Tuesday, November 29, 2016

पालघर वार्ता २९ नोव्हेंबर २०१६

पालघर वार्ता २९ नोव्हेंबर २०१६
==============
वसई : निर्मळ यात्रेचे पावित्र्य मांस आणि अंडी विक्रीने बिघडवू नका!
निर्मळ यात्नेत शासकीय बंदी असूनही मांसाहार व अंड्यांचे पदार्थ काही स्टॉल्सवर सर्रास बनत व विकत आहेत. यामुळे यात्नेकरूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. निर्मळ माहात्म्य या प्राचीन ग्रंथात निर्मळ येथे मांसाहारी पदार्थांवर बंदी घातली आहे. तसेच परंपरेनुसारही येथे कधीही या पदार्थांचे स्टॉल लावले जात नाही. पूर्वी ग्रामपंचायत असतांनाही कधी अशा स्टॉल्ससाठी परवानगी दिली जात नसे. तसेच आताही महानगरपालिकेन अशा स्टॉल्सना परवीनगी दिली नाही. एवढेच नाही तर मंदिर व्यवस्थापनही मांसाहार व अंडी विक्रीसाठी स्टॉल्सना ना हरकत प्रमाण पत्न देत नाहीत. तरीही काही स्टॉल्स लपूनछपून लागतातच. याबाबत महिला वर्गातही नाराजी आहे.
यासाठी महिलांनी यंदा अशा विक्रत्यांची समजूत घालून त्यांच्याशी संवाद साधून त्यांना देवळातील देवावरील प्रसादाची फुले देऊन प्रबोधन केले. महिलांचे म्हणणे आहे की, आम्ही वसईकर सुद्धा बहुसंख्य मांसाहारी आहोत. पण आमच्या घरी आम्ही दिवस-वार पाळतो, श्रावण पाळतो. परंतू, यात्रेत मांसाहाराचे स्टॉल्स पाहून आमचीच मुले आम्हाला विचारतात की यात्नेत मांसाहार चालतो का मग चतुर्थीला आम्ही मांस खाल्ले तर काय झाले? महिला सवाल करतात की अशा स्टॉल्समुळे यात्नेतून आमची मुलं संस्कार शिकणार की नको ते शिकणार ! (वार्ताहर,लोकमत)
 महिला वर्गाचे म्हणणे आहे की लोक असे स्टॉल्स पाहून मांसाहार करतात व नंतर मंदिरात येतात. किंवा दर्शन घेऊन जाताना स्टॉलवर मांसाहार करतात. आमच्या मुला बाळांवर काय संस्कार होणार हे पाहून ?
महिला व बालकांनी सर्व स्टॉलवाल्यांना विनवणी करून सांगितले कि, बाबांनो तुम्ही आमचे बंधू, तुम्हीही धार्मिक आहात. तुम्हाला व्यापारासाठी वर्ष पडलं आहे. पण निदान यात्ना व सणावाराच्या दरम्यान आठ-दहा दिवस तरी तिर्थक्षेत्नाचे पावित्र्य सांभाळा. या महिला व बालकांच्या विनवणीमुळे अनेक स्टॉलवाले स्वत:हून म्हणाले ताई तुम्ही म्हणता ते आम्हाला पटलंय, काही वर्षापूर्वीच हे प्रकार सुरू झाले पण आता आम्ही फक्त शाकाहारी पदार्थच विकू. महिला व बालकांनी केलेल्या या प्रबोधनाची सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने ही दखल घ्यावी अशी मागणी प्रबोधन करणार्‍या भगिनींनी केली आहे.
एका बौद्ध महिलेने सवाल केला की, ही बुद्धाच्या शिकवणीची भूमी, तीन तीन बुद्धमूर्ती इथेआहेत, पण अहिंसा परमो धम्मची शिकवण या यात्नेत का राबविली जात नाही ?
==============
वाड्यात पोलिसांच्या निवाऱ्याची सुरक्षा संकटात
    वसंत भोईर / वाडा , लोकमत
    नागरिकांच्या संरक्षणासाठी २४ तास सज्ज असणाऱ्या पोलीसांना सुरक्षित निवारा मिळणेही दुरापास्त झाले आहे. अनेक ठिकाणच्या पोलीस वसाहतींना समस्यांनी वेढलेले आहे. वाडयातील वसाहतही यातून सुटलेली नसून येथील दोन चाळी अतिशय जीर्ण व मोडकळीस आल्याने पोलिसासंनी आपला निवारा भाडयाच्या खोलीत अथवा फ्लॅटमध्ये मांडला आहे.
