Friday, November 25, 2016

पालघर वार्ता २५ नोव्हेंबर २०१६

पालघर वार्ता २५ नोव्हेंबर २०१६==============
वसई-विरार : ‘सिग्नल’नंतरही वाहतुकीचा बोऱ्या?
प्रतिनिधी, वसई , लोकसत्ता
अतिक्रमणे, फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या कायम राहणार
वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून वसई-विरार शहरात शनिवारपासून सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. मात्र सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतरही शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार का? हा गहन प्रश्न आहे. कारण पदपथावरील अतिक्रमणे, महावितरणचे रस्त्यातच असलेले विद्युत रोहित्र, बेशिस्त रिक्षाचालक, दुकानदारांची रस्त्यावरील अतिक्रमणे, निमुळते रस्ते यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम राहणार असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून वसई-विरार शहर झपाटय़ाने विकसित होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांची संख्या प्रचंड वाढत आहे. लोकसंख्या आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या शहरात निर्माण झाली आहे. शहर वाढत असताना शहरात सिग्नल यंत्रणा नव्हती. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहरात सिग्नल यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. वसईपासून शहरात विविध ठिकाणी टप्प्याटप्यांनी सिग्नल यंत्रणा उभारण्यात येत आहे. शनिवार, २६ नोव्हेंबर रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे. मात्र सिग्नल लावले तरी वाहतूक कोंडी सुटेल का हा प्रश्न कायम राहणार आहे.

महावितरणाच्या खांबांचा अडथळा
वसई-विरार महापालिका स्थापन होण्यापूर्वी नगरपरिषद आणि ग्रामपंचायती अस्तित्वात होत्या. तेव्हापासून महावितरणाने विद्युत खांब आणि विद्युत रोहित्र उभारलेले आहेत. त्याचा मोठा अडथळा रस्त्यातील वाहनांना होत आहे. वसईच्या बऱ्हामपूर नाका, माणिकपूर, पंचाळ नगर, अंबाडी नाका, शंभर फुटी रोड आदी महत्त्वाच्या ठिकाणांवर विद्युत खांब आणि रोहित्र असून ते रस्त्यांमध्ये आले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

फेरीवाल्यांची अतिक्रमणे
वसई स्थानक रोडपासून बाभोळा परिसरात पदपथांवर फेरिवाल्यांची अतिक्रमणे वाढलेली आहेत. दुकानदारांनी आपापल्या दुकानातील साहित्य दुकानासमोर मांडल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी त्रास होत आहे. या फेरिवाल्यांवर महापालिका कुठलीच कारवाई करत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. अनेक गॅरेजचालक भर रस्त्यात गाडय़ा उभ्या करून दुरुस्तीचे काम करत आहेत. पदपथावर भिक्षेकरी तसेच इतर फेरीवाल्यांनी आपापले संसार थाटले आहेत.

बेशिस्त वाहनचालक
वसईत हजारो अनिधकृत रिक्षा सुरू आहेत, तसेच खाजगी मॅजिक गाडय़ा आणि बस कार्यरत आहेत. त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने ते कुठेही रस्त्यात गाडय़ा उभ्या करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. अनेक ठिकाणच्या रस्त्यांचे रुंदीकरण न झाल्यानेही वाहतूक कोंडीत भर पडते. विरार पश्चिमेला तर स्थानकाबाहेरील रस्ता रिक्षाने व्यापलेला असतो. त्यामुळे चालणेही कठीण होते. परिवहन सेवेच्या बसना आगर नसल्याने त्या बस रेल्वे स्थानकाच्या मुख्य रस्त्यावर असतात. वसईत एका बसने वळण घेतल्यावर किमान पाच मिनिटे  वाहतूक खोळंबते. त्यामुळे अतिक्रमणे हटवावी, अशी मागणी वसईचे स्थानिक समाजिक कार्यकर्ते नानू शेलार यांनी केली आहे.
==============
वसई-विरार : 'वसईकरांना ‘सिग्नल’चा इशारा'
मयुरेश वाघ, वसई , महाराष्ट्र टाईम्स
वसई-विरार शहर महापालिकेच्या वतीने वसई रोड शहरात आठ ठिकाणी "स्वयंचलित सिग्नल यंत्रणा" लागल्या असून शनिवारी त्याचे रीतसर उद्घाटन होत आहे. सिग्नल लागल्यानंतर त्याचे एकूणच नियोजन वाहतूक पोलिस करणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. वाहतूककोंडी होत असलेल्या मार्गावर हे सिग्नल लागले असून शनिवारपासून वसईकरांना सिग्नलच्या इशाऱ्यावरून थांबावे किंवा धावावे लागणार आहे.
वसई-विरार पालिकेच्या सहा विकासकामांचा लोकार्पण कार्यक्रम शनिवारी होत आहे. त्यातील सिग्नल यंत्रणेचा लोकार्पण सोहळा वसई रोड येथे सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे. वसईत वाढलेली वाहनांची मोठी संख्या, अरुंद रस्ते, वाहतूककोंडी पाहता सिग्नल यंत्रणा असावी, अशी मागणी गेल्या सहा-सात वर्षांपासून होत होती. पालिकेने आठ ठिकाणी सिग्नल लावले असून त्याची चाचणीही घेण्यात आली आहे. शनिवारी उद्घाटन झाल्यानंतर वाहतूक पोलिस त्याचे नियोजन करणार आहेत.
 "आम्हाला सिग्नलबाबत फारशी माहिती नाही. त्यामुळे ज्यांनी सिग्नल यंत्रणा बसवली, त्या कंत्राटदाराच्या तज्ज्ञांकडून आम्ही माहिती करून घेऊ व त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पुढील नियोजन केले जाईल," असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. सिग्नल यंत्रणेचा खर्च पालिकेने केला असून पुढील पाच वर्षांची देखभाल-दुरुस्तीही कंत्राटदाराकडून केली जाणार आहे. सध्या जेथे सिग्नल लावले आहेत, त्या रस्त्यावर सततची वाहतूककोंडी होते. सिग्नल लावल्याने काही प्रमाणात दिलासा मिळेल, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. पालिका क्षेत्रात उर्वरित आठ ठिकाणीही पालिका सिग्नल यंत्रणा उभारणार असून त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी वसईकर करीत आहेत
व्हिडिओ कॉन्फरन्स युनिट
 विरार येथील पालिका मुख्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्स युनिट तयार करण्यात आले आहे. मुख्यालयातून पालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी बोलायचे झाल्यास या युनिटचा फायदा होणार आहे. तसेच, विरार पूर्वेला टोटाळे तलावाजवळ पालिकेचे सार्वजनिक वाचनालय असून ते नवीन बनविण्यात आले आहे. या वाचनालयात मोठ्या प्रमाणात वाचक येत असतात. व्हिडिओ कॉन्फरन्स युनिट व वाचनालयाचेही उद्घाटन शनिवारी होणार आहे. वसईतील तामतलाव सुशोभिकरणाचे व नालासोपाऱ्यातील पालिका रुग्णालयामध्ये आयसीयू सेंटर, डेन्टल केअर सेंटरचेही उद्घाटन होणार आहे.
