Saturday, November 12, 2016

पालघर वार्तापत्र १२ नोव्हेंबर

पालघर वार्तापत्र १२ नोव्हेंबर 


================

श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजा, पालघरच्या दाम्पत्यास यंदाचा मान
पंढरपूर : प्रतिनिधी , पुढारी
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी रणजित कुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू आदी प्रमुख उपस्थित होते. दरम्यान, परंपरेनुसार शासकीय  महापूजेस उपस्थित राहण्याचा मान श्री विठ्ठलाच्या दर्शन रांगेत उभे असलेल्या विलास लहू शेलवले (वय 52) आणि त्यांच्या पत्नी वनिता विलास शेलवले (वय 46, मु. पो. पिंजाळ, ता. वाडा, पालघर) या वारकरी दाम्पत्यास मिळाला.
शासकीय महापूजेसाठी महसूलमंत्री ना. पाटील हे गुरूवारी सायंकाळीच पंढरीत दाखल झाले होते. पहाटे 2 च्या सुमारास त्यांचे मंदिरात आगमन झाले. त्यानंतर  त्यांच्या हस्ते पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी शासकीय महापूजा सुरू झाली. पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली. यावेळी दर्शन रांगेत उभ्या असलेल्या विलास लहू शेलवले आणि त्यांच्या पत्नी वनिता विलास शेलवले यांना महापूजेचा मान देण्यात आला. 

================

बलात्कारी रिक्षाचालकाचा जामीन अर्ज फेटाळला
खास प्रतिनिधी, मुंबई, महाराष्ट्र टाइम्स
 सात मुलांचा बाप असूनही एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या रिक्षाचालकाचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच फेटाळला. प्रथमदर्शनी अर्जदाराने मुलीचा लैंगिक छळ केल्याचे दिसत असून त्याला जामिनावर मोकळे सोडता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने त्याला दिलासा देण्यास नकार दिला. हबीबुल्ला उर्फ बॅरिस्टर करीमुल्ला शेख (३३)हा रिक्षाचालक विवाहित असून त्याला सात मुले आहेत. त्याच्याविरुद्ध बोइसर पोलिसांनी एका १७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला

आहे. भादंविच्या ३६३ (अपहरण), ३७६ (बलात्कार) या कलमांबरोबरच पोक्सो कायद्याखालील कलमांतर्गत गुन्हे नोंदवून पोलिसांनी त्याला अटक केली.
याप्रकरणी खटल्याला विलंब झाल्याच्या कारणाखाली त्याने फेब्रुवारी २०१५मध्ये पालघर अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तो न्यायालयाने फेटाळला आणि खटला सुरू होण्यासाठी चार महिन्यांची मुदत दिली. तरीही खटला सुरू होऊ न शकल्याने त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्याविषयी सुनावणी घेतल्यानंतर न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी त्याचा अर्ज नुकताच फेटाळून लावला. पीडितेच्या जबाबानुसार अन्य मुलींसह ती शेखच्या रिक्षातून शाळेत जात असे. याचा फायदा घेत संधी साधून त्याने एकदा बळजबरी करत तिच्यावर बलात्कार केला. शिवाय कोणालाही सांगितलेस तर गंभीर परिणाम होतील, अशी धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. यातून ती गर्भवती राह‌लिी. त्यानंतर त्याने तिला उत्तर प्रदेशमध्ये नेले आणि तिथे तिची प्रसूती झाली. मात्र शेखने आमचे प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच दोघे उत्तर प्रदेशमध्ये पळून गेले होते, असे दावा केला आहे. मात्र, मुलीच्या वडिलांनी शेखने मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांत दिली होती.