    वाडा पोलीस ठाण्याच्या बाजूलाच पोलिसांची वसाहत आहे. सन १९१७ साली येथे दोन चाळी व पोलीस निरीक्षकांसाठी स्वतंत्र निवासस्थान बाधण्यात आले आहे. मात्र गेल्या चार पाच वर्षापासून या चाळींची दुरावस्था झाली आहे. घरांचे दरवाजे खिडक्या तुटलेल्या आहेत. चाळींच्या छतावरील कौले तुटलेली असल्याने येथे गळती लागलेली आहे. चाळीला लावलेली लाकडे (वासे) तुटलेली आहेत. ड्रेनेजचे पाईप फुटलेले आहेत. या समस्या या वसाहतीत भेडसावत आहेत. अतिशय जीर्ण व मोडकळीस आलेल्या या चाळीत फक्त एक कर्मचारी राहत आहे. बाकीचे पोलीस कर्मचारी भाडयाच्या खोलीत अथवा फ्लॅटमध्ये राहत आहेत. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने पोलीस कर्मचारी नाराजी व्यक्त करीत आहेत.
    या वसाहतीत दोन चाळी व पोलीस निरिक्षकांसाठी स्वतंत्र निवास्थान असून या दोन चाळीत एकूण २५ खोल्या आहेत. तसेच भरपूर मोकळी जागा आहे. पाण्याची सुविधा मुबलक आहे. आणि विशेष म्हणजे दोन मिनिटांच्या अंतरावर पोलीस ठाणे आहे. सा.बां.कडून पोलिसांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पोलीस कर्मचारी सी.बी. पाटील यांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या चाळींची दुरावस्था झाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
    या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रकाश पातकर यांच्याशी संपर्क साधला असता येत्या दोन आठवडयात दुरूस्तीचे अंदाजपत्रक बनवून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल अशी माहिती दिली. तर वाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविंद्र नाईक यांच्याशी संपर्क साधला असता पोलीस वसाहतीची जागा महाराष्ट्र शासन (महसूल विभाग) यांच्या नावावर असल्याने ती पोलीसांकडे वर्ग होण्यासाठी जिल्हा भूमी अभिलेख यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून ती लवकरच आमच्याकडे वर्ग करून मोडकळीस आलेली चाळ पाडून पोलीसांकडे नवीन इमारत उभारणीचे आमचे प्रयत्न सुरू असल्याचे नाईक यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
==============
काळे धन गरीब कल्याण निधीमध्ये!
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली लोकसत्ता
विधेयक सादर; बेहिशेबी पैसा घोषित केल्यास पन्नास टक्के आणि सापडल्यास ८२.५ टक्के कर व दंड
काळ्या धनांविरुद्धची लढाई आणखी तीव्र करताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नोटाबंदीपाठोपाठ करचुकवेगिरीविरुद्ध कडक तरतुदी करणारे विधेयक सोमवारी लोकसभेत मांडले. त्यानुसार, स्वत:हून बेहिशेबी मालमत्ता घोषित करणाऱ्यांना घोषित रकमेवर पन्नास टक्के कर व दंड लावण्याबरोबरच त्या रकमेतील पंचवीस टक्के हिस्सा चार वर्षांसाठी सरकारकडे जमा करावा लागणार आहे. तरीही एखाद्याने बेहिशेबी मालमत्ता जाहीर करण्यास कुचराई केल्यास थेट ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक कर व दंडाची तरतूद आहे. यातून मिळणारी  रक्कम पंतप्रधान गरीब कल्याण निधीत टाकली जाईल. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी दुपारी कर कायदा (द्वितीय दुरुस्ती) विधेयक लोकसभेत सादर केले. या विधेयकामध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा अंतर्भाव आहे. त्यानुसार रिझव्‍‌र्ह बँक पंतप्रधान गरीब कल्याण ठेव योजना सुरू करेल.

घोषित केलेल्या बेहिशेबी संपत्तीवरील ३३ टक्के उपकर आणि घोषित केलेल्या बेहिशेबी मालमत्तेच्या पंचवीस टक्के रक्कम या निधीत जमा होईल. त्यातून सिंचन, स्वस्त गृहबांधणी, शौचालये, पायाभूत सुविधा, आरोग्य, प्राथमिक शिक्षण आदींसाठी निधी उपलब्ध केला जाईल.

