Thursday, November 24, 2016

पालघर वार्ता २४ नोव्हेंबर २०१६

   
पालघर वार्ता २४ नोव्हेंबर २०१६
==============
वसईत १० हजार लोकांच्या मृत्यूचा सापळा ?
वसईतील हजारो वर्षांपासून भारतातील सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या महत्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या निर्मळ येथे विमलेश्‍वर महादेवाची यात्रा कार्तिक एकादशी (२५ नोव्हेंबर २०१६) पासून सुरु होतो. लाखाहून अधिक भाविक यात्रेकरू आणि पर्यटक ह्या यात्रेत उपस्थित असतात. स्थानिकाना येथे रोजगार मिळतो , त्याचप्रमाणे वसईतील वैशिष्ट्यपूर्ण सुकेळी आणि इतर पदार्थांची मेजवानी असते.
शासकीय अनास्था
प्राचीन पवित्र निसर्गरम्य तीर्थक्षेत्राकडे शासनाने आजपर्यंत दुर्लक्ष केले आहे. शासकीय अनास्थेमुळे येथे येणाऱ्या भाविकांसाठी किंवा पर्यटकांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही. दुसरीकडे अनधिकृत बांधकाम , सांडपाणी ह्या समस्यांनी वेढले आहे.
टीम आमची वसईने घेतला पुढाकार
सामाजिक जबाबदारीचा वसा घेतलेल्या टीम आमची वसईने यात्रेच्या आधी सर्वत्र तपासणी केली, त्यात अनेक धक्कादायक गोष्टी आढळुन आल्या. यात्रेत गैरप्रकार वाढत असतानाच यात्रेकरूंच्या जीवाशी खेळ होत असल्याचे उघडकीस आले आहे.
अनैतिक अवैध अपवित्र प्रकार
जुगार, मद्यपान, मांसाहार, अश्लील नाच, कर्णकर्कश आवाज ह्यामुळे निर्मळ तीर्थक्षेत्राचे पावित्र्यभंग होते आहे. ह्याविषयी टीम आमची वसईने निषेध नोंदवला आहे. शासकीय यंत्रणांकडे हे गैरप्रकार थांबवण्यासाठी निवेदन दिले आहे. त्याचप्रमाणे जनजागृती मोहीम सुरु केली आहे.
मौत का समुंदर ?
यात्रेतील पारंपारिक व साहसी खेळांची जागा आता यांत्रिक खेळण्यांनी घेतली आहे. यांत्रिक झुले , पाळणे , चक्र ह्यात मौत का कुआ नावाचा प्रकार हटकून असतो. एका बंदिस्त रिंगणात फिरणाऱ्या गाड्यांवर कसरती करणारे तरुण तरुणी स्वतःच्या आणि लोकांच्या जीवाशी खेळत असतात. निर्मळ येथे भरणाऱ्या यात्रेत मौत का कुआ सामील झाला व गर्दी खेचु लागला. दरवर्षी काहीतरी अपघात होत राहिले. त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही , शासकीय यंत्रणेने तपास केल्याची नोंद उपलब्ध नाही.
विनापरवानगी?
मौत का कूआ सारख्या जीवघेण्या प्रकाराला परवानगी कोणी दिली आहे ह्याची माहितीच असे खेळ उभारणारे देउ शकले नाही. टीम आमची वसईने ह्याचा पाठपुरावा केला असता लवकरच परवानगी घेतली जाईल असे कंत्राटदाराने सांगितले. मात्र हे प्रचंड सांगाडे उभे करायला कोणी परवानगी दिली हे समजु शकले नाही.
उंचीची मर्यादा किती?
४० फुटाहुन उंच असलेल्या सांगाड्यात माणसांच्या जीवांशी खेळ होत आहे. परंतु अशा धोकादायक प्रकारांवर कोणतीही बंदी नाही, मात्र दहीहंडीच्या मानवी मनोऱ्यावर बंदी आणली गेली. हा कोणता न्याय असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
शॉर्ट्सर्किट आणि आगीची शक्यता
मौत का कुआच्या लोखंडी सांगाड्याच्या आजूबाजूला उघड्यावर असलेल्या वीजेच्या तारांमधुन वाहती वीज, तिथेच साचलेले पाणी , लोखंडाचे तुकडे हे हजारोंच्या मृत्यूचे कारण बनु शकतात.
अरुंद धोकादायक जिने.
एकावेळी १००-२०० लोकांना मौत का कुआ पहाण्यासाठी प्रवेश मिळतो. साधारण ४० फुट उंच असलेल्या ह्या जीन्यांवरुन चालणे कठीण असते. जर एखादा अपघात घडला , तर मोठा दुर्दैवी प्रकार घडु शकतो.
कर्णकर्कश आवाज आणि महिलांचे प्रदर्शन
मौत का कुआमध्ये होणारे गाड्यांचे आवाज कमी पडतात असे वाटुन आयोजक मर्यादेपेक्षा जास्त आवाजाचे ध्वनीपेक्षक वापरतात. ज्यांना देवदर्शन व यात्रेचा आनंद उपभोगायचा आहे, त्यांच्यावर देखील जबरदस्ती होते. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजासोबत प्रवेशद्वाराजवळ बसणाऱ्या भडक पोशाख करणाऱ्या महिलांचे प्रदर्शन मांडले जाते.