================

पु.ल. कला महोत्सवामध्ये वारली चित्र, नृत्याची कार्यशाळा
खास प्रतिनिधी, मुंबई, महाराष्ट्र टाइम्स
पालघर जिल्ह्यातील वारली समाजातून काही विद्यार्थी मुंबईमध्ये शिक्षणासाठी आले. त्यांनी वैद्यकीय, इंजीनिअरींगचे शिक्षण घेऊन प्रगती केली. मात्र स्वतःच्या मुळांची, स्वतःच्या संस्कृतीची श्रीमंती त्यांना माहीत असल्याने ही समृद्धी जगापर्यंत पोहोचवण्याची त्यांची आस सुटली नाही. त्यासाठी वारली समाजातील शिक्षित तरुणांनी आदिवासी युवा शक्ती (आयुश) व्यासपीठाची निर्मिती केली. या व्यासपीठाच्या माध्यमातून पु.ल. देशपांडे कला अकादमीमध्ये सुरू असलेल्या पु.ल. कला महोत्सवामध्ये शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांमध्ये या वारली डॉक्टर, इंजीनिअरसोबतच अजूनही अक्षरांपासून दूर असणारे आदिवासीही आपल्या संस्कृतीची समृद्धी उलगडणार आहेत.
 वारली चित्रे आणि वारली नृत्य शहरांपर्यंत पोहोचली. मात्र त्या चित्रांमधील चिन्हांमधून व्यक्त होणारे भाष्य, त्यातील सांकेतिक खुणा, नृत्याचे प्रकार, हे नृत्य कोणत्या ऋतूमध्ये सादर केले जाते, ते मात्र पोहोचलेले नाही. त्रिकोण दिसले म्हणजे वारली चित्रशैली किंवा तारपा नृत्य म्हणजे वारली नृत्य अशा सरधोपट समीकरणापलीकडे ही कला आहे. ही सांस्कृतिक संपदा इतर समाजापर्यंत पोहोचली, तिची व्याप्ती वाढली तर तिचे जतन होण्यास मदत होईल, असा विश्वास वारली समाजाला वाटतो. आतापर्यंत या व्यासपीठावरून वारली प्रचारासाठी आदिवासी कलाकार वैयक्तिक पातळीवर विविध महोत्सवात सामील झाले आहेत. मात्र मुंबईमध्ये होणारा पु.ल. कला महोत्सव आयुशसाठी आणि वारली समाजासाठी फार महत्त्वाची संधी असल्याचे आयुशच्या संस्थापक सदस्य सचिन सातवी सांगतात.
 कला महोत्सवादरम्यान वारली चित्रकलेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येईल. त्यामध्ये इच्छुकांनाही त्यासंदर्भातील मटेरिअल देण्यात येईल. याशिवाय प्राथमिक पातळीवरील कलाकार आणि थोडे शिकलेले कलाकार यांच्यासाठी रोजची चार तासांची कार्यशाळाही घेण्यात येणार आहे.
यामध्ये चित्रांतील आकृतीबंध, निसर्गाशी असलेले त्यांचे नाते, दैनंदिन जीवनातील त्याचा अर्थ, मानवी मूल्य हे तत्त्वज्ञान उलगडून सांगण्यात येणार आहे. वारली नृत्याचेही तारपा, ढोल, टिपरी असे सुमारे सहा प्रकार या कार्यशाळांमध्ये सादर केले जाणार आहे. वारली समाजातील युवावर्ग या कार्यशाळा घेणार आहे. वारली समाजाच्या कलेचे मूल्य या तीन दिवसांमध्ये मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्यामध्ये यश येईल, अशी आशा त्यांना आहे.
   
