Wednesday, October 5, 2016

५ ओक्टोबर २०१६

वसई :अवैध बांधकामांचा निर्मळ तलावाला विळखा

वसई : ऐतिहासिक निर्मळ तलावाला अनधिकृत बांधकामांचा विळखा पडला असून, सर्व्हे क्र.१५५ आणि १५६ या आरक्षित जागेची खुले आम विक्री केली जात आहे.
विमलासूराचा वध करून भगवान परशुरामांनी निर्मळ आणि विमल तलावाची निर्मिती केल्याची आख्यायिका आहे. या परिसरात शंकराचार्यांचे पौराणिक मंदिरही आहे. अशा या निर्मळ तलावाला अनधिकृत बांधकामांचा वेढा पडला आहे. तलावाच्या परिसरातील आरक्षित जागांवर अनधिकृत इमारती उभाण्यात आल्या आहेत. तलावाच्या सुळेश्‍वर पाड्यालगत सुमारे पाच एकर जागा आहे. या जागेवर महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता करारी गार्डन संकुलातील बहुमजली इमारती उभारण्यात आल्या आहेत, अशी माहिती माहिती अधिकाराखाली महापालिकेनेच दिली आहे.
(प्रतिनिधी)

जव्हारमध्ये तीन दिवसांपासून धुके
जव्हारमध्ये तीन दिवसांपासून धुके


जव्हार : जव्हार येथे गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण शहरात व परीसरात धुक्याचे आच्छादन असून रस्ते धुक्यामध्ये हरवले आहेत. वाहनचालकांना दिवसाही वाहनांचे दिवे चालू ठेवावे लागत आहेत. त्यात जव्हार शहर हे समुद्र सपाटी पासून १८00 फूट उंचीवर आहे. पाऊस आणि धुक्याच्या वातावरणामुळे अत्यंत आल्हाददायक आणि निसर्गरम्य असे डोळ्यांचे पारणे फेडणारे वातावरण निर्माण झाले असून वर्षा विहाराकरीता येणार्‍या पर्यटकांचे पाय आता जव्हारकडे वळू लागले आहे. पूर्वीचे ठाणे व सध्याचे पालघर जिल्ह्याचे महाबळेश्‍वर म्हणून जव्हारची ख्याती आता दूरवर पसरली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने व्हर्जिन असलेले नितांत सुंदर जव्हार सुटीच्या दिवशी पर्यटकांच्या गर्दीने हळूहळू फुलत आहे. हुसेन मेमन

