Thursday, November 10, 2016

पालघर वार्तापत्र १० नोव्हेंबर

पालघर वार्तापत्र १० नोव्हेंबर
 ============================
वसईत सागरी सुरक्षेसाठी नौदलाचे पहिले केंद्र
पालघर जिल्ह्यातले तिसरे केंद्र; बंदोबस्त, गस्त अधिक प्रभावी होण्यास मदत
सागरी किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी वसईत अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर पहिले ऑपरेशन केंद्र उभारण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यतले हे तिसरे केंद्र आहे. यामुळे समुद्रातील बंदोबस्त आणि गस्त अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.
वसईच्या पश्चिमेला विस्तीर्ण किनारपट्टी आहे. सागरी किनारपट्टी ही नेहमीच संवेदनशील मानली जाते. दहशतवादी कृत्ये सागरी मार्गाने मोठय़ा प्रमाणात होतात.
मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी सागरी मार्गाने मुंबईत आले होते. त्यामुळे किनारपट्टीवरील सुरक्षा महत्त्वाची मानली जाते. त्यामुळेच पोलिसांनी वसईची सागरी किनारपट्टी अधिक सुरक्षित करण्यासाठी अर्नाळा येथे ऑपरेशन केंद्र उभारले आहे. पालघरच्या पोलीस अधीक्षक शारदा राऊत यांच्या हस्ते नुकतेच या केंद्राचे उद्घाटन झाले. या केंद्रात टेहळणी मनोऱ्याचाही समावेश आहे. २४ तास पोलीस तैनात राहणार आहेत. समुद्रात गस्त घालणाऱ्या स्पीड बोटी आणि सागरी पोलिसांचा समन्वय याच केंद्रातून साधला जाणार आहे. हे केंद्र अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या अखत्यारित आहे. बंदोबस्त आणि सुरक्षा पुरवणे, गस्तींवर नियंत्रण ठेवणे या केंद्रामुळे शक्य होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (लोकसत्ता)
===========

वसईत हजाराची नोट 300 रुपयांना विकली!
वसई : वार्ताहर,पुढारी
काळ्यापैशाला लगाम घालण्यासाठी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्याने बुधवारी व्यापारी, दुकानदारांनी या नोटा स्वीकारण्यास टाळाटाळ केली. यामुळे सर्वत्र दैनंदिन व्यवहारांवर विपरित परिणाम झाल्याचे चित्र असतानाच किराणा माल विकत घेण्यासाठी पैसे नसल्याने हजाराची नोट चक्क 300 रुपयांना विक्री करण्याची नामुष्की वसईतील सर्वसामान्य ग्राहकावर ओढवली. तसेच वसई शहरात पाचशेच्या नोटेची शंभर रुपयांना विक्री झाल्याचे चित्र ठिकठिकाणी पहायला मिळाले.
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याने अनेक सर्वसामान्य नागरिकांना घरातील महिन्याचे रेशन कसे आणायचे तसेच  रोजचा घरखर्च कसा चालवायचा याची चिंता सतावत आहे. आपल्याकडील पाचशे आणि हजाराची नोट घेण्यास कोणीही तयार नसल्याने नागरिक पुरते हैराण झाले आहेत. वसईच्या अग्रवाल सिटी भागात राहणार्‍या एका रहिवाशाकडे किराणा सामान भरण्यासाठी शंभरच्या नोटा नसल्याने त्याला हजाराची नोट विकून नड भागवावी लागली. किराणा दुकानदाराने त्याला हजाराच्या नोटेबदल्यात तीनशे रुपये दिल्याची माहिती त्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
===========