================

'आदिवासी भागातील तरुणाची ‘तारांगण भेट’           
शुभम पाटील , महाराष्ट्र टाइम्स
आपल्या अवकाश निरीक्षणाच्या छंदापायी नोकरी व्यवसाय सोडून अवकाश निरीक्षण तसेच अवकाश संशोधन करणाऱ्या डहाणू तालुक्यातील कासामधील चंद्रकांत घाटाळ यांनी आपल्या अवकाश निरीक्षण कार्यक्रमात पुढचा टप्पा गाठला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अजून चांगल्या पद्धतीने अवकाश निरीक्षण करता यावे, यासाठी तारांगण भेट या उपक्रमाची सुरुवात त्यांनी केली आहे. तारांगण भेट या उपक्रमांतर्गत कासा तसेच आजूबाजूच्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी चंद्रकांत घाटाळ यांच्यातर्फे सहलींचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत नेहरू तारांगण मुंबई, आयुका पुणे, धर्मपूर नक्षत्रालय गुजरात, कोडद ( रेडिओ टेलिस्कोप ) नारायण गाव, पुणे इ. ठिकाणी बऱ्याच सहलींचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधे अवकाश विज्ञानाविषयी जागृती निर्माण झाली आहे. नेहरू तारांगण येथे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी घाटाळ नेहमीच तत्पर असतात. तसेच घाटाळ यांचे अवकाश शोधनिबंधावर काम सुरू असून येत्या काही काळात शोधनिबंध प्रकाशित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रकांत घाटाळ यांच्या भरीव कामगिरीला लक्षात घेत काही दिवसांपूर्वी त्यांना 'पालघर भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डहाणू हा आदिवासी तालुका आहे. तसेच या ग्रामीण भागात विज्ञान संशोधन केंद्र नसल्याने येथील विद्यार्थ्यांसाठी येत्या काळात विज्ञान केंद्र आणि विज्ञान वाचनालय व्हावे, यासाठी सरकारकडे मदतीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रकांत घाटाळ यांच्या अनुजा अवकाश निरीक्षण केंद्रात दोन शक्तिशाली खगोलशात्रीय दुर्बिणी असून याद्वारे ते विद्यार्थ्यांना विनाशुल्क अवकाश निरीक्षणाची सोय उपलब्ध करून देत आहेत. परंतु विद्यार्थ्यांना अजून चांगल्या प्रकारे आकलन होण्यासाठी हा संच अपुरा असल्याने नवीन अद्ययावत विज्ञान केंद्र स्थापन करण्याची मागणी ते सराकरकडे करणार आहेत. या विज्ञान केंद्रात लहान थ्री डी अवकाश निरीक्षण केंद्र, बाल वैज्ञानिक प्रयोगशाळा, खगोलशास्त्रीय वाचनालय बनवण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. या प्रकल्पांसाठी प्रयत्नशील असून येत्या काही काळात हे विज्ञान केंद्र उभारू, अशी माहिती घाटाळ यांनी दिली.

================

आणि घरे उजळली
शुभम पाटील, ठाणे , महाराष्ट्र टाइम्स
 वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार अनेकदा घडतात. यामुळे नागरिकांचे अक्षरशः हाल होतात. एकिकडे वीज खंडित होण्याची समस्या अनेक भागात असताना दुसरीकडे अनेक गावात आजही वीज पोहोचलेली नाही. ठाण्यासारख्या जिल्ह्यामधील बऱ्याच गावांचा या यादीत समावेश आहे. यातीलच शहापूरपासून ३० किमी असलेली दापूरमाळ आणि खोरगवाडी ही अशीच अंधारातील गावे. मात्र काही तरुणांनी एकत्र येऊन या गावात रोषणाई आणली. सौरदिव्यांच्या प्रकाशात ही गावे खऱ्या अर्थाने उजळली. या गावातील रहिवाशांनी आजवर आपल्या घरात विजेचा दिवा पहिला नव्हता. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाल्यानंतरही या गावात रस्ते आणि विजेसाठी कोणताच पर्याय नव्हता. परंतु या दिवाळीत येथील सर्व घरांमध्ये तेलाच्या दिव्यांसोबतच विजेच्या दिव्यांनीदेखील प्रकाश केला. तरुणांच्या एका गटाने दापूरमाळ, खोरगवाडी या गावांचा कायापालट केला. स्नेहल नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी श्री श्री रवीशंकर डेव्हलपमेंट प्रोग्रामची मदत घेत दापूरमाळ आणि येथूनच काही अंतरावर असलेल्या खोरगडवाडी या दोन गावांतील एकूण ४० घरांमधे विजेची सोय करून येथील नागरिकांना दिवाळीची एक अविस्मरणीय भेट दिली.
 या उपक्रमा अंतर्गत गावांमध्ये सौरदिवे लावले गेले. यामुळे ही दोन्ही गाव प्रकाशमान झाली आहेत. श्री श्री रवीशंकर डेव्हलपमेंट प्रोग्रामचे अक्षय जोशी यांनी यावरच न थांबता भविष्यात ठाणे तसेच पालघर जिल्ह्यातील अशा दुर्गम भागातील अनेक गावांसाठी काम करणार असल्याचे सांगितले. तसेच इतर तरुणांनीदेखील या समाजकार्यात सहभागी होऊन देश प्रगत करण्याच्या या मोहिमेत आमच्या सोबत येऊन मदत करावी, असे आवाहन या टीमतर्फे करण्यात आले आहे.