सारे काही श्रेयासाठी...
 वसई-विरारच्या महापौर प्रविणा ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एकाच दिवशी ही उद्घाटने होणार आहेत. पालिकेतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने या विकासकामांचे श्रेय स्वत:कडे घेण्याच्या दृष्टीने कार्यक्रमांचे नियोजन केल्याचे दिसत आहे. या विकासकामांच्या उद्घाटनाच्या ठिकाणी बविआ कार्यकर्त्यांनी अधिक संख्येने उपस्थित रहावे, अशा सूचना बविआ नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर प्रविणा ठाकूर भूषविणार आहेत तर विकासकामांचे उद्घाटन आमदार व सत्ताधारी बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर करणार आहेत. या कार्यक्रमाच्या दोन दिवसांपूर्वी आलेल्या पहिल्या निमंत्रणपत्रिकेत माजी महापौर राजीव पाटील व नारायण मानकर यांची नावे नव्हती. याबाबत चर्चा झाल्यानंतर त्यांची नावे आता प्रसिद्ध करण्यात आली आहेत. पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचेही नाव निमंत्रण पत्रिकेत आहे. मात्र या निमंत्रणपत्रिकेत "प्रोटोकॉल" पाळला गेलेला नाही, अशी चर्चा होत आहे.
==============
'वसईत दिसले शाही गरुड'
मयुरेश वाघ, वसई , महाराष्ट्र टाईम्स
 वसई येथे अतिदुर्मिळ अशा शाही गरुड (इंपीरिअल ईगल) पक्ष्याचे दर्शन घडल्याची माहिती पक्षीमित्रांनी दिली. दुर्मिळ व स्थलांतरित पक्षीही वसईत येत असल्याने पक्षीमित्र हे पक्षी पाहून त्यांचे छायाचित्रण नियमितपणे करत असतात.
नालासोपाऱ्यातील नेस्ट संस्थेचे अध्यक्ष व पक्षी अभ्यासक सचिन मेन हे नेहमीप्रमाणे वसईतील मिठागर परिसरात पक्षी निरीक्षणासाठी गेले असताना ते व त्यांच्या जोडीला असलेल्या पक्षीमित्रांना या शाही गरुडाचे दर्शन झाले. यावेळी हा गरुड त्यांना मिठागर परिसरात आकाशात उंचावर घिरट्या घालताना दिसला. टेलिलेन्स व सुपर झूम कॅमेरामुळे आपल्याला या गरुडाचे फोटो काढणे शक्य झाले, असे त्यांनी सांगितले.
इम्पिरिअल ईगल हे या शाही गरुडाचे इंग्रजी नाव आहे. भला मोठा आकार, पंखांची प्रचंड व्याप्ती, बघता क्षणीच नजरेत भरेल असा रुबाबदारपणा यामुळे त्याला शाही ही उपाधी मिळाली असावी. १९८५मध्ये तो नाशिकजवळील नांदूर मधमेश्वर अभयारण्यात दिसला होता. २०१५मध्ये वसईत तरखड भागात नेस्टच्याच पक्षीमित्र एम. विवेकानंद भक्त यांना त्याचे दर्शन झाले होते, अशी माहिती पक्षीमित्रांनी दिली.
 मार्च, एप्रिल मध्ये युरोप ते पश्चिम व मध्य आशियात त्यांची वीण होते. हिवाळ्यात ते आफ्रिका व भारतीय उपखंडाकडे स्थलांतर करण्यास सुरुवात करतात. छोटे पक्षी, साप, सरडे, उंदिर, घुशी हे त्यांचे खाद्य. हे खाद्य मिळवण्यासाठी ते नद्या, तलाव, माळराने, गवताळ प्रदेशावर घिरट्या घालताना दिसतात. जगभरातून त्यांची संख्या झपाट्याने कमी होत चालल्याने त्यांच्या अस्तित्वास धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत वसई येथे गेल्या दोन वर्षांत झालेले त्यांचे दर्शन महत्वपूर्ण मानले जाते, असेही मेन यांनी सांगितले.
 दरवर्षी थंडी पडू लागली की येथे मोठ्या प्रमाणावर शिकारी पक्षी व पाणपक्षी स्थलांतर करून येतात. या पक्ष्यांचे निरिक्षण, पक्षी प्रजातींची नोंद, त्यांचा अभ्यास करण्याचे काम (नेस्ट) ही संस्था गेली अनेक वर्षे करीत आहे. हरित वसई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसई तालुक्यास भरभरून पक्षीवैभव असून नागरिकांनी पक्षी अधिवास वाचविण्याची गरज आहे. समुद्रकिनारी, खाडीकिनारे, खारफुटीचा प्रदेश, मिठागरे, भातशेती, शहरी भाग, आर्द्र व मिश्र पाणगळीचे जंगल असे विविध पक्षी अधिवास तालुक्यात आहेत. त्यामुळे येथे पक्ष्यांची विविधताही मोठ्या प्रमाणात बघायला मिळते.
