Monday, November 28, 2016

पालघर वार्ता २८ नोव्हेंबर २०१६

पालघर वार्ता २८ नोव्हेंबर २०१६
==============
वसई : शंकराचार्यांच्या पालखीचा सोहळा उत्साहात
 निर्मळ येथे जगद्गुरु शंकराचार्यांचा पालखी सोहळा शनिवारी उत्साहात पार पडला. यावेळी वेदमूर्ती धनंजयशास्त्नी वैद्य यांनी शिष्यांसमवेत व वसईतील प्रतिष्ठीतांच्या उपस्थितीत पूजा आरती केली. छत्नपती शाहू महाराजांनी नियुक्त केलेले वसईचे पूर्वीचे वतनदार शंकरराव केशव फडके यांच्या वंशजांनी मानाची पालखी उचलली. त्यावेळी पेशव्यांचे इनामदार भिडे, तसेच भट व पंड्या घराण्यातील मंडळीही उपस्थीत होती.
निर्मळ व रावार ग्रामस्थ भक्तांनी तसेच दूरदूरहून आलेल्या भक्तमंडळींनी स्वयंप्रेरणेने आपापले योगदान पालखी सोहळ्यास दिले. सुमारे ५० हजार भाविकांनी दिवस भरात मंदिरात दर्शन घेतले व हजारो भाविकांनी मध्यरात्नीच्या पालखी सोहळ्याचा लाभ घेतला.
गेल्या ४-५ वर्षांपासून जुगार सदृश खेळ तसेच डिजे-डिस्कोवर मोठ्यांने फिल्मी गाणी लावणे आदी प्रकार यंदा पूर्णपणे बंद असल्याने यात्नेकरूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच मांसाहारी स्टॉलवर जाण्याचे यावेळी भक्तांनी कटाक्षाने टाळले. (लोकमत)
==============
निर्मळच्या शंकराचार्य यात्रेची शानच न्यारी!
वसई : शुक्रवारपासून दहा दिवस चालणार्‍या निर्मळ यात्रेची शानदार सुरुवात झाली. निर्मळ येथे भगवान श्रीपरशुराम स्थापित विमल सरोवर व किनारी असलेल्या टेकडीवरचे श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्यांचे मंदिर हे यात्रेकरूंचे मुख्य श्रद्धास्थान आहे.
प्रदक्षिणेच्या वाटेवरील हनुमान मंदिर, सुरेश्‍वर (सुळेश्‍वर) मंदिर, सतीची समाधी, गणपती मंदिर, दुर्गादेवी मंदिर, सांब सिद्धेश्‍वर शिवलिंग व नागेश्‍वर मंदिर यांची मंदिर असून या मंदिरांमध्ये भाविक आवर्जून जतात. श्रीमत् जगद्गुरू शंकराचार्य मंदिरासमोरील भव्य दिव्य दगडी दीपमाळ, मोठा दगडी पिंपळपार, तुळशी वृंदावन, प्रशस्त मंदिराची भिंत त्यावरील सनई चौघड्याचे स्थान, घुमटावरील कमळाची नक्षी, वेलबुट्टी व किरावली हे वास्तू वैशिष्ट्य यात्रेकरूंचेच नव्हे तर विविध धर्मीयांचेही मन मोहून घेते. जगद्गुरू मंदिरात महादेवाचा गाभारा व महाविष्णूचा गाभारा आहे. म्हणजे हरि व हर एकाच मंदिरात असल्याचा हा वैदिकधर्मीय बहुदेववादातील एकदेववादाचा समन्वयात्मक दृष्टीकोन भगवान परशुरामांनी व जगद्गुरूंनी घालून दिला आहे हे स्पष्ट होते. मंदिर परिसरात पोतरुगीजांनी शेजारील टेकडीवर उद्ध्वस्त केलेल्या श्रीपद्मानाभ तीर्थ स्वामींच्या समाधी मंदिरातील समाधीच्या पाषाणाचेही अवशेष सुरक्षित ठेवले आहेत.