नोट बंदीने घरे स्वस्त होण्याची चिन्हे
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक करताना पंतप्रधानांनी 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यामुळे बांधकाम क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रातील काळ्या पैशाचा अनिर्बंध वापराला आळा बसणार असून घरांच्या किंमतीवरही परिणाम संभवत आहे.
 पुनर्विक्री व्यवहाराला मोठा फटका बसण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्‍त केली जात आहे. मात्र थेट विकासकाडून घर घेणार्‍यांना या निर्णयाचा फारसा फायदा होणार नाही, असा काहीजणांचा अंदाज आहे.
 या निर्णयाचे बांधकाम क्षेत्रावर दूरगामी परिणाम होतील, ते तत्काळ दिसून येतील, अशी प्रतिक्रिया जेएलएल इंडियाचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी दिली.
 थेट विकासकांकडून खरेदी होणार्‍या घरांना बँकांकडून पतपुरवठा होत असतो. त्यामुळे या व्यवहारात काळ्या पैशाला मोठ्या प्रमाणात वाव नसतो. घरांच्या किमती सर्वज्ञात असतात. त्यामुळे कायदेशीर रकमेत सूट देऊन काळा पैसा स्वीकारण्याचे प्रमाण कमी असते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था अधिकारी, राजकारणी यांच्याशी होणारे व्यवहार रोखीतच केले जातात, असे क्रेडाईचे अध्यक्ष गेतांबर आनंद यांनी सांगितले.
 महानगरांमध्ये थेट विकासकांकडून घर घेताना कायदेशीर मार्गांचा आणि वैध पैशांचा वापर केला जातो. मात्र पुनर्विक्री करताना मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर व्यवहार होतात. कॅपिटल गेन टॅक्स वाचवण्यासाठी विक्रेता रोख रकमेची मागणी करतो. खरेदीदारालाही त्याचा फायदा होतो. घराची रक्‍कम कमी दाखवल्यामुळे मुद्रांक शुल्क कमी भरावे लागते. शिवाय खरेदीदाराकडे असलेला बेनामी पैशाची परस्पर वासलात लागते.
 काळ्या पैशाच्या वापरामुळेच महानगरांतील जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. ताज्या निर्णयामुळे जमीन आणि सदनिका खरेदी विक्री व्यवहारातील रोख रकमेचा वापर पुढील काही महिन्यांसाठी तरी थांबेल, त्यामुळे पुनर्विक्री व्यवहार होणार्‍या घरांच्या किमती कमी होतील. काही प्रमाणात थेट विकासकांशी होणार्‍या व्यवहारांवरही याचा परिणाम संभवण्याची शक्यता आहे.
===========