==============
 नालासोपारा : आधी परवानगी; नंतर नकार
म. टा. वृत्तसेवा, वसई
 नालासोपारा पश्चिम येथील पालिकेच्या मैदानात २६ नोव्हेंबर रोजी"संविधान दिना"च्या कार्यक्रमास वसई-विरार पालिकेकडून आधी परवानगी मिळूनही आता पालिकेने मैदान देण्यास नकार दिला आहे. मात्र अशा पद्धतीने जाणीवपूर्वक कार्यक्रमात खोडा घालण्यात येत असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विरार शाखेने आंदोलनाचा इशारा देत कार्यक्रम येथेच होईल, असे जाहीर केले आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान या देशाला अर्पण केले. या दिवसाचे औचित्य साधून वसई-विरारमधील विविध पक्ष कार्यकर्ते, संघटना, विविध जाती-धर्माच्या बांधवांनी एकत्र यायचे ठरवले. नालासोपारा पश्चिमेकडील शूर्पारक मैदान येथे"गौरव संविधानाचा" या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरले होते. या मैदानात कार्यक्रमासाठी पालिकेकडे आयोजकांनी शुल्कही भरले. १५ नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमासाठी पालिकेने परवानगी दिली होती. मात्र या कार्यक्रमाचा जागोजागी प्रचार व प्रसार झालेला असताना २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी, कार्यक्रमाच्या तीन दिवस आधी या कार्यक्रमास पालिकेकडून दिलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे.
 मैदानाच्या सुशोभिकरणाचे कारण
 शूर्पारक मैदानाचे सुशोभिकरण सुरू असून क्रिकेटच्या खेळपट्टीस नुकसान होईल, हे कारण पालिकेने यासाठी दिले आहे. मात्र सुशोभिकरणाचे कारण पुढे करून परवानगी रद्द करणे म्हणजे जाणीवपूर्वक या कार्यक्रमास खोडा घातला जात आहे, असे रिपाइंचे विरार अध्यक्ष गिरीश
दिवाणजी यांनी म्हटले आहे. क्रिकेट खेळपट्टीचे काम दोन दिवसांपासून सुरू झाले आहे. संविधान दिनाच्या कार्यक्रमास अशा प्रकारे ऐनवेळी परवानगी नाकारण्यामागे राजकारण असून पालिका प्रशासनाचा निषेध करीत असल्याचे दिवाणजी यांनी सांगितले.
==============
'जलवाहतुकीच्या शिडात नवे वारे!
पायाभूत सुविधा उभारणी नव्या वर्षात, प्रवासवेळा कमी होणार
 Jayant.howal@timesgroup.com @hjayantMTमुंबई
मुंबईची उपनगरे तसेच ठाणे जिल्ह्यातून थेट वसई-​विरार, अगदी भाईंदर-पालघर पर्यंतचा प्रवास आगामी काळात अवघ्या १५ मिनिटांवर येणार आहे! मार्वे ते पालघर या पट्ट्यात जलवाहतुकीसाठी (रो-रो सेवा) पायाभूत सुविधा उभारण्याच्या कामास जानेवारी ​​किंवा फेब्रुवारी २०१७ मध्ये सुरुवात होणार असल्याने नव्या वर्षात सार्वजनिक वाहतुकीचे एक नवे दालन खुले होईल.
याशिवाय घोडबंदर येथेही जलवाहतूक सुरू होणार आहे. मात्र, ती केवळ प्रवासी वाहतुकीसाठी असेल, रो-रो नसेल. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची जबाबदारी शिरावर घेतली असून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी झपाट्याने कार्यवाही सुरू आहे.मार्वे-मनोरी, गोराई-बोरीवली, नारंगी (विरार)-खारवाडेश्वर (पालघर) व भाईंदर- वसई या पट्ट्यात जलवाहतुकीला हिरवा कंदील मिळाला असल्याने पुढील दीड वर्षांत हे विभाग आणि मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यात वेगाने दळणवळण होऊन प्रवासाचा वेग कमालीचा कमी होणार आहे.
 या प्रकल्पासाठी आता सीआरझेड कायद्याचा अडसर राहिला नसून आता काही पर्यावरणविषयक मुद्द्यांवर मंजुरी बाकी आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत केंद्र सरकारकडून उर्वरित सोपस्कार पूर्ण होतील. पुढील महिन्यात निविदा काढून जानेवारी किंवा फेब्रुवारी, २०१७ मध्ये वर्क ऑर्डर काढली जाईल. पुढील १८ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
ही जलवाहतूक रो-रो सेवा (बोटीतून प्रवाशांसोबत वाहनांचीही ने-आण) असल्याने मुंबई, ठाणे तसेच पालघर जिल्ह्यातील लोक आपली वाहने घेऊनही प्रवास करू शकतात.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- या प्रकल्पामुळे मुंबई-ठाणे व ठाणे-पालघर थेट आणि कमी वेळात एकमेकांशी जोडले जातील.
-विरार ते पालघर हे सुमारे रस्तामार्गे ६० किमीचे अंतर अवघ्या १.७ किमीवर प्रवास १५ मिनिटांत.
-भाईंदर ते वसई हे ४० किमीचे अंतर जलवाहतुकीने २.५ किमी. प्रवासवेळेत दोन तास बचत.
-गोराई-बोरीवली मार्गावर सध्या बोटीतून रोज ३५० दुचाकी तर १२०० प्रवाशांची वाहतूक.बोरिवली जेट्टीहून रोज किमान ३००० प्रवासी एस्सेलवर्ल्डला जातात. रो-रो सेवा सुरू झाल्यानंतर या संख्येत वाढ.
-रस्ता मार्गे गोराई ते बोरीवली अंतर ३० किमी. आहे. त्यासाठी मीरा भाईंदर-उत्तन ओलांडून जावे लागते. जलमार्गे हे अंतर केवळ ६५० मीटरवर. प्रवासवेळेत एक तास बचत.
-मार्वे-मनोरी या ३७ किमी अंतरासाठी दीड तास लागतो. जलवाहतूक प्रवाशांना १५ मिनिटांत या स्थळी पोहचवेल.
-घोडबंदर येथील प्रवासी जेट्टीमुळे पुढे वसई, मुंब्रा, गायमुख, उत्तन या ठिकाणी जाता येईल.
-ठाणे तसेच पालघर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ. 
==============
वसई : 'भित्तीचित्रांतून निसर्गसंवर्धनाची जनजागृती'
म. टा. वृत्तसेवा, वसई
 निसर्ग संवर्धनासंदर्भात जनजागृती करण्यासाठी या वर्षीदेखील वसईतील जागरुक नागरिक संस्थेतर्फे भित्तीचित्र रंगविणे हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. वसईतील सुरुचि बाग बीच येथे झालेल्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष होते.
वसई फर्स्ट, स्वरोहि आर्ट अकादमी आणि वसई विरार शहर महापालिकेच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्वरोही अकादमीचे वयोगट २ ते १२ मधील ४५ छोटे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि २० कलाकार यांनी "पाणी वाचवा", "खारफुटी आणि झाडे वाचवा", "समुद्रकिनारा स्वच्छ राखा" या विषयांवर भित्तिचित्रे काढली. प्रभाग समिती "आय"चे सभापती प्रवीण शेट्टी या वेळी उपस्थित होते.