न्याय व समानता ही दोन उद्दिष्टे या दुरुस्ती विधेयकामागे असल्याची टिप्पणी जेटली यांनी या वेळी केली.
नोटाबंदीच्या पाश्र्वभूमीवर १९६१च्या प्राप्तिकर कायद्यातील काही तरतुदींचा गैरवापर करून काळे धन लपविले जाण्याची भीती सरकारला वाटत होती. तसेच हे धन लपविण्यासाठी विविध क्लृप्त्या करण्याची शक्यता गृहीत धरून अशा मंडळींना आपला पैसा अधिकृत करण्याची आणखी एक संधी देण्याचा सरकारचा विचार या विधेयकामागे आहे. यामुळे महसूल वाढून गरिबांच्या योजनांना निधी उपलब्ध होईल आणि त्याचबरोबर उर्वरित काळा पैसा अधिकृत होऊन अर्थव्यवस्थेमध्ये येईल, असे सरकारला वाटते. एका अर्थाने, स्वत:हून बेहिशेबी उत्पन्न जाहीर करण्याच्या योजनेचा (आयडीएस-२) हा दुसरा भाग म्हणावा लागेल. याआधी संपलेल्या पहिल्या योजनेमध्ये (आयडीएस) ६५ हजार कोटींहून अधिक बेहिशेबी उत्पन्न घोषित झाले आहे. त्यावरील ४५ टक्के दंडातून सरकारला सुमारे तीस हजार कोटी रुपये मिळणार आहेत.
..तर अध्यादेश किंवा वित्त विधेयक
हे विधेयक चालू अधिवेशनात मार्गी लावण्याचा सरकारचा इरादा आहे. अधिवेशन चाललेच नाही तर अध्यादेशाचा मार्ग चोखाळला जाऊ शकतो. जर लोकसभा चालली आणि राज्यसभेत असाच गदारोळ होत राहिला तर मग या विधेयकावर वित्त विधेयकाचा (मनी बिल) शिक्का मारला जाईल. वित्त विधेयक असल्यास राज्यसभेच्या संमतीची आवश्यकता नसते.
असे आहे, असे असेल..
    गुंतवणूक, रोकड, शिल्लक आणि अन्य संपत्तीमधून मिळालेले बेहिशेबी उत्पन्न :
सध्या तीस टक्के कर आणि त्यावरील उपकर व उपशुल्क लागू होते. पण नव्या तरतुदीनुसार, थेट ७५ टक्के कर (६० टक्के कर व या कररक्कमेवर २५ टक्के उपकर) लागू करण्यात येईल. शिवाय या कररक्कमेवर दहा टक्के दंडाची तरतूद. त्यामुळे एकूण कर व दंडाची रक्कम ८२.५ टक्क्यांवर पोचणार. याशिवाय फौजदारी गुन्हे वेगळेच.
बेहिशेबी रोकड व बँकांमधील ठेवी स्वत:हून घोषित केल्यास..
ही नवी तरतूद आहे. तीस टक्के कर, या कररक्कमेवर ३३ टक्के उपकर आणि उत्पन्नावर दहा टक्के दंड असा एकूण ५० टक्के कर-दंड असेल. शिवाय घोषित उत्पन्नापैकी पंचवीस टक्के रक्कम पंतप्रधान गरीब कल्याण निधीमध्ये चार वर्षांसाठी बिनव्याजाने ठेवून घेतली जाईल.
छाप्यांमध्ये बेहिशेबी मालमत्ता व उत्पन्न मिळाल्यास.. : सध्या बेहिशेबी उत्पन्न मान्य केल्यास दहा टक्के आणि मान्य न केल्यास वीस टक्के दंड लावला जातो. नव्या बदलानुसार, उत्पन्न मान्य केल्यास थेट तीस टक्के दंड आणि अन्य बाबतींमध्ये तब्बल साठ टक्के दंडाची तरतूद केली आहे.
==============
तलाठी, मंडल अधिकारी रूजू
म. टा. वृत्तसेवा, वसई
 राज्याच्या महसूलमंत्र्यांनी वाटाघाटी करून तलाठ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेतल्यामुळे तलाठ्यांचा संप नुकताच मिटला. वसई तालुक्यात तलाठी व मंडळ अधिकारी कामावर रूजू झाले आहेत. महसूल वसुलीच्या कामाला त्यामुळे गती प्राप्त झाल्याचे वसईचे तहसीलदार गजेंद्र पाटोळे यांनी सांगितले.