चेंगराचेंगरीत १०,००० लोकांना धोका ?
अरुंद चिंचोळ्या रस्त्यावर साधारण ८०० मीटरच्या पट्ट्यात १०,००० च्या आसपास भाविक येतात. मुंगी शिरायला जागा नसते एवढी गर्दी असते. कागदोपत्री शासकीय यंत्रणेच्या लेखी प्रचंड बंदोबस्त असला तरी प्रत्यक्षात ८-१०चीच उपस्थिती दिसुन येते. आकाशपाळणे व इतर धोकादायक यंत्रांच्या जवळपास तर ॲम्ब्युलन्स पोहचायला जागा नसते.
हजारो रुपयांचा महसुल कि हजारोंचा जीव?
मौत का कुआ हा १०-१५ लोकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे , पण त्यामुळे होऊ शकणारे अपघात हे हजारो लोकांच्या जीवावर बेतु शकतात. महसुल खात्यात काही हजार रुपांचा कर जमा होत असला तरी, १००-२०० लोकांचे मनोरंजन करणाऱ्या मौत का कुआमुळे यात्रेत येणाऱ्या दहा हजार लोकांचा जीव जाऊ शकतो. काही हजार रुपांचा महसुल विरूध्द दहा हजार लोकांचा जीव ह्या लढ्यात शासकीय यंत्रणा कोणाची बाजु घेणार आहे ह्याची चर्चा वसई तालुक्यात होते आहे.
टीम आमची वसईची जनजागृती
हे सर्व लक्षात घेऊनच टीम आमची वसईने मौत का कुआ ह्या अत्यंत धोकादायक प्रकाराला विरोध केला आहे. ह्याबाबतीत टीम आमची वसईने जनजागृती मोहिम सुरु केली असुन त्याला सर्वच थरातुन पाठिंबा लाभला आहे. तीर्थक्षेत्राचे पावित्र्यभंग आणि निर्सगसंपत्तीचा नाश करणारे हे गैरप्रकार हटवावे व ती जागा मोकळी करावी. त्या जागेतुन किती शासकीय महसुल जमा होतो आहे आणि त्याचा विनियोग कुठे होतो आहे त्याची माहिती यात्रेकरूंसाठी उपलब्ध असावी जेणेकरुन स्थानिकांवर व्यावसायिक अन्याय होत असल्यास निर्दशनात येईल.
आदिवासी कोळी भंडारी वाडवळ कुपारी व अनेक बहुरंगी समाजांचे वसईच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक घडणीत योगदान आहे. वसई तालुक्यातील स्थानिक संस्कृती, इतिहास व निसर्गाची माहिती देणारे प्रदर्शन भरवावे. आणि फक्त स्थानिकांनी बनवलेल्या पारंपारिक वस्तुंची बाजारपेठ असावी अशी मागणी आता जोर धरत आहे.
==============
सागरी सुरक्षा रामभरोसेच!
निशांत सरवणकर, मुंबई , लोकसत्ता
राज्यातील २२ निर्मनुष्य बेटांकडे दुर्लक्षच; अनेक सागरी पोलीस ठाणी कागदावरच
मुंबईवरील हल्ल्याला आठ वर्षे पूर्ण होत आली तरी राज्याची सागरी सुरक्षा रामभरोसे असल्यासारखीच स्थिती आहे. राज्यात ४४ सागरी पोलीस ठाणी असून ही सर्व पोलीस ठाणी कार्यरत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रशिक्षित कर्मचारी आणि साधनांची कमतरता आदींमुळे सागरी सुरक्षा रामभरोसे असल्यासारखीच परिस्थिती असल्याची वस्तुस्थिती वरिष्ठ पोलीस सूत्रांकडूनही मान्य केली जात आहे. यापैकी २० टक्के सागरी पोलीस ठाण्यांना स्वतंत्र कायालये नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. २२ निर्मनुष्य बेटांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून तब्बल एक हजार किलोमीटर इतकी खाडी पसरली आहे. कुलाबा येथील बधवार पार्क परिसरातून दहा अतिरेकी शिरले आणि त्यांनी २६/११ चा संहार घडवून आणला. तेव्हापासून मुंबईची सागरी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यासाठी विशेष महानिरीक्षक (सागरी सुरक्षा) असे नवे पदही निर्माण करण्यात आले आहे. नौदल आणि तटरक्षक दलाशी समन्वय साधून सागरी गस्तीची जबाबदारी या महानिरीक्षकांवर आहे. त्यासाठी आवश्यक असलेली सागरी पोलीस ठाणी उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी खलाशी पोलीस नियुक्त करण्यात येत आहेत. आतापर्यंत १६०० हून अधिक पोलिसांना खास प्रशिक्षण देण्यात आले असले तरी ते सर्व भरसमुद्रात गस्त घालण्यासाठी हे संख्याबळ कमी असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

शिवाय या पोलिसांना ही नियुक्ती म्हणजे शिक्षा वाटत असल्यामुळे त्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्याची मागणी अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. राज्यातील निर्मनुष्य अशा २२ बेटांच्या सुरक्षेबाबत काहीच विचार झालेला नाही, अशी बाबही जूनमध्ये मुख्यमंत्र्यांपुढे झालेल्या एका सादरीकरणामुळे पुढे आली आहे. या बेटांच्या सुरक्षेबाबात उपाययोजना करण्यात येणार असली तरी अद्याप त्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. या निर्मनुष्य बेटांकडे तसे दुर्लक्षच होत असून त्यासाठी अपुऱ्या संख्याबळाचे कारण पुढे केले जात आहे. राज्याच्या ताब्यात ६९ स्पीड बोटी आहेत. परंतु या अपुऱ्या असल्याचे सांगितले जात आहे.