मुंबई, ठाण्यात सोने ६० हजारावर?
शलाका सरफरे-भाग्यश्री प्रधान, ठाणे, लोकसत्ता
सरकारने ५००-१००० रुपयांच्या जुन्या नोटांच्या वापरावर बुधवारी मध्यरात्रीपासून बंदी आणताच मुंबई, ठाण्यासारख्या बडय़ा शहरांमधील सोने खरेदी बाजारात अभुतपुर्व तेजी अवतरल्याचे चित्र दिसून आले. या जुन्या नोटा वठविल्या जाव्यात यासाठी हातगाईवर आलेल्या खरेदीदारांकरिता दारे खुली करत काही बडय़ा जवाहिऱ्यांनी कोणत्याही शासकीय पुराव्याशिवाय अव्वाच्या सव्वा दराने सोन्याची विक्री सुरु केल्याचे पहायला मिळाले.
ठाण्यातील गोखले मार्गावरील काही बडे व्यापारी जुन्या नोटांचा स्विकार करत एक तोळे सोन्यासाठी थेट ६० हजार रुपयांची दर आकारणी करत असल्याने ग्राहकही भांबावले होते. बुधवारी  रात्री उशीरापर्यत सोने खरेदीचा हा चढा व्यापार बिनदिक्कत सुरु होताच शिवाय उद्या गुरुवारी हाच दर ७० हजार रुपयांचा घरात पोहचेल असा दावाही काही व्यापारी ग्राहकांपुढे करताना दिसले. सोन्याच्या या विक्री व्यवहारातून काही शे कोटी रुपयांचे काळे धन वठविण्यात आल्याची चर्चाही यानिमीत्ताने होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री  घोषणा केल्यानंतर सोने खरेदीवर ग्राहकांच्या उडय़ा पडण्यास सुरूवात झाली. त्यासाठी रात्री उशीरापर्यंत दुकाने खुले ठेऊन ग्राहकांना जुन्या चलनाच्या नोटांवर सोने विक्री केली जात होती. ठाण्यातील सुवर्णकार संघटन आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या वतीने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र खाजगी आणि बडय़ा सोने विक्रेत्यांनी दिवसभर सोने विक्री सुरू ठेवत मोठय़ाप्रमाणात भाववाढ करण्याचा प्रयत्न केला आहे. सकाळी ३४ हजार तोळे दराने सुरू झालेला भाव दुपार पर्यंत ३८ हजार, ४२ हजार, ५० हजार आणि ६० हजारापर्यंत टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आला होता. ‘लोकसत्ता’चे प्रस्तुत प्रतिनिधींनी शहरातील बडय़ा ज्वेलर्समध्ये जाऊन तेथील सोन्याच्या किमतींची चौकशी केल्यानंतर अधिकृतपणे हा दर वाढवण्यात आल्याचा दावा विक्रेत्यांकडून करण्यात येत होता. दोन लाखावरील सोने खरेदीसाठी पॅनकार्ड आवश्यक असल्यामुळे कुटूंबातील अन्य व्यक्तीच्या नावे सोने खरेदी करण्याचा सल्लाही सोने व्यापाऱ्यांकडून सुचवण्यात येत होता. चेक, डेबीट आणि क्रेडीट कार्डने सोने खरेदी करण्यासाठी ३२ हजारांचा दर आकारला जात होता. त्याच वेळी हजार आणि पाचशे रुपयांची थेट रोख रक्कम घेऊन येणाऱ्या ग्राहकांना ६० हजारांचा दर आकारण्यात आल्याचे चित्र ठाण्यात होते. प्रत्येक दुकानदार नरेंद्र मोदी यांच्या कालच्या घोषणेचा हवाला देत हा दर गुरूवारी थेट ७० हजारापर्यंत पोहचणार असल्याचे सांगत आजच खरेदी करा अशा दावा करत होते.
दोन लाखावरील रोख रकमेवरील खरेदीलाही पॅनकार्ड सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे असे व्यावहार होत असल्यास ते अयोग्य आहे. अनेक बडे सोने व्यापारी वेगवेगळ्या गोष्टींवर खर्च मोठे दाखवून हा फायदा वळता करत असल्यामुले त्यांची मनमानी सुरू आहे. याचा फटका छोटय़ा व्यापाऱ्यांना बसणार आहे.
– कमलेश श्रीमाल, अध्यक्ष ठाणे ज्वेलर्स असोसिएशन
===========

मोखाड्यातील 512 बालके मृत्युच्या दाढेत
मोखाडा : हनिफ  शेख, पुढारी
मोखाडा तालुक्यात गेल्या तीन महिन्यांत कुपोषणामुळे तीन आदिवासी बालकांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असतानाच तालुक्यात सप्टेंबरअखेर तब्बल 512 बालके अतितीव्र कुपोषित असून ती मृत्युच्या दाढेत असल्याचे भीषण वास्तव सरकारी आकडेवारीतून उघड झाले आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत राज्यातील डझनभर मंत्र्यांनी दौरे करूनही या समस्येबाबत ठोस उपाययोजना न झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
 तालुक्यातील बलद्याचा पाडा येथे राहणारी चार वर्षीय शितल निखडे या बालिकेचा रविवारी मृत्यू झाला. याबाबतचे वृत्त प्रासार माध्यमांमधून झळकल्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मात्र, हे जागेपण तेवढ्यापुरतेच राहत असल्याचे तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बालमृत्युंमुळे स्पष्ट झाले आहे. तालुक्यात आजही 512 बालके अतितीव्र कुपोषित श्रेणीत असून यातील कित्येक बालके सरकारी अनास्थेचा बळी ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मंत्री आणि प्रशासनाने केवळ दौरे करून पोकळ आश्‍वासने न देता ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
===========