 तालुक्यात १२ दिवसांपासून ३४ तलाठी व ५ मंडळ अधिकारी संपावर होते. त्यामुळे महसुली कामे थंडावली होती. नोटबंदीच्या काळात वसुली जोरात झाली असती. मात्र ती संपामुळे रखडली होती. या कामाला आता चालना मिळाली आहे. राज्यात तलाठ्यांसाठी अतिरिक्त सजा तयार करावी या मागणीबाबत १५ जानेवारीपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे. पूर्वी सातबाराच्या संगणकीकरणासाठी एकच सर्व्हर होता. आता जिल्हानिहाय सर्व्हर महसूल कार्यालयात बसविण्यात येणार आहेत. एक फेरपार संगणकावर टाइप करण्यासाठी संपूर्ण दिवस लागत असे आता हे काम तसाभरात पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. तसेच गौण खनिज बेकायदा उत्खननाच्या कारवाईबाबत तलाठ्यांनी गुन्हे दाखल करण्याचा अधिकार देणारे आदेश आता निघाल्याने तलाठ्यांना आता कायदेशीर संरक्षण मिळाले आहे, अशा अनेक प्रश्नांची तड लागली असून तलाठ्यांच्या मागण्यांना सरकारने बऱ्यापैकी न्याय दिला आहे असे सांगण्यात आले
==============
लाचखोर अधिकाऱ्यांना १ डिसेंबरपर्यंत कोठडी
म. टा. वृत्तसेवा, पालघर
पालघरचे उपजिल्हाधिकारी शिवाजी दावभट्ट आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी ५०० व हजाराच्या जुन्या नोटांवर बंदी असतानाही ५० लाखांची रक्कम लाच म्हणून घेतली. ही रक्कम ते कुठे आणि कशा पद्धतीने वटवणार होते, याचा गंभीरपणे तपास होणे गरजेचे असल्याच्या

सरकारी वकिलाच्या मागणीवरून पालघर न्यायालयाने सोमवारी तिन्ही आरोपींना जामीन नाकारात १ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
तालुक्यातील साळसूद व परनाली येथे ह्या प्रकरणातील फिर्यादीच्या मालकीची ९० एकर जागा असून, त्यातील २० एकर जागेसंदर्भात फिर्यादीच्या आत्याने व नातेवाईकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात फिर्यादीच्या बाजूने निर्णय देण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्याने ५० लाखांची मागणी केली होती. त्यामुळे चिडलेल्या फिर्यादीने ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात २९ ऑगस्ट, २० नोव्हेंबर आणि २४ नोव्हेंबर अशा तीन दिवसांत फिर्यादी आणि नायब तहसीलदार सतीश मानीवडे, दावभट्ट यांच्यामध्ये या व्यवहाराबद्दल संभाषणाचे भक्कम पुरावे लाच लुचपत विभागाने घेतले होते. त्यानुसार ठाण्याचे एसीपी सावंत यांच्या पथकाने २४ नोव्हेंबरला सापळा रचून संबंधितांना अटक केली होती.
==============
पालघर : भाजपाचे पानिपत
पालघर जिल्ह्यात नव्यानेच निर्माण झालेल्या विक्रमगड, मोखाडा, तलासरी या तिन्ही नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाचे पानिपत झाले आहे. हा निकाल पाहता जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांना मोठा झटका बसला आहे.
    मोखाडा नगरपंचायत शिवसेनेने १३ जागा मिळवून पुन्हा आपल्याकडे राखली आहे. तर भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. तलासरी नगरपंचायत मार्क्सवाद्यांनी ११ जागा जिंकून आपल्याकडे ठेवली आहे. येथे भाजपला चार तर राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत. विक्रमगडमध्ये भाजपाची ३० वर्षांची सत्ता विक्रमगड विकास आघाडीने १७ पैकी ७ जागा मिळवून उद्ध्वस्त केली आहे. जागृती परिवर्तन या दुसऱ्या आघाडीने ६ जागा मिळविल्या आहेत. तर भाजपला येथे फक्त २ जागा मिळाल्या आहेत. हा निकाल पाहता जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्याबाबत जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे मानले जात आहे. कुपोषण, भ्रष्टाचार, बेरोजगारी याबाबत त्यांचा उदासीन दृष्टीकोन पक्षाला भोवल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते आहे.