================

रेल्वे स्टेशनांना सौरऊर्जा, वसईपासून सुरुवात
Hemant.satam@timesgroup.com
मुंबई  पारंपरिक ऊर्जेच्या वापराचे दुष्परिणाम, देखभालीचा वाढता खर्च या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने अनेक प्रायोगिक उपक्रम हाती घेतले असून विजेची बचत करणाऱ्या उपकरणांच्या वापरासह किमान ३० स्टेशनवर सौरउर्जेच्या वापराचा प्रकल्प आखण्यात आला आहे. त्यातून विजेच्या बचतीसोबत वीजबिलात घट होणार असून प्रदूषणविरहीत ऊर्जेचा अखंड पुरवठा होणार असल्याचा दावा केला जात आहे. पश्चिम रेल्वेने वसई स्टेशनवर पहिल्यांदा विजेची बचत करणारी उपकरणे बसवण्याचा प्रकल्प आखला आहे. त्यात एसीसह ​बल्ब, पंखे आदी उपकरणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यास यश मिळताच अन्य स्टेशन्सवरदेखील त्याची अमलबजावणी केली जाणार आहे. ​ पश्चिम रेल्वेने विजेच्या वापरातील खर्चात बचत करण्याच्या हेतूने सार्वजनिक क्षेत्रातील एनर्जी एफिशिअन्सी सर्विसेस कंपनीबरोबर संयुक्तपणे हा प्रकल्प राबवला जात आहे. वसईमध्ये काही दिवसांतच हा प्रकल्प राबवला जाणार आहे. हा पथदर्शी उपक्रम यशस्वी झाल्यानंतर त्याचे मॉडेल अन्य स्टेशन्सवरदेखील राबवण्याचा पश्चिम रेल्वेचा मानस आहे. वसई स्टेशनमध्ये ईईएसएल कंपनीतर्फे सध्याची सर्व विजेची सर्व उपकरणे बदलून नवीन उपकरणे बसवली जातील. त्यात, पंखे, एसी, बल्ब आदींचा समावेश आहे. ही उर्जाबचत करणारी उपकरणे वापरात आल्यानंतर बिलात किमान १० टक्क्यांच्या बचतीचा दावा आहे. एकट्या वसई स्टेशनमध्ये विजेचा मासिक वापर ५५ हजार युनिट्स असून त्यासाठी रेल्वेस किमान पाच ते सहा लाख रुपये मोजावे लागतात. या उपकरणांमुळे बिलात मोठी बचत होणार आहे. पश्चिम रेल्वेने दोन मेगावॉट क्षमतेच्या सौरउर्जेचा वापर करण्यासाठी पावले उचलली आहेत. पारंपरिक उर्जेपेक्षा सौर उर्जेच्या वापरावर रेल्वेने भर दिला आहे.

