यांना योग्य मार्गदर्शन करीत नाहीत. त्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे. तसेच हे कर्मचारी पोलीसांनाही दाद देत नसल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे. अशा कर्मचार्‍यांची बदली व्हावी अशी मागणी आहे. (वार्ताहर,लोकमत)
============

बोईसर: ग्रामीण रुग्णालयाची सेप्टी टॅँक तुबली, रोगराई
पंकज राऊत,  बोईसर, लोकमत
येथील ग्रामीण रुग्णालयाची आवारातच शौचालयाच्या तुंबलेली सेप्टी टॅँक भरून वाहू लागल्याने तिच्या डबक्यात रोज हजारो डासांची उप्तती होत असल्याने रुग्णांचे व संपूर्णपरिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्गंधी व डासांमुळे सगळे हैराण झालेले असले तरी आरोग्य खाते आणि स्थानिक प्रशासन मात्र याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करीत आहेत.
ही टाकी साफ करण्याची जबाबदारी आरोग्य खात्याची, रुग्णालयाची की, पंचायतीची असा तिढा निर्माण झाला आहे. बोईसर ग्रामीण रुग्णालयात प्रतिदिन सुमारे दोनशे बाह्य रुग्ण औषधोपचाराकरिता येत असतात तर त्यापैकी काही गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना दाखल ही करून घेण्यात येते त्याच प्रमाणे प्रसूतीसाठी ही महिला मोठय़ा प्रमाणात दाखल होत असतात. बोईसरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये बोईसरसह परिसरातील सुमारे पंचवीस ते तीस गावां-पाड्यांतून नागरी वसाहतींतून गरीब तसेच आदिवासी त्याचप्रमाणे तारापूर एम्.आय्.डी.सी.मधील कामगारवर्ग व त्यांचे कुटुंब मोठय़ा प्रमाणात उपचाराकरीता येत असतात.
सध्या डेंग्यूसह अनेक साथींच्या आजारांची सर्वत्र लागण सुरु असून त्यामध्ये रुग्ण दगावत आहेत तर डेंग्यूच्याबाबत भयंकर भीती आहे. शासकीय यंत्रणाच म्हणते स्वच्छता राखा, घरात व आजुबाजुला पाणी व डबके साचू देऊ नका त्या मध्ये डासांची उत्पत्ती मोठय़ा प्रमाणात होऊन साथीचे आजार पसरतील परंतु याच शासनाच्या अखत्यारितील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात नेमके त्याविरुद्ध वातावरण आहे. बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील या मैल्याच्या डबक्यामध्ये डासांच्या झुंडीच्या झुंडी सर्वत्र घोंघावत आहेत. इथे उपचारासाठी आणि रोगमुक्त होण्यासाठी यायचे की, नवे विकार जडवून घेण्यासाठी यायचे असा प्रश्न रुग्णांना पडला आहे. डॉक्टर आणि नर्सेस, वॉडबॉय यांचेही आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात साचलेल्या मैल्याच्या डबक्यासंदर्भात उपाय योजना करण्यासाठी जानेवारी, मार्च व जून अशा तीन महिन्यात बोईसर ग्रामपंचायतीला पत्र देण्यात आले आहे परंतु ग्रामपंचायतीने ही या गंभीर बाबीची दखल घेतली नाही, त्या साचलेल्या डबक्यातच बाटल्या, औषधांनी भरलेले खोके टाकून देण्यांत आले आहेत. ही औषधे का टाकून देण्यांत आली त्याची चौकशी होणे गरजेचे असून योग्य विल्हेवाट न लावता जर औषधे फेकून देण्यात आली असतील तर सबंधितांवर कारवाई झाली पाहीजे अशी मागणी नागरीक करीत आहेत.

तर रुग्णालयाच्या आवारामधील डासांच्या आळ्य़ा खाऊन डासांचा नाश करणारे गप्पी मासे पैदा करण्यासाठी खास बांधलेल्या हौदाचीही कचराकुंडी झाली आहे.तिची सफाई गेल्या अनेक महिन्यांत झालेली नाही. यामुळे संपूर्ण रुग्णालय आणि परिसराचे त्यातील कर्मचार्‍यांचे व रहिवाशांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. याबाबत पंचायत आणि प्रशासन लक्ष घालणार तरी कधी?
वारंवार पत्रव्यवहार करुनही ग्रामपंचायतीने दखल घेतली नाही. ग्रामीण रुग्णालया तर्फे बोईसर ग्रामपंचायतील ड्रेनेज लाईन व स्वच्छतेसाठी तीन वेळा पत्र दिले आहे परंतु त्यांनी दखल घेतली नाही आणि त्या साचलेल्या पाण्यामध्ये जी औषधे टाकण्यांत आली आहे ती शेजारच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून दोन, तीन महिन्या पूर्वी टाकली आहेत त्या औषधांचा ग्रामीण रुग्णालयाशी सबंध नाही.
- डॉ. राजेंद्र केळकर,अतिरीक्त जिल्हाशल्य चिकीत्सक, पालघर जिल्हा
============

जव्हार : विजेचा लपंडाव सुरू, उग्र आंदोलनाचा इशारा
 जव्हार तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून अचानक वीज जाते आहे, त्यामुळे नागरीक हैराण झाले असून वीजपुरवठा अखंडित न ठेवल्यास महावितरण विरोधात उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वीज रात्री - बेरात्री खंडीत होत होती. आता ती दिवसाही वारंवार खंडीत होते आहे. यामुळे टीव्ही, फ्रीज, ओव्हन, मिक्सर महागडे एलईडी दिवे, पंखे, एसी आदी वस्तू जळून जात आहेत. त्यामुळे वीजग्राहकांत संताप आहे.
वीज वितरणाने एकाही महिन्याचे विज देयक अदा केले नाही तर लगेच ग्राहकांवर कारवाई करून वीज खंडीत केली जाते, मात्र वीजपुरवठा अखंडीत ठेवण्याबाबत महावितरणकडून हलगर्जीपणा केला जात आहे, त्यामुळे कमकुवत झालेल्या वीजवाहिन्या त्वरीत बदलून नियमित दाबाने वीज पुरवठा अखंडित ठेवावा अशी मागणी होत आहे.
(वार्ताहर,लोकमत)

 ============

सविस्तर वृत्त http://www.palgharlive.com/2016/11/blog-post_9.html

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home