Wednesday, October 5, 2016

वज्रेश्‍वरीचे मूळ रूप गुंजकाटीची भागीरथी माता

वज्रेश्‍वरीचे मूळ रूप गुंजकाटीची भागीरथी माता

वज्रेश्‍वरीचे मूळ रूप गुंजकाटीची भागीरथी माता
ऐतिहासिक देवस्थान : जिल्हा विभाजनामुळे होते आहे घोर उपेक्षा, तिर्थस्थानाचा दर्जा मिळणे आवश्यक

वसंत भोईर ■ वाडा

या तालुक्यातील गुंजकाटी येथे पांडवकालीन अतिप्राचीन भागिरथी मातेचे मंदिर आहे. निसर्गरम्य, डोंगराळ स्थळी वसलेले हे मंदिर सध्या दुर्लक्षित आहे. त्याला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळणे गरजेचे आहे.
तालुक्यातील गुंजकाटी येथील मंदाकिनी पर्वतावर भगवान परशुराम व त्यांची माता भागिरथी आजही तपश्‍चर्या करीत आहे, अशी भाविकांची समजूत आहे. पांडव अज्ञातवासात असतांना ते येथे आले होते. त्यांनी देवतांसाठी मंदिर उभे करावे, या हेतूने मंदिर बांधावयास घेतले. परंतु मंदिर पूर्ण होण्याआधीच कोंबडा आरवल्याने त्यांनी हे कार्य थांबविले. अपूर्ण मंदिराचे अवशेष आजही गुंजकाटी येथे आढळतात. त्याचप्रमाणे येथे शिवमंदिराचे अवशेष देवतांच्या पाळणाघराचे अवशेष आहेत. मंदिर पूर्ण न झाल्याने तेथील देवता आश्रमासाठी भागिरथी येथील काट्यांच्या डोंगरात बसून काटी या गावी गेली. महालक्ष्मी ही महालक्ष्मी (मुंबई) येथे गेली तर कालिका, रेणुका व वज्रेश्‍वरी या तानसानदी जवळील वज्रेश्‍वरी येथे गेल्या. तेथे चिमाजी आप्पा यांनी वसई किल्ला सर केल्या नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. या दोन्ही ठिकाणी दरवर्षी मोठय़ा यात्रा भरतात. या सर्वांमध्ये परशुराम लहान असल्याने ते मंदाकिनी पर्वतावर तपश्‍चर्या करीत आहेत. अशी आख्यायिका आहे. काटी येथे भागिरथी मातेच्या मंदिराजवळ पाण्याचे कुंड असून त्याला तटासारख्या भिंती आहेत. येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते एकाच दगडाचे बनवले असून त्याला आकार सुबक आहे. त्याला तीन प्रवेशद्वारे आहेत. गाभारा वेगळा असून मुख्य प्रवेशद्वार सुंदर कोरीवकामाने मढवले आहे. मंदिराच्या मागील भागी वाघाची गुहा आहे. निसर्गरम्य पण दुर्लक्षित
हे मंदिर निसर्गरम्य डोंगरात आहे. ही वास्तू सध्या वज्रेश्‍वरी येथील योगिनी देवी ट्रस्टच्या ताब्यात असून ट्रस्टकडून कुठल्याही प्रकारची देखभाल होत नाही. ठाणे जिल्हा परिषदेकडून हे स्थळ पर्यटनस्थळ घोषित होणार होते. पालघर जिल्हय़ाची निर्मिती झाल्याने सर्व कागदावरच राहिले. पुन्हा त्याची घोषणा करून देवस्थानाच्या विकासाला चालना द्यावी अशी मागणी मोहन पवार यांनी केली आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home