Friday, October 7, 2016

पालघर न्यूज ७ ओक्टोबर

पालघरमध्ये डेंग्यूची साथ
पालघरमध्ये डेंग्यूची साथ
पालघर : या तालुक्यात डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात फैलाव सुरु असून माहीम रोड वरील सत्तर गाळ्या जवळ राहणाऱ्या बब्बू बोजा या रुग्णाला उपचारासाठी गुजरात राज्यातील वलसाड येथील रुग्णालयात नेण्यात आले असून अमिता कुडू यांना डेंग्यूची लागण झाल्याने पालघरच्या ढवळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डासाच्या नायनाटासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा डासावर कुठलाही परिणाम होत नसल्याने औषधावरील लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे.

मोटारविक्री करणाऱ्या शोरूमचालकांना अनोख्या पद्धतीने गंडा घालणारी टोळी वसईत सक्रिय झाली आहे.
प्रीती बंजारा नावाची ठकसेन महिला आपल्या पतीसमवेत १ सप्टेंबर रोजी वसईच्या सवरेदय मोटार्स या शोरूमध्ये गेली. तिने १००० रुपयांचा धनादेश देऊन एक मोटारसायकल बुक केली. काही दिवसांनी ती परत आली आणि आमची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने आम्ही हा व्यवहार रद्द करत आहोत, असे शोरूमला कळवले. शोरूमने नियमानुसार या महिलेस बुकिंग केलेल्या रकमेपैकी ५०० रुपये वजा करून ५०० रुपयांचा धनादेश दिला. मात्र या महिलेने या धनादेशात फेरफार करून ५०० रुपयांऐवजी तब्बल पाच लाख ३५ हजार रुपये धनादेशावर टाकले. अत्यंत सफाईने केलेल्या खाडाखोडीमुळे काहीच शंका न आल्याने वसईतील बँकेने धनादेशातील रक्कम प्रीतीच्या खात्यात जमा केली. सवरेदय मोटार्सचे व्यवस्थापक सुनील मोरे यांनी या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरारच्या मॅग्नस मोटार्स या शोरूमलाही या ठकसेन महिलेने अशा पद्धतीने गंडा घातल्याची माहिती पोलिसांनी दिली. वसईमधील आदित्य होंडाच्या शोरूमलाही अशाच प्रकारे गंडा घालण्याचा प्रयत्न या महिलेने केला होता, मात्र बँकेच्या सावधगिरीमुळे तो फसला. या ठकसेन महिलेले दिलेल्या १००० रुपयांतून १०० रुपये वजा करून ९०० रुपयांचा धनादेश आदित्य होंडाने तिला दिला होता. आरोपी महिलेने त्यात फेरफार करून ९०० रुपयांऐवजी ९ लाख लिहिले आणि हा धनादेश वटविण्यासाठी बँकेत जमा केला, परंतु बँकेने खात्री करण्यासाठी शोरूमचालकाला फोन केल्यानंतर ही फसवणूक टळली.