ही २२ बेटे सुरक्षेविना : अर्नाळा, पोशफिर, जुली, पणजू, ग्रीन आयलंड (पालघर); अम्बू, काश्यारॉक आणि बुचर आयलंड (मुंबई), वाशी (ठाणे); एलिफंटा (नवी मुंबई); तानसा रॉक, खंडेरी, मुरुड कानसा, मुरुड जंजिरा फोर्ट, कुलाबा, उंदेरी (रायगड); दापोली जंजिरा फोर्ट ; मालवण

पदमगड, सिंधुदुर्ग फोर्ट, वेंगुर्ला मामा-भाचे, निवतीरॉक, कवडारॉक (सिंधुदुर्ग)

    अपूर्ण बांधकाम : मुंबई सागरी – एक पोलीस ठाणे (माहीम)
    कामे सुरू होऊ न शकलेली पोलीस ठाणी : अर्नाळा, कळवा (पालघर), दाभोळ, पावस (रत्नागिरी), उत्तन (ठाणे ग्रामीण), येरंगळ (मुंबई), दादर, मोरा
    पूर्ण झालेली चेक पोस्ट : पालघर (१६), रत्नागिरी (४), रायगड (३), नवी मुंबई (२), ठाणे ग्रामीण, मुंबई (प्रत्येकी एक)
    बांधकामे पूर्ण झालेली पोलीस ठाणी : सातपाटी (पालघर), एनआरआय (नवी मुंबई), मांडवा, दिघी (रायगड), बानकोट, जयगड, नटे (रत्नागिरी), विजयदुर्ग, आचरा, निवती (सिंधुदुर्ग)
    अपूर्ण चेकपोस्ट : मुंबई (४), ठाणे ग्रामीण – एक चेक पोस्ट अपूर्ण
==============
वसई : तहसीलदारांच्या आदेशाचे तलाठय़ाकडून उल्लंघन
बेकायदा भराव करणारे ट्रक रंगेहाथ पकडल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करून कामण तलाठय़ाने तहसिलदारांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. याप्रकरणी एका वकीलाने कोकण आयुक्तांकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
मौजे कामण येथील सर्वे क्र. १५/४ या जमिनीवर दिड हजार ब्रास डेबरीजचा भराव केला होता. या भरावाकरीता कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्यामुळे तलाठी गणेश पाटील यांनी या भरावाचा जागेवर जाऊन पंचनामा केला असता, भराव करणारे ट्रक सोडून चालक पळून गेले होते.
३ जून २०१६ रोजी घडलेल्या या प्रकाराबाबत गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश तलाठी गणेश पाटील यांना त्यांनी दिले होते आणि तशी खबरही पोलीसांना दिली होती.
मात्र, या आदेशाला गणेश पाटील यांनी न जुमानता गुन्हा दाखल करण्यास गेल्या पाच महिन्यांपासून टाळाटाळ केली आहे. या प्रकरणी अँड. किशोर म्हात्रे यांनी तहसीलदारांकडे सातत्याने तक्रारी करून तलाठी पाटीलवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, तहसीलदारांनीही याप्रकाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. . (प्रतिनिधी,लोकमत)
==============
कर्ज परतफेडीसाठी मुदतवाढ , साठ दिवस अधिक मिळणार; एक कोटी रुपयांपर्यंतची मर्यादा
मुंबई - देशभरातील चलन तुटवड्याची दखल घेऊन एक कोटी रुपयांपर्यंतच्या गृह, मोटार, कृषी आणि अन्य कर्जाची परतफेड करण्यासाठी साठ दिवसांचा अतिरिक्त कालावधी रिझर्व्ह बॅंकेने सोमवारी दिला.
रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत परतफेड असणाऱ्या कर्जासाठी ही मुदतवाढ असेल. या काळातील कर्जे थकीत समजली जाणार नाहीत; तसेच त्यांची फेररचनाही होणार नाही, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. सध्या असलेल्या परतफेडीच्या मुदतीत साठ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. ही सवलत कोणत्याही बॅंकेतील एक कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी असणार आहे. या सवलतीचा फायदा व्यावसायिक अथवा खासगी कर्जदारांना एक कोटी रुपयांपर्यंतच्या बॅंका, वित्तसंस्थांमधील कर्जालाही लागू असेल. यात कृषी व गृहकर्जाचा समावेश आहे. (पीटीआय)
==============
अभियंता सेवा परीक्षेत कनोजे जिल्हय़ात प्रथम
विक्रमगड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियंत्रिकी सेवा परीक्षेत विक्रमगडचा आदिवासी युवक निखिल सुरेश कनोजे हा महाराष्ट्रात ७ वा तर पालघर जिल्हयांतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. त्याचे आई-वडील शिक्षक आहेत. घरात ज्ञान संपन्नतेचे वातावरण असल्याने त्याने या परिक्षेमध्ये यश मिळविले आहे. सध्या त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता म्हणून निवड झाली आहे. त्याने नवी मुंबईच्या एमजीएम अभियांत्रिकी महाविदयालयातून सिव्हील इंजिनियरिंगची पदवी घेतली. त्याने पहिल्याच प्रयत्नामध्ये हे यश मिळविले. (लोकमत)
==============
वसईच्या श्रीक्षेत्र निर्मळची आजपासून यात्रा
वार्ताहर,पुढारी
इतिहास प्रसिद्ध श्रीक्षेत्र निर्मळ येथे भगवान परशुराम यांनी स्थापन केलेल्या विमलेश्‍वर महादेवाची यात्रा गुरुवारपासून सुरु होत असून ती 11 दिवस चालणार आहे. या यात्रेत पालघर, ठाणे जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपर्‍यातील लाखो भाविक हजेरी लावणार आहेत. गुरुवारी यात्रेला प्रारंभ होऊन पूजा विधीला सुरुवात होईल. त्यानंतर शुक्रवारी पहाटे कार्तिकी एकादशीपासून देवदेवतांना अभिषेक घातल्यावर मंदिरात भजन, कीर्तन तसेच रात्री पालखी सोहळा होणार आहे.
 निर्मळ येथे श्रीमद जगदगुरू शंकराचार्य यांची समाधी  असल्याने या क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यात्रेत दरवर्षी चार ते पाच लाख भाविक गर्दी करतात. यात्रेत मिठाई तसेच विविध वस्तुंची दुकाने, खेळाचे  स्टॉल थाटण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील 11 दिवस येथील अबालवृद्धांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. यात्रेसाठी प्रशासन सज्ज झाले असून वीजपुरवठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालये, रोगराई पसरू नये यासाठी यंत्रणा, वैद्यकीय पथके, अग्निशमल दल आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा काळात भुईगावपासून पुढे निर्मळ या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून या दिवसांत एसटी महामंडळाकडून विशेष आणि जादा बस सोडण्यात येणार आहेत. नागरिक तसेच भाविकांनी यात्रा सुरळीत व शांततेत पार पडण्याचे आवाहन देवस्थान कमिटी, पोलीस तसेच स्थानिक प्रशासनाने केले आहे.
==============
वसई-विरार : डॉक्टरांची सुरक्षा धोक्यात
मयुरेश वाघ, वसई, महाराष्ट्र टाइम्स
पालिका रुग्णालयात तृतीयपंथींचा गोंधळ
वसई-विरार शहर महापालिकेच्या तुळींज येथील पालिका रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत पोलिसांनी लक्ष द्यावे, असे साकडे पालिकेच्या डॉक्टरांनी घातले आहे. दोन दिवसांपूर्वी पालिका रुग्णालयात काही तृतीयपंथींनी डॉक्टरांशी वाद-विवादी केल्यानंतर पोलिसांना पालिकेकडून पत्र देण्यात आले आहे.
 पालिकेचे नालासोपारा पूर्व विजयनगर तुळींज येथे व वसई गावात सर डी. एम. पेटीट रुग्णालय आणि सातीवली येथे माता-बाल संगोपन केंद्र कार्यरत आहे. या रुग्णालयांमध्ये कायम रुग्णांची गर्दी असते. विजय नगर तुळींज येथील पालिका रुग्णालयात २० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास एक तृतीयपंथी उपचार घेण्यासाठी आला. त्याच्याबरोब त्याचे दोन सहकारी होते.
 उपचारांसाठी आलेला तृतीयपंथी किरकोळ जखमी झालेला होता. त्याच्यावर डॉक्टरांनी त्वरित उपचारही केले. त्यानंतरही त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला रुग्णालयात भरती करण्यावरून डॉक्टरांशी वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच अश्ललि हावभाव व नृत्य करून जवळपास अडीच तास रुग्णालयामध्ये धिंगाणा घातला. यापूर्वी देखील गर्दुल्ल्यानी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली होती. या प्रकारच्या घटना वारंवार घडत असतात. अशा घटनांमुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. तृतीयपंथीयांनी रुग्णालयात केलेल्या प्रकाराबाबत पालिकेने पोलिसांना माहिती दिली. मात्र पोलिसांनी आतापर्यंत त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे रुग्णालय परिसरात अशा घटना घडू नयेत, म्हणून पोलिसांनी प्रयत्न करावेत, अशी विनंती पालिकेकडून करण्यात आली आहे.