 वसईचे समुद्रकिनारे हे वसईचे वैभव आहे. मात्र येथे सध्या बेसुमार वृक्षतोड आणि कचरा टाकला जात असल्यामुळे हे सौंदर्य नष्ट होत चालले आहे. त्यामुळे या समुद्रावर जाणाऱ्या रस्त्यावरच असे संदेश रंगवून नागरिकांमध्ये जनजागृती करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असल्याचेे या कार्यक्रमाचे प्रमुख ओनील डिकुन्हा आणि शायनी कोलासो यांनी सांगितले. प्रा. मृणालिनी वर्तक, नेसी कोलासो, क्लीओन कोलासो, वेंचर मिस्किटा, रोहन गोन्साल्वीस, निकेत काळे, मुस्तफा अब्बास, आशिष परुळेकर, रुलेश रिबेलो, कृचा पेन, विशाल डिमेलो, कॉसमॉस डिसिल्वा, रेमिया गोन्साल्विस, तेजस राऊत या कार्यकर्त्यांनी यासाठी परिश्रम घेतले.
==============
वसई : सुशोभीकरणाचा बट्टय़ाबोळ!
प्रतिनिधी, वसई , लोकसत्ता
लाखो रुपये खर्चूनही वालीव तलावाची दुरवस्थाच; कर्मचाऱ्यांचा अभाव
दोन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आलेल्या वालीवच्या तलावाची दुरवस्था झालेली आहे. कर्मचारी नसल्याने तलाव आणि उद्यानाची निगा राखली जात नसून व्यायामाचे आणि खेळाचे साहित्य धूळखात पडले आहे. स्थानिक महिलांसाठी बांधलेला धोबीघाटही बंद पडलेला आहे.
वसई-विरार शहर महापालिकेने वालीव तलावाचे दोन वर्षांपूवी शोभीकरण करून हा तलाव विकसित केला होता. तलावासभोवतालच्या व्यायामाचे व खेळण्याचे साहित्य बसविण्यात आले होते. मात्र कर्मचाऱ्यांअभवी हे साहित्य धूळखात पडले आहे. उद्यानात लावण्यात आलेले व्यायामाचे साहित्य निखळून पडले आहेत. सकाळी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी याबाबत पालिका आयुक्तांसह प्रभारी सहायक आयुक्त यांना लेखी तक्रारीही केलेल्या आहेत, मात्र त्यात काहीही सुधारणा झालेल्या नाहीत.
उद्यानांचे सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव पालिकेत संमत करताना ज्या-ज्या उद्यानात व्यायामाचे साहित्य लावले जाणार आहेत, त्या उद्यानांमध्ये एक प्रशिक्षक ठेवण्यात येईल, तो लोकांना साहित्य कसे हाताळायचे हे दाखवून देईल, अशी माहिती देण्यात आली होती. मात्र आतापर्यंत कुठल्याही उद्यानात प्रशिक्षक नेमण्यात आलेला नाही.
धोबीघाटाकडेही दुर्लक्ष
वालीव तलावातील पाणी दूषित होऊ नये म्हणून वसई-विरार शहर महापालिकेकडून उद्यानात एक धोबीघाट बांधण्यात आला आहे, परंतु गेल्या काही महिन्यांपासून या धोबीघाटातील पाण्याच्या टाकीत पाणी भरण्यासाठी कर्मचारी वर्ग नसल्याने त्याच्या दुर्दशेत वाढत होत आहे. या धोबीघाटावर येणाऱ्या महिला जिवावर उदार होऊन या तलावातील पायऱ्यांवर कपडे धूत आहेत. याच धोबीघाटावर मृत व्यक्तींचे क्रियाकर्म सभामंडप उभारण्यात आला आहे. या सभामंडपाचा वापर इतर वेळी मद्यपी, गर्दुल्ले करत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
==============
वसईकरांना आकर्षित करत आहेत परदेशी श्वेत करकोचा व खेकडा चिखल्या
वसई , नवशक्ती – हरित वसई म्हणून ओळखल्या जाणार्या वसई तालुक्यात पक्षी वैभव लाभले आहे समुद्रकिनारा, खारफुटीच्या प्रदेश, मिठागरे, शेती यासह शहरी,पाणथळ आदी भागात विविध पक्षी अधिवास करीत आहेत. थंडीचा गार वारा आणि त्यात स्थलांतरित झालेला श्वेत करकोचा व खेकडा चिखल्या (क्रब फ्लवर )पक्षी वसईकरांना सध्या आकर्षित करीत आहे.
नेस्ट संस्थेचे पक्षी मित्र सचिन मेन व त्यांचे सहकारी या श्वेत करकोचाचे निरीक्षण तसेच त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतानाच आणखी 4 श्वेत करकोचे येऊन  सामील झाल्याने त्यांची संख्या सातवर पोहोचली आहे.
श्वेत करकोचांचे मूळ स्थान हे युरोप येथील असून तेथे त्यांची वीण होते. करकोचे आफ्रिका व  भारतासारख्या  उष्ण कटिबंधीय देशांकडे स्थलांतर करतात. महाराष्ट्रात यापूर्वी मार्च 2016 साली डोंबिवली जवळील पडले गाव येथे श्वेत करकोचाचे दर्शन घडले. 2008 साली उरणला व 2009 ते 2011 मध्ये भांडुप येथे हा करकोचा दिसला. तर वसईच्या भुईगाव येथे आलेला खेकडा पक्षी हा 2015 साली अमोल लोपीस यांना दिसला होता. खेकडा हा कृष्णधवल रंगाचा असून, लांब पाय व पाय आकाशी राखी रंगाचे तर चोच काळी, जाड असते. आवडते खाद्य शोधून तो फस्त करतो. महाराष्ट्रातील वसईत झालेले त्याचे दर्शन हे वसईच्या पक्षीप्रेमींसाठी आकर्षण आहे असे नेस्टचे अध्यक्ष व पक्षी अभ्यासक सचिन मेन यांनी सांगितले.