विक्रमगड : मत्स्यप्रकल्पाने देहर्जे प्रदूषित
मंगूर मत्स्य पालनाने विक्र मगड तालुक्यातील हातने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गावाच्या हद्दीत व देहर्जे नदी पात्नाच्या लगत आमीन फार्म प्रा.लि. मध्ये असलेल्या सात तलावांमध्ये मंगूर माशांचे पालन व उत्पादन केले जाते.
या माशांना कोंबडीची सडलेली आतडी, कुजलेले मांस हे खाण्यास टाकले जात असल्यामुळे गावामध्ये तसेच आजूबाजूला दुर्गंधी पसरली आहे. त्याच बरोबर हे दूषित पाणी देहर्जे पात्नात सोडले जात असल्याने नदीचे पाणीसुद्धा दूषित होत आहे. त्यामुळे आजू-बाजूच्या गावामध्ये रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच या तलावांमधील दूषित पाण्यामुळे गाव परिसरात डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या बाबत ग्रामपंचायतीने या फार्मच्या मालकाला नोटीस बजावली आहे तरीही त्याने त्याकडे दुर्लक्ष करुन हे उत्पादन सुरूच ठेवले आहे.
याबाबत येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी शासनाला निवेदने दिलीत. त्यांच पाठपुरावाही केला. त्यानंतर आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकासहीत चौकशी करून या मत्स्यपालनाने आजूबाजूच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा अहवाल गटविकास अधिकार्‍यांना सादर केला आहे. मात्न या मत्स्यपालन प्रकल्पावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पाणी कुठे मुरते आहे, असा प्रश्न ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाला आहे. (वार्ताहर,लोकमत)
हा प्रकल्प बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात असून, या बाबत ग्रामपंचायतीने गट विकास अधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी, पोलीस स्टेशन, यांच्याशी याबाबत बराच पत्नव्यवहार केला आहे. मंगूर मत्स्यपालन प्रकल्पातील दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून हे पाणी देहर्जे नदीच्या पात्नात सोडले जाते. त्यामुळे ते दूषित झाले असून हा प्रकल्प बंद व्हावा या साठी आम्ही शासनाकडे ग्रामपंचायतस्तरावरून वेळो-वेळी निवेदने देऊन पाठपुरावा केला आहे. मात्न याबाबत शासनाने कुठली ही कारवाई केली नाही.
-नंदीनी डोले (सरपंच, देहर्जा ग्रामपंचायात)
मुळात असा प्रकल्प सुरू करण्याआधी ग्रामपंचायतीची, प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेतली होती का? नसेल तर हा प्रकल्प सुरू झालाच कसा? इतके दिवस ग्रामपंचायत झोपली होती का? याची उत्तरे कोण देणार? - एक नागरीक
===========

वसई येथील शिक्षका अर्चना डिसोझा आज निर्मळ येथे गेल्या असताना, त्यांना तेथे दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याचे जाणावले. ५००-१००० च्या नोटा बंद होण्याच्या व्हाट्सप टीवी फेसबुकवरच्या मेसेजनी सर्वसामान्य जनता गोंधळून गेली आहे असे त्यांनी पाहिले. सर्वप्रथम त्यांनी बाजारातील लोकांना समाजावुन सांगितले कि ५००-१००० च्या नोटांनी व्यवहार करता येईल. फक्त बॅंकचे व्यवहार सुरु होतील तेव्हा त्या नोटा बॅंकेत जमा करुन नवीन नोटा घ्या. अर्चना ताईंच्या ह्या एका समाजकार्याने बाजारातील अनेकांना धीर आला , विशेषकरुन ज्यांचे संसार रोजच्या व्यवहारावर अवलंबून आहेत त्यांना दिलासा मिळाला.

