Friday, October 28, 2016

पालघर वार्तापत्र २८ ऑक्टोबर

पालघर वार्तापत्र २८ ऑक्टोबरकोस्टल रोड थेट विरारपर्यंत?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
नरिमन पॉईंट ते कांदिवलीपर्यंत कोस्टल रोडचा थेट विरारपर्यंत विस्तार करण्याची सूचना मएमआरडीएच्या नियोजन विभागाने मुंबई महापालिकेला केली आहे. मिरा-भाईंदरला जोडणाऱ्या वसई खाडी पुलापर्यंत हा रोड नेता येऊ शकतो, त्यानंतर अर्थातच विरारला जोड मिळू कते, असा हा प्रस्ताव आहे. विरार आणि अलिबागमधील उत्तर-दक्षिण भाग जोडण्याच्या दृष्टीने कोस्टल रोडचा विस्तार उपयुक्त ठरेल, असा या प्रस्तावामागचा उद्देश आहे. सध्या नरिमन पॉईंट पासून ते कांदिवलीपर्यंतच कोस्टल रोडचा आराखडा तयार करण्यात आला आहे. एमएमआरडीएची सूचना मुंबई महापालिकेने मान्य केल्यास कांदिवली ते वसई असा आराखडा तयार करावा लागेल.

=============================================

वसईतील उड्डाणपुलाला तडे
वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या जुन्या उड्डाणपुलाच्या खांबांना तडे गेल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत माणिकपूर पोलिसांनी पाहणी केली आहे. त्वरित या पुलाची पाहणी करून दुरुस्ती करावी, अशा सूचना पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम खाते, रेल्वे तसेच महापालिकेला केल्या आहेत. रेल्वेने मात्र पूल सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा रेल्वेवरील पूल १९७६मध्ये बांधण्यात आला होता. हा पूल जुना झाल्याने नवीन पूल तयार करण्यात आला होता. एमएमआरडीएने नुकताच या ठिकाणी नवीन पूल बांधून वाहतुकीसाठी खुला केला आहे. मात्र जुन्या पुलावरून अद्याप वाहतूक सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून माणिकपूर पोलिसांकडे काही वाहनचालकांनी पुलाच्या खांबांना तडे गेल्याचे सांगितले होते. त्यानंतर माणिकपूर पोलिसांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तेव्हा खांबांना तडे गेल्याचे दिसून आले. ही धोक्याची घंटा असल्याचे पोलिसांनी सांगितले. आम्ही त्वरित सार्वजनिक बांधकाम खाते तसेच महापालिका आयुक्तांना लेखी पत्र देऊन आवश्यक ती उपाययोजना करावी, असे लेखी पत्र दिल्याचे माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले.

वैतरणा पुलाचे बांधकाम परीक्षण नाही
विरारजवळ वैतरणा खाडीवरील पश्चिम रेल्वेचा ब्रिटिशकालीन वैतरणा पूल आहे. या पुलाचे बांधकाम परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) कधी झाले याची माहिती रेल्वेकडे उपलब्ध नाही. हा पूल ब्रिटिशकालीन असून  शंभरहून अधिक वर्षे जुना आहे. गुजरात तसेच उत्तरेकडील राज्यांना जोडणारा हा महत्त्वाचा
आणि एकमेव रेल्वे पूल आहे. सर्व मेल आणि एक्स्प्रेस गाडय़ा या पुलावरून जात असतात. वैतरणा पुलाच्या खालून मोठय़ा प्रमाणावर बेकायदा रेतीउपसा होत असतो, या रेतीउपशामुळे पुलाला धोका असल्याचे खुद्द रेल्वेने म्हटले आहे. गेल्या काही वर्षांपासून रेल्वे त्यासाठी पाठपुरावा करत आहे. त्यात खारेवारे, पाणी यामुळे पूल कमकुवत झाला होता. त्यासाठी पुलाचे बांधकाम परीक्षण करणे आवश्यक होते.
वाहतुकीसाठी पूल बंद करण्याची मागणी
जुन्या उड्डाणपुलावरून एकमार्ग वाहतूक आजही सुरू आहे. दररोज हजारो वाहने जात असतात. यापुर्वीच हा जुना पूल कमकुवत झाल्याने नव्या पुलाची निर्मिती करण्यात आली होती. जुना पूल वापरासाठी कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. खांबांना जे तडे गेलेले आहेत, ते प्लास्टरचे आहेत. खांबांचा मूळ गाभा सुरक्षित आहे. पुलाचे आम्ही वार्षिक सर्वेक्षण करत असतो आणि त्याची वेळोवेळी डागडुजी करत असतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पूल जुना असला तरी भक्कम आणि व्यवस्थित आहे.
एस. मीना, पूल विभागाचे अभियंता, रेल्वे
=============================================

पालघरमधील गोदामात स्फोटकांचा साठा जप्त
- हितेन नाईक/आरिफ पटेल, पालघर
मुंबई - अहमदाबाद महामार्गालगत सातिवली गावाजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका पडक्या इमारतीत स्फोटकांचा मोठ्या प्रमाणात साठा दडवून ठेवल्याची माहिती कळताच मुंबईतील काळाचौकी येथील दहशतवादविरोधी पथकाने छापा घालून डिटोनेटर, जिलेटीनच्या कांड्या अशी १४ ते १५ किलो वजनाची स्फोटके हस्तगत केली. या साठ्यामुळे येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी दहशतवादी पथकाने ताब्यात घेतलेल्या एका आरोपीने पालघर जिल्ह्यातील महामार्गालगतच्या सातिवली गावाच्या हद्दीत निर्मनुष्य ठिकाणी या गोदामात स्फोटके दडवून ठेवल्याची माहिती दिली होती. त्याआधारे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी ७ वाजता या पडक्या इमारतीच्या परिसरात पोहोचले. त्यावेळी लहान लहान पाकिटांमध्ये ही स्फोटके खड्डे खणून दडविल्याचे आढळले. मात्र याबाबत कोणतीही अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. दहशतवादी पथकाचे मुंबई युनिटचे उपायुक्त धनंजय कुलकर्णी, अधिक्षिका शारदा राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी अशोक होनमाने आदींसह सुमारे १०० अधिकारी, कर्मचारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत या ठिकाणी शोध घेत होते.