 अनधिकृत बांधकामांमध्ये पोलिसांचा हस्तक्षेप
तक्रारदारालाचधमकी? : नगरसेवक अरुण जाधव यांच्या प्रकरणातून उघड झाले वास्तव
शशी करपे■ वसई
अनधिकृत बांधकामांविरोधातील वाढत्या तक्रारींमध्ये पोलिसांचा हस्तक्षेप वाढतो आहे. बेकायदा बांधकामे करतांना बिल्डर बनावट कागदपत्रे तयार करीत असल्याचा फायदा घेऊन पोलिसांकडून कारवाईच्या नावाखाली बिल्डरांनाच अभय देण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यातूनच एका तक्रारदाराने पोलिसांनी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार केल्याने पोलीस वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत.
वसई विरार परिसरात सध्या बनावट कागदपत्रे तयार करून बेकायदा इमारती बांधल्याची शेकडो प्रकरणे उजेडात आली असून विविध पोलीस ठाण्यांमध्ये दोनशेहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. तर आतापर्यंत तितकेच बिल्डर जेलमध्ये गेले आहेत. बनावट कागदपत्रांमध्ये जामीन मिळत नसल्याने बिल्डर धास्तावले आहेत. त्यामुळे आता बिल्डरांनी पोलिसांशी संधान साधून स्वत:ला सेफ करण्यास सुरुवात केली आहे.
त्यातूनच तक्रारदाराची तक्रार दाखल करून न घेणे, तक्रार मागे घेण्यासाठी दबाब टाकणे, बिल्डरांना झुकते माप देण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेकडे आता संशयाने पाहिले जात आहे. एका जाधवने दुसर्‍या जाधवला पाठीशी घातले? जाधव याप्रकरणी फरार होते. त्यांना शोधण्यासाठी पोलीसांनी महापालिकेच्या आयुक्तांना सहकार्य करण्याची विनंती केली होती. तरीही अटकपूर्व जामीन घेण्यासाठी उच्च न्यायालयात हजर राहिलेल्या अरुण जाधव यांची पोलीस कस्टडी घेणे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल एस.जाधव यांना आवश्यक वाटले नाही. त्यामुळे अर्थपूर्ण संबंधातून एका जाधवने दुसर्‍या जाधवला पाठीशी घातल्याची तक्रार काकडे यांनी केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी काकडे यांनी सुरु केली आहे. त्यामुळे हे प्रकरण मिटवण्याची कामगिरी अरुण जाधव यांनी दोन पोलीसांकडे सोपवल्याची तक्रार काकडे यांनी पोलीस अधिक्षक शारदा राऊत यांच्याकडे केली आहे. राजेश महाजन आणि शाम शिंदे अशा या पोलीसांनी अरुण जाधव यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारी मागे घे. त्यासाठी तुला पैसे देतो. नाहीतर खोट्या गुन्ह्यात अडकवून टाकू अशी धमकी दिल्याची तक्रार काकडे यांनी पोलीस अधीक्षका शारदा राऊत यांच्याकडे केली आहे. जाधव यांना मुंबई हायकोर्टातून अटकपूर्व जामीन मिळाला असल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याप्रकरणात काकडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे पोलिसांविरोधात केलेल्या तक्रारीची चौकशी सुरु आहे. पोलीस हवालदारांना प्रभारी अधिकार्‍यांच्या आदेशाशिवाय गुन्हा दाखल करण्याचे कोणतेही अधिकार नसतात. तरीही काकडे यांच्या तक्रारीची सत्यता पडताळण्यात येत आहे.
- प्रकाश बिराजदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे. अनधिकृत बांधकामाशी माझा कोणताही संबंध नसून याप्रकरणात मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. काकडे यांनी केलेल्या तक्रारीतील पोलिसांनी दिलेल्या तथाकथित धमकीशीही माझा संबंध नाही. सर्व आरोप निव्वळ राजकीय आकसापोटी करण्यात आलेले आहेत.
- अरुण जाधव, नगरसेवक.

नालासोपार्‍यात सट्टेबाजाला अटक
विरार : कर्नाटक प्रिमियर लीगमधील हुबळी टायगर्स विरुद्ध बेलारी टस्कर्स सामान्यावर पैसे लावून जुगार खेळणार्‍या सट्टेबाजाला तुळींज पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सट्टा खेळण्यासाठी लागणारे साहित्यही जप्त करण्यात आले.
दिलीप उर्फ रिंकू रामबदन मिश्रा असे आरोपीचे नाव आहे. कर्नाटक राज्यात सुरु असलेल्या कर्नाटक प्रिमियर लीगमधील हुबळी टायगर्स विरुद्ध बेलारी टस्कर्स सामन्या दरम्यान नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवरील चंदन नाका परिसरातील फिलिप्स पॅराडाईज इमारतीमधील शॉप नंबर ३,४,५,६ मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राकेश साखरकर, सुरेंद्र शिंदे, लक्ष्मण तरवारे, भास्कर कोठारी, योगेश आहिरे, किरण म्हात्रे, मनोज सकपाळ, सुनील आव्हाड यांनी धाड टाकली होती. (वार्ताहर)