==================

"श्री किशोर राऊत" (डायनोमर्क कंट्रोल्स) ह्यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास परीषदेतर्फे दिला जाणारा मानाचा "भारतरत्न जे आर डी टाटा उद्योजक" पुरस्कार प्राप्त झाला आहे.
श्री राऊत हे उंबरगोठण, विरार पश्चिम येथील असल्याचे सांगितले आहे. पुरस्कार प्राप्त श्री किशोर राऊत ह्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होते आहे. युवा पिढीने त्यांचा आदर्श ठेवुन अधिकाधिक उद्योगक्षेत्रात प्रगती करावी अशी सोशल मिडीयावर भावना व्यक्त होते आहे.

================

वसईतील वर्तक कॉलेज विद्यार्थ्याला ३ वर्षे तुरुंगवास
वसई येथील १२ वर्षीय मुलीचा विनयभंग व लैंगिक छ्ळ केल्या प्रकरणात लाला खान नावाच्या २० वर्षीय तरुणाला ३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली आहे.
लाला खान सदर मुलीची छेड काढत असे व अश्लील शेरेबाजी करत असे. ह्याकडे दुर्लक्ष मुलीने दुर्लक्ष केले. मात्र लाला खानची वासना वाढत जाऊन त्याने मुलीला रस्त्यात थांबवुन लैंगिक जागी स्पर्श केले व मुलीने विरोध करताच डोक्यात मारले. मुलीने कशीबशी सुटका करुन घेतली व घरी हा प्रकार सांगितला.
वालीव , वसई पुर्व येथे मुलीच्या आईने तक्रार नोंदवली होती. सरकारी वकिल उज्वला मोहोळकर ह्यांनी आरोपीस शिक्षा होण्यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याचे सांगितले.

================

वसई येथील गृहनिर्माणचे म्हाडाने मंजुर केलेले टेंडर राज्यसरकारने नाकारले?
वसई कर्जत कल्याण ठाणे खालापूर रायगड येथील स्वस्त गृहनिर्माण (प्रधानमंत्री आवास योजना) करण्यासाठी म्हाडातर्फे टेंडर काढण्यात आले होते. मात्र ठराविक कंत्राटदारांना नफा होईल अशा पद्धतीने टेंडर मंजुर झाले होते.
एकुन ३३,५१० घरे बांधण्यासाठी ३६१२ करोडची टेंडर मंजुर झाली होती. ह्या आधीच्या प्रकल्पात दुय्यम दर्जाचे साहित्य वापरलेल्या कंत्राटदारांना हे काम मिळणार असल्याने सरकारवर टीक झाली असती , त्यासाठी राज्य सरकारने हे टेंडर रद्द केले.
वसई येथे दोन, कर्जत व खालापूर येथे प्रत्येकी एक अश्या भुखंडांवर हे गृहनिर्माण प्रकल्प होणार आहेत. हे भूखंड हरीत पट्ट्यात असल्याने म्हाडाला अजुन ताबा मिळाला नाही.
================

मनोरला राज्यमंत्री विद्या ठाकूर दत्तक घेणार?
मनोर : नांदगाव तर्फे मनोर गाव दत्तक घेण्यासाठी महिला बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी संबंधित अधिकारी व ग्रामस्थांबरोबर नांदगाव येथे सभा घेऊन चर्चा केली त्यासाठी पालघर जिल्हा भाजप अध्यक्ष व आमदार पास्कल धनारे, जि. प. अध्यक्ष सुरेखा थेतले,
विनिता कोरे सभापती, सतीश देशमुख अप्पर जिल्हाधिकारी, महेंद्र सागर तहसिलदार, सुजित पाटील, उपाध्यक्ष भाजप, वसंत चव्हाण उपाध्यक्ष नारायण सवरा, उप सरपंच, सरपंच इंद्रा गणपत तांबडी, विनोद पोद्दार, गटविकास अधिकारी जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी त्या म्हणाल्या की मी गावाच्या विकासासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनाही बोलावले आहे. तुम्हाला काय हवे आहे असे ते सांगा. मी ते तत्परतेने साकारेन. यावर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी आरोग्य, महसूल, बालकल्याण, वनविभाग, कृषी विभागा चे अधिकारी उपस्थित होते त्यांचा बरोबर चर्चा करण्यात आली आज आदर्श आमदार गाव दत्तक विषय आढावा मीटिंग आयोजित केली होती. (वार्ताहर,लोकमत)
===========