परेच्या मुंबई ​विभागाच्या नॉन ट्रॅक्शन वापरासाठी मासिक २५ लाख युनिट्सची आवश्यकता भासते. ही वीज बेस्ट, महावितरणकडून किमान १० रुपये प्रति युनिट दराने खरेदी करावी लागते. त्याअनुषंगाने पश्चिम रेल्वेने एका कंपनीकडून प्रति यु​निट पाच रुपये दराने सौर उर्जा खरेदी करार (पीपीए) करण्यात येणार आहे. ३० स्टेशनवर सौर पॅनेल यापूर्वी पश्चिम रेल्वेने माटुंगा स्टेशनवर १२ केव्ही क्षमतेचे सौर ऊर्जा यंत्रणा अंतर्भूत केली आहे. मुंबई सेंट्रल येथील विभागीय कार्यालयात १० केव्ही क्षमतेची यंत्रणाही आहे. सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे धोरण रेल्वे मंत्रालयाने आखले आहे. ३० लोकल स्टेशन्सच्या छतांवर सौर पॅनेल उभारले जाणार आहेत. हा पुरवठा कमी ठरल्यास अन्य कंपन्यांकडून ऊर्जा घेण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून किमान सहा महिन्यात हा प्रकल्प प्रत्यक्षात येईल, असा विश्वास पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी व्यक्त केला आहे.

================

कररूपाने दोनशे कोटींच्या नोटा जमा
(लोकसत्ता)
एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यावर दोन दिवस राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये विविध करांच्या वसुलीसाठी या नोटा वसूल करण्यास मुभा दिल्यावर एक दिवसात २०० कोटी रुपयांची रक्कम या नोटांच्या माध्यमातून शासनाकडे जमा झाली आहे.
नोटा चलनातून हद्दपार करण्यात आल्यावर शासनाने विविध सेवा तसेच पालिकांमध्ये वसुलीकरिता १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार गेल्या दोन दिवसांमध्ये विविध पालिकांमध्ये कर भरण्यास झुंबड आहे.  १००० आणि ५०० रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून मोठी रक्कम  जमा झाल्याची माहिती नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी दिली. पालिकांमधील वसुलीसाठी १४ तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुण्यात सर्वाधिक नोटा
महापालिकांमध्ये पाणीपट्टी, करवसुलीसाठी १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याच्या निर्णयानंतर गेल्या दोन दिवसांमध्ये पुणे महानगरपालिकेत सर्वाधिक १८ कोटी रुपये जमा झाले आहेत. मुंबई महापालिका (दोन कोटी), नवी मुंबई (तीन कोटी), कल्याण-डोंबिवली (पाच कोटी), मीरा भाईंदर (दोन कोटी), वसई-विरार (दोन कोटी), उल्हासनगर (साडेचार कोटी), भिवंडी (एक कोटी), पिंपरी-चिंचवड (सव्वापाच कोटी), ठाणे (सव्वाचार कोटी), सांगली (एक कोटी). तीन दिवसांची मुदतवाढ १००० आणि ५०० कोटी रुपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी देण्यात आल्याने मोठय़ा प्रमाणावर रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.

