Saturday, November 5, 2016

पालघर वार्तापत्र ०५ नोव्हेंबर

*पालघर वार्तापत्र ०५ नोव्हेंबर*
================================================
*वसई पंचात समिती सभापतींचे पद धोक्यात*
*कोकण आयुक्तांकडे प्रस्ताव सादर : पदावरून दूर करण्याची मुख्याधिकार्‍यांची शिफारस*
_शशी करपे,लोकमत, वसई_
आपल्या पदाचा गैरवापर करून पतीला अर्नाळा आणि पाणजू येथील जलवाहतूकीचा ठेका मिळवून दिल्याप्रकरणी वसई पंचायत समितीच्या सभापतींना पदावून दूर करण्याची शिफारस पालघर जिल्हा परिषदेच मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी कोकण आयुक्तांना केली आहे. त्यामुळे वसईच्या सभापतींचे पद धोक्यात आले आहे.
वसई पंचायत समितीच्या सभापती चेतना चंद्रकांत मेहेर यांचे पती चंद्रकांत मेहेर यांना अर्नाळा ते अर्नाळा किल्ला आणि नागाव बंदर ते पाणजू दरमन जलमार्गावर प्रवाशी वाहतूक करणचा ठेका मिळाला आहे. विशेष म्हणजे हा ठेका २३ मार्च २०१५ रोजी सभापती चेतना मेहेर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. तसेच ठेका पोटी भरणा केलेली रक्कम चंद्रकांत मेहेर यांच्या नावानेच ठाणे जिल्हा मध्वर्ती बँकेत भरण्यात आली होती. त्यानंतर ठेका मंजुरीबाबत गटविकास अधिकारी व उपविभागीय अभियंता, बांधकाम पंचायत समिती वसई यांनी कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग जव्हार यांना ठेका मंजुरी बाबतचा प्रस्ताव पाठवलेला होता. सभापतींना आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या पतीचा पंचायत समितीचा ठेका मिळवून दिल्याने त्यांना सभापतीपदावरून दूर करावे अशी मागणी आमदार आनंद ठाकूर यांनी जिल्हा परिषदेकडे केली होती. त्यानंतर ठपका ठेवण्यात आला आहे. निधी चौधरी यांनी मेहेर यांना सभापतीपदावरून दूर करण्याबाबतचा अहवाल पाठवला आहे.
_मुख्याधिकार्‍यांनी अहवालात काय दिले_
आपल्या अहवालात चौधरी यांनी मेहेर यांच्यावर दोन ठपके ठेवले आहेत. मेहेर अर्नाळा किल्ला ग्रामपंचातीच्या सदस्या होत. पंचायत समितीत निवडून गेल्यानंतर त्यांनी ग्रामपंचात सदस्य पदाचा राजीनामा तब्बल सहा महिन्यांनी दिल्याचा ठपका चौधरी यांनी ठेवला आहे. तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १६ (झ) अन्वये तसेच कलम २७७ अन्वये सभापती चेतना मेहेर यांनी त्यांचे पती चंद्रकांत मेहेर यांच्या नावाने ठेक्याचा निमबाह्य लाभ घेतला असल्याने मेहेर या दोषी असून महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम ७३ अन्वये सभापती चेतना मेहेर याच्या विरुद्ध पदावरून दूर करण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येत असल्याचे चौधरी यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. मेहेर यांना पदावरून दूर करण्याची शिफारस जिल्हा परिषदेने कोकण आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांची भेट घेऊन मेहेर यांना पदावरून ताबडतोब दूर करावे अशी मागणी केली आहे. देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या अहवालानुसार कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे पदाचा गैरवापर करणार्‍या मेहेर यांची बडतर्फी अटळ आहे. - आनंद ठाकूर, आमदार
================================================
*वारली चित्रे पोहोचणार जपानला*
शुभम पाटील, महाराष्ट्र टाइम्स, ठाणे
कलेला सीमेच्या मर्यादा नसतात, असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय डहाणूतील तरुणांना आला आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू-गंजाड येथे राहणाऱ्या वायेडा बंधूंना जपानमधील कला संघटनांनी वारली चित्रशैली दाखवण्यासाठी आमंत्रित केले आहे. यामुळे दोन देशांमधील सांस्कृतिक बंध दृढ होण्यास मदत होणार आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू-गंजाडमधील तुषार वायेडा आणि मयूर वायेडा हे गेल्या अनेक वर्षांपासून वारली चित्रे काढतात. भारतातील अनेक ठिकाणी यांच्या वारलीचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यात लेह-लडाखपासून कन्याकुमारीपर्यंतच्या अनेक ठिकाणांचा समावेश आहे. येत्या काळात भारतातील लुप्त होत चाललेल्या वारली चित्रशैलीसाठी भरीव कामगिरी करत तिच्या संवर्धनासाठी तसेच, जागतिक पातळीवर या चित्रशैलीला प्रसिद्ध मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मयूर यांनी केले.