दरवर्षी थंडी पडू लागली कि येथे मोठय़ा प्रमाणावर पाणपक्षी स्थलांतर करून येतात. या पक्ष्यांचे निरीक्षण पक्षी प्रजातींची नोंद, त्यांचा अभ्यास करण्याचे काम नेस्ट ही संस्था गेली अनेक वर्षे करीत आहेत. संस्थेतील पक्षी मित्र वेळोवेळी परिसरातील पक्षी अधिवासांना भेट देऊन पक्षी निरीक्षण करीत असतात. नेस्ट संस्थेचे सदस्य व पक्षी मित्र डॉ अभय हुले व जॉनसन वर्की यांना वसई भागात पक्षी निरीक्षण करताना सुमित अशा श्वेत करकोचाचे दर्शन घडले.
यावेळी तीन श्वेत करकोचे वसई येथील मिठागरांच्या भागात खाद्य शोध करताना दिसले. त्यापैकी दोन प्रौढ व एक किशोरवयीन पक्षी असल्याचे डॉ हुलें यांचे मत आहे. नेस्ट संस्थेचे पक्षी मित्र या श्वेत करकोचाचे निरीक्षण तसेच त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. करकोचाची एकूण संख्या सात आहे. पर्यटकांनी निसर्गाचा आनंद जरूर घ्यावा मात्र पक्षाना हानी पोहचेल असे कृत्य करू नये, असे आवाहन पक्षीप्रेमी सचिन मेन यांनी केले आहे.
==============
वसई : रिक्षाचालकाच्या मुजोरीने १ मृत्युमुखी
    पारोळ : अर्नाळा येथील रिक्षाचालकांनी जवळचे भाडे नको म्हणून हार्टअ‍ॅटॅक आलेला असतांनाही रुग्णालयात नेण्यास नकार दिल्याने विलास बावकर यांना मृत्युमुखी पडावे लागले. ही बातमी गावकऱ्यांना समजताच त्यांनी रिक्षावाल्याना धारेवर धरले. ही घटना बुधवारी दुपारी घडली.
    पर्यटकांना रिसॉटमध्ये सोडले की, लांबचे भाडे आणि रिसॉर्ट चालकाकडून मोठे कमिशन मिळत असल्यामुळे रिक्षावाले स्थानिक प्रवाशांकडे दुर्लक्ष करतात. भाडे नाकारतात हा नित्याचा अनुभव असून त्यातून हा प्रकार घडला. रिक्षाचालकांच्या या मुजोरीमुळे स्थानिक व रिक्षाचालक यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता असल्याचे या भागातील नागरीकांचे म्हणणे आहे.(वार्ताहर,लोकमत)
==============
मनोर : विद्यार्थी फेकतात भोजन!
   आरिफ पटेल / मनोर, लोकमत
    पालघर तालुक्यातील टाकव्हल मनोर येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत मुलांना निकृष्ट जेवण दिले जात असून विद्यार्थी ते फेकून देत आहेत. तसेच त्यांची उपासमारही होते आहे. जेवण वाढले की ते फेकून देण्यासाठी या मुलांची रांगच सूर्याकॉलनी समोर लागते. आदिवासी पालकमंत्र्यांच्या पालघर जिल्हयातच अशी परिस्थिती आहे तर पूर्ण महाराष्ट्रातील आश्रमशाळांची आदिवासी मुलांची परिस्थिती काय असणार?
    अत्यंत निकृष्ट दर्जाचे तांदूळ न निवडता, साफ करता तसेच शिजविले जातात. भांडी न घासताच त्यातच स्वयंपाक केला जातो. अनेकदा भांड्यांना माती चिकटलेली असते, असे महिला कार्यकर्त्या कविता पाडवी यांनी सांगितले त्यांनी स्वत: आश्रमशाळेला भेट दिली त्या वेळा त्यांच्या निदर्शनास ही बाब आली.
==============
जव्हार : जि.प. शाळेत सडका पोषण आहार
    हुसेन मेमन / जव्हार, लोकमत
    या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना कुजक्या, सडक्या पोषण आहाराचा धान्य पुरवठा करण्यात आला आहे, असा आरोप जव्हार पंचायत समिती सदस्य- मनू गावंढा आणि सुधाकर वळे. यांनी केला आहे.
    जव्हार तालुक्यात जि.प.च्या २५५ असून पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी पर्यंत १६ हजार २४० विद्यार्थी त्यात शिक्षण घेत आहेत. त्यांना तांदूळ, मूगडाळ वाटाणाडाळ, तूरडाळ, मोहरी, हळद, तेल, अशा धान्याचा पोषण आहार म्हणून महाराष्ट्र राज्य को.आॅप. मार्केटिंग फेडरेशनद्वारे पुरवठा केला जातो. मात्र या ठेकेदारांनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना आॅक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यात कुजक्या, सडक्या धान्याचा पुरवठा केला आहे.
    जव्हार तालुक्यातील नागरिकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांना आपल्या मुलांना पालक नाईलाजाने जिल्हा परिषदेच्या शाळेतच दाखल करावे लागते आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना पोषण आहार म्हणून भोजनही मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गळती कमी होऊन पटसंख्या वाढते व कायम राहते. मात्र नाव पोषण आहार असले तरी त्याची निर्मिती करण्यासाठी लागणारे धान्य मात्र इतके सडके आणि कुजके असते की, ते खाणे सोडा त्यांच्याकडे बघवतही नाही. या आहारामुळे पोषण होणे सोडा विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिंता पालकांनी व्यक्त केली आहे. जव्हारमध्ये आॅक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यात पुरवठा करण्यात आलेले पोषण आहाराचे धान्य आळ्या आणि किडे मिश्रित असून सडके, खराब व कुजके आहे. ही बाब पालकांनी जव्हार पंचायत समितीच्या सदस्यांच्या लक्षात आणून देऊन गरज पडल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हा परिषद शाळेतील मुलांना चांगल्या धान्यचा पुरवठा करावा अशी मागणी. पालक, आणि प.स.सदस्य यांनी केला आहे.
==============
‘सूर्या’ योजना तीन वर्षांत कार्यान्वित
    भार्इंदर : मागील सहा वर्षांपासून मीरा-भार्इंदर व वसई-विरारला ३०३ एमएलडी पाणीपुरवठा करणारी सूर्या योजना तीन वर्षांत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. समन्वय समितीची बैठक आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या दालनात झाली.
    यावेळी एमएमआरडीएच्या नगररचना विभागाचे सहप्रकल्प संचालक एस.सी. देशपांडे, पाणीपुरवठा स्रोत व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सल्लागार द.ता. डांगे, वनविभागाचे विभागीय अधिकारी सुनील ओहोळ, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सहायक वनरक्षक कल्पना टेमगिरे, येऊर वनक्षेत्रपाल संजय वाघमोडे, प्रकल्पाच्या सल्लागार कंपनीचे सर्व्हेअर एस.के. थोरात व राजेंद्र देशमुख उपस्थित होते. मीरा-भार्इंदरला २०१५ पूर्वी एमआयडीसी व स्टेममार्फत अनुक्रमे ३० व ८६ असा एकूण ११६ एमएलडी पाणीपुरवठा केला जात होता. काही महिन्यांपूर्वी एमआयडीसी कोट्यातून शहराला अतिरिक्त २० एमएलडी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. आजमितीस शहराला एकूण १३६ एमएलडी पाणीपुरवठा होत असला तरी तो अपुराच असल्याने राज्य सरकारने पुन्हा एमआयडीसीच्या कोट्यातूनच ७५ एमएलडी पाणीपुरवठ्याला मंजुरी दिली. या योजनेचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा ३११ एमएलडीवर जाणार असला तरी भविष्यात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची समस्या कायम राहणार आहे. यापूर्वी २००९ मधील महासभेत सूर्या धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याला राज्य सरकारने मान्यता देत त्यात वसई-विरारचाही समावेश करून एकूण ३०३ एमएलडी पाणीपुरवठा योजना एमएमआरडीएमार्फत राबवण्याला हिरवा कंदील दाखवला.

    तत्पूर्वी मीरा-भार्इंदरमधील पाणीसमस्या मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने अतिरिक्त १०० एमएलडी पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली होती. ही योजना ३०३ एमएलडी योजनेतूनच पूर्ण करण्यासाठी मान्यता दिल्यानंतर शहराच्या वाट्याला एकूण २१८ एमएलडी पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला.
    एकूण ४०३ एमएलडी पाणीपुरवठा योजनेची प्रक्रिया सहा वर्षांपासून सुरू होती. तिला मूर्त स्वरूप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच १ हजार ९७८ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता दिली. यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली असली तरी या योजनेंतर्गत ९८ किलोमीटरची मुख्य जलवाहिनी वनविभागाच्या जागेसह महामार्गावरून जाणार आहे. त्याला वनविभाग, राष्ट्रीय व राज्य महामार्ग प्राधिकरणाकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. एमएमआरडीएकडून ही योजना मीरा-भार्इंदर शहरांच्या प्रवेशद्वारापर्यंतच राबवण्यात येणार आहे. शहरांतर्गत योजनेसाठी मात्र पालिकेला खर्च करावा लागणार आहे. एमएमआरडीएला जलकुंभ बांधण्यासाठी अद्याप पुरेशी जागा मिळालेली नाही. जागा व परवानगीच्या अडचणीत सापडली असली तरी ही जागा पालिका हद्दीत असलेल्या चेणे परिसरात प्रस्तावित केली आहे. सुमारे पाच एकर जागेत २० एमएलडी क्षमतेचा जलकुंभ बांधण्यात येणार असून प्राप्त होणाऱ्या २१८ पैकी ७५ एमएलडी पाणीपुरवठा योजना या वर्षअखेरीस कार्यान्वित होण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात येत आहे. (प्रतिनिधी,लोकमत)
==============
अर्नाळा आगार तोट्यात
म. टा. वृत्तसेवा, वसई
प्रवाशांच्या अपुऱ्या प्रतिसादाअभावी वसई तालुक्यातील अर्नाळा एसटी आगाराला मासिक ३० लाखांचा तोटा होत असल्याचे उघडकीस आले आहे. एकेकाळी सातत्याने काही वर्षे हे आगार फायद्यात होते. आजही या आगाराची सेवा चांगली आहे. या आगाराच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्याही वाढवण्यात आली असली तरीही आगार तोट्यात चालले आहे.
अर्नाळा आगारातून पश्चिम, दक्षिण महाराष्ट्रात तसेच, खानदेश व कोकणात लांब पल्ल्याच्या बस गाड्या सोडल्या जातात. एसटीच्या या गाड्यांना पुरेसे प्रवासी नसले की तोट्यातील गाड्या बंद केल्या जातात. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काही लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू ठेवण्यास परवानगी दिल्यामुळे या गाड्यांमध्ये ६० टक्के प्रवासीसंख्या असते. नाशिकला जाणारी पूर्वीची गाडी आता चोपड्यापर्यंत जाते. तर, धुळ्याला जाणारी एसटी आता भुसावळपर्यंत वाढविण्यात आली आहे. बीडसाठीची गाडी विचाराधीन असूनही सुरू झालेली नाही. सातारा, गोंदवले येथे जाणारी बस बंद झाली आहे. त्या बससेवेला पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे उघड झाले आहे. शिर्डी, पैठण गाडीलाही प्रतिसाद नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तुळजापूर बस मात्र फायद्यात आहे. तसेच, सोलापूर रात्रगाडीदेखील फायद्यात आहे. श्रीवर्धन गाडी बंद झाली असली तरी कोकणात आता गुहागर गाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 अर्नाळा आगारातून एकूण ६० बसगाड्या धावत असून २५६ कर्मचारी येथील कारभार हाकत आहेत. चालक, वाहक, प्रशासकीय लिपिक, यांत्रिक कर्मचारी या सर्व व्यवस्थेसमोर हे मासिक ३० लाखांचा तोटा भरून काढण्याचे आव्हान आहे. आगाराच्या माध्यमातून अधिकाधिक चांगली सेवा देऊन आगाराचा नफा वाढविण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, असे डेपो मॅनेजरने सांगितले
==============
मोखाडा : कातकरी रोजगाराच्या शोधात
    रवींद्र साळवे / मोखाडा , लोकमत
    या तालुक्यातील हजारो कातकरी बांधव रोजगारासाठी तालुक्याबाहेर जिल्हाबाहेर वीटभट्टीवर स्थलांतरित झाला आहे.