मराठी साहित्य संमेलनात तारपाचे सूर, वारलीचे रंग
भाग्यश्री प्रधान, ठाणे, लोकसत्ता
जव्हारमधील संमेलनपूर्व संमेलनात आदिवासी संस्कृतीचे दर्शन
ठाणे जिल्ह्य़ात मोठय़ा संख्येने राहणाऱ्या आदिवासींच्या कला आणि साहित्याला प्रोत्साहन मिळावे, शहरवासीयांना त्याचे दर्शन घडावे म्हणून साहित्य संमेलनात विशेष व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात जव्हार तालुक्यात संमेलनपूर्व साहित्य संमेलन भरविण्यात येणार आहेत.  ठाणे जिल्ह्य़ाचे भूमिपुत्र आगरी, कोळी, आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व ठसठशीतपणे मांडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
ठाणे-पालघर जिल्ह्य़ात विखुरलेल्या आदिवासी समाजात चित्रकला, नृत्य, काव्य आदी कलांची जोपासना केली जाते. त्यातली काव्य परंपरा ही बरीचशी मौखिक स्वरूपाची आहे. हे वाङ्मय छापील स्वरूपात आणण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे. त्याचबरोबर त्यांचे सण, चालिरीती, पोशाख आदींचे दर्शन घडणार आहे. आदिवासी समाजातील कला परंपरा, बदलत्या जगातील त्यांचे स्थान, त्यांचे प्रश्न आणि उपाय याविषयी चर्चा, परिसंवाद संमेलनात होतील.  डोंबिवलीतील साहित्य संमेलनातही त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, म्हणून वाहन व्यवस्था केली जाईल.
हे आदिवासी संमेलन नेमके कसे असावे याविषयी साहित्यिक आणि तज्ज्ञंमंडळींसोबत विचारविनिमय केला जात आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी लोकसत्ता ठाणेला दिली. या संमेलनाची आखणी जव्हार भागातच व्हावी अशा सूचना संमेलन समितीपुढे करण्यात आल्या होत्या. त्यास सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.
याआधीही हा प्रयोग
ठाण्यातील संमेलनाच्या वेळीही जव्हार येथे आदिवासी साहित्य संमेलन भरविण्यात आले होते. भारतीय शिक्षण मंडळ संस्थेचे संस्थापक अनिल पाठक यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता.
===========