बेकायदेशीर गोदामे धोकादायक
आजवर अनेक स्फोटकांचा यशस्वी शोध घेणाऱ्या पोलिसांच्या श्वानपथकातील लकी आणि मोती या श्वानांनी हा साठा शोधला. नवनिर्मित पालघर जिल्ह्यात प्रथमच बेवारस स्फोटके सापडल्याने हा जिल्हा दहशतवाद्यांच्या कारवाईचे लक्ष्य करण्याचा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गालगत आदिवासी तसेच खाजगी जमिनींवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गोदामे उभारण्यात आली असून त्यातून अनेक प्रकारची बेकायदेशीर कृत्ये केली जात आहेत. त्यामुळे घातपाती कारवायांसाठी अशा गोदामांचा वापर केला जात असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

सहा महिन्यांपासून साठा दडविला
मनोर पोलीस ठाण्याच्या वरई चौकीपासून सातिवलीमधील हे गोदाम अवघ्या ६०० फुटांवर असून त्या चौकीवर २४ तास पहारा असतानाही ही स्फोटके उतरवण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा साठा दडविल्याचे समजते. त्यामुळे महामार्गालगतच्या पडक्या इमारती, अनधिकृत ढाबे, गोदामे यामुळे देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गोदामात मागील अनेक महिन्यांपासून काही जणांचे वास्तव्य असल्याचे घटनास्थळावरील दगडाच्या चुली, ब्लँकेट्स, जुने कपडे यावरून स्पष्ट होते.

=============================================

मुंबईबाहेरील गर्दीचा रेल्वेवर ताण
मुंबईतील उपनगरीय प्रवाशांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढ झाली असून, यापैकी सर्वाधिक गर्दी मुंबई महापालिकेच्या हद्दीपलीकडील स्थानकांमध्ये होत असल्याचे समोर आले आहे. पश्चिम रेल्वेवर नालासोपारा, विरार, वसई, भाईंदर या स्थानकांबरोबरच मध्य रेल्वेवरही बदलापूर, दिवा आणि टिटवाळा या स्थानकांतील प्रवाशांची गर्दी वाढली आहे. विशेष म्हणजे वसई प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या क्षेत्रात येणाऱ्या परिसरात गेल्या चार वर्षांत वाहन नोंदणीत ५२१ टक्क्यांची महाप्रचंड वाढ झाल्याचेही स्पष्ट होत आहे. या भागांमध्ये होणाऱ्या नवनवीन गृहसंकुलांमुळे ही संख्या वाढत असल्याचे आढळत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये घरांच्या किमती मुंबईतील गगनचुंबी इमारतींप्रमाणेच गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आपल्या स्वप्नाच्या कक्षा रुंदावून मुंबईबाहेरील घरांकडे आपला मोर्चा वळवावा लागत आहे. याचे प्रतिबिंब उपनगरीय लोकलच्या प्रवासी संख्येवरही पडत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पश्चिम रेल्वेच्या प्रवासी संख्येत ०.६७ टक्के आणि मध्य रेल्वेच्या प्रवासीसंख्येत दोन टक्के एवढी वाढ झाली आहे. या दोन्ही मार्गावरील प्रवासी संख्या अनुक्रमे ३८ आणि ४३ लाख एवढी प्रचंड असल्याने ही अल्प वाटणारी टक्केवारीही जास्त असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. मुंबईत मोठमोठय़ा गृहसंकुलांसाठी मोकळ्या जागा मिळणे अशक्य आहे, तसेच मुंबईत जागांच्या किमतीही प्रचंड आहेत. त्यामुळे गृहनिर्माण क्षेत्रातील बडे विकासकही आता वसई-विरार किंवा ठाणे जिल्ह्य़ातील काही महत्त्वाच्या ठिकाणी आपले प्रकल्प राबवत आहेत. येथे ग्राहकांनाही कमी किमतीत जास्त सोयीसुविधा प्राप्त होत असल्याने ग्राहकांचा कलही या जागांसाठी वाढला आहे. या भागांमध्ये सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या खूप जास्त आहे, असे जिओप्रिन्युअर ग्रुपचे संचालक अवि शहा यांनी सांगितले.

मुंबईतील जागांचे भाव, येथील व्यवसायांचे विकेंद्रीकरण वसई-विरार, पनवेल-कर्जत, बदलापूर, टिटवाळा आदी भागांमध्ये वाढलेल्या गृहसंकुल वसाहती यांमुळे यापुढे रेल्वेच्या प्रवाशांची संख्या या भागात वाढणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील विविध कंपन्या, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी-सीप्झ आदी भागांमध्ये दक्षिण मुंबईतील उद्योग आणि नोकरीच्या संधी एकवटू लागल्या आहेत. त्यामुळे वांद्रे, दादर या स्थानकांपर्यंतच्या प्रवाशांची संख्या भविष्यात जास्त असेल. त्या दृष्टीने आमचे नियोजन सुरू आहे.
मुकुल जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (पश्चिम रेल्वे, मुंबई)

वाहन नोंदणीतही प्रचंड वाढ
* रेