Sunday, October 9, 2016

पालघर न्युज* 📡💻 ०९ ऑक्टोबर🗞 *विष्णू सवरा यांच्या वाडा येथील घरावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मोर्चाचे आयोजन भलत्याच लोकांनी केल्याची बाब समोर आली आहे.*
कृषी  विभागाकडून राज्यात कोरडवाहू शेती विकास कार्यक्रम राबविण्यात येत होता. डोंगर उतारावर जेसीबी मशिनद्वारे सपाटीकरण करून शेतीसाठी उपयुक्‍त पट्टे तयार केले जातात. ही कामे प्रामुख्याने पुणे जिल्ह्याच्या जुन्नर, आंबेगाव या भागात करण्यात आली असून संबंधित ठेकेदार राजकीय नेत्यांशी संबंधित आहेत. मात्र दोन वर्षांपासून कृषी विभागाने या योजनेचा निधी बंद केला. त्यामुळे कंत्राटदारांचे साडेतीन कोटी रुपये थकले. ही बिले कोणत्याही मार्गाने वसूल करण्याचा कंत्राटदारांनी विडा उचलला आणि त्यांनी आदिवासी विकास विभागाला लक्ष्य केले. कारण आदिवासी विकास विभागाकडून अशाच पद्धतीचा "पडकई‘ कार्यक्रम राबविला जातो. कंत्राटदारांनी बिले आदिवासी विकास विभागाकडे सादर केली, मात्र संबंध नसल्याचे सांगून आदिवासी विकास विभागाने प्रस्ताव फेटाळला. यानंतर पुण्यातील वजनदार मंत्र्याने आदिवासी विकास विभागाची बैठक घेतली व बिले मंजूर करण्यासाठी सुचित केले, तरीही आदिवासी विकास विभागाने हा दबाव झुगारून लावला. आदिवासी विकास विभाग जुमानत नसल्याने कंत्राटदारांनी अनोखा मार्ग अवलंबला. कुपोषणाच्या मुद्यावर विष्णू सवरा यांच्या घरावर मोर्चा निघणार होता. या मोर्चाला योग्य रसद कंत्राटदारांनी पुरविली. (सकाळ न्यूज नेटवर्क)

🗞 *तीन अल्पवयीन मुली बेपत्ता*
विरार : गेल्या दोन दिवसात वसईतून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. विरार पूर्वेकडील मनवेलपाडा येथून कृपाली बोर्डीकर ही सतरा वर्षांची मुलगी कॉलेजला गेली ती परतली नसल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
आरती लक्ष्मण मोरे हिला तिच्या वडिलांशी असलेल्या भांडणाचा राग काढण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीने पळवून नेले असल्याबाबत विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असाच एक प्रकार माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. एका सतरा वर्षीय मुलगी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार माणिकपूर पोलीस ठाण्यात दाखल करणत आली आहे. (वार्ताहर)

🗞 *२२ रिक्षांवर कारवाई*
विरार : नालासोपारा शहरात चालणार्‍या बेकायदेशीर २२ रिक्षांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई केली. या धडक कारवाईमुळे कागदपत्रांची पूर्तता नसणार्‍या आणि बेकायदा रिक्षा अचानक गायब झाल्या आहेत. वसई, नालासोपारा, विरार या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात फिटनेस विनारिक्षा प्रवासी वाहतूक करीत आहेत.

🗞 *वालीव पोलीस ठाणे अद्यापही ठाण्यातच*
विरार : ठाणे जिल्हा विभाजनानंतर अस्तित्वात आलेल्या पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा अधिक्षक असतानाही वालीव पोलीस ठाण्याचा फलक बदलण्यात आलेला नाही.

🗞 *१३ सुवर्णांसह ३३ पदकांची कमाई*
पालघर : मुलुंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पालघरच्या स्पर्धकांनी १३ सुवर्णांसह ३३ पदकांची लूट केली. जपानमधील वर्ल्ड फुनाकोशी शोतोकोन कराटे असोसिएशन चे संस्थापक शिहान इस्माईल यांनी मुंबईच्या प्रियदर्शनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुलुंड येथे २२ ते २५ सप्टेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन केले होते. भारतातील स्पर्धकांसह जपान, इंग्लंड, रशिया, कझाकिस्तान, पोर्तुगाल, श्रीलंका इ. २२ देशातील चार हजार स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रशिल जाधव (३ सुवर्ण,१ कांस्य पदक), प्रथमेश जाधव (२ सुवर्ण, १ रजत, १ कांस्य), आयुष लोखंडे (२ सुवर्ण, १ कांस्य), आकाश यादव ( १ सुवर्ण १ कांस्य), विघ्नेश रामटेके (१ सुवर्ण), प्रकाश विश्‍वकर्मा (१ सुवर्ण, अमित शेळके (२ सुवर्ण पदक), प्रतीक राऊत (१ सुवर्ण), किरण भोईर (१ रजत १कांस्य), हनिष दहिवले (१ रजत, १ रजत, १ कांस्य), आर्य देशमुख (१ रजत ), प्रणाली ठाकूर (२ कांस्य), सिद्धीका पाटील (१ कांस्य) अशी एकूण ३३ पदकांची लयलूट केली. तसेच प्रशिक्षक राजेश पाटील यांनी ३ री ते ७ वी डिग्री या स्पर्धा प्रकारात सहभागी होऊन कांस्य पदक मिळविले. (प्रतिनिधी,लोकमत)

🗞 *मोक्काच्या आरोपीला अटक*
विरार : मोक्काच्या आरोप असलेल्या नालासोपार्‍यातील आरोपीला तब्बल अकरा महिन्यांनी पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई येथून अटक केली. २३ नोव्हेंबर २०१५ रोजी शैलेंद्र ऊर्फ शेरू लोढा याच्यावर मोक्का लावण्यात आला होता. त्याच्याविरोधात तुळिंज पोलीस ठाण्याच्या दप्तरी विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्काची कारवाई करण्यात आली होती. बांधकाम व्यावसायिक जावेद अन्सारी हा शेरुचा जिवलग मित्र होता. काही कारणास्तव दोघांमध्ये बिनसले. म्हणून शेरूने जावेद याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानुसार वसई पूर्वेकडील एव्हरशाईन सिटी परिसरात ११ ऑगस्ट २०१५ रोजी जावेदवर गोळ्याही झाडण्यात आल्या होत्या.
गोळीबार प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर तुळिंज पोलिसांनी त्याच्यावर मोक्का लावला होता. त्यानंतर शेरू फरार झाला होता. अखेर अकरा महिन्यांनी शेरुला अंधेरी येथून पालघर गुन्हे शाखेच्या वसई युनिटने गुप्त माहितीच्या आधारे अटक करून ताब्यात घेतले आहे. (वार्ताहर,लोकमत) पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपी विकास आणि इम्रान याला अटक केली होती. शेरू लोढा याला १२ ऑगस्टला अटक केल्यानंतर न्यायालयातून १५ दिवसांनी जामीन मंजूर करण्यात आला होता. विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यामुळे शेरू याचा जामीन पोलिसांनी रद्द करून २३ नोव्हेंबरला त्याच्याविरुद्ध मोक्काचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून शेरु लोढा तब्बल ११ महिने फरार होता.


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home