वसई : नायगाव परिसरात रस्त्यालगत ठेवण्यात येणाऱ्या मोटार सायकलस्वारांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. तर बेकायदा रिक्षांवर कारवाई होत नसल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
नायगाव पश्चिमेला पार्किंगसाठी जागा अतिशय अपुरी असल्याने मोटारसायकली आणि चारचाकी गाड्या रस्त्यालगत ठेऊन शेकडो लोक जातात. या गाड्या पहाटेपासून रात्रीपर्यंत रस्त्यावर बेवारसपणे ठेवल्या जातात. जागा नसल्याने वाहनचालक आपल्या महागड्या गाड्या रस्त्या कडेला कित्येक वर्षांपासून ठेवत आहेत. त्यातच जुलै महिन्यापासून कोसळलेल्या पावसामुळे नायगाव रेल्वे पार्किंगमध्ये पूर्ण पाणी साचून राहिले आहे. तसेच येथे पर्यायी पार्किंग जागा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या कडेला आपली वाहने पार्किंग करू लागला आहे. गेल्या महिन्यापासून वाहतूक पोलिसांनी यावर कारवाई करीत दंड’ वसूल करायला सुुरुवात केली आहे. रात्री कामावरून परतलेल्या चाकरमान्यांना याचा चांगलाच फटका बसला. पर्यायी व्यवस्था नसतांना झालेली कारवाई अन्यायकारक असल्याच्या तक्रारी वाहतूक पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत. मात्र ही वाहने रस्त्याच्या कडेला काढण्यात आलेल्या सफेद पट्ट्या बाहेर असल्याच्या तक्रार असल्याने कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
शिस्तबद्ध पार्किंग केलेल्या वाहनांना अनेकवेळा रिक्षाचालक मुद्दामून रस्त्यावर आणून ठेवत असल्याने प्रवासी तसेच रिक्षा चालकांमध्ये बाचाबाची होत असते. अनेकवेळा गाडयांना मुद्दाम पाडण्यात येऊन त्यांची नासधूस करण्यात येते. रिक्षा स्टॅन्ड हा रेल्वेने आरक्षित अ‍ॅम्ब्युलन्स पार्किंगमध्ये उभारला गेल्याने तो बेकायदेशीर असल्याच्या तक्रारी रेल्वेकडे करूनही कुठलीच कारवाई केली जात नाही. राज्य सरकारकडून रेल्वे परिसरात उभी केलेली मोफत अ‍ॅम्ब्युलन्स अनेकवेळा याच रिक्षा स्टॅन्डमुळे अडकून पडत असते. वसई वाहतूक पोलीस निरीक्षकांनी अलीकडेच लावलेल्या सूचना फलका शेजारीच रिक्षा रस्त्यामधोमध उभ्या केल्या जात असतांनाही केवळ आपल्यावरच कारवाई का? अशी प्रवाशांमध्ये चर्चा आहे. रिक्षांमध्ये ५ प्रवासी भरून वाहतूक केली जाते त्याकडे दुर्लक्ष होते आहे. तसेच रस्त्यामध्ये बेशिस्तपणाने रिक्षा उभ्या केल्या जात असतांना त्यावर वाहतूक पोलीस का कारवाई करीत नाही? असा सवाल प्रवासी वर्ग विचारू लागला आहे. (प्रतिनिधी)

विरार : मध्यमवर्गीय कुटुंबीयांना माफक दरामध्ये घर देण्याची आकर्षक योजना व आमिषे दाखवून त्यांच्याकडून धनादेश सुमारे ६0 ते ७0 कोटी रुपयांची रक्कम घेऊन पसार झालेल्या म्होरक्याला तेरा महिन्यांनी पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतील हुतात्मा चौकातून अटक केली. मोहमद आजम अब्दुल अजीम खान असे म्होरक्याचे नाव आहे. मेसर्स आयोनिक (इकोसिटी) रिअँलिटी प्रा.लि. आणि मेसर्स क्रिस्टल होमकॉन प्रा.लि. या दोन कंपन्यांनी विरारजवळील बोळींज येथे गृह प्रकल्पाची योजना आखली होती. या प्रकल्पामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबीयांना माफक दरात घर देण्याची आमिषे दाखवण्यात आली होती. या दोन्ही कंपनींच्या भुलथापांना बळी पडून आयोनिक (इकोसिटी) रिअँलिटी प्रा.लि. या कंपनीने जवळपास १ हजार ४00 लोकांकडून आणि मे.क्रिस्टल होमकॉन प्रा.लि. या कंपनीने सुमारे ४00 ते ५00 लोकांकडून सुमारे ६0 ते ७0 कोटी रुपयाची रक्कम उकळली होती. या दोन्ही कंपन्यांनी मिळून जवळपास सुमारे दोन हजार लोकांची फसवणूक केलेली आहे. आतापर्यंत फसवणूक झालेल्या १ हजार १0३ लोकांनी कंपनी विरोधात पोलिसांकडे तक्रारी दिल्या आहेत. मे.आयोनिक (इकोसिटी) रिअँलिटी प्रा.लि. व मे.क्रिस्टल होमकॉन प्रा.लि. या कंपनीमध्ये घर खरेदीसाठी ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. तसेच आजपर्यंत पोलीसांकडे फसवणूक झाल्याची तक्रार केलेली नाही अशा व्यक्तींनी लवकरात लवकर आर्थिक शाखा पालघर येथे कागदपत्रांसह संपर्क साधण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक नारायण पाटील यांनी केले आहे.