   प्रशिक्षण देण्याऐवजी घेतले राबवून

राहुल वाडेकर■ विक्रमगड,
पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत वाडा व विक्रमगडच्या ९0 तरुणांना बोईसर येथील कंपनी प्रशासनाने प्रशिक्षण देण्याऐवजी राबवून घेतल्याने ८0 प्रशिक्षणार्थ्यांनी घर गाठले आहे.
कौशल्य विकास हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. या याद्वारे बेरोजगार युवकांना प्रशिक्षण दिल्यामुळे कुशल मनुष्यबळ तयार होईल. त्यांना निश्‍चितपणे रोजगाराची संधी मिळावी हा या मागचा उद्देश आहे. या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात प्रथम वाडा येथे या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यातून वाडा व विक्रमगड तालुक्यातील ९0 बेरोजगारांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती.या सर्व तरुणांना बोईसर येथील बॉम्बे रियोंन फॅशन लिमिटेड या कंपनीत प्रशिक्षणासाठी नेण्यात आले. तेथे त्यांना प्रशिक्षण देण्याऐवजी हेल्पर म्हणून काम करायला लाऊन झाडू मारणे, प्लांट मधील पाणी काढायला लावणे, सुताचे रोल भरून येणार्‍या गाड्या खाली करायला लावणे अशी कामे करायला लावल्याने हे प्रशिक्षणार्थी कंटाळून शेवट प्रशिक्षण सोडून घरी आले. त्याच बरोबर येथे दिले जाणारे भोजन सुद्धा खुप कमी मिळत असल्याची तक्रार अनेक प्रशिक्षणार्थीनी केली.
ग्रामपंचायतीच्या मनमानीने मनोर ग्रामसभा तहकूब

१२४ ग्रामस्थांची उपस्थिती : तरीही कोरमचा अभाव दाखविला
मनोर : मनमानी कशाला म्हणतात याचे दर्शन रविवारी गांधीजयंती निमित्त तहकूब केलेल्या मनोर ग्रामसभेवरुन समोर आले. तब्बल १२४ ग्रामस्थांची उपस्थिती असतांना सरपंच व उपसरपंच यांनी कोरम पुर्ण नसल्याचे सांगत आपली मनमानी केली.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त सर्व पंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्यात आली. त्याअनुषंगाने मनोर पंचायतीमध्येही ती आयोजित केली होती. रजिस्टर्ड बुकवर ७१ ग्रामस्थांच्या सह्याही झाल्या होत्या. ग्रामपंचायतच्या प्रवेशद्वारावर कर्मचारी बसवून सह्या घेतल्या जाण्याची पद्धत अनुसरली गेली नाही. ग्रामस्थ येऊन बसल्यानंतर त्यांच्या सह्या घेतल्या जाऊ लागल्या. लोकही हळूहळू येताना दिसत होते. ते येण्याची प्रतिक्षा न करता सरपंच जागृती हेमाडे, उपसरपंच साजिद खतिब, सदस्य ग्रामसेवक शिंदे यांनी ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करण्यात येते. असे घोषित केले.
हा मनमर्जीचा गैरप्रकार माजी सरपंच यशवंत ठाकरे, अनंता पुजारी, संतोष माळी, केतन पाडोसा तसेच ग्रामस्थ संतोष जनाटे, किशन भुयाल, सुरेश डगला, सुधाकर गायकवाड, दामोदर फासट, मदन भोईर यांनी सवाल केला की, १२४ लोकांची उपस्थिती आहे आणि तुम्ही ग्रामसभा तहकूब कशी करतात? हजेरी बुकात ७१ जणांच्या स्वाक्षर्‍या झाल्या आहेत व स्वाक्षर्‍या न झालेले ५३ जण सभागृहात आहेत. त्यांच्या सह्या घ्या व सभा सुरू करा परंतु सत्ताधार्‍यांनी तसे करण्यास नकार दिला. वेळ संपून गेली आहे आता ग्रामसभा होऊ शकत नाही असे बोलून सरपंच निघून गेल्या. त्यामुळे येथील ग्रामस्थ नाराज झाले असून निवडणुकीनंतरही पहिले पाढे ५५ असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. (वार्ताहर) श्रद्धांजली व राष्ट्रगीतालाही बगल
गांधी जयंतीनिमित्त ग्रामसभा घेणे गरजचे असून कोरम पूर्ण न झाल्याने ग्रामसभा घेऊ शकत नाही पंरतु तहकूब केल्यानंतर उरीतील शहिदांना o्रद्धांजली न वहाता राष्ट्रगीतही झाले नाही त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायती विरोधात संताप व्रूक्त केला. ग्रामसेवक काय म्हणतात..
ग्रामसेवक शिंदे म्हणाले की, १ ते १.३0 पर्यंत लोकांची वाट बघितली फक्त ७१ लोक आले होते. म्हणून ग्रामसभा तहकूब केली. जास्त वेळ वाट बघू शकत नाही असा कायदा आहे. असेही ते म्हणाले.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home