वायेडा बंधू जपानला रवाना झाले असून ५ ते २३ नोव्हेंबरपर्यंत त्यांचा तिथे मुक्काम असणार आहे. या कालावधीत जपानमधील विविध ठिकाणी चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. टोकियोमधील गाकुगेई विद्यापीठ आणि इनिवाशिरोमधील यामागाटा शाळेत वारली चित्रशैलीवर तुषार आणि मयूर यांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहे. टोकियो आणि इनिवाशिरो या दोन शहरांच्या भेटीदरम्यान येथील पुरातत्त्व मंदिरे-संस्कृतीचा अभ्यास करून येथील लोककथांवर आधारित वारली चित्रे काढणार असल्याची माहिती तुषार आणि मयूर यांनी दिली. वारलीचित्रांना हक्काचे व्यासपीठ नसल्याची खंत व्यक्त होत असतानाच, परदेशात या कलेला स्थान मिळत असल्याने आनंद व्यक्त होत आहे.
================================================
*पालघर : दुगारी आळीच्या किल्ला आला पहिला*
सोमवंशी क्षत्रिय पाच कळशी हितवर्धक मंडळ माहीम यांनी दीपावली निमित्त आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक दुगारी आळीच्या किल्ल्याला मिळाला. द्वितीय क्रमांक फारोडी आळी, तृतीय रेवाळे तर उतेजनार्थ तांबळाई, संगम रेवाळे, वारेख यांना देण्यात आला. आकाशकंदील व क्रीडा स्पर्धांनाही मोठा प्रतिसाद मिळाला. माहीम येथे दीपोत्सव २०१६ मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धा, रांगोळी, चित्नकला, शिवकालीन किल्ले उभारण्याच्या स्पर्धा पार पडल्या. तसेच वाडळवडी खाद्य जत्ना व बाजारपेठचे आयोजन करण्यात आले होते बाजारपेठेचे उद्घाटन माहीमच्या संरपंच निलम राऊत यांचे हस्ते झाले व क्रीडा स्पर्धाचे उद््घाटन जयंत वर्तक यांचे हस्ते झाले. (लोकमत,प्रतिनिधी)
================================================
*वरसावे पूलावरील वाहतूक होणार पूर्णपणे ठप्प*
_ऑनलाइन लोकमत/राजू काळे_
भाईंदर, दि. 04  -  मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक 8 वरील उल्हासनदीवर 43 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या वरसावे पूलाची  दुरुस्तीवर अखेर पडदा पडला असून दुरुस्तीला 15 नोव्हेंबरपासून सुरुवात करण्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) घेतला आहे. या दुरुस्ती दरम्यान पुलावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होणार आहे. त्यामुळे वरसावे वाहतूक बेटावर प्रचंड वाहतूक कोंडी उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाड येथे घडलेल्या पूल दुर्घटनेमुळे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील एनएचएआयने बांधलेल्या जुन्या पुलांचे स्ट्रक्टरल ऑडिट करण्यास सुरुवात केली. त्यापैकी मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक 8 वरील वरसावे पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटला 3 सप्टेंबरपासून सुरुवात केली. गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या अहवालात पुलाच्या वरसावे बाजूकडील चौथ्या क्रमांकाच्या 114 मीटर लांबीच्या गर्डरला तीन तडे गेल्याचे नमूद करण्यात आले. परंतु, एनएचएआय तसेच पुलाचे बांधकाम करणाऱ्या गॅमन इंडिया या कंपनीकडे पुलाचा मास्टर प्लान उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. तत्पूर्वी 2013 मध्ये एका गर्डरला गेलेल्या तड्याची दुरुस्ती करणाऱ्या आयडियल रोड बिल्डर (आयआरबी) कंपनीकडेही पुलाचा बांधकाम नकाशा प्राप्त न झाल्याने पुलाची दुरुस्ती नेमकी कशी व कुठून करायची, असा यक्ष प्रश्न एनएचएआयसमोर उभा राहिला. गेल्या 22 सेप्टेंबरपासून सुरु असलेला नकाशाचा शोध मोहिमेत सुमारे 200 हुन अधिक नकाशे  प्राप्त  झाले. त्यापैकी केवळ 10 ते 12नकाशेच फायदेशीर ठरले. यानंतरही दुरुस्ती कशापद्धतीने करायची यावर