मंदिराच्या ओवरींवर काल-कामासहित भगवान परशुराम, रेणुका देवीची व जमदग्नींच्या दर्शनाचा लाभ होतो. तसेच अत्री, माता अनुसया समवेत दिगंबर अवस्थेतील बाल दत्ताची मूर्ती ही दुसर्‍या ओवरीवर आहे. संतांच्या मूर्ती बसवण्याचा प्रघात वैदिक धर्मात नाही, संतांची शिल्पं मंदिराच्या द्वारावर किंवा गोपुरांवर ठेवण्याची परंपरा आहे. परंतु भोळ्या भक्तांनी भक्तिने येथे श्रीज्ञानदेव व संत तुकारामांची शिल्पे ओवर्‍यावर हल्ली हल्ली बसवली आहेत.
पूर्वी वसईकर ब्राह्मणांनी राजा बिंबदेवाबरोबर आलेल्या गंगातीरस्थांबरोबर वाद करून शिरगावला स्थापन केलेल्या मंदिरातील शिवलिंग तेथून काढून येथे आणले. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात त्या शिवलिंगाभोवती माणिकपूर येथील एका धनिकाने पुढाकार घेऊन छोटे मंदिर बांधले आहे. तेव्हापासून भक्त येथे आधी दर्शन घेतात मग मोठय़ा मंदिरावर जातात. अशाप्रकारे निर्मळ क्षेत्रात सर्व जातीच्या लोकांचे योगदान आहे.
निर्मळ मंदिरात ब्रह्मदेव व कार्तिक स्वामींच्याही मूर्तींचे पूजन होते. मंदिराचे केंद्रस्थानी जगद्गुगुरू शंकराचार्य स्वामींची जिवंतपणी घेतलेली समाधी आहे. पोतरुगिजांनी शंकराचार्यांचे समाधी मंदिरही उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. जगद्गगुरूंचे पारंपारिक शिष्य असलेल्या ३७-३८ वर्ष वयाच्या नरवीर चिमाजी आप्पांनी पेशव्यांच्या नेतृत्वाखाली शौर्य गाजवून पोतरुगिज राजवट उखडून टाकली व या प्रांतातील सर्व जाती व पंथियांना भयमुक्त केले. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या आ™ोने पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. सध्याचे मंदिर हे १७५0 नंतर जीर्णोद्धार केलेली वास्तू आहे. या वास्तूतील गाभार्‍यांना चांदीची दारे आहेत. उत्सवासाठी चांदीची भांडीही आहेत. मंदिराच्या मानकर्‍यांकडे साधू व भक्तांसाठी धर्मशाळी व अन्नछत्राची व्यवस्था दिली होती. सध्या हे अन्नछत्रच दिसत नाही. जीर्णोद्धारानंतर पूर्वापार चालत असलेल्या यात्रा व पालखी उत्सवाला मोठय़ा प्रमाणात सुरुवात झाली. पालखीला जगद्गुरु शंकराचार्यांचे शिष्य प्रतिनिधी येतात. (प्रतिनिधी लोकमत)
निर्मळ यात्रेचा पालखी सोहळा उत्साहात पार
निर्मळ व रावार ग्रामस्थ भक्तांनी तसेच दूरदूरहून आलेल्या भक्तमंडळींनी स्वयंप्रेरणेने आपापले योगदान पालखी सोहळ्यास दिले. सुमारे ५० हजार जणांनी दिवस भरात मंदिरात दर्शन घेतले व हजारो भाविकांनी मध्यरात्रीच्या पालखी सोहळ्याचा लाभ घेतला निर्मळ येथे प्राचीन काळापासून परंपरेने चालत आसलेल्या श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य महाराजांच्या पालखीचा सोहळा यंदा शनिवारी मध्यरात्री सुरू होऊन रविवारी पहाटे संपन्न झाला.
==============
डहाणू :  किनारपट्टीची सुरक्षा अजूनही रामभरोसेच!
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे बदल करण्यात आले. मात्न सुरक्षा यंत्नणांनी केवळ शहरी भागांकडेच लक्ष केंद्रीत केले असून आजही ग्रामीण भागातील सागरी पोलीस ठाणी दुर्लक्षितच आहेत. त्यामुळे महाराष्ट्र गुजरात सीमेशी जोडलेले चेकपोस्ट सीसीटीव्हीने जोडणे आणि सागरी प्रमुख मार्गांच्या चौपदरीकरणाची आवश्यकता व्यक्त होत आहे.
मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारा कसाब व अन्य दहशतवादी गुजरातच्या सागरीक्षेत्रातून पालघरमार्गे घुसले होते. शिवाय गुजरात समुद्रात तटरक्षकदलाने जेथे संशयित बोटीचा स्फोट केला. ते ठिकाण मुंबई सागरी सीमेतच आहे. त्यामुळे या भागाच्या सुरक्षेचे आधुनिकीकरण करणे अत्यावश्यक आहे. मात्न, ग्रामीण पोलिसांना मनुष्यबळाची कुमक आजतागायत वाढवून मिळालेली नाही. मोजके दिवस वगळता वर्षभर सागरी चौक्या बंदच असतात. त्यांना सीसीटीव्हीने जोडणे आवश्यक आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात रस्त्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. तथापी येथील प्रमुख सागरी राज्य मार्गाचे चौपदरीकरण अजूनही झालेले नाही. चिखले येथील तटरक्षक दलाचा प्रकल्प कागदावरच आहे. दोन वर्षांपूर्वी हॉवरक्राफ्ट दाखल झाली होती. त्या धर्तीवर नियमित गस्तीची गरज आहे. शिवाय डहाणू सागरी पोलिसांच्या तीन्ही गस्तीनौका २४ तास सज्ज राहिल्या पाहिजेत. २६/११ च्या निमित्ताने सीमा भागातील सागरी सुरक्षा सक्षम करण्याच्या दृष्टीने लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर लोकमत)
==============
डहाणूत वणव्यांनी होतो आहे वनसंपदेचा र्‍हास!
कासा : डहाणू तालुक्यातील जंगलामध्ये सतत वणवे लागत असल्याने वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
तालुक्यातील उर्से, साये, दाभाणे साखरे, महालक्ष्मी आवढाणी, ओसरविरा, बापूगाव, धरमपूर, आंबोली, सोनाळे, खाणीव, पावन, गांगणगांव, वांगर्जे, सारणी, सिसणे, निकावली तर कासा भागातील बर्‍हाणपूर, सोमटा, आंबेदा नानीवली, मेंढण आदी भागात मोठया प्रमाणात जंगल आहे. परंतु पावसाळयानंतर जंगलातील ससे, हरीण, रानडुक्कर आदी प्राण्यांची शिकार करण्यासाठी आजुबाजूच्या परिसरातील काही शिकारी रात्री व दिवसा जंगलात आगी लावतात. पावसाळयानंतर जंगलातील गवत, पालापाचोळा सुकून जातो. त्यामुळे एखाद्या ठिकाणी लावलेली आग सर्व बाजूने वेगाने वाढत जाते. त्यामुळे तीन ते चार दिवस ही आग सतत धुमसत राहते. त्यामुळे जंगलातील वन्यजीव व वनस्पती आगीत खाक होऊन जातात.
जंगलात साग, खैर, शिसव आदी मौल्यवान वनस्पती व विविध औषधी वनस्पती नष्ट होतात. त्याच प्रमाणे छोटे मोठे प्राणी व त्यांची वसतीस्थाने आगीत नष्ट होतात. तर पक्षांची घरटी व पिल्लेही आगीत होरपळून जातात. त्यामुळे जंगालातील वनस्पती प्राणी दिवसेंदिवस नष्ट होत आहेत. त्यामुळे वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर असून जंगलेही बोडकी (उघडी) पडली आहेत. वनविभगाकडून मात्र या आगी रोखण्यासाठी कोणतीही ठोस उपाय योजना राबविली जात नाही. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर

लोकमत)
==============
डहाणूला प्रतीक्षा सुसज्ज रुग्णालयाची
डहाणूत शासनाच्या उदासीन धोरणामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय तसेच उपजिल्हा रूग्णालयात सिटी स्कॅन, सोनोग्राफी, रक्तसाठा, औषधसाठय़ा बरोबरच रूग्णालयात जिल्हापरिषदेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी राहत नसल्याने परिसरातील सुमारे ७० टक्के गोर-गरीब आदिवासी रूग्णांना उपचारासाठी सिल्व्हासा तसेच गुजरात राज्यातील रूग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया कराव्या लागत असल्याने नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त केला जात असून शासनाने डहाणूच्या मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ मध्यवर्ती ठिकाण सुसज्ज रूग्णालय उभे करण्याची मागणी होत आहे.
साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू या आदिवासी बहुल तालुक्यात दोन ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय तसेच नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. परंतु गेल्या अनेक वर्षापासून या रूग्णालयाची स्थिती जैसे थे आहे. येथे बालरोग, स्त्रीरोग, भूलतज्ज्ञ तसेच सिटी

स्कॅन, सोनोग्राफी, एक्सरे मशीन, रक्तसाठय़ा बरोबरच मुंबईच्या तुलनेत अत्याधुनिक सोयी-सुविधा नसल्याने गंभीर आजारी किंवा अपघातात जबर जखमी झालेल्या रूग्णाची जबाबदारी झटकून टाकण्यासाठी त्याला मुंबई-वापी-सिल्व्हासा किंवा वलसाड येथे नेण्याचा सल्ला दिला जातो. परंतु मुंबईचे अंतर लांब असल्याने तेथे पोहोचण्यास उशिर होत असल्याने अनेक वेळा रस्त्यातच रूग्ण मरण पावतो. डॉक्टर सांगतात कुठेही जा, उपचार घ्या!
दरम्यान डहाणूच्या उपजिल्हा तसेच कासाच्या ग्रामीण रूग्णालयात शेकडो आदिवासी रूग्ण उपचारासाठी येतात. मात्र एखाद्या गंभीर आजाराची तपासणी करते वेळी सिटीस्कॅन व सोनोग्राफी खाजगी केंद्रात जाऊन करणे परवडत नसली तरी करून घ्यावी लागते.
त्यामध्ये कर्ज व उसनवारी करण्याशिवाय आदिवासी रूग्णांपुढे दुसरा पर्याय नसतो. कधी कधी डहाणू बाहेर वाहनाव्दारे रूग्णांना नेऊन इतर शहरातील केंद्रात तपासणी करतांना विलंब झाल्यास रूग्णाला प्राणासही मुकावे लागते. मात्र अशी महागडी तपासणी आदिवासी रूग्णांची प्रत्येक वेळी परवडणारी नसते.  यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाने डहाणूत सर्व सोयी-सुविधेने युक्त असे सुसज्ज रूग्णालय बांधण्याची मागणी जोर पकडू लागली आहे. (लोकमत)
==============
विरार : दोन बलात्कारी सावत्र बाप अटकेत
दोन सावत्र बापांनी अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या घटना नालासोपारा शहरात घडल्या असून तुळींज पोलिसांनी दोन्ही घटनेतील आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही घटना एकाच आठवड्यात घडल्या आहेत.
आचोळे येथे राहणार्‍या समीर अन्सारी (४0) याने पहिली बायको मयत झाल्याने दुसरे लग्न केले होते. दुसर्‍या बाकोच्या एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर समीरने गेल्या वीस दिवसात चार वेळा बलात्कार केला होता. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर समीर फरार झाला होता. शनिवारी पोलिसांनी समीरला बेड्या ठोकल्या.
दुसर्‍या एका घटनेत नालासोपारा पूर्वेकडील जबरा कंपाऊंडमध्ये आपल्या दोन बायका आणि बारा मुलांसह राहणार्‍या असलम खान (४७) याने आपल्या एका पंधरा वर्षीय सावत्र मुलीवर गेल्या चार वर्षांपासून लैंगिक अत्याचार केले होते. शुक्रवारी असलमला तुळींज पोलिसांनी अटक

केली होती. पित्याने कन्येवर बलात्कार करण्याच्या घटना अलिकडे वाढीस लागल्या आहेत. (वार्ताहर,.लोकमत)
==============
दप्‍तराचे ओझे शाळांना जाणार जड
मुंबई : प्रतिनिधी, पुढारी
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे, यासाठी शालेय शिक्षण विभागाने कडक पावले उचलली असून यापुढे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे प्रमाणापेक्षा जास्त आढळून आल्यास अशा शाळेला एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा प्राथमिक शिक्षण संचालनालयाचा विचार आहे. संचालनालयाने तसा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शालेय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे तपासण्यासाठी समिती नेमली होती. या समितीच्या अहवालावरून विद्यार्थ्यांच्या पाठिवरचे ओझे घटले की वाढले यासाठीही जिल्हानिहाय समित्या नेमण्यात आल्या होत्या. बहुतांश शाळांत दप्‍तराच्या ओझ्याची परिस्थिती जेैसे थे आहे. यासाठी आता शाळांवर कडक निर्बंध लादले जात आहेत.