    मूळ निवासी असणाऱ्या या समाजाच्या मालकीची जमीन नाही शिक्षणाचा गंध नाही त्यातच व्यसनाधिनता, कुपोषण, बालविवाह आदी समस्यांचा डोंगर तसेच रोजगार हमी योजना या घटकापर्यंत पोहचत नाही, त्यामुळे आदिम जमात म्हणून ओळखला जाणारा कातकरी समाज दुर्लक्षित राहिला आहे. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने हा समाज दरवर्षी स्थलांतरित होतो. रोजगार हमीची कामे जरी आॅक्टोंबरपासून सुरु झाली असली तरी कायम स्वरूपी रोजगार मिळेल याची शाश्वती नसल्यामुळे हा समाज या रोजगार हमी योजनेपासून दूरच आहे
    पावसाळ्यात त्यांना गावातच शेतमजूर म्हणून काम मिळते मात्र दिवाळीनंतर पोटाची भूक भागवण्यासाठी हा समाज जिल्ह्यातील इतर तालुक्यात ठाणे कल्याण वसई विरार इत्यादी ठिकाणी स्थलांतरीत होत असतो नोव्हेंबर ते मे या कालावधीत वीटभट्टीवर काम केल्यानंतर पुन्हा पावसाळ्यात हा समाज गावाकडे परततो. हा परिपाठ परंपरागत सुरु आहे आणि त्यासोबत त्याची फरफटही सुरु आहे. ती थांबण्याच्या प्रतिक्षेत तो आहे.
==============
'वैद्यकीय अधिकाऱ्यांची २८८ पदे भरणार'
विशेष प्रतिनिधी, मुंबई
आरोग्य विभागाने मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी २२ जिल्ह्यांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची २८८ रिक्त पदे तातडीने भरण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य म्हणजे ही पदे थेट मुलाखतीद्वारे म्हणजे वॉक इन इंटरव्ह्यूव्दारे भरण्यात येणार आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची ७ हजार २८१ पदे मंजूर आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यापैकी सुमारे २५ टक्के पदे रिक्त होती. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम झाला होता. आता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी जिल्हा पातळीवर जाहिराती प्रसिद्धिचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला दिले आहेत.
 या जिल्ह्यांत होणार भरती
नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, ठाणे, रायगड, पालघर, मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
==============
पालघर : पो. अधीक्षक कार्यालयाचे नूतनीकरण
 सुसज्ज अशा पालघर पोलीस अधीक्षकांच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन कोकण परिक्षेत्नाचे महानिरीक्षक प्रशांत बुरूडे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
पालघर जिल्ह्याच्या निर्मितीची घोषणा दोन वर्षा पूर्वी झाल्यानंतर बिडको औद्योगिक वसाहती जवळच्या विक्रीकर विभागाच्या वास्तूमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, व जिल्हा परिषद कार्यालये लगबगीने सुरू करण्यात आली. पालघर जिल्ह्याची मुख्य प्रशासकीय इमारत म्हणविणार्‍या या वास्तूमध्ये जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने तसेच अधिकारी, कर्मचार्‍यांच्या मानाने वास्तू चे क्षेत्नफळ कमी असल्याने या तिन्ही विभागातील अधिकार्‍यांना जागेची कमतरता भासू लागली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय हे जवळच्याच एका खाजगी इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले.
पालघरच्या प्रशासकीय इमारतीचे दोन मजले हे पोलीस अधीक्षक कार्यालयाला दिले गेल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतनीकरणचे काम हाती घेण्यात आले होते. या अंतर्गत पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी येणार्‍या अभ्यागतांसाठी प्रतिक्षालय, साकारण्यात आले आहे.त्यात आकर्षक म्युरल्स बसविण्यात आली आहेत. या अधीक्षक कार्यालयाच्या नूतनीकरणाची जबाबदारी वास्तू शिल्प असोसिएटचे प्रसिद्ध वास्तुविशारद निशांत पाटील व ठेकेदार बशीर खत्नी यांनी पार पाडली. या वेळी त्यांचा सत्कार पोलीस महानिरीक्षक बुरडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पोलीस अधिक्षिका शारदा राऊत, अप्पर अधीक्षक बी यशोद, विनय कुमार इ. मान्यवर उपस्थित होते. ,लोकमत
==============
विरार : ५ लाखाला गंडा
नालासोपारा पूर्वेकडील धानीब बाग येथील संजय जैन यांना शेजारी असलेल्या विकास झा (२३) ने जुन्या नोटा बदलवून देण्याच्या नावाखाली ५ लाखाचा गंडा घातला.
त्याने दोन वेळा पंधरा हजारांच्या जुन्या नोटा बदलून नव्या दिल्या होत्या. त्यामुळे संजयचा विश्‍वास बसला होता. संजयने स्वत:चे आणि काकांचे असे पाच लाख विकासला दिले होते. विकासने पैसे घेऊन संजयला विरार पूर्वेकडील नारंगी फाटा येथे बोलावले होते. पैशांची बॅग घेऊन तो पैसे बदलून आणण्याचा बहाणा करून पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संजयने विरार पोलीसात गुन्हा दाखल केला. (वार्ताहर लोकमत)
==============
५० लाखांची लाच घेताना उपजिल्हाधिकारी अटकेत
पालघरः पालघरचे महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी शिवाजी दावभट यांना एका व्यक्तीकडून ५० लाख रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपतविरोधी पथकाने रंगेहाथ पकडले. नायब तहसीलदार सतीश मानिवडे व जयेश पाटील हा खासगी वाहनचालक या अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे.
 पालघर तालुक्यातील सालवड गावतील एका पारशी कुटुंबाच्या वेगवेगळ्या चार जमिनींच्या प्रकरणाचे निकाल गेले काही महिने अडकून ठेवण्यात आले होते. त्यासाठी दावभट यांनी ही पैशांची मागणी केल्याचे सांगण्यात आले. स्वीकारलेल्या नोटांमध्येही ४७ लाख रुपयांच्या नोटा बनावट असल्याचे सांगण्यात आले.
लाचलुचपत विभाग गेल्या तीन महिन्यांपासून सतत पाठपुरावा करून तपशील गोळा करण्याचे काम करत होता. अखेर गुरुवारी आपल्या कार्यालयात ५० लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना शिवाजी दावभाट यांच्यासह तिघांना अटक केली. दावभट यांना लाच घेताना अटक केल्याचे समजताच पालघर तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपजिल्हाधिकारी कार्यलयाजवळ जमले व फटाके वाजवून दावभट यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
==============
कवी डायस यांना बहिणाबाई पुरस्कार
वसई : वसईतील प्रसिद्ध कवी इग्नेशियस डायस यांच्या अधांतराला लटकलेल्या अवतरणात या कविता संग्रहाला बहिणाबाई पुरस्कार जाहीर झाला आहे.
