Sunday, November 20, 2016

पालघर वार्ता २० नोव्हेंबर २०१६

पालघर वार्ता २० नोव्हेंबर २०१६
==============
आंबा, काजू, केळीला पीकविमा योजना लागू
रविंद्र साळवे,मोखाडा,लोकमत
पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिकांना प्रतिकूल हवामानात संरक्षण देण्यासाठी आंबा, काजू, केळीला विमा योजना लागू करण्यात आली असून या योजनेकरिता जास्तीच जास्त शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी अधिकारी बी.बी. वाणी यांनी केले आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश दुर्बल शेतकर्‍यांचे मनोबल वाढवणे हा असून या विमा हप्त्याची अंतिम मुदत काजू फळपिकासाठी ३0 नोव्हेंबर आहे, तर आंबा फळपिकाची अंतिम मुदत ३१, डिसेंबर आहे
काजू फळ पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर ७६000/- असून ३८00/-रुपये हप्ता भरावा लागेल गारपीट नुकसानीसाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर २५३00/-असून १२६५ चा हप्ता भरावयाचा आहे. आंबा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर रुपये ५५00/- असून हप्ता भरावा लागेल त्याचप्रमाणे गारपीट नुकसानीसाठी प्रति हेक्टर विमा संरक्षीत रक्कम ३६७00/-असून रुपये १८३५ रकमेचा हप्ता भरावयाचा आहे.
ही फळ विमा योजना हवामानावर आधारित असून महसूल मंडळाशी सलग्न आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना प्रस्ताव पत्नक भरून रोख रक्कम विमा हप्त्यासह आपले खाते असणार्‍या बँकेत मुदतीमध्ये जमा करावी लागणार आहे. यासाठी मोखाडा कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन शेतकर्‍यांना करण्यात आले आहे.
==============
अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी विवाहित मुलगीही पात्र
विशेष प्रतिनिधी, मुंबई लोकसत्ता
राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
राज्य शासनाच्या सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली जाते. आता त्यासाठी विवाहित मुलाप्रमाणे विवाहित मुलीलाही पात्र ठरविण्यात येणार आहे. अनुकंपा नियुक्त्यांमधील स्त्री-पुरुष भेदभाव संपुष्टात आणणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
शासकीय सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास, त्याच्यावर अवलंबून असणारे त्याचे कुटुंब आर्थिक संकटात सापडते. कुटुंबाचा आधार नाहीसा होतो. अशा परिस्थितीत त्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य व्हावे, या हेतूने त्या कुटुंबातील एकाला अनुकंपा तत्त्वावर शासन सेवेत सामावून घेण्याचे राज्य सरकारचे जुने धोरण आहे. त्यासाठी कुटुंबातील कोणत्या सदस्याला नोकरी द्यायची याबाबतचे निकष व पात्रताही ठरविण्यात आली होती. दिवंगत कर्मचाऱ्याची पत्नी, पती, मुलगा किंवा अविवाहित मुलगी, अथवा मृत्यूपूर्वी कायदेशीररीत्या दत्तक घेतलेला मुलगा व अविवाहित मुलगी, सून यांना पात्र धरले जाते. अविवाहित मृत कर्मचाऱ्याच्या बाबतीत त्याचा भाऊ किंवा अविवाहित बहिणीला नोकरीसाठी दावा करता येतो.
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणांतील (मॅट) व उच्च न्यायालयातील काही प्रकरणांवरील निर्णयानंतर राज्य सरकारने आता या धोरणात सुधारणा केली आहे. शासकीय सेवेत अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी विवाहित मुलाप्रमाणे विवाहित मुलीलाही पात्र मानण्याचा निर्णय या आधी २०१३ मध्ये घेण्यात आला होता. परंतु विवाहित मुलगी एकटीच असेल तर तिला पात्र धरण्यात येत होते. मुलांच्या बाबतीत मात्र ही अट नव्हती. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांमध्येही स्त्री-पुरुष भेदभाव ठळकपणे दिसत होता. आता नव्या निर्णयानुसार विवाहित मुलगी एकटी असो वा तिला अन्य भाऊ-बहीण असोत, तिलाही अनुकंपा तत्त्वावरील नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थात त्या मुलीवर ते कुटुंब अवलंबून असणे आवश्यक आहे. राज्य शासनाने उशिरा का होईना, शासकीय सेवेत विशिष्ट परिस्थितीत नियुक्ती देताना होत असलेला स्त्री-पुरुष भेदभाव दूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
शासकीय सेवेत अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी विवाहित मुलाप्रमाणे विवाहित मुलीलाही पात्र मानण्याचा निर्णय या आधी २०१३ मध्ये घेण्यात आला होता. परंतु विवाहित मुलगी एकटीच असेल तर तिला पात्र धरण्यात येत होते. मुलांच्या बाबतीत मात्र ही अट नव्हती. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांमध्येही स्त्री-पुरुष भेदभाव ठळकपणे दिसत होता. आता ती दरी संपणार आहे.
==============
वाडा : मल्चिंगने भाताचे विक्रमी पीक
    - वसंत भोईर,  वाडा, लोकमत
    सांगे गावातील अनिल पाटील या शेतकऱ्याने मल्चिंग (शेतात अच्छादन पसरून) पद्धतीने भातशेती करून भाताचे विक्रम पीक घेतले आहे. तसेच उत्पादन खर्च या तंत्राने बचतही साधली आहे. हे तंत्र यशस्वी व लाभदायक ठरले असल्याचे त्यांचे म्हणणे असून गेल्या पाच वर्षांपासून ते आपल्या शेतात विक्रमी उत्पन्न घेत आहेत.   निसर्गाचा लहरीपणा, वाढलेली मजुरी व कामगारांचा तुटवडा ,वाढलेले बियाणे व खतांचे दर तसेच भाताला मिळणारे तुटपुंजे दर यामुळे भातशेती शेतकऱ्यांना नकोशी झाली आहे. मात्र शेतीत काही अमूलाग्र बदल केल्याने भातशेती नक्कीच फायदेशीर होईल हे पाटील आपल्या प्रयोगाच्या यशाच्या बळावर सिद्ध केले आहे.
    मल्चिंग पद्धतीने भातशेती हे शेतकऱ्याला एक नक्कीच वरदान ठरणार असून चिखल न करता कशी शेती करता येईल का? या विचारांनी खरं तर ही प्रेरणा मिळाल्याचे पाटील सांगतात. पाटील यांनी या वर्षी हायब्रीड जातीचे कर्जत ५ व सह्याद्री १ हे भात लावले होते.