घोडे अडले. या दुरुस्तीच्या जरतर मध्ये एनएचएआयच्या सूचनेनुसार या पुलावरील अवजड वाहतूक गेल्या दिड महिन्यांपासून बंद करण्यात आल्याने पुलाच्या दोन्ही बाजूस मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ठराविक अंतराने एका बाजूची वाहतूक सोडण्यात येत असल्याने वाहनांना सुमारे दिड ते दोन तास वाहतूक कोंडीत खोळंबून रहावे लागत आहे. यावर पर्याय म्हणून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवरील दापचरी, नाशिकरोड, वाडा -भिवंडीरोड आदी ठिकाणी गुजरात व मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहने टप्प्या-टप्प्याने सोडण्याकरिता वाहनतळ निर्माण केली. त्यामुळे वाहतूक कोंडीचे नियोजन काही अंशी सुसह्य झाल्याचे एनएचएआयच्या सुत्रांकडुन सांगण्यात येत आहे. दरम्यान भारतातील पूल तज्ञ डॉ. वीरेंद्र कुमार रैना यांच्या पथकाने केलेल्या तपासणीअंती एनएचएआयने ब्रिटनमधील मेसर्स रॅम्बोल या बांधकाम कंपनीला पुलाच्या दुरुस्तीचे कंत्राट दिले. या कंपनीच्या तज्ञांनी3 ऑक्टोबरला पुलाची तपासणी करून  आयआरबीला सल्लागार म्हणून नियुक्त केले. दुरुतीचा निर्णय अंतिम टप्प्यात असताना पुलाच्या ज्या भागांना तडे गेले आहेत, त्या भागांची अद्यावत सखोल तपासणी करण्यासाठी भारतातील ए. ई. अँड सी इंनोवटिंग कन्स्ट्रक्शन या खाजगी कंपनीला नियुक्त आहे. येत्या दोन दिवसांत तपासणीची पूर्ण होणार आहे. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून दुरुस्तीच्या चर्चेत असलेल्या या पुलाच्या दुरुस्तीला 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असल्याचे एनएचएआयकडून सांगण्यात आले. दुरुस्तीच्या कालावधीत हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याने वाहतूक कोंडीत प्रचंड भर पडणार आहे. त्याच्या नियोजनासाठी 24 तास वाहतूक विभागासह स्थानिक वाहतूक शाखा, स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचारी व ट्राफिक वार्डन अशा सुमारे 100 हुन अधिक कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असल्याचे स्थानिक वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक विलास चौगुले यांनी सांगितले. पुलाच्या दुरुस्तीसाठी अंदाजे दिड महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुरुस्तीदरम्यान वाहनचालकांनी ठाणे येथून गुजरातकडे तसेच गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी माजिवडा जंकशन, माणकोली नाका, अंजूर फाटा, चिंचोटी व मनोर मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पालघर व ठाणे जिल्हाप्रशासनाने केले आहे.
================================================
*नोकरीचे आमिष; लुटणारा गजाआड*
फेसबुकवर बनावट खाते उघडून न्यायालय, बँक येथे नोकरी लावतो असे सांगून तरुणींची फसवणूक करणारा भिवंडीतील विश्‍वनाथ पाटील (२४) या भामट्यास गुन्हे शाखेच्या काशिमीरा युनिटने खडवली येथून अटक केली. आतापर्यंत १७ तरुणींना याने फसवल्याचे समोर आले आहे. गुरुवारी त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विश्‍वनाथ याने माया पाटील या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडले होते. त्यावरुन त्याने अनेकांशी मैत्री केली. भाईंदरच्या राई गावात राहणार्‍या अशाच एका तरुणीशी त्याने फेसबुकवर मैत्री केली होती. तिच्याशी चॅटींग दरम्यान त्याने न्यायालयात नोकरभरती असल्याचे आमिष दाखवले. त्या तरुणीने राई गावातच राहणारी आपली मैत्रीण हेमांगी पाटील (१९) हीला नोकरीबाबत माहिती दिली. माया पाटीलच्या आडून त्याने हेमांगीचा भ्रमणध्वनी मिळवला. मग त्याने मायाच्या नावानेच हेमांगीला नोकरीला लावण्याचे काम करणारा साहेब म्हणून स्वत:ची ओळख करुन दिली.