‘पाचशे-हजारा’च्या गोंधळात एसटीचे चार कोटींचे नुकसान
मुंबई : मोठय़ा नोटांच्या बंदीचा निर्णयाचा फटका एसटी महामंडळालाही बसला असून सुटय़ा पैशांच्या अभावी प्रवाशांनी एसटीचा प्रवास टाळण्याचे प्रकार घडले आहेत. राज्यभरात गेल्या दोन दिवसांमध्ये एसटीच्या प्रवासी भारमानात तब्बल पाच टक्क्यांची घट झाली आहे. दिवाळीनंतर वधारून ६५ टक्क्यांवर पोहोचलेले एसटीचे भारमान दोन दिवसांत ६० टक्क्यांवर आले असून या दोन दिवसांमध्ये एसटीचे चार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संध्याकाळी अचानपणे ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला आणि देशात एकच हलकल्लोळ उडाला. लोकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम झाला असून त्याचे प्रतिबिंब एसटीच्या प्रवासी संख्येवरही उमटले आहे. एसटीने प्रवाशांच्या सोयीसाठी ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेतला असला, तरी बहुतांश प्रवाशांनी दोन दिवसांपासून एकंदरीतच प्रवास टाळला आहे. विशेष म्हणजे दर वर्षी कार्तिकी एकादशीच्या वेळी जादा गाडय़ा सोडणाऱ्या एसटी महामंडळाच्या नेहमीच्या गाडय़ाही सध्या रिकाम्या जात आहेत. या परिस्थितीमुळे गेल्या दोन दिवसांमध्ये एसटीचे प्रवासी भारमान ६५ टक्क्यांवरून ६० टक्के एवढे कमी झाले आहे.

तिकीट तपासनीसांपुढे दंड वसुलीचे आव्हान

मुंबई: रेल्वे तिकीट तपासनीसांकडून प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना दंड आकारण्यात आल्यावर प्रवासी ५००-१००० रुपयांच्या नोटा पुढे करत आहेत.  प्रवाशांना परत देण्यासाठी सुटे पैसे नसल्याने अनेकांना या विनातिकीट प्रवाशांना दंड घेतल्याशिवाय सोडून द्यावे लागत आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये तिकीट तपासनीसांकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडात ४० टक्क्य़ांची घट झाली आहे.
५००-१००० रुपयांच्या रद्दबातल झालेल्या नोटांचा वापर रेल्वे, रुग्णालये, वीज बिल भरणा केंद्र येथे काही कालावधीपर्यंत केला जाऊ शकतो, असे केंद्र सरकारने जाहीर केले. त्यामुळे अनेकांनीरेल्वेची सर्वात लांबच्या मार्गावरील सर्वात महागडी तिकिटे आरक्षित करण्यास सुरुवात केली. ही तिकिटे नंतर रद्द करून रद्दीकरणाचे शुल्क देऊन उर्वरित रक्कम परत घेण्याकडे या लोकांचा कल होता. त्यामुळे रेल्वेला काही अंशी फायदाही झाला. मात्र दुसऱ्या बाजूला मध्य रेल्वेवरील तिकीट तपासनीसांना विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करताना या ५००-१००० रुपयांच्या नोटांचा अडसर येत आहे.

================

एका रिक्षातून पाच प्रवाशांची वाहतूक
(लोकसत्ता)
रिक्षाचालकांच्या मुजोरीपुढे प्रशासन ढिम्म; वसईकरांचा जीव धोक्यात
रिक्षामध्ये नियमानुसार केवळ तीन प्रवासी नेण्याची मुभा आहे. मात्र या नियमाकडे दुर्लक्ष करत रिक्षाचालक सर्रास क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी रिक्षातून नेतात. वसई-विरारमध्ये तर तब्बल पाच प्रवासी एका रिक्षातून प्रवास करतात आणि प्रशासन मात्र त्याकडे काणाडोळा करत असल्याचे चित्र आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी रिक्षातून नेत असल्याने वसईकरांचा जीवही धोक्यात आला आहे.
वसई-विरार शहरात चालणाऱ्या रिक्षांना मीटर नसल्याने प्रवाशांकडून मनमानी भाडेवसुली होत असते, त्यातच आता रिक्षातून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. केवळ तीन प्रवासी नेण्याची मुभा असतानाही कधी चार, तर कधी पाच प्रवासी रिक्षातून नेत असल्याचे चित्र आहे. नायगाव पूर्व, नायगाव पश्चिम, नालासोपारा पूर्व या ठिकाणी तर पाच  प्रवासी बसवले जातात. तीन प्रवासी मागील आसनावर तर दोन प्रवासी रिक्षाचालकाच्या आजुबाजूला बसविण्यात येतात. मात्र वाहतूक पोलिसांचे त्याकडे लक्ष नाही.