आयसीयू सुरू होणार
वसई-विरार शहर महापालिकेच्या तुळींज येथील रुग्णालयात सात खाटांचा अतिदक्षता विभाग (आय.सी.यू.) व दंत चिकित्सा विभाग तयार करण्यात आला आहे. २६ नोव्हेंबरपासून हे विभाग सुरू होणार असून त्यासाठी आवश्यक मशीनरी आणण्यात आली आहे. आयसीयू, डायलेसिस व सोनोग्राफी या विभागात आकारण्यात येणारे दर नुकतेच पालिका महासभेत ठरविण्यात आले. नाममात्र दरात ही सेवा दिली जाणार आहे. येत्या काही महिन्यांत वसई गावातील पालिकेच्या पेटीट रुग्णालयामध्येही आयसीयू विभाग सुरू करण्याचा प्रयत्न आयुक्त सतीश लोखंडे यांनी सुरू केले आहेत.
==============
वसई-विरार महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
मयुरेश वाघ, वसई, महाराष्ट्र टाइम्स
विरार शहरात २०१३ पासून भुयारी गटार योजनेचे काम सुरू असून त्याअंतर्गत विरारमध्ये उभारण्यात आलेल्या मलजल प्रक्रिया केंद्राचे उदघाटन शनिवारी होणार आहे. विरारमधील मलजल या केंद्रात जमा होणार असून त्यावर प्रक्रिया करून शुद्ध केले जाणार आहे. पालिकेच्या वतीने सुरू होत असलेला हा पहिला मोठा प्रकल्प आहे.
 केंद्र सरकारच्या सॅटेलाईट सिटींना पायाभूत सुविधा देण्याच्या योजनेअंतर्गत विरार येथील भुयारी गटार योजना २०१२ मध्ये मंजूर झाली. विरार पूर्व-पश्चिमेला भुयारी गटार योजना म्हणजेच एसटीपी २ चे काम करण्यासाठी जवळपास १३८ कोटींचे टेंडर मंजूर करण्यात आले होते. २६ मार्च २०१३ रोजी या कामाचे आदेश ठेकेदारला देण्यात आले. मे २०१६पर्यंत या कामास मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे हे काम लांबले.
या योजनेअंतर्गत शहरातील सर्व इमारतींमधून निघणारे मलजल भुयारी गटारातून या मलजल प्रक्रिया केंद्रापर्यंत नेले जाईल. बोळींज गोकुळटाऊनशीप भागात पालिकेने ३० एमएलडी क्षमतेचे मलजलनि:स्सारण प्रक्रिया केंद्र (सिवरेज ट्रिटमेंट प्लांट) उभारले आहे. या केंद्राचे उदघाटन २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. गेली तीन वर्षे या योजनेसाठी रस्त्यांचे खोदकाम केले गेल्याने नागरिकांचे बरेच हाल झाले. या योजनेसाठी शहरात एकूण ६१ किलोमीटर मुख्य भुयारी पाइप लाइन टाकण्यात आली आहे. या योजनेसाठी आतापर्यंत ११५ कोटींचा खर्च करण्यात आला आहे.
 या योजनेचे काम झटपट पूर्ण व्हावे म्हणून पालिकेचे आयुक्त सतीश लोखंडे व नगर अभियंता संजय जगताप यांनी गेल्या काही महिन्यांत प्रयत्न करतानाच स्वत: या कामावर लक्ष ठेवले. आता प्रक्रिया केंद्र सुरू होणार असून बुधवारी आयुक्तांनी अधिकाऱ्यांसह येथे येऊन केंद्राची पाहणी केली. विरार पूर्व-पश्चिम भागात अंतर्गत पाइप टाकून झाले आहेत. मात्र विरार पूर्वेकडील पाइप पश्चिमेला नेण्यासाठी रेल्वे क्रॉसिंग करावे लागणार आहे. हायड्रेलिक जॅकींग पुशींग पद्धतीने रेल्वे क्रॉसिंगचे काम करण्यात येणार आहे. रेल्वेकडून या कामास तत्वत: मंजुरी मिळाली असून रेल्वे क्रॉसिंग पाइप टाकण्याचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.
केंद्र सुरू होणार
 बोळींज येथे उभारण्यात आलेल्या मलजल प्रक्रिया केंद्रात अत्याधुनिक यंत्रणा वापरण्यात आली आहे. शहरातून येणाऱ्या मलावर येथे दररोज प्रक्रिया होणार असून या पाण्याचा पुर्नवापर केला जाणार आहे. बांधकामासाठी तसेच फायर ब्रिगेड, गार्डन, रस्ते धुणे यासाठी या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो. शहरातील इमारती, घरे, आस्थापने या केंद्राला जोडण्यासाठी एकूण सुमारे ११२० जोडण्या कराव्या लागणार आहेत. पालिका याबाबत रहिवाशांना आवाहन करणार आहे. इमारतींनी एका महिन्यात या जोडण्या न केल्यास पालिका त्या करून देणार असून इमारतींकडून त्याची रक्कम वसूल केली जाईल. इमारतींच्या टाक्यांच्या जोडण्या चेंबरशी करायला आणखी तीन महिने लागू शकतात.
