Monday, November 7, 2016

पालघर वार्तापत्र ०७ नोव्हेंबर

पालघर वार्तापत्र ०७ नोव्हेंबर 

 ==================
रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई
वसई तालुक्याच्या आठ बंदरांतून बेकायदेशीरपणे वाळू उपसा होत आहे. शनिवारी वैतरणा पुलाची पाहणी करण्यासाठी गेलेले पालघरचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना तो प्रकार दिसताच त्यांनी कारवाई सुरू केली. या कारवाईत रेती उपसा करण्यासाठी वापरले जाणारे दीडशे सक्शन पंप तसेच ६० हून अधिक बोटी जप्त करण्यात आल्या. मात्र केवळ जप्तीची कारवाई न करता जिल्हाधिकाऱ्यांनी कटरने या बोटी तोडण्यास सुरुवात केली.
रविवारी सकाळी दहाच्या सुमारास मोठय़ा संख्येने रेती उत्पादक विरारच्या खानिवडे नाक्यावर जमले आणि त्यांनी मुंबई अहमदाबाद महामार्ग रोखून धरला. बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बळीराम जाधव यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. सुमारे दोन तास रास्ता रोको केल्यानंतर पोलिसांना आंदोलकांचे मन वळविण्यात यश आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी होऊन शेकडो वाहने खोळंबून पडली होती. रेती उत्पादक हे स्थानिक भूमिपुत्र आहेत. त्यांच्यावर अन्याय होत असल्याने मी आंदोलनाचे नेतृत्व केल्याचे माजी खासदार बळीराम जाधव यांनी सांगितले. ही कारवाई सुरूच राहिली तर पालघर बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला.
_.तर अधिकाऱ्यांवरही कारवाई करा_
जवर पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांना मॅनेज केले जात असल्याने ही कारवाई दिखाऊ असेल असा कयास होता. परंतु थेट बोटी नष्ट होऊ लागल्याने रेती उत्पादक बिथरले. पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांना आम्ही पैसे देतो मग आमच्यावर कारवाई का? असा सवाल करत त्यांच्यावरही कारवाई करा, अशी मागणी आंदोलकांनी केली. (लोकसत्ता)
==================
स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीसाठी २७ नोव्हेंबरला रास्ता रोको
स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीसाठी मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई या सहा ठिकाणी २७ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. त्याला सर्वानी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटना अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले आहे.
आर्थिक मागास असलेल्या कोकणात पूर्वी शासकीय, निमशासकीय नोकऱ्यात ८० टक्के स्थानिकांना संधी मिळायची, पण आता कोकण शैक्षणिक, औद्योगिक, शेती-बागायती अशा सर्वच क्षेत्रात मागास राहिले असून, नोकऱ्यादेखील ९० टक्के घाटमाथ्यावरील बेरोजगारांना मिळतात तसेच अधिकारी घाटमाथ्यावरील असल्याने नोकऱ्यांची खरेदी-विक्रीदेखील होत आहे, असे प्रा. नाटेकर यांनी म्हटले आहे. कोकणातील तरुण बेरोजगार बनला असून देशोधडीला लागला आहे. कोकणावर सतत अन्याय होत असल्याने कृषी, शैक्षणिक, औद्योगिक, पर्यटन, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात कोकण पिछाडीवर आहे. त्यामुळे स्वतंत्र कोकण राज्य निर्माण झाले तरच कोकण आणि कोकणी जनतेचा आर्थिक विकास होणार आहे, असे प्रा. महेंद्र नाटेकर यांनी म्हटले आहे.
(लोकसत्ता)
==================
‘न पेटणारी झोपडी’ गेली राष्ट्रीयस्तरावर
शशिकांत ठाकूर, कासा, लोकमत
डहाणू तालुक्यातील चंद्रनगर जिप शाळेच्या ‘न पेटणारी झोपडी’ या प्रकल्पाची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. आदिवासी जीवन शैलीवर आधारीत विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा प्रकल्प १३ ते १९ डिसेंबर दरम्यान बंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात
मांडला जाणार आहे.