    मोखाडा नगरपंचायतीतील १७ पैकी १३ जागा शिवसेनेने जिंंकल्याने तिथे त्यांचा नगराध्यक्ष विराजमान होणार आहे. त्याचे श्रेय तालुकाप्रमुख पाटील यांचे आहे. तर तलासरीत एकही नेता पाठीशी नसताना केवळ कार्यकर्त्यांच्या जोरावर मार्क्सवाद्यांनी १७ पैकी ११ जागा जिंकल्या असून तिथे त्यांचा नगराध्यक्ष होणार हे ही निश्चित आहे. विक्रमगडमध्ये पक्षांतर्गत आणि मतदारांची नाराजी भोवल्यामुळे भाजप पराभूत झाला असून तिथे सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष म्हणून विक्रमगड विकास आघाडी पुढे आली आहे. तिने १७ पैकी ७ जागा मिळविल्या आहेत. त्या बहुमतासाठी कमी आहेत. त्यामुळे आघाडीला सत्ता स्थापनेसाठी ६ जागा मिळविणाऱ्या जागृत परिवर्तन आघाडीशी युती करणे भाग आहे. त्याऐवजी तिने चिल्लर पक्षांच्या २ सदस्यांची मदत घेतली तर चित्र वेगळे असू शकते. कारण तिला सत्ता स्थापनेसाठी ९ नगरसेवकांची गरज असून त्यापैकी ७ तिच्याकडे आहेत व तिला दोनच नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे बहुमत मिळवायचे याचा निर्णय विक्रमगड विकास आघाडीचे सूत्रधार निलेश सांबरे यांना घ्यावा लागणार आहे. (प्रतिनिधी,लोकमत)
==============
वसई विरार अपंग कल्याणाचा निधी पडून
शशी करपे / वसई लोकमत
वसई विरार महापालिकेने अपंगांच्या कल्याणासाठी असलेल्या निधीचा गेल्या सहा वर्षांत योग्य वापर केला नसून तो इतर अनावश्यक कामांसाठी वापरला आहे.
केंद्र सरकारने १९९५ मध्ये समान संधी, समान संरक्षण आणि समान सहभाग हा कायदा अपंगांच्या कल्याणासाठी मंजूर केला आहे. त्या अन्वये प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी तीन टक्के निधी राखीव ठेऊन तो अपंग कल्याणाच्या विविध योजनांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. नागरी भागातील अपंगांच्या कल्याणासाठी खर्च करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार केली असून त्यात विविध १८ प्रयोजने निश्चित करण्यात आली असून त्यात घरकूल योजना, उदरनिर्वाहासाठी सहाय्य, बस स्थानकात व्हीलचेअर, सार्वजनिक वाचनालयात अपंगांसाठी आॅडियो लायब्ररी, पालिकेच्या शाळेत अपंगांना सुविधा याचा समावेश आहे. असे असताना वसई विरार पालिकेने २०१० पासून अपंगांवर खर्च न करता तो निधी इतर कामांकडे वळवल्याची माहिती अपंग जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष देवीदास केंगार यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीवरून उजेडात आले आहे.
पालिकेने २०१०-११ आणि २०११-१२ या आर्थिक वर्षात तरतूद केली असतानाही एकही पैसा खर्च केला नाही. २०१०-११ या आर्थिक वर्षात पालिकेने ३ कोटी २४ लाख ९३ हजार आणि २०११-१२ या आर्थिक वर्षात ६ कोटी १५ लाख २५ हजार रुपयांची तरतूद केली होती. मात्र, या दोन्ही वर्षात पालिकेने एकही पैसा खर्च केलेला नसल्याने ताल ९ कोटी ४० लाख रुपये पडून राहिल्याने अपंगांना त्याचा लाभ घेता आला नाही. २०१२-१३ या आर्थिक वर्षात १ कोटी ८६ लाख ५९ हजार रुपयांची तरतूद असताना एका संस्थेला १ लाख अनुदान देण्यापलिकडे एकही रुपया खर्च केला नाही.