सप्टेंबरच्या अखेरीस विश्‍वनाथने हेमांगीशी व्हॉट्स अँपवर चॅटींग सुरु केले. ठाण्याला येऊन भेट मी माझा ड्रायव्हर पाठवतो असे तिला सांगून स्वत: विश्‍वनाथच ड्रायव्हर म्हणून आला. भाईंदर एसटी डेपोजवळ २९ सप्टेंबरला तो हेमांगीला भेटला. गाडी खराब झाल्याचे सांगून दोघेही बसने ठाण्याला आले. ठाणे एसटी डेपोत उतरल्यावर ड्रायव्हर म्हणवणार्‍या विश्‍वनाथने 'साहेबांना आपण गरीब आहोत असे दाखवले तर नोकरी मिळेल,' असे सांगत तिच्या कानातले सोन्याचे डूल, चमकी व मोबाईल असा सुमारे १४, ५०० रुपयांचा ऐवज काढून घेतला आणि पसार झाला.
विश्‍वनाथने आतापर्यंत वसई, विरार, ठाणे, कल्याण येथील तब्बल १७ तरुणींना अशाप्रकारे फसवल्याचे कबूल केले. अशा तरुणींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. गणेशपुरी पोलीस ठाण्यातही विश्‍वनाथविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. (लोकमत)
================================================
*भिवंडी :  पालिका कामगारांचे भिवंडीत 'भीक माँगो'*
पालिका कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी पगार देण्याचे शासनाचे निर्देश असताना तो न मिळाल्याने कामगारांची दिवाळी अंधारात गेली. पगाराबाबत ठोस आश्‍वासन देऊनही जबाबदारी घेण्यासाठी प्रशासन अथवा लोकप्रतिनिधी पुढे येत नसल्याचा निषेध करण्यासाठी कामगार-कर्मचारी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वाखाली कामगारांनी गुरूवारी शहरांत भीकमाँगो मोर्चा काढला.
पालिकेत दिवाळखोरी निर्माण होण्यास विविध खात्यातील भ्रष्टाचार कारणीभूत असून त्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी मोर्चेकर्‍यांनी केली. पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त व स्वच्छ कारभारासाठी पालिकेवर प्रशासक नेमण्यासह १९ मागण्यांचे निवेदन प्रांताधिकार्‍यांमार्फत समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांना दिले. शहरातून जमा केलेली ४,७५६ रूपयांची भीक प्रांताधिकार्‍यांमार्फत पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आली. या आंदोलनामुळे पालिका मुख्यालय,प्रभाग कार्यालयांत शुकशुकाट होता. आंदोलनात सहभागी झालेल्यांना पालिकेने नोटिसा बजावल्या. तसेच सरकारकडून अनुदान मिळताच पगार होईल, असे स्पष्ट केले. (लोकमत, रोशन घाडगे)
================================================
*वसई : अस्पष्ट वीज देयकांचे वसईमध्ये शुक्लकाष्ठ*
'वाचून दाखवा अन् पैज जिंका' अशी स्थिती हल्ली महावितरणच्या वीज देयका बाबत पहायला मिळत आहे. अनियमित आणि अस्पष्ट प्रिटिंगमुळे ग्राहकांना मात्र भुर्दंड सोसावा लागत आहे.वसईत गेल्या काही महिन्यांपासून अनियमित व अस्पष्ट वीज देयके येत असताना सप्टेंबर, ऑक्टोबर २०१६ च्या देयकांतही ती स्थिती कायम आहे. मीटर रिंडीग अस्पष्ट असून फोटो रिडींग घेतल्याचे दिनांक तर गायबच आहेत. (लोकमत, वार्ताहर)
================================================
(वृत्त संकलन : दैनिक लोकसत्ता , दैनिक लोकमत , दैनिक महाराष्ट्रटाईम्स, दैनिक सकाळ )
सविस्तर वृत्त http://www.palgharlive.com/2016/11/blog-post_5.html

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home