त्यांच्या कवितेची ओळख साहित्य रसिकांना व्हावी यासाठी त्यांच्या कवितेवर चर्चासत्र आणि त्यांचा सत्कार रविवार दि.२७ नोव्हे.२0१६ सकाळी १0 वा. भुईगाव युवक वाचनालय येथे आयोजित केला आहे. जेष्ठ साहित्यिक, विचारवंत फा. फ्रांन्सिस दिब्रिटो यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येईल. चर्चसत्रात कवी समीक्षक डॉ.आशुतोष पाटील, सायमन मार्टिन, गणेश वसईकर, महेश लीला पंडित, कृष्णा किंबहुने सहभागी होतील. तर प्रमुख पाहुणो म्हणून प्रसिद्ध कवी हेमंत दिवटे आणि वर्जेश सोलंकी उपस्थित राहणार आहेत. भुईगाव येथील युवक वाचनालय, युवा विकास संस्था, कल्पतरू पतसंस्था तसेच स्वाभिमानी वसईकर संघटना यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. (वार्ताहर लोकमत)

कवी डिसोजा यांना पुरस्कार
आवानओल प्रतिष्ठान कणकवलीतर्फे देण्यात येणारा कविवर्य द.भा.धामणस्कर काव्य पुरस्कार वसईतील कवी फेलिक्स डिसोजा यांना जाहीर झाला आहे. कवीच्या काव्य संग्रहाचा विचार न करता काव्य गुणवत्तेचा विचार करुन त्याच्या पुढील लेखनाला प्रोत्साहन म्हणून हा पुरस्कार दिला जातो. मात्र त्यासाठी कविच्या वाङमयीन नियतकालिकांमध्ये प्रसिध्द झालेल्या कवितांचा विचार करण्यात येतो. कवी डिसोजा यांच्या कविता मुक्तशब्द, वाङमयवृत्त, दर्शन, मुराळी, अभिधानानंतर, खेळ अशा अनेक प्रतिष्ठित नियतकालिकांमधून प्रसिध्द झाल्या आहेत. त्यांना साहित्य अकादमीची प्रवास फेलोशिपही प्राप्त झाली आहे. रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे स्वरूप आहे. जानेवारीमध्ये कणकवली येथे होणार्‍या ७ व्या वसंत सावंत स्मृति उगवाई काव्य उत्सवात कवी डिसोजा यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी लोकमत)
==============
लोकवर्गणीतून साकारले खार्डी डोलीव ग्रापं कार्यालय
अडीच लाख शासनाचे : उर्वरित निधी जनतेचा

सुनिल घरत पारोळ लोकमत
विरार पूर्व भागातील खार्डी डोलिव येथे सुसज्य ग्रामपंचायत कार्यालयाचे उद््घाटन आ क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यालयासाठी सतरा लाखांचा निधी खर्च झाला. अडीच लाखाचा निधी शासनाच्या जन सुविधा योजनेतून तर बाकीचा निधी लोकवर्गणीतून जमा करून तो खर्च करण्यात आला. तसेच ग्रामपंचायतीने केलेली रस्ते, विहीर बाधंणी, तलाव, कूपनलिका इ. विकासकामे सरपंच प्रकाश भोईर यांनी यावेळी कथन केली.
या उद््घाटन प्रसंगी माजी जि प अध्यक्ष काशीनाथ पाटील, उपसभापती जयप्रकाश ठाकूर, प्रभाकर पाटील, डी के पाटील ग्रामसेवक शिवाजी तनपुरे उपसरपंच संगीता भगत इ. या वेळी हजर होते.
==============
अधिकाऱ्यांच्या हल्लेखोराला तडीपारीचे आदेश
म. टा. वृत्तसेवा, पालघर
राजकीय वरदहस्ताने धुडगूस घालून तलासरीतील सीमा टोलनाक्यावरील अधिकारी व पोलिसांवर हल्ला आणि मारहाण करणाऱ्या गुंडाला डहाणूच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी तडीपारीचा आदेश बजावला आहे. मात्र या आदेशाची अंमलबजावणी होण्याआधीच तो गायब झाला आहे.
तलासरीतील सीमा टोलनाक्यावर दहशत पसरवून अल्ला रख्खा कुरेशी हा गुंड व त्याच्या साथीदारांची दहशत होती. दापचारी येथे असलेल्या राज्य सीमा तपासणी नाक्यावर कर न भरता अवजड वाहने जाऊ देणाऱ्या अनेक टोळ्या असून या टोळ्यांना राजकीय वरदहस्त असल्याचे मानले जाते. त्यामुळे तलासरी भागात दहशत निर्माण करून या टोळ्यांनी धुडगूस घातला होता. त्याच्यावर कायदेशीर कारवाईस गेलेले तलासरी पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक ए. मुल्ला यांच्यावर तलासरी नाक्यावर भर चौकात प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक मुल्ला दापचारी सीमा तपासणी नाक्यावर कर्तव्य बजावत असलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांना मारहाण व प्राणघातक हल्ला करणाऱ्या अल्ला रख्खा कुरेशी याच्यावर डहाणू उपविभागीय अधिकारी प्रणाली दिघावकर जाधव यांनी दोन वर्षांचा तडीपारीचा आदेश बजावला व त्याची कार्यवाही तलासरी पोलिसांनी तात्काळ केली.
 कुविख्यात गुंड अल्लारखा कुरेशी याच्या विरुद्ध पोलिसांनी तडीपारीचे प्रकरण डहाणू उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुरू असतानाच या गुंडाने साथीदारांसह तलासरीतील पत्रकार सुधाकर काटे यांना मारहाण करून धमकी दिली होती. या सर्वांचा विचार करून अल्लारख्खा कुरेशी यास तडीपारीचा आदेश काढण्यात आला आहे. मात्र तडीपारीचा आदेश प्राप्त होताच अल्लारखा कुरेशी हा गायब झाला आहे. तडीपारीचा आदेश रद्द करण्यासाठी तो राजकारण्यांच्या गाठीभेटी घेत असल्याचे समजते. बुधवारी दुपारी अल्लारखा कुरेशी एका आमदारासह पालघर येथे पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी आला होता, मात्र त्याची भेट होऊ शकली की नाही, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
==============

सविस्तर वृत्त http://www.palgharlive.com/2016/11/blog-post_25.html

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home