२०१३-१४ या आर्थिक वर्षात ४ कोटी ४४ लाख ३६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या वर्षात पालिकेने विरार जवळील बोळींज येथील एका ट्रस्टला १८ लाख ५६ हजार अनुदान देण्यापलिकडे एकही पैसा खर्च केला नाही. त्यामुळे या आर्थिक वर्षात सव्वाचार कोटी रुपये पडून राहिले होते. २०१४-१५ या आर्थिक वर्षात ३ कोटी ४५ लाख ८हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यातील ७ लाख ६९ हजार ६५२ रुपये विरार येथील अपंग पुर्नवसन केंद्रातील १२६ अपंगांना कृत्रिम साहित्य वाटपासाठी करण्यात आले. यापलिकडे एकही पैसा खर्च न झाल्याने ३ कोटी ३७ लाख ३८ हजार ३४८ रुपये खर्च झाले नाहीत.
==============
वसई-विरार पालिकेतर्फे मॅरेथॉनची महातयारी! , डांबरीकरण, सुशोभिकरण
 मयुरेश वाघ, वसई
 वसई-विरार शहर महापालिकेतर्फे ११ डिसेंबरला महापौर मॅरेथॉन स्पर्धा होणार असून, पालिकेकडून त्याची जोरात तयारी सुरू आहे. रस्त्यांचे डांबरीकरण, सुशोभिकरण सुरू झाले आहे. कमी वेळेत अधिकाधिक कामे पालिका अधिकाऱ्यांना करावी लागणार आहेत. त्यामुळे पालिकेची मॅरेथॉन घाई दिसत आहे.
 महापौर मॅरेथॉन स्पर्धेचे यंदाचे सहावे वर्ष आहे. महिनाभर या मॅरेथॉनची तयारी करण्यात येत आहे. आता मॅरेथॉन स्पर्धेसाठी अगदी काही दिवस उरल्याने अधिकारी आता त्याकडे अधिक लक्ष देत आहेत. स्पर्धा मार्गावर एकही खड्डा राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे. यामुळे या मार्गावर डांबरीकरणाचे पॅच मारले जात आहेत. तसेच रस्त्यांवर सफेद पट्टे मारणे, रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या झाडे व वीज पोलला रंग दिले जात आहेत. तुटलेले डिव्हायडर नवीन केले जात असून त्यालाही रंगवले जात आहेत.
 संपूर्ण स्पर्धा मार्ग चकाचक करण्याचे काम पालिकेच्या बांधकाम विभागाकडून केले जात आहे. स्पर्धेसाठी राज्यासह देशातून स्पर्धक येत असल्याने ही काळजी घेतली जात आहे. ज्या डिव्हायडरमध्ये झाडे नव्हती तेथे झाडे लावली जात असून झाडांची काळजीही घेतली जात आहे.

महापौर मॅरेथॉनच्या एकूणच तयारीचा आढावा घेण्यासाठी नुकतीच बैठक झाली. आयोजन करण्यासाठी यंदाही समन्वय समित्या नेमण्यात आल्या असून त्या काम पाहत आहेत. मॅरेथॉनची दरवर्षीप्रमाणेच तयारी सुरू आहे, असे पालिका आयुक्तांनी सांगितले. विरार पश्चिमेच्या जुना जकात नाका ते गोकुळ टाऊनशीप या मार्गावर रस्त्याचे उर्वरित काम केले जात असून नव्याने डिव्हायडर लावण्यात आले आहेत.
 स्पर्धेच्या निमित्ताने शहरात रस्ते सुस्थितीत येऊन स्पर्धा मार्गाला चांगले रूप येत आहे. दरवर्षी मॅरेथॉन आली की ही कामे वेगाने होतात. मात्र या कामांचा दर्जा पुढील काही महिने टिकेल असाच असतो. त्यानंतर पुन्हा परिस्थिती "जैसे थे" होते असा नागरिकांचा अनुभव आहे. त्यामुळे वर्षभर अशाच पद्धतीने टिकाऊ कामे व्हावीत व शहराच्या संपूर्ण भागात अशा पद्धतीने काम केले जावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
 वसई तालुक्यातून जे स्पर्धक मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत, तेही धावण्याचा सराव करीत आहेत. बक्षीस मिळविण्यासाठी नव्हे तर आपला शारीरिक फिटनेस ठेवण्यासाठी अनेकजण स्पर्धेत सहभागी होतात. कमीत कमी ११ किलोमीटर धावण्याची स्पर्धा पूर्ण करण्याचा संकल्प अनेक तरुणांनी केला आहे.