विद्यार्थ्याना शाळेत दिली जाणारी पुस्तके, वह्या, डबा, पिण्याच्या पाण्याची बाटली यामुळे मुलांच्या पाठिवरील दप्तराचे ओझे वाढते की पुस्तकांव्यतिरिक्त काही पुस्तके पालकांकडून दिली जातात त्यामुळे दप्तराचे ओझे वाढते, हे पाहाण्याची शाळांची जबाबदारी आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
शरीराच्या वजनापेक्षा दप्तराचे वजन जास्त असल्याने विद्यार्थ्यांना पाठीचे आजार झाल्याचे निदर्शनास आले. याप्रश्‍नी सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून याचिका दाखल केली आहे. न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू असतानाच शिक्षण विभागाने जुलै 2015 मध्येच दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काही उपाययोजना सुचविल्या असून सध्या शाळांमधून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या पाठिवरचा भार हलका झाला आहे का याची तपासणीही केली जात आहे. पण काही शाळा हा विषय गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावर जरब बसावी, यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचा विचार प्राथमिक शिक्षण विभाग करीत आहे.
काही शाळांनी मात्र शिक्षण विभागाने सुचवलेल्या उपाययोजनांची अत्यंत चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामध्ये मुंबई महापालिकेच्या काही शाळांचाही समावेश आहे. अनेक खासगी शाळांमध्ये अभ्यासाच्या तासिका व्यतिरिक्‍त कोणतीही वह्या, पुस्तके आणण्यास सांगितले जात नाही. त्याचबरोबर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी लॉकर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्व वह्या, पुस्तके या लॉकरमध्ये ठेवली जातात. त्यामुळे घर ते शाळा आणि शाळा ते घर असे दप्तराचे ओझे विद्यार्थ्यांना वाहून न्यावे लागत नाही.
==============
मस्जिद बंदर स्थानक चालते, मग राम मंदिर स्थानक का नाही?
मुंबई , पुढारी
 पश्‍चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील जोगेश्‍वरी व गोरेगाव स्थानकांदरम्यान नव्याने उभारण्यात आलेल्या ओशिवरा नजिकच्या स्थानकाला राम मंदिर स्थानक नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयाला विरोध करणार्‍यांसमोर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी प्रश्‍न उपस्थित केला आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर सीएसटी स्थानकानंतरच्या स्थानकाचे नाव मस्जिद बंदर स्थानक आहे. हे नाव मुंबईतील सर्वधर्मियांना चालते. या नावाला कुणी विरोध केलेला नाही मग राम मंदिर स्थानकाच्या नावाला का विरोध केला जात आहे, असा प्रश्‍न त्यांनी केला.