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविल्याने अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे रिक्षात बसलेल्या प्रवाशांचा जीव सतत टांगणीला असतो. मुख्य रस्त्यांवरही सर्रास चार प्रवासी बसवले जातात. प्रवाशांचे हाल
अनेक ठिकाणी तर पाच प्रवासी घेतल्याशिवाय रिक्षा सुरूच होत नाही. शेअर रिक्षाचे भाडे प्रति प्रवासी ८ ते १० रुपये असते. त्यामुळे रिक्षाचालकाला एका फेरीमागे ५० रुपये मिळतात. रिक्षात बसलेल्या प्रवाशांना दाटीवाटीने आणि आखडून बसावे लागते. महिला प्रवाशांचे यात खूप हाल होतात.

कारवाई नाही
एकीकडे मीटर लावणे बंधनकारक असताना वसई-विरार शहरात कुठल्याची रिक्षांना मीटर लावण्यात आलेले नाहीत. त्यातच ही बेकायदा वाहतूक सुरू आहे. वाहतूक पोलीस इतर वाहनांवर कारवाई करतात. मात्र बेकायदा प्रवासी वाहतूक करून प्रवाशांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करताना दिसून येत नाही.

मनमानी कायम
मीटर नसल्याने रिक्षाचालक मनमानी भाडे आकारतात. विशेष रिक्षा करून जायचे असल्यास २५ ते ३० रुपये भाडे द्यावे लागते. त्यामुळे लोकांना नाइलाजाने शेअर रिक्षात बसावे लागते. आम्ही शेअर रिक्षात बसतो पण चार प्रवासी आल्याशिवाय रिक्षा सुरू करत नाही. दुपारच्या वेळी खूप वेळ वाट बघावी लागते, असे सरला पाटील या वसईतील महिला प्रवाशांनी सांगितले.

================

लाचखोरी घटली
(वार्ताहर, नवशक्ती)
 भ्रष्टाचार ,व काळा पैसा यांच्या विरुद्ध लढा अधिक तीव्र करण्यासाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा  चलनातून रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णयाचे परिणाम काय होतील याचे उत्तर आज जरी नसले तरी गेल्या वर्षभरा पासून लाचलुचपत विभागाने घेतलेल्या जनजागृती मोहिमेला चांगले यश मिळाले असून ठाण्यात लाचखोरीच्या प्रकरणात घट झाली आहे.लाचखोराना पकडण्यासाठी लावण्यात येणार्या सापळ्यात देखील  घट झाली आहे.या वर्षीच्या आकडेवारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकूण 97  सापळे रचून 130 जणांना अटक केली

आहे. तुलनेने  मागील वर्षा पेक्षा या वर्षी लावण्यात आलेल्या  सापाळ्याची संख्या कमी आहे.
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या परिक्षेत्रात ठाणे, पालघर, नवीमुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आदी सहा युनिट कार्यरत आहेत.या विभागा मार्फत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी देखील 1 जानेवारी ते 4 ऑक्टोंबर दरम्यान लाचलुचपत विभागाने एकंदर 41 सापळे लावले. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना दुसर्यांदा लाच घेताना पकडण्यात आले. या पार्श्वभूमीवर लाचलुचपत विभागाने एकूण 102 गुन्हे  दाखल केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ठाणे युनिट नंतर पालघर 15,रायगड 14,रत्नागिरी 10,नवीमुंबईत सापळे रचण्यात आले.दाखल झालेल्या 102 गुन्ह्यापैकी 67 प्रकरणाचा तपास सुरु असून त्यातील 15 प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत.