==============
पालघर व ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम खात्यात मोठा गैरव्यवहार
म. टा. वृत्तसेवा, पालघर
 पालघर व ठाणे जिल्ह्यातील भ्रष्टरचाराने बजबजलेल्या सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या मोजमाप पुस्तकिांची ( मेजरमेट बुक ) चौकशी करा, अशी मागणी शिवक्रांती संघटनेने मुख्यमंत्रयकडे केली आहे.
 ठाणे व पालघर या दोन जिल्ह्यांमधील सार्वजनकि बांधकाम विभागामध्ये मोठया प्रमाणावर गैरव्यवहार सुरू आहे. कामे न करताच बिले काढणे, बोगस कागदपत्रे तयार करून सरकारी तिजोरीची लुट करणे, अंदाजपत्रकाची रक्कम वाढवून बिले वाढवून घेणे, असे प्रकार केले जातात. प्रत्यक्ष कामाच्या रकमेपेक्षा कितीतरी पटीने अधिक अंदाजपत्रक बनवून शासनाची फसवणूक केली जाते.
 राजरोस चाललेला हा भ्रष्टाचार रोखायचा असेल तर या दोन्ही जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषदेच्या बांधकाम कार्यालयातील मोजमाप पुस्तकिांची चौकशी स्वतंत्र समतिी नेमून करावी, अशी मागणी शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष शरद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
 पालघर जिल्ह्यामध्ये कामे न करताच बिले काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठक्कर बाप्पा योजनेमध्ये झालेला भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर पोलसि ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांचा तपास करताना असे लक्षात आले की, मंगल कार्यालयाच्या इमारतीचे बिल व अंदाजपत्रक शाखा अभियंत्याने तयारच केलेले नव्हते तर या विभागामध्ये अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी मोजमाप पुस्तकिाही शाखा अभियंत्याने नव्हे तर ठेकेदारानेच लिहलिी होती, असे शरद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने एका शाखा अभियंत्यास जबाबदार धरून निलंबति केले आहे. मात्र हा एकाच मोजमाप पुस्तकिेचा प्रश्न नाही, तर या दोन्ही जिल्ह्यांतील सर्वच कार्यालयांमधील अनेक मोजमाप पुस्तकिा गायब आहेत. या सर्व मोजमाप पुस्तकिांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी केल्यास कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार उघड होईल, असेही पाटील म्हणाले.< सार्वजनिक बांधकाम विभागातील काही शाखा अभियंत्यांनी स्वतःची स्वतंत्र कार्यालये थाटली आहेत. तेथे पगारावर खाजगी कर्मचारी कामाला ठेवले आहेत. हेच कर्मचारी ही बोगस बिले व अंदाजपत्रके बनवतात. मोजमाप पुस्तकिाही तेच तयार करतात. या मोजमाप पुस्तकिा शाखा अभियंत्याच्या खाजगी कार्यालयांमध्ये वा घरीच आहेत. त्या कार्यालयामध्ये नाहीत. म्हणूनच प्रत्येक कार्यालयातील किती मोजमाप पुस्तकिा गायब आहेत ? व त्या कुणी लिहील्या आहेत ? याची चौकशी होणे गरजेचे आहे.
 दरम्यान, मोजमाप पुस्तकिा गायब झाल्याची चर्चा या दोन्ही जिल्ह्यात सुरू असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्यात मोठा गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता आहे.
==============
पालघर विकास आराखड्यात शेतकऱ्यांचा विश्वासघात
नरेंद्र पाटील, पालघर, महाराष्ट्र टाइम्स
 पालघर नगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्याला मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी देऊन पालिका क्षेत्रातील ग्रामस्थ, शेतकरी आणि आदिवासींवर अन्याय केल्याचा आरोप प्रारूप विकास आराखडाविरोधी संघर्ष समितीने केला आहे. पालिकेच्या कार्यक्षेत्रातील टेभोडे, नवली, अल्याळी, घोलविरा, वेवूर, गोठणपूर या गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांवर विकास आराखड्याचे आरक्षण लादले असून या गावामध्ये बिल्डर व मोठ्या जमीनदारांवर कोणत्याही प्रकारचे आरक्षण न लावता, हा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. नगरपालिकेच्या या विकास आराखड्यात चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकल्याबाबत संघर्ष समिती मार्फत जिल्हाधिकारी, कोकण महसूल आयुक्त, पालक मंत्री, नगरविकास सचिव इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह राज्यपालांकडेही दाद मागितली. मात्र त्यांना पोकळ आश्वासनांपलिकडे काहीही मिळाले नाही.