==============
वाढवण बंदराविरोधात मच्छीमार आक्रमक
डहाणू : वार्ताहर , पुढारी
डहाणूच्या सागरी किनारपट्टीवर वाढवण येथे 20 वर्षांपूर्वी रद्द झालेले वाढवण बंदर पुन्हा होणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने या पट्ट्यातील मच्छीमारांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बंदरामुळे पारंपरिक मासेमारी नष्ट होण्याची भीती असल्याने मच्छीमार बांधव हवालदिल झाला असून वाढवण बंदरविरोधातील संघर्ष अधिक तीव्र करण्यासाठी मंगळवारी ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ, ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छीमार संघ आणि महाराष्ट्र मच्छीमार समाज संघाची (उद्या) मंगळवारी पालघर येथे संयुक्त सभा बोलावण्यात आली आहे. यावेळी वाढवण बंदरविरोधी कृती समितीही उपस्थित राहणार असल्याने हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्या दालनात नुकतीच जेएनपीटीचे अधिकारी, मेरीटाईम बोर्ड यांची बैठक झाली. या बैठकीत आमदार आनंद ठाकूर, अमित घोडा, विलास तरे, खासदार चिंतामण वानगा तसेच वाढवण बंदरविरोधी  कृती समितीने  प्रस्तावित बंदराला तीव्र विरोध दर्शवला आहे. तसेच समाज मंदिरात झालेल्या सभेत वाढवण बंदराला विरोध करण्याचा ठराव संमत करण्यासाठी खास ग्रामसभा घेण्यात आली. या वेळी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीचे सचिव व मच्छीमार नेते अशोक अंभिरे, वशिदास अंभिरे, प्रकाश मर्दे, ठकसेन तामोरे, भरत पागधरे, दिनेश मर्दे आणि परिसरातील मच्छीमार नेते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढवण बंदरामुळे परिसरातील 25 गावे बाधित होणार असल्याने गावे-खेडोपाड्यात वाढवण बंदराच्या विरोधासाठी संघर्ष अधिकच पेटत चालला आहे. वाढवण बंदराच्या विरोधासाठी चिंचणी ते डहाणू परीसरातील सर्व गावांतील शेतकरी, बागायतदार, मच्छीमार तसेच ग्रामस्थ एकत्र येऊन बंदराला कडाडून विरोध करू लागले आहेत.
या आंदोलनाची धार आणखी वाढवण्यासाठी मंगळवारी पालघरच्या दर्यासारंग हॉलमध्ये वाढवण बंदर कृती समिती आणि मच्छीमार कृती समितीने संयुक्त सभेचे आयोजन केले आहे.
==============
वसई महापालिकेची २२ कोटींची करवसुली
    ठाणे : मालमत्ता आणि पाणीपट्टी या दोन करांच्या थकबाकीचे तब्बल ३२४ कोटी ५६ लाख रुपये ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका आणि पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महापालिकेने गेल्या केवळ १६ दिवसांत गोळा केले. केंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यावर त्याच नोटांद्वारे थकबाकीवसुलीच्या झालेल्या निर्णयामुळे महापालिकांनी बाळसे धरले आहे. त्यामुळे नागरी कामांकरिता निधी नाही, हे रडगाणे निदान पुढील काही दिवस तरी ऐकावे लागू नये, अशीच नागरिकांची अपेक्षा आहे.
पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महापालिकेने २२ कोटी ९६ लाख रुपयांची करवसुली केली. महापालिकांकडे जमा झालेली ही रक्कम नागरी कामांवर खर्च होणार की, कंत्राटदारांची रखडलेली बिले देण्यावर खर्च होणार, याची चर्चा रंगली आहे.
    पुढील वर्षी ठाणे, उल्हासनगर, भिवंडी या महापालिकांच्या निवडणुका असल्याने तेथील सत्ताधारी पक्ष तिजोरीतील ही रक्कम मुख्यत्वे नागरी सुविधांवर खर्च व्हावी, याकरिता आग्रह धरतील. अन्यत्र कंत्राटदारांची बिले भागवून रखडलेल्या नागरी कामालाच एक प्रकारे गती दिली जाईल, असे अधिकार्‍यांचे मत आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक मीरा-भाईंदर महापालिकेने ७० कोटी ७७ लाखांचा कर वसूल करून विक्रम केला. त्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली मनपाने ६२ कोटी ६७ लाख रुपये, नवी मुंबई मनपाने ५७ कोटी ६६ लाख, ठाणे मनपाने ५१ कोटी ७५ लाख, उल्हासनगरने मनपाने ३७ कोटी १८ आणि भिवंडी-निजामपूर मनपाने २१ कोटी ५५ लाख रुपयांची करवसुली केली.
    राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांकरिता थकबाकीदार ही मोठी डोकेदुखी असून कराच्या वसुलीकरिता थकबाकीदारांच्या घरासमोर बॅण्डबाजा वाजवणे, तृतीयपंथीयांना नाचवणे येथपासून मालमत्ता जप्त करून लिलाव करण्यापर्यंतचे अनेक उपाय केले गेले. मात्र, त्या उपायांनाही धूप न घालणाऱ्या गेंड्याच्या कातडीच्या थकबाकीदारांनी आपल्याकडील पाचशे-हजाराच्या नोटा वर्षअखेरीस कागदाचे कपटे होणार म्हटल्यावर राज्यातील सर्व महापालिकांच्या तिजोरीत मिळून एक हजार ४०० कोटी ७७ लाखांचा करभरणा केला. यामध्ये अर्थातच काही छोट्या राज्यांएवढा अर्थसंकल्प असलेल्या बृहन्मुंबई महापालिकेने ४८९ कोटी ६१ लाख रुपयांची प्रथम क्रमांकाची वसुली केली. त्या खालोखाल राज्यात द्वितीय क्रमांकाची म्हणजे ३०१ कोटी ५८ लाखांची विक्रमी करवसुली ठाणे जिल्ह्यातील सहामहापालिकांनी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच महापालिकांना थकबाकीदारांची डोकेदुखी सतावत असून उल्हासनगर व भिवंडी या दोन महापालिकांत शेकडो कोटी रुपयांची थकबाकी आहे. (प्रतिनिधी , लोकमत)
==============
वसईत बलात्काराचे तीन गुन्हे दाखल
वसई : वार्ताहर, पुढारी
 लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याचे तीन गुन्हे वसई उपविभागीय पोलीस हद्दीतील विरार, नालासोपारा आणि तुळींज पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. विरार पूर्वेकडील एकतानगर येथील 31 वर्षीय विवाहितेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर 2012 ते 2016 या कालावधीत बलात्कार करून नंतर विवाहास नकार देणार्‍या अनुज कपाडीया या तरुणा विरोधात विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे शहरातील कोपरी परिसरातील आनंदनगर येथे राहणार्‍या 24 वर्षीय तरुणीला नालासोपारा येथील आचोळे आंबेडकर नगर येथील श्रेयस ललिम देवरूखकर याने लग्नाचे आमिष देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पीडितेने लग्नासाठी विचारणा केली असता श्रेयसने लग्नास नकार दिल्याने अखेर पीडितेने तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.
याशिवाय नालासोपारा पूर्वेकडील हरे राम हरे कृष्णा चाळीत राहणार्‍या एका वीस वर्षीय तरुणीला पिंटू राम गौतम याने लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानेही लग्नास नकार दिल्याने पीडितेने पिंटूविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
==============
सीकेपी बँकेत 7 कोटींचा घोटाळा उघडकीस
ठाणे : प्रतिनिधी , पुढारी
दिवाळखोरीत निघालेल्या सीकेपी बँकेच्या लोकपूरम शाखेतील 6 कर्मचार्‍यांनी आणि एका खातेदाराने मिळून 7 कोटींचा घोटाळा 2011 ते 2014 या कालावधीत केल्याचे उघड झाले आहे. या कर्मचार्‍यांनी बँकेत बोगस खाती उघडून त्याद्वारे मंजूर क्रेडिट कार्ड रक्कमेच्या मर्यादेपेक्षा जास्त उचल घेऊन तसेच संगणकामध्ये फेरफार करून 6 कोटी 92 लाख 19 हजार 47 रुपये इतक्या रक्कमेचा गैरव्यवहार केला. याप्रकरणी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    सीकेपी सहकारी बँक ही देशातील जुनी नागरी सहकारी बँक म्हणून ओळखली जाते. मात्र ही बँक गेली दहा वर्षे संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभारामुळे दिवाळखोरीच्या उंबरठयावर गेली आहे. त्यामुळेच आयुष्याची पुंजी ज्यांनी मुलां-मुलींचे विवाह, म्हातारपणातील विकारांचे उपचार, उदरनिर्वाह यासाठी ठेवली होती त्या सामान्य ठेवीदार व खातेदारांची रक्कम या बँकेत अडकली आहे. या बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी या पूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल झालेले असतांना आता ठाण्यातील लोकपूरम शाखेती आणखी एका गैरव्यवहार समोर आला आहे.

बँकेच्या लोकपूरम शाखेतील कर्मचारी अंजली पिसाळ, चंद्रशेखर कर्वे, उन्नती ठोंबरे, सतीश जांभळे, विकास कुबल, नरेंद्र जाधव आणि खातेदार सत्येन सालवा या मंडळींनी मिळून बँकेत बोगस खाते उघडले.