तालुक्यातील चंद्रनगर या शाळेचा न पेटणारी झोपडी हा प्रकल्प पालघर जिल्हा परिषद आयोजित विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक मिळवून बारामती येथील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी पाठविण्यात आला होता. त्यातून या प्रकल्पाची राष्टीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रीय विज्ञान संस्था नागपूर यांनी वर्षभरात वेगवेगळया तपशिलामध्ये माहिती मागविली होती. त्या माहितीचा शाळेतील पदवीधर शिक्षक शैलेश राऊत यांनी पाठपुरावा केला त्या त्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी
दिल्ली मार्फत बंगलोर येथे होणाऱ्या २०१६ राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात त्याची सादरीकरणासाठी महाराष्ट्रातून निवड झाली आहे. राष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी होणारी पालघर जिल्हयातील चंद्रनगर ही पहिली शाळा आहे. आदिवासी विद्यार्थीनी नम्रता भुसारा हिने हा प्रकल्प तयार केला असून प्रदर्शनीय वस्तूची मांडणी व मार्गदर्शन शाळेतील शिक्षक लहानू वरगा, जगन धोडी, व शैलेश राऊत यांनी केले आहे. या प्रकल्पाचे आदिवासी जीवनशैलीतील अत्यंत महत्वपूर्ण असणारी गवताची झोपडी हा घटक असून तिच्यावर युरिया खत व पाणी यांचे मिश्रण
फवारले आहे. या मिश्रणाचा आगीशी संपर्क आल्यास वाढणाऱ्या तापमानामुळे अमोनिया वायू तयार होतो. अमोेनिया वायूमुळे ज्वलनास लागणारा आॅक्सिजन आगीपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे झोपडीचा आगीपासून बचाव होतो.
या वैज्ञानिक तत्वावर हा प्रकल्प आधारीत आहे. हा प्रकल्प जंगलात लागणारे वणवे व त्या वणव्यात मृत्यूमुखी पडणारे आदिवासी बांधव, त्यांचे सर्वस्व असणारी झोपडी जळून खाक होते त्यामुळे नैराशाने तयांची प्रगती खुंटते असे वास्तव चित्र सदर प्रकल्पात उभारले आहे. सर्वस्तरातून या शाळेचे कौतुक होत आहे.
==================
नवरा आला गं, दादा, दारू ला जबाबदार कोण?
आरिफ पटेल, मनोर, लोकमत
सध्या आर.टी.ओ.च्या आशीर्वादाने वाहनांना आपल्या पसंतीच्या वाहन मालकांना नंबर दिले जातात मात्र त्या नंबर ने नवरा आला गं, दारू, दादा अशा प्रकारे नंबरप्लेट लावून गाड्या सुसाट वेगाने फिरतात मात्र पोलीस व आर टी ओ बघे झाले आहेत.
नवीन वाहन घेतले की, २०/ २५ हजार जास्त पैसे देऊन आपल्या पसंतीची अक्षर जुळतील असा नंबर घेऊन व आपले डोके वापरून पेंटर कड्ून एम.एच.२३ जी. त्याच्या नवरा खाली आला गं, एम.एच. ०१ पी.पी. दारू असे काहीही लिहले जाते. एका वाहनावर लिहीले होते दादा
असे अनेक फॅन्सी नंबर कार, जीप गाड्यांवर लिहीलेले आहेत. त्या रस्त्यावरून पोलीस व आरटीओच्या समोरून जा ये करतात त्या वाहनांना बघून अधिकारी हसतात, एकमेकाला दाखवतात. मात्र त्यांना अडवून कारवाई करत नाही असे नंबर टाकून कायद्याची पायमल्ली होत आहे अशी वाहने अपघात करून पळून गेली तर त्या वाहनाचा नंबर कसा शोधायचा असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. नवरा, दारू, दादा म्हणजे कोणता नंबर? अशा फॅन्सी नंबर प्लेट मिरविणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी आहे.
पालघर हा सागरी आणि गुजरातच्या सीमेलगतचा जिल्हा आहे. येथे अणुऊर्जा प्रकल्प आहे, रिलायन्सचा प्रकल्प आहे. तारापूर येथे तसेच बोईसरला अवाढव्य एमआयडीसी आहे. अशा स्थितीत दहशत वादी आणि अतिरेकी यांचा धोका असताना अशा नंबर प्लेटस कशा काय? वापरू दिल्या जातात. त्याचा फायदा घेऊन जर कुणी घातपात घडवला तर त्याची जबाबदारी टाकणार कोणावर?