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघर्ष समितीच्या पदाधकिाऱ्यांबरोबर झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासनही दिले होते. मात्र या आश्वासनाला मुख्यमंत्र्यांनीच हरताल फसल्याचा आरोप विकास आराखडाविरोधी संघर्ष समितिने केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी पालघर पालिकेच्या विकास आराखड्यास मंजुरी देताना संघर्ष समितीच्या आश्वासनास तिलांजली दिल्याचे समितीने म्हटले असून हा विश्वसघात असल्याचा आरोप शेतकरी व ग्रामस्थांनी केला आहे. बैठकीदरम्यान, फडणवीस यांनी शेतकरी व ग्रामस्थांकडून पुन्हा हरकती मागवल्या होत्या, मुख्यमंत्र्यांच्या सूचने नुसार शेतकरी व ग्रामस्थांनी आपल्या हरकती नगरविकास विभागाकडे पुन्हा नोंदविल्या. मात्र त्यातील एकही हरकतीचा विचार मुख्यमंत्र्यांनी न केल्याचे संघर्ष समितीने म्हटले आहे. विविध शासकीय कार्यालयांसाठी असलेली आरक्षणे सरकारी कार्यालय व निवासस्थाने अशा नावाने बदलण्यात आली आहेत.
==============
वसई : नालासोपाऱ्यात फेरीवाल्यांची दादागिरी
नालासोपाऱ्याच्या पश्चिमेकडील उड्डाणपुलाकड़ून रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर फेरीवाल्यांंनी अतिक्रमण केले असून काही गुंडांचा आशिर्वाद लाभल्यामुळे या फेरीवाल्याकडून दादागिरी केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्यामुळे महापालिकेने त्यांना नोटीसा बजावल्या आहेत.
    रिक्षा स्टॅण्डसमोर असलेल्या सत्यम शिवम कॉम्प्लेक्स जवळून रेल्वे स्थानकाकडे एक रस्ता जातो. या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम तत्कालीन नगरपालिकेने केले होते. त्यानंतर मात्र, हा रस्ता खाजगी असल्याचे कारण देवून त्यावर फेरीवाले बसवण्याचा सपाटा काही लोकांनी लावला. सत्यम कॉम्प्लेक्स आणि तिच्या समोर असलेल्या इमारतीमध्ये सुमारे वीस फुटांचे अंतर होते. त्यावर पालिकेने दहा फु टांचा रस्ता बनवला होता. त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे या दोन इमारतींमधील अंतर केवळ पाच फु टांंचे राहिले आहे.

त्यामुळे एकमेकांना धक्का देत प्रवाशांना रेल्वे स्थानक अथवा रिक्षास्टॅण्डकडे जावे लागते. अशावेळी फेरीवाल्यांच्या टोपलीला अथवा फळीला धक्का लागला तर त्यांच्या शिव्याही खाव्या लागत आहेत. अशा अनेक तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या होत्या.
    या तक्रारींची गंभीर दखल घेवून महापालिकेच्या ई प्रभाग समितीने अठरा जणांना नोटीसा काढल्या आहेत. पानटपरी, कमरेचे पट्टे, चप्पल, नाईटी, खारीबटर, फरसाण, वडापाव, कपडे, पर्स, अगरबत्ती, मोबाईल कव्हर, घड्याळ, दाबेली आदीची विक्री या टपऱ्यातून होते. वीरेंद्र नाईक, कृष्ण चौरसिया, शिराज अब्दुल गोरदास, अब्दुल रहीम, श्री अंबिका, अल्फाज अन्सारी, अनमोल जयस्वाल, जेती, रामकुमार गुप्ता, पवनकुमार जस्वाल, दिनु दानिष मन्सुर, जिवनलाल शाहु, महम्मद गफार, जितेंद्र सुर्वे, साजीद मेमन, कन्हैया मासेतु, वसीन कासार, निजाम वोरा अशी या फेरीवाल्यांची नावे आहेत. त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमान्वये नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
    दरम्यान, खाजगी रस्ता अधिकृतपणे ताब्यात येत नाही तोपर्यंत त्यावर खर्च करता येत नाही. असे असतांना तत्कालीन नालासोपारा नगरपालिकेने या रस्त्याचे डांबरीकरण केले होते. त्यानंतर हा रस्ता पालिकेने ताब्यात घेणे गरजेचे होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने हा रस्ता फेरीवाल्यांनी व्यापला आहे. त्यातून ही समस्या इतकी वर्ष वाढत गेलेली आहे. ती सोडविणार कोण? हा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)
    रेल्वे स्टेशनला जोडणारा नालासोपारा पश्चिमेकडील हा एकमेव रहदारीचा रस्ता आहे. मात्र, तो खाजगी जागेतून जात असल्याने काही जणांनी फेरीवाल्यांना बसण्यासाठी देऊन त्यांच्याकडून भाडे वसुली सुरु केली आहे. हा प्रकार गेल्या वीस वर्षांपासून सुरु असून त्याविरोधात कुणीही बोलत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते.
==============
खैराची तस्करी पकडली
    पारोळ : वसई व पालघर तालुका पूर्व सीमारेषे अंतर्गत असणाऱ्या भाताणे वन परिक्षेत्र विभागाने रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास तस्करीचे खैराचे ५१ ओंडके व झायलो गाडी पकडली आहे. ही कारवाई पालघर तालुक्यातील सोनावे गावाच्या हद्दीतील जंगलात करण्यात आली. मात्र अंधाराचा फायदा घेऊन तस्कर फरारी झाले.