 नाव नोंदणी सुरू
 महापौर मॅरेथॉनची माहिती देण्यासाठी शहरभर पोस्टर्स, बॅनर लावण्यात आले आहेत. आतापर्यंत जवळपास आठ हजार स्पर्धकांनी विविध गटांत स्पर्धेसाठी नावे नोंदवली आहेत, असे पालिकेकडून सांगण्यात आले. पालिका कार्यालयात तसेच ऑनलाइन नावे नोंदवली जात आहेत. राष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू यंदाही धावण्यासाठी शहरात येणार असून, अनेकांनी तसा होकार पालिकेकडे कळवला आहे.
==============
नालासोपारा ; पाणी भरण्यावरून खून'
    विरार : पाणी भरण्यावरून झालेल्या वादात एका इसमाची तीन तरुणांनी तलवार आणि लोखंडी सळीने हल्ला करून हत्या केली. यात मयताचा मुलगा आणि भाचा जबर जखमी झाले आहेत. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. ही घटना नालासोपारा पूर्वेकडील शिरडी नगर चाळीत घडली. याठिकाणी पाणी भरण्यावरून शाम यादव यांच्याशी वाद झाला होता. त्यामुळे संतापलेल्या जगन कटीयार (१९), अज मिश्रा (१८) आणि दिनेश भास्कर (१९) यांनी काल रात्री शाम यादव याच्यावर तलवार आणि लोखंडी सळईने हल्ला केला होता. यात शाम यादव यांचा मृत्यु झाला होता. हल्ल्यात यादव यांचा मुलगा आणि भाचा जबर जखमी झाले आहेत. तुळींज पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. (वार्ताहर,लोकमत)
==============
डहाणू : दीड किलो बिस्किटांसह व्यापार्‍यांना अटक
 सीमेलगत बलसाड जिल्ह्यातील उंबरगाव तालुक्यातील भिलाड पोलिसांनी े सोन्याची दीड किलो बिस्कीटे बोईसरच्या व्यापर्‍यांकडून जप्त केली आहेत. निर्मल बद्रीनाथ शर्मा (बोईसर) आणि श्रेणिक हसमुख मेहता (पालघर) हे दोन्ही व्यापारी रविवारी, कारमधून गुजरातमधील सरिगावच्या दिशेने जात होते. त्यांच्याकडे सोन्याची दिड किलो बिस्कीटे आहेत अशी माहिती भिलाड पोलिसांना मिळाल्यानंतर बलसाडचे पोलीस अधीक्षक प्रेमवीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी डमी व्यापारी पाठवले. येथील निट्री हॉटेलच्या गल्लीत हा व्यवहार सुरू असतांना पोलिसांनी संबंधितांना मुद्देमालासह अटक केली. हस्तगत केलेल्या सोन्याचे बिल नसल्याची माहिती भिलाड पोलीसांनी दिली. (वार्ताहर,लोकमत)
==============
वसई :  विचारे-काझी क्रिकेट स्पर्धेला परवानगीचा खोडा
नालासोपारा येथील शूर्पारक मैदानावर गेली २८ वर्षे सुरु असलेली विचारे-काझी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा वसई विरार पालिकेने परवानगी न दिल्याने रखडली आहे. ही स्पर्धा टिकून राहण्यासाठी पालिकेने मैदान उपलब्ध करून द्याव,े अशी मागणी आयोजकांनी केली आहे.
सध्या विलास विचारे आणि गुलाम नबी काझी चषकासाठी ही स्पर्धा होत आहे. शहरातील खेळाडूंना संधी मिळावी यासाठी शुर्पारक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून विलास विचारे यांनी हे मैदान विकसीत केले होते. विचारे यांच्या संघर्षामुळे मैदान बचावले होते. वसई विरार पालिकेच्या निर्मितीनंतर मैदानाचा ताबा पालिकेने घेतला. पालिकेने मैदानाभोवती कंपाउंड करून मातीचा भराव केला. तसेच गवताची पेरणी करून विकेटही तयार केली आहे. पूर्वी मैदानात कुणालाही खेळता येत असे. आता मात्र रितसर परवागनी घेऊन फी भरून खेळावे लागत असल्याने खेळाडू नाराज झाले आहेत. आता गेल्या २८ वर्षांपासून होणारी स्पर्धा पालिकेच्या परवानगीच्या प्रतिक्षेत अडकून पडली आहे. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी ही स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेतून आयपीएल, रणजी आणि लीगचे खेळाडू घडले आहेत. (प्रतिनिधी,लोकमत)
==============
पालघर fb.com/palagharlive 9270656495

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home