ज्यासाठी एकरी त्यांना १२ हजार रुपये खर्च आला होता त्यात त्यांना ३८ हजार रुपये उत्पन्न मिळाले. आता भात कापणी नंतर त्यांनी हरभरा हे रब्बी पीक लावले आहेत. मल्चिंग पद्धतीने राबणी, चिखलणी करण्याचा त्रास वाचतो एवढेच नव्हे तर जमिनीची अन्नद्रव्याची धूप टळते, तण नियंत्रणासाठी मजुरी अथवा तणनाशक वापरावे लागत नाही. रोपांची मुळे न तुटल्याने जोमदार वाढ होते. जास्त अंतर ठेवून एका जागी ३-४ बिया टाकल्याने रोपांना भरपूर सूर्यप्रकाश मिळून फुटवे जास्त येतात. भातशेतीनंतर त्याच ओलीवर किंवा संरक्षित पाणी देऊन रब्बी पीक घेतल्यास दुबार उत्पन्न तर मिळतेच पण पिकामुळे प्लास्टिकला ऊन कमी लागून त्याचेही आयुष्य वाढून बिना मशागतीत सलग पाच वर्षे या मल्चिंगवर पिक घेता येते.
    काय आहे मल्चिंगचे तंत्र :पाच वर्षांकरता सुरवातीलाच एकदा वाफे करून घ्यावे. त्यानंतर मल्चिंग पेपर अंथरून १-१ फुटावर विशेष अवजार तापवून छिद्र पाडावी. पाऊस पडून जमीन ओली होताच प्रत्येक छिद्रात ३ किंवा ४ बिया टाकून काडीने हलवावे. त्या जागी गरजेनुसार चाळलेले शेणखत व गांडूळखत टाकावे. रोप २० दिवसांचे झाल्यावर ४ रोपांच्या मधे पुन्हा छिद्र पाडून युरिया-डीएपी ब्रिकेट खोचावी. भातशेती नंतर रब्बी पिकांचे दाणे याच पद्धतीने खोचून तेही पीक उत्तम घेता येते. जिल्ह्यातील बाकीचे भात उत्पादक शेतकरी याचे अनुकरण कधी करतात याकडे कृषी खात्याचे लक्ष लागले आहे. भातशेती परवडत नाही अशी ओरड करण्याऐवजी ती प्रयोगशीलतेने करावी असे त्यांचे म्हणणे आहे.