पालघर : ऑस्ट्रेलिया स्पर्धेसाठी स्नेहल राजपूत
ऑस्ट्रोलिया येथे २५ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान होणार्‍या अँथलॅटिक्स स्पर्धेत पालघरच्या स्नेहल राजपूत या २ हजार मीटर्स स्ट्रीपलचेस व ४00 मीटर हर्डल्स मध्ये त्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. आतापर्यंत १९ देशात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले असून अनेक पदकेही मिळविली आहेत. या स्पर्धेतही आपण पदके मिळवूच असे त्या म्हणाल्या . (वार्ताहर)

पारोळ : विरार खानिवडेजवळ शाळेतील दोन विद्यार्थ्यांना रिक्षातून पळवून नेण्यात येत असता त्यांनी प्रसंगावधान राखून रिक्षातून उड्या मारुन पळ काढल्याने अपहरणाचा डाव उधळला गेला.
वसई तालुक्यातील खानिवडे प्रतिभा विद्यामंदिराचे भालिवली येथे राहणारे विद्यार्थी आदित्य किसन घाटाळ इयत्ता ७ वी व विकी सुरेश भोये ६ वी हे दोन विद्यार्थी नेहमी प्रमाणे २९ सप्टेंबर रोजी घरातून खानिवडे शाळेत सकाळी ७.३० च्या सुमारास जात होते. सकाळची वेळ असल्याने या रस्त्यावर वर्दळ नव्हती. यावेळी एक अनोळखी रिक्षा त्यांच्या शेजारी येऊन थांबली व त्यात बसलेल्या चालकाने बसा मी तुम्हाला शाळेत सोडतो असे सांगितले. हे दोघेही विद्यार्थी रिक्षात बसले. ती काही अंतरावर पुढे गेल्यानंतर चालकाने दुसऱ्या कुणाशी मोबाईलवर संपर्क साधून हिंदीमध्ये संभाषण करतांना सांगितले कि, दो को हम ले आए है, आप तैयार रहना. हे हिंदी संभाषण आदित्यने ऐकले व आपल्याला काहीतरी धोका असल्याचे त्याच्या लक्षात आले. तेव्हा त्याने विकीला खुणेने रिक्षातून उडी मारण्यास सांगितले. रिक्षा सर्व्हिस रोडवरून मुख्य महामार्गावर जात असतांना वेग कमी असल्याने दोघांनीही बाहेर उड्या मारल्या. रिक्षाचालकास हे समजताच त्याने रिक्षा थांबवण्याऐवजी महामार्गावर मुंबई दिशेने निघून गेला . या दरम्यान आदित्यने न घाबरता रिक्षाच्या पाठीमागे नंबर शोधण्यासाठी नजर लावली परंतु रिक्षाला नंबरच नसल्याचे त्याच्या लक्षात आल्याचे त्याने या प्रसंगाविषयी बोलताना सांगितले . दरम्यान, तसेच उडी मारताना विकीला मार लागला आहे . दरम्यान भालिवली येथील इतर सवंगडी आल्यावर त्यांच्या बरोबर शाळेत येऊन घडलेला प्रसंग आदित्यने क्लास टीचरला सांगितला. यामुळे पोलिसांनी या रस्त्यावरील गस्त वाढविली आहे. (वार्ताहर)

चंदनाची तस्करी करणारे तिघे अटकेत
विरार : चंदनाची तस्करी केल्याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी अविनाश पवार (सातारा), शंकर चिनप्पा देशमुख (खटाव) आणि राजू होवाळ (सांगोला) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ३६ हजार रु पयांचे चोरटे चंदन जप्त करण्यात आले आहे. खारोडी येथे नाकाबंदी सुरु असताना पोलिसांना तीन जण संशियतरित्या फिरताना आढळून आले.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home