==================
मनोर : वनराई बंधार्‍यामुळे पाणी पातळी वाढल्याने ग्रामस्थ समाधानी
वनविभाग व वनव्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वनराई सिमेंट बंधार्‍यात पावसाळी पाणी साचल्याने घानेघर, नीव, दापचरी परिसरातील विहिर कूपनलिका व तलावात पाण्याची पातळी वाढली असून तेथील ग्रामस्थ, शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
उन्हाळ्यात मार्च महिन्यांपासून घानेघर नवीदापचरी परिसरात पाणी टंचाई सुरु होते याची दखल वनव्यवस्थापन समिती व मनोर वन क्षेत्नपाल विभागाने दखल घेऊन घानेघर गावाच्या हद्दीत वाहणार्‍या ओहळात सिमेंट बंधारा बांधून पाणी अडवले आहे. त्या पाण्याने परिसरातील विहीर, कूपनलिका, तलावांची पाण्याची पातळी वाढली असून यंदा परिसरात पाणी टंचाई भासणार नाही, असे एस पी मांगदरे वनपाल यांनी सांगितले. सध्या बंधार्‍यात पाणी असल्याने गुरे, प्राणी, पक्षी आपली तहान त्यावर भागवितांना दिसत आहेत. गाव पाड्यातील महिला कपडे धुण्यासाठी त्याचा आधार घेत आहेत. पाण्यासाठी महिलांना यंदा पायपीट करावी लागणार नाही. यामुळे आता याच प्रयोगाचे अनुकरण सर्वत्र केले जावे, अशी जनतेकडून मागणी होत आहे. (वार्ताहर,लोकमत)
==================
निधीसाठी ठेकेदारांचे जि.प. समोर उपोषण
हितेन नाईक, पालघर, लोकमत
ठाणे जिल्हा परिषदेने पालघर जिल्ह्यातील १७० विहिरी खणण्यासाठी मंजूर केलेला तीन कोटी रुपयांचा निधी जिल्हा रोखून ठेवल्याच्या निषेधार्थ ठेकेदारांनी पालघर जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
ठाणे जिल्हा परिषदेकडून १७० विहिरी खणण्याची कामे सुरूही करण्यात आली होती. प्रत्येकी विहीरी मागे सुमारे आठ ते दहा लाख रुपये या हिशेबाने या कामाची रक्कम पालघर व ठाणे जिल्हा परिषदेकडून देण्यात ही आली होती. तदनंतर या १७० विहिरींचे काम पूर्ण होऊन देखील या कामाचे सुमारे तीन कोटी रुपये देण्यास विलंब केला जात आहे. त्यामुळे ठेकेदार आर्थिक कोंडीत सापडले आहेत. काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतींच्या स्तरावरून ई निविदा काढण्यात अडचणी निर्माण झाल्याने तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी विहिरींची कामे तात्काळ होणे आवश्यक असल्याचे कारण देत या कामांच्या ग्रामपंचायतींच्या स्तरावरून खुल्या निविदा काढण्याचे निर्देश दिले होते. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गाव, पाड्यात ही कामे करण्यात येणार असल्याने पाण्याची आवश्यकता पाहता ही कामे त्वरीत सुरु करण्याचे निर्देश ठेकेदारांना देण्यात आले होते. त्याप्रमाणे ठेकेदारांनी आपली कामेही पूर्ण केली होती. त्या प्रमाणे या कामाचे काही हप्ते पूर्वी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी असलेल्या (कॅफो) संजय तरंगे यांच्या कार्यकाळात देण्यातही आले होते. मात्न तरंगे हे पालघर जिल्हा परिषदेत बदली वर कार्यरत झाल्या नंतर मात्न त्यांनी पुढील उर्वरीत हप्ते सुरळीतपणे देण्या ऐवजी रोखून धरल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी या प्रक्रियेत खोडा घातल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेने या कामातील काही हप्ते दिले असतांना पालघर जिपत मात्न वेगळी प्रक्रिया का?
कामे मिळवितांना आम्ही बँकांची कर्जे, नातेवाईकांना कडून उधार, उसनवारी करून भांडवल उभे केले आहेत. आमची बिलेच मागील दिड वर्षापासून थकविण्यात आल्याने आमच्या मागे पैसे देणार्‍यांचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे ठेकेदार आर्थिक कोंडीत सापडले आहेत. जर या ठेक्याची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देत आमच्याकडून चुकीची कामे करवून घेणार्‍या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक लेखाधिकारी, वरिष्ठ लेखाधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असतांना त्यांचे पगार मात्न वेळेवर सुरु आहेत. मग ई टेन्डरिंग प्रक्रि या न राबविता पेपर टेन्डरिंग प्रक्रिया राबविण्यात आली असेल तर त्याची शिक्षा फक्त ठेकेदारांनाच का? असा सवाल आहे. (वार्ताहर,लोकमत)
काय आहे वस्तुस्थिती?
पालघरच्या सीओ निधी चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता ही बिले अदा करण्याची प्रक्रि या ३-४ वर्षा पूर्वीची आहे. मी पाच महिन्यांपूर्वी चार्ज घेतला आहे. वरील कामे ही ई टेंडरिंगने मंजूर करण्याचे निर्देश असताना ती पेपर टेंडरने करण्यात आली आहेत. ही अनियमितता असून शासनाकडे ही प्रकरणे मार्गदर्शनासाठी पाठविण्यात आली आहेत. त्याचा पाठपुरावाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
==================
जव्हार : भाज्या झाल्या एकदम स्वस्त
सध्या सणवार संपल्याने मागणी घसलेली व आवक वाढलेली त्यामुळे भाज्यांचे दर मोठय़ा प्रमामात घसरले आहे.