    नवी पद्धत शेतकऱ्यांच्या फायद्याची
    मल्चिंग व्यतिरिक्त पाटील यांनी ड्रम सीड्स व प्लास्टिक ट्रे या पद्धतीत सुद्धा भातशेती केली असून त्यालाही भरघोस उत्पन्न आले आहे. भातशेतीला हल्ली अनेक शेतकरी कंटाळून भातशेती करणे सोडतात किंवा अनेक वेळा परम्परा मोडायला किंवा नवीन प्रयोग करायला

हिम्मत करत नाहीत, शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीवरील खर्च कमी करणे आवश्यक आहे व या युगात नवनवीन पद्धती नक्कीच वरदान ठरतील असे मत कृषी भूषण शेतकरी अनिल पाटील यांनी व्यक्त केले.
    नुकताच पाटील यांनी भातशेती विषयावर त्यांच्या शेतावर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्र म आयोजित केला होता यात विजय देशपांडे प्राचार्य, कोकण कृषि विद्यापीठ व माजी सहायक संशोधन संचालक व शास्त्रज्ञ यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
==============
वसई-विरार महापालिकेची 11 कोटींची कर वसुली
विरार, दि. 18 (वृत्तसंस्था नवशक्ती) –
वसई – विरार महापालिकेने केवळ आठ दिवसांमध्ये 11 कोटी रूपयांवर कर वसुली केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1 हजार रूपयांच्या जुन्या नोटा कर वसुलीसाठी स्वीकारल्या जाण्याच्या घोषणा केल्यानेतर अनेक नागरिकांनी कर भरण्यासाठी गर्दी केली होती.
केंद्र सरकारच्या आदेशानंतर महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने पालिकांमध्ये कर भरण्यासाठी 500 आणि 1 हजार रूपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार असल्याचे पत्रक जारी केले होते. नागरिकांच्या वाढत्या समस्येकडे पाहता केंद्र सरकाने 24 नोव्हेंबरपर्यंत 500 आणि 1 हजार रूपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले होते. वसई- विरार महानगरपालिकेचे आयुक्त सतिश लोखंडे यांच्या आदेशानुसार सर्व अधिकार्यांनी कर वसुली करण्यासाठी सुरूवात केली होती. महानगरपालिकेने आतापर्यंत 11 कोटी 19 लाख 76 हजार रूपयांची कर वसुली केली आहे. ज्यांची थकबाकी आहे, अशा नागरिकांनी लवकरात लवकर कर भरावा, असे आवाहन आयुक्त लोखंडे यांनी केले आहे.
==============
आपल्या बँक खात्याचा दुरुपयोग होऊ देऊ नका
मुंबई, शुक्रवार (वृत्तसंस्था नवशक्ती)  – नोटाबंदीच्या निर्णयानंतर काळा पैसा साठवणार्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. त्यामुळे आपला काळा पैसा नियमित करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत आहेत. याचीच दखल घेत अर्थ मंत्रालयाने आता अशा व्यक्तींवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अर्थ मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. काळा पैसा बाळगणारे गरीब आणि जनधन अकाऊंटधारकांना पैसे देत आहेत. या माध्यमातून ते काळा पैसा नियमित करुन घेत आहेत.

अशा व्यक्ती आढळून आल्यास त्यांना काळ्या पैशावर कर आणि दंड भरावा लागेल. तसेच जी व्यक्ती आपल्या खात्याचा इतरांना दुरुपयोग करु देईल  त्या व्यक्तीला देखील शिक्षा होईल,  असे सरकारने स्पष्ट केले आहे.
==============
वाहतूक नियम तिसर्यांदा तोडल्यास लायसन्स रद्द
मुंबई, शुक्रवार (विशेष प्रतिनिधी नवशक्ती) –
वाहतुकीची शिस्त मोडून तीन वेळा नियम तोडल्यास संबंधितांचे लायसन्स रद्द करण्यात येणार आहे. नियम तोडून गाडी चालविणार्यांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस खात्याने एक नवीन नियम बनविला आहे. याची रंगीत तालीम दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती.
राज्यातील वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असते. यावेळी दंड भरताना किंवा कारवाई करताना वाहनचालक आणि पोलिसांदरम्यान भांडणाचे प्रसंग ओढवतात. परिणामी, वाहतूक विस्कळीत होते. यासाठी ई-चलन व्यवस्था कार्यान्वित केली आहे. वाहनचालकांने नियम तोडल्यास त्याला ई-चलनाची नोटीस जागेवरच देता येईल किंवा घरच्या पत्त्यावर जाईल. दंडाची रक्कम त्याला संगणकाद्वारे भरता येईल. या यंत्रणेमुळे वाहनचालकाने किती वेळा नियम तोडला त्याचा तपशिल उपलब्ध होईल, अशी माहिती गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी दिली.
मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड वगळता राज्यातील उर्वरित 24 महापालिका क्षेत्रात वर्षभरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होणार असून नियमनात ई-चलन प्रणाली अस्तित्वात आल्याने वाहतूक नियमांचे तीन वेळा उल्लंघन केल्यास चालकांचा वाहन परवाना कायमचा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती के. पी. बक्षी यांनी दिली. गृह विभागात आमूलाग्र बदल करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. उर्वरित 24 महापालिका क्षेत्रातही ही यंत्रणा बसविण्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती केली असून हे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार असून गुन्हय़ांची उकलही कमी वेळेत होईल, असा विश्वास बक्षी यांनी व्यक्त केला.