या बोगस खात्याअंतर्गत क्रेडिट कार्ड मिळवून मंजूर रक्कमेच्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढली. तसेच संगणकामध्ये फेरफार करून इतरही खातेदारांच्या खात्यातून रक्कम काढून त्यांचा अपहार केला. हा सर्व घोटाळा 6 कोटी 92 लाख 19 हजार 47 रुपये इतक्या रक्कमेचा असून 2011 ते 2014 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी राजेंद्र फणसे (54) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
==============
बँक खात्यातून रेल्वेचा पास!
प्रतिनिधी, मुंबई, लोकसत्ता
प्रवाशांना ‘ईसीएस’ चा नवा पर्याय उपलब्ध; घरपोच पास मिळण्याचीही सुविधा
दिवसेंदिवस उपनगरीय रेल्वे स्थानकांवर तिकिटांची गर्दी वाढत चालली असून त्यावर उपाय म्हणून काढण्यात आलेल्या एटीव्हीएम यंत्रानेदेखील तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी झालेल्या नाहीत. या तिकीट खिडकीवरील गर्दी कमी करण्यासाठी आता रेल्वेने एटीव्हीएम कार्डाच्या वापराप्रमाणेच बँक खात्यातून ईसीएसच्या साहाय्याने पास काढण्याची सुविधा देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे तिकीट काढण्यासाठी अजून एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
रेल्वे स्थानकांवर एटीव्हीएमसह अन्य पर्याय उपलब्ध झाल्यानंतरही तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी होत नसल्याची हल्ली प्रमुख तक्रार आहे. रेल्वेलादेखील एटीव्हीएम यंत्रामध्ये असणाऱ्या त्रुटी, मोबाइल अ‍ॅपवरून कमी प्रमाणात होणारी तिकीट विक्री आदी विविध कारणांमुळे तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करणे कठीण ठरले आहे. त्यासाठीच रेल्वेने डेबिट कार्ड, ईसीएच्या साहाय्याने पासविक्रीचा पर्याय उपलब्ध करण्याचा मानस रचला आहे. प्रवाशांना ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावरून डेबिट कार्डाच्या साहाय्याने मासिक पास काढण्याची सुविधा मिळू शकेल.
‘सेंटर फॉर रेल्वे इन्फॉम्रेशन सिस्टीम’ (क्रिस)ने या पद्धतीने तिकीट देण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून केवळ स्मार्ट कार्डावर अवलंबून न राहता प्रवाशांना दुसरेही पर्याय मिळण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे ‘क्रिस’च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रवाशांना घरपोच पास मिळण्यासाठी ईसीएस पद्धतीचा अवलंब करण्यावरही भर दिला जात आहे. त्यासाठी, प्रवाशांनी तिकीट खिडकीवर घराचा पत्ता नोंदवणे आवश्यक असून त्यानंतर ईसीएसच्या साहाय्याने पास काढणे शक्य होऊ शकेल. त्यानुसार, प्रवाशांना १३९ क्रमांकावरून पास संपण्याच्या १० दिवस अगोदर एसएमएस मिळणार आहे. ईसीएसच्या साहाय्याने मासिक, त्रमासिक, अर्धवार्षकि, वार्षकि पास काढण्याचा पर्याय राहणार आहे. ईसीएससाठी प्रवाशांनी संमती दिल्यानंतर बँकेच्या खात्यातून पासाची रक्कम वळती केली जाऊन पासधारकास त्याचा पास घरपोच मिळण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
डेबिट कार्डच्या साहाय्याने मोबाइल तिकीट
डेबिट वा क्रेडिट कार्डाच्या साहाय्याने कोणत्याही एटीव्हीएमवरून दैनंदिन तिकीट वा पास घेणे शक्य होण्याचा उद्देश त्यातून साध्य होईल. त्यासाठी ‘क्रिस’कडून स्टेट बँक ऑफ इंडियाशी प्राथमिक चर्चा सुरू असून या पद्धतीने तिकीट, पास विक्रीसाठी यंत्रे पुरवण्यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचे सांगितले जाते.  डेबिट कार्डाच्या साहाय्याने मोबाइल तिकीटही काढता येईल यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.
==============

सविस्तर वृत्त http://www.palgharlive.com/2016/11/blog-post_79.html

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home