उत्तम भाजी १० रु. पाव, या भावाने उपलब्ध आहे. काही भाज्या तर खपत नसल्याने त्या परत नेण्याचा खर्च परवडत नसल्याने वजनी विक्री करण्याऐवजी त्यांचे मोठमोठे वाटे करून त्या विकल्या जात आहेत. यामुळे खवय्यांची मात्र चंगळ होते आहे. डाळीच्या महागाईवर भाज्यांच्या स्वस्ताईचा हा तोडगा सामान्यांना मात्र चांगलाच सुखावणारा ठरतो आहे. त्यामुळे अनेक घरांत दोन्ही वेळेस दोन-दोन भाज्या होत आहेत. (वार्ताहर,लोकमत)
==================
विक्रमगड : साखरे येथील पूलाच्या बांधकामास सुरुवात
विक्रमगड-जव्हार या मुख्य रस्त्या लगत साखरे गावानजिक पूल असून या पूलाची दयनीय अवस्था झाली आहे. हा पूल उंचीला ही कमी व धोका दायक असल्याने या मुख्य रस्त्यावर दुसर्‍या पूलाची मागणी करण्यात आली होती. या मागणीचा विचार करून या साखरे पूलाला मंजूरी देण्यात आली असून या पूलाचे काम सुरू झाले आहे. या पूलामुळे पासाळयात होणार्‍या गैरसोयी टाळता येणार आहे. तसेच नवीन पूलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असून हा पूल वेळेत पूर्ण के व्हा होईल याकडे बांधकाम खात्याने लक्ष द्यावे, अशी
मागणी आहे. (वार्ताहर,लोकमत)
==================
कासा रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता
या तालुक्यातील डहाणू कॉटेज रुग्णालय आणि कासा उपजिल्हा रुग्णालय या प्रमुख रुग्णालयातील डॉक्टरांची, टेक्निशियन्सची रिक्त पदे, प्रतिनियुक्तीवरील नियुक्ती तसेच नादुरुस्त रुग्णवाहीका यामुळे डहाणूची आरोग्य सेवा सलाईनवर आहे.
पालघर विधानसभेचे आमदार अमित घोडा यांनी शुक्र वारी कासा उपजिल्हा रु ग्णालयाची पाहणी केली. त्यामध्ये रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, रुग्णवाहिका, प्रतिनियुक्तीवर गेलेले वैद्यकीय अधिकारी, या विषयावर डॉ. प्रसाद तरसे, डॉ मुकणे यांच्याशी चर्चा केली आदिवासी गोरगरीब जनतेला आवश्यक वैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी मिळवून देण्याबाबत सूचना केल्या. यावेळी कासा सरपंच रघुनाथ गायकवाड, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आप्पा भोये, डहाणू तालुका प्रमुख संतोष वझे, चारोटी उपसरपंच प्रणय मेहेर, महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख, उपस्थित होते.
कासा उपजिल्हा रुग्णालयाला एकूण ८ आरोग्य केंद्र जोडण्यात आलेली आहेत. महामार्गालगतच्या या उपजिल्हा रुग्णालयाला एकूण ३ रु ग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. मात्न त्यापैकी २ नादुरुस्त आहेत. एकाच रुग्णवाहिकेवर भार आहे. त्यामुळे नजिकच्या सोमटा केंद्रात असलेली रुग्णवाहिका कासा उपजिल्हा रुग्णालयाला उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. कासा येथे वाहनचालक हे पद मंजूर नाही. कंत्नाटी पद्धतीने ५ कामगार काम करीत असून त्यांचेही वेतन वेळेवर दिले जात नाही. त्यामुळे कासा येथे इमारती आहेत. पण डॉक्टरांअभावी रूग्णसेवा सलाईनवरच आहे. कासा उपजिल्हा रुग्णालयाला जनरल सर्जन नाही त्यामुळे एकही शस्त्नक्र ीया होत नसल्याने ग्रामीण रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा म्हणण्याची वेळ आली आहे.
डहाणूच्या दोन्ही रुग्णालयात मोठ्या आजारांवर शस्त्रक्रिया होत नाहीत. दाखल केलेल्या रुग्णांना सिल्व्हासाचे विनोबा भावे रुगणालय किंवा बापू रूग्णालयात नेण्यात येते. त्यामुळे डहाणू, कासा येथील रूग्णालये असून अडचण नसून खोळंबा असे म्हणण्याची वेळ आली आहे. (लोकमत)

================

सविस्तर वृत्त http://www.palgharlive.com/2016/11/blog-post_7.html

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home