गृह विभागात होणारे अन्य बदल

पोलीस भरतीसाठी संगणकाद्वारे वजन, उंची व धावण्याच्या चाचण्या घेण्यात येतील. आग, आरोग्य आणि तातडीच्या पोलीस मदतीसाठी देशभरात एकच 112 टोल फ्री क्रमांक. पोलिसांसाठी आवश्यक असणार्या वस्तूंची खरेदी, उपलब्धता याचा स्वतंत्र ऍपवर तपशील असेल,

त्यामुळे अनावश्यक खरेदी टाळता येईल.पोलीस कर्मचार्यांच्या आरोग्याबाबतचा तपशील ऍपवर असेल. त्यामुळे कोणत्या कर्मचार्याला कोणते आजार आहेत, त्यानुसार कामाची जबाबदारी देण्यात येईल.
==============
विरार में 11.84 लाख रूपये की लूट
पीटीआई-भाषा संवाददाता PTI
पालघर :महाराष्ट्र: 19 नवबंर :भाषा: यहां के विरार जिले में एक बिल्डर के आवास से लुटेरों ने कथित तौर पर 11.84 लाख रूपये के गहने और नकदी लूट ली।
विरार थाने के उपनिरीक्षक जेडी ठाकुर ने आज बताया कि बिल्डर अपने परिवार के साथ शहर से बाहर गया था। कुछ अज्ञात लुटेरों ने 14 से 17 नवंबर के बीच उनके घर में जबरन घुसे और सोने के गहने और नकदी लूट ली। नकदी में बंद कर दिए गए 1000 और 500 रूपये के नोट थे जिन्हें अलमारी के लॉकर में रखा गया था। लूट के माल में तीन लाख रूपये की नकदी थी। ठाकुर ने कहा कि इस बाबत एक मामला दर्ज कर लिया गया है और तफ्तीश चल रही है।
==============
पालघर :  पूजा समीर पाटील हिने रौप्य व ब्रॉण्झपदक मिळविले.
जयपूर येथे झालेल्या महिलांच्या ६० व्या राष्ट्रीय शॉटगन डबल ट्रॅप शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये पालघरच्या पूजा समीर पाटील हिने रौप्य व ब्रॉण्झपदक मिळविले.
पूजा ही मुंबईच्या भाऊसाहेब हिरे कॉलेज आॅफ आर्किटेक्चरची थर्ड इयरची स्टुडंट आहे. तिचे वडील समीर हे एक निष्णात शूटर असून त्यांच्या कडूनच हा वारसा घेतल्याचे ती सांगते. या पूर्वी मुंबई येथे झालेल्या प्रोन रायफल स्पर्धेतही तिने रौप्य पदक मिळविले होते. तर जयपूर येथे १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या महिलांच्या राष्ट्रीय ज्युनिअर शूटिंग स्पर्धेत रौप्य पदक तर सिनिअर महिलांच्या स्पर्धेत कांस्य पदक मिळविले. पालघर जिल्ह्याला प्रथमच हा सन्मान मिळवून देण्याची किमया पूजा ने साधली असून आपले वडील समीर तर जिल्हा परिषद सदस्य असलेली आपली आई नीता हेच आपले मार्गदर्शक असल्याचे तिने लोकमतला सांगितले. तिच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. (प्रतिनिधी,लोकमत)
==============
वसई : आंतरराष्ट्रीय गणित व विज्ञान ऑलिंम्पियाडमध्ये ब्रॉण्झपदक
वसईतील डॉ. म. ग. परुळेकर मित्र मंडळाच्या आर. व्ही. नेरकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी १३ व्या आंतरराष्ट्रीय गणित व विज्ञान ऑलिंम्पियाडमध्ये चमकदार कामगिरी केली. इंडोनेशिया येथे पार पडलेल्या या स्पर्धेत २२ देशातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यात नेरकर शाळेतील मैथिली शेळके, सिद्धी कदम, चैतन्य शेडगे, साकेत बाबरेकर, निहार सामंत, सानिया कदम, अथर्व पाटील, मल्हार शेलार, मुक्ता परांजपे, आदित्य सामंत, हर्ष वारेकर, शवर्धन राऊत यांनी भाग घेतला होता. यातील अथर्व पाटील, मल्हार शेलार आणि मुक्ता परांजपे यांनी विज्ञान विभागात ब्रॉण्झपदक पटकावले. (प्रतिनिधी,लोकमत)
==============
सविस्तर वृत्त http://www.palgharlive.com/2016/11/blog-post_20.html

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home