================

सरकारी बाबूंना सोमवारी उपस्थिती सक्तीची
प्रतिनिधी , पुढारी
राज्यातील सर्व सरकारी अधिकार्‍यांची सोमवारी कार्यालयात उपस्थिती सक्तीची करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी  याबाबतचे आदेश दिले आहेत.
 सोमवारी  क्षेत्रीय पातळीवरील अधिकार्‍यांना मंत्रालयात बैठकीसाठी बोलविण्यात येवू नये. तसेच क्षेत्रीय पातळीवर काम करणार्‍या अधिकार्‍यांनीही त्यांच्या हाताखालील अधिकार्‍यांना सोमवारी बैठकीसाठी बोलाऊ नये. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीसाठी लोकप्रतिनिधी मुंबईत असतात.

त्यांनी उपस्थित केलेल्या  विकासकामांबाबत बैठका आयोजित करण्यात याव्यात. मंगळवार ते गुरूवार क्षेत्रीय अधिकार्‍यांबरोबर बैठका आयोजित करण्यात याव्यात. 
 दर महिन्याच्या चौथ्या बुधवारी पंतप्रधान प्रगती व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे आढावा घेत असल्याने दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुख्य सचिव व प्रगतीशी संबंधित सचिव  हे त्यासाठी उपस्थित रहातात. त्यामुळे सचिवांची उपस्थिती अपेक्षित असलेल्या बैठका ठेवू नयेत, असेही मुख्य सचिवानं जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आल आहे.

================

राज्यातील 850 ताडीच्या दुकानांना लागणार टाळे
(वार्ताहर, नवशक्ती)
राज्यातील 12 हजार 500 ताडी माडीच्या दुकानांपैकी 850 बेकायदेशीर दुकानांना कायमचे टाळे ठोकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ताडीच्या नावाखाली विदर्भ मराठवाडा, व पश्चिम महाराष्ट्रात गुंगीचे औषध टाकून ताडी बनविण्याचा प्रकार उघडकीस आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापुढे 1000 ताडीची झाडेअसतील तेथे पक्त एकच दुकान देण्याचे राज्य सरकारचे धोरण असल्याचे परिपत्रक राज्य शासनाने काढले आहे.
राज्यातील ताडी माडीच्या झाडांचा शोध घेण्यासाठी सर्व्हे केला होता. मुंबईसह राज्याच्या अन्य भागात ताडीची झाडे नसतानाही ताडीची खुलेआम विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. विदर्भात तर ताडीची झाडे नसतानाही गुंगीचे आणि झोपेचे औषध टाकून ताडी म्हणून विक्री केली जात होती. झोपेचे औषध वापरून ताडी विक्री होत असल्याने मेंदूचे आजार झाल्याचे उघड झाल्याने ज्या भागात ताडीची झाडेच नाहीत अशा भागात ताडीचा लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत ताडीची जाडे नसतानाही ताडीची विक्री केली जात होती अशा दुकानांवर राज्य उत्पादन विभागाने कारवाई केली आहे. 1 हजार 50 दुकानांपैकी 850 दुकानावर कारवाई करण्यात येणार आहे. ताडी माडीच्या दुकानाच्या माध्यमातून सरकारला दरवर्षी 40 कोटीचा महसूल मिळत होता. 850 दुकाने बंद करण्यात येणार असल्याने दरवर्षी 25 कोटीचा महसूल कमी होईल.
ताडीची झाडे असलेल्या तालुक्यात कायम रहिवाशी असलेल्या व्यक्तीला व सहकारी संस्थेला लिलावात भाग घेता येईल तर ज्या तालुक्यात 1 हजार ताडीचे झाडे आहेत त्याच तालुक्यात ताडीच्या एका दुकानाला परवानगी देण्यात येणार आहे. यापुढे ताडीचे दुकान दुसर्या तालुक्यात हलविता येणार नाही असाही निर्णय घेण्यात आला आहे.

===========
सविस्तर वृत्त http://www.palgharlive.com/2016/11/blog-post_12.html 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home