Monday, November 14, 2016

पालघर वार्ता १४ नोव्हेंबर २०१६

पालघर वार्ता १४ नोव्हेंबर  २०१६
==============
चिमुरडी कोमल कचरा वेचून भरते पोट!
अरिफ पटेल,मनोर,लोकमत
वडील कुटुंबाचा त्याग करून गेलेले. इतरांच्या घरी धुणे-भांड्याची कामे करणार्‍या आईची कमाई पुरत नाही. त्यामुळे चिमुरड्या कोमलवर कचरा वेचून घरखर्चाला हातभार लावण्याची पाळी ओढावल्याचे विदारक चित्र येथे पहायला मिळते. सोमवारी बालदिन आहे. पण तो फक्त आहे रे वर्गातील बालकांसाठीच!
कोमलसारख्या लाखो मुला-मुलींना आपल्यासाठी असा काही दिवस असतो आणि तो साजरा केला जातो याची कल्पनाही नसेल. सगळेजण रस्त्याने जाताना-येताना तिची धडपड पाहतात. पण कुणाच्याही काळजाला पाझर फुटत नाही. शाळेत जाण्याच्या, खेळण्या-बागडण्याच्या वयात या चिमुरडीवर कचरा वेचून कुटुंबाला हातभार लावण्याची आलेली वेळ टळावी, तिला तिचे बालपण मिळावे यासाठी आपण काही करावे असे कुणालाही वाटत नाही. गांधी नगर मध्ये रहाणारी कोमल तिचे भाऊ करण व किरण यांचा सांभाळही करते आणि कचराही गोळा करते. ती सांगते की, मेरे भाई और मै सुबह से कचरा पुठ्ठा, प्लास्टिक, बोटल, जो मिला उसे जमा करके ऊसे भंगार के दुकान मे बेचते है और २५ या ३0 रुपये मिलते है उससे रोज का खाना खाते है। आम्ही गांधी नगर पालघर येथे रहातो माझे वडील आम्हाला सोडून गेले माझी आई व आम्ही तिघे रहातो आई भांडी कपडे धुण्याचे काम करते आम्ही कचरा वेचून मिळेल त्या पैशाने उदरनिर्वाह करतो. कचरा वेचतांना बिल्डिंग मध्ये रहाणारे शिव्या देतात पाठलाग करतात चोर म्हणतात कधी मारझोडही करतात. (लोकमत)
==============
कृषी विज्ञान केंद्रात मधमाशीपालन प्रशिक्षण
डहाणू/बोर्डी: मधमाशीपालन हा शेती पूरक जोडधंदा असून शुद्ध मधाचे बाजार मूल्यही अधिक आहे. या बाबत शेतकर्‍यांना माहिती देण्याच्या उद्देशाने डहाणूतील कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथे शुक्र वारी, मोफत प्रशिक्षण आयोजित केले होते. शास्त्नज्ञ प्रा. उत्तम सहाणे व प्रमुख शास्त्नज्ञ डॉ संभाजी नालकर यांनी मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त शेतकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे.(लोकमत)
==============
गुराख्याचा मुलगा कॉमेंट्रिटर
फक्त चौथी पास : हिंदी शिकला स्वत:च, सर्वत्र आहे भरपूर डिमांड
लाडक्या झळकेल लवकरच चॅनल्सवर
विक्रमगड : वांगणपाडा येथील लाडक्या ४ थी पास असून तो क्रिकेटच्या सामन्याचे उत्तम समालोचन करतो. रेडिओवरील कॉमेंट्री ऐकून तो हिंदी व समालोचन शिकला. परिस्थिती बिकट असल्यामुळे तो गुराख्याचे काम करतो. असे असूनही त्याचे हिंदीवरील प्रभुत्व आणि क्रिकेटची जाण, ज्ञान जबरदस्त आहे. सध्या विक्रमगड तालुक्यामध्ये विविध ठिकाणी क्रिकेटच्या टुर्नामेन्ट चालू असून त्यास खास बोलाविले जाते. त्याने सांगितले की, घरात कमावते फक्त माझे वडील असल्याने मी स्वत: गुरे चारतो. घर चालविण्यासाठी मदत करीत असतो. गुरे चारताना विरंगुळा म्हणून कानाला रेडिओ लावून कॉमेंट्री ऐकण्याचा छंद मला जडला. त्यामुळे मी आज उत्तम प्रकारे हिंदीमध्ये क्रिकेट समालोचन करण्याची कला अवगत केली आहे. व मला यामुळे अनेक विभागात मोठ्या शहरातील क्रिकेट्र सामान्यामध्ये मोबदला देऊन समलोचना करीता आवर्जून बोलाविले जाते . त्यातून मला आर्थिक मदतही होते. परंतु आता माझे स्वप्न आहे ते टी. व्ही चॅनलवर समालोचन करण्याचे.
लाडक्या भोये हा एक उत्तम हिंदी क्रिकेट समालोचक असून त्याला टी. व्ही चॅनल्स, रेडीओ आदींवर कॉमेंट्री करण्याची संधी द्या असे मत विक्रमगड स्पोर्टस क्लबचे जेष्ठ क्रिकेटर नितीन तामोरे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले आहे. (वार्ताहर,लोकमत))
==============

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home