मुरबाडमधील ‘कान्होळ’ पहिले ‘वायफाय’ग्राम
प्रशांत मोरे, ठाणे, लोकसत्ता
गावात ठिकठिकाणी राऊटर जोडणीचे काम सुरू
परिसर स्वच्छता, पाणीपुरवठा, तंटामुक्ती आणि राजकारणविरहित स्थानिक प्रशासन व्यवस्था यामुळे ठाणे जिल्ह्य़ात आदर्श ठरलेल्या मुरबाड तालुक्यातील कान्होळ गावाने संपूर्ण गावगाठ हद्दीत वायफाय सेवा कार्यान्वित करून स्वतला आधुनिक जगाशी जोडले आहे. मंगळवारी राऊटर जोडणीचे काम सुरू झाले. येत्या दोन दिवसांत ही सेवा कार्यान्वित होणार आहे.
इंटरनेट सुविधा ही अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याइतकीच प्राथमिक गरज ठरली आहे. शहरात रेल्वे स्थानके, महत्त्वाचे चौक तसेच काही महाविद्यालयांनी  वायफाय इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ठाणे महापालिकेने तर संपूर्ण शहरात वायफाय देण्याची घोषणा नुकतीच केली. आधुनिकीकरणाचे हे वारे कान्होळ गावातही पोहोचले आहे. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत डिजिटल पद्धतीचे शिक्षण उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांसाठी टॅब आहेत. बाराशे लोकसंख्या असलेल्या कान्होळमध्ये सुमारे शंभरेक अ‍ॅँण्ड्रॉइड मोबाइल आणि २५ संगणक आहेत. इंटरनेट सुविधेपोटी प्रत्येकी किमान २०० रुपये खर्च गृहीत धरला तरी दरमहा गावकऱ्यांना २० हजारांहून अधिक रक्कम मोजावी लागत होती. त्यामुळे त्याऐवजी संपूर्ण गाव वायफाय करण्याची कल्पना गावातील शिक्षक जीवन शेळके यांना सुचली. स्थानिक विशाखा केबलचे तानाजी घोडविंदे आणि सुशिक्षित तरुण एकनाथ हरड यांनी ती कल्पना उचलून धरली.
गावकऱ्यांना विनामूल्य इंटरनेट
गावठाणाचे क्षेत्रफळ साडेसात एकर असून १२६ घरे आहेत. वाय फाय सुविधेसाठी गावात सात ठिकाणी राऊटर बसविण्यात आले आहेत. एका राऊटरमुळे ३०० मीटर क्षेत्रात इंटरनेट सुविधा उपलब्ध होते. त्यामुळे संपूर्ण गावात इंटरनेट सुविधा मिळते. त्यामुळे आता ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, मध्यवर्ती ठिकाणी असलेले हनुमानाचे मंदिर, समाजगृह तसेच घरोघरी इंटरनेट सुविधा उपलब्ध होणार आहे. या सुविधेसाठी लागणारे दरमहा तीन ते चार हजार रुपये शुल्क ग्रामपंचायत भरणार आहे. त्यामुळे समस्त गावकऱ्यांना ही सेवा विनामूल्य मिळणार आहे.
===========

पेट्रोलपंप चालकांनी उठवला प्रचंड फायदा
मुंबई : प्रतिनिधी,पुढारी
पाचशे व हजार रुपयांची नोट व्यवहारातून रद्द ठरवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा पेट्रोल पंप व सीएनजी पंप चालकांनी चांगलाच फायदा उठवला. आपल्या मर्जीप्रमाणे पाचशे, हजार रुपयांचेच इंधन भरण्याची सक्ती पेट्रोल पंप चालकांकडून वाहनचालकांना करण्यात आल्याने, अनेक पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. वाहनचालकांना पाचशे आणि हजार रुपयांचेच इंधन भरण्याची सक्ती होत असल्याने पंपावरील कर्मचार्‍यांसोबत शाब्दीक चकमकी पाहण्यास मिळत होत्या.
 पेट्रोल पंपावर पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येत होत्या. मात्र पेट्रोल पंपांवर पाचशे किंवा हजार रुपये किंमतीचे पेट्रोल, डिझेल घेण्याची सक्ती करण्यात येत असल्याने वाहन चालक व पेट्रोल पंपावरील कर्मचार्यांमध्ये प्रचंड वाद होत असल्याचे चित्र दिसत होते. विशेषत: दुचाकी स्वारांना या सक्तीचा फटका बसत असल्याने दुचाकीस्वारांसोबत मोठे वाद होत होते.
 पाचशे व हजारच्या नोटा दिल्यावर शिल्लक परत करता येणार नाही अशी नोटीस पेट्रोल पंपांवर लावण्यात आली होती. त्यामुळे पूर्ण रक्कमेचे इंधन भरण्याशिवाय वाहनचालकांकडे काही पर्याय उरला नव्हता. 
===========
सविस्तर वृत्त http://www.palgharlive.com/2016/11/blog-post_10.html 

1 Comments:

At November 10, 2016 at 9:27 AM , Blogger Rupesh Patil said...

Very nice online news.

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home