    भाताणे वन परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल मनोहर चव्हाण यांना सोनावे गावाच्या हद्दीतील जंगलात एक झायलो गाडी संशयीतपणे फिरत असल्याची माहिती मिळाली. वनरक्षक वैभव जगदाळे, विनायक गवारी, लक्ष्मण टिकेकर व वनपाल रहीम राजे, बबन गवळी यांनी या गाडीचा मागोवा घेतला असता ही गाडी महामार्गाकडे येताना सर्वे नं १२८ मध्ये आढळून आली. तिला थांबण्याचा इशारा केला असता ती वेगाने पुढे जाऊन थांबली व तस्कर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. कोणीही नसलेल्या स्थितीत गाडी ताब्यात घेतली. यावेळी झडतीत गाडीच्या मागच्या सर्व सीट काढलेल्या व मोकळ्या जागेत खैराच्या झाडाचे ओंडके आढळून आले.
    गुटखा, काथ आदी तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरात महत्वाचा घटक म्हणून खैराचा वापर केला जातो व त्यासाठी ही तस्करी केली जाते. यासाठी हे तस्कर प्रवासी वाहनांचा वापर करत आहेत. पकडलेल्या गाडीचा मालक व फरार तस्करांपर्यंत आम्ही लवकरच पोहोचू असा दावा वनक्षेत्रपाल मनोहर चव्हाण यांनी केला आहे. (वार्ताहर,लोकमत)
==============
डहाणू : प्रेमी युगलांविरोधात शिवसेनेची मोहीम
या तालुक्यातील समुद्रकिनारा आणि सुरुंच्या बागांमध्ये प्रेमी युगलांकडून होणाऱ्या अश्लील वर्तनाविरोधात शिवसेनेने मोहीम सुरू केली आहे. परंतु संबंधित शाळा आणि कॉलेजचे वरिष्ठ त्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यास तयार नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

दरम्यान अनैतिक प्रकारांना आळा घालण्यात डहाणूतील पोलीस आणि वन विभाग हतबल ठरले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या माजी डहाणू तालुका महिला अध्यक्ष उज्वला डामसे आणि युवा सेना शहर प्रमुख अमित आरेकर यांच्या नेतृत्वाखाली गैरप्रकार करणाऱ्या प्रेमीयुगलांना सोमवार, २१ नोव्हेंबर रोजी हुसकावून लावण्यात आले. शिवाय घटनास्थळी युनिफॉर्म मध्ये आढळलेल्या विद्यार्थ्यांची ओळखपत्र घेऊन संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांकडे सुपूर्द केली गेली. या मध्ये डहाणूतील दोन महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र याबाबत काही कारवाई करण्यासंदर्भात पोलीस, वन विभाग आणि संबंधित महाविद्यालयातील शिक्षक व वरिष्ठांनी हात झटकले आहेत. तर कॉलेजच्या वेळेत सुरु बागेत अश्लील वर्तन करताना रंगेहात सापडलेल्या एका विद्यार्थ्याने आपला बाप कॉन्ट्रॅक्टर असून तुम्हाला बघून घेईन, अशी धमकी दिल्याचे उज्वला डामसे यांनी लोकमतला सांगितले. दरम्यान डहाणूतील पारनाका, आगर, नरपड, चिखले, घोलवड आणि बोर्डी समुद्रकिनारी तसेच सुरु बागेत अश्लील वर्तन करणाऱ्या प्रेमीयुगलांविरुद्ध पोलीस आणि वन विभागाने कडक कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा या गैरप्रकारातून मोठ्या स्वरूपातील गुन्हेगारी वाढण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर,लोकमत)
==============
Maharashtra tribals don’t eat wheat, barter it for salt, oil, says study
Faisal Malik, Hindustan Times, Mumbai
 A research group formed to study causes of malnutrition in Maharashtra has suggested ‘participatory malnutrition free villages action plan’ for active participation of all concerned government agencies to deal with the issue. The group suggested formulation of schemes in view of culture, eating habits of the tribals and their geographic variation, apart from several other measures.   
Manthan, a Pune-based group, conducted the study following directives from Rest of Maharashtra Development Board in 2014-15. The group surveyed 21 villages in Palghar and Nandurbar districts.
The group also found inconsistent supply of public distribution system (PDS), inaccessible roads, staff vacancies, take home ration (THR), eating habits of the tribals and their migration factors that are contributing to malnutrition problem.  It also discovered that the tribals were not using wheat in their daily meals. Despite receiving it through PDS, they exchanged it against oil, salt or any other commodity. This is because of their eating habits. It also means that lack of balanced diet is a factor for malnutrition and not just food scarcity, said Radhika Rastogi, member secretary, rest of Maharashtra Development Board.
In a presentation made before the Governor CV Rao last week, the group suggested restructuring of the present schemes being run by the state government in order to make them fruitful to curb malnutrition cases. The group was formed to study the factors contributing to the problem, detect loopholes in the existing system and make recommendations to plug them.
==============
सविस्तर वृत्त  http://www.palgharlive.com/2016/11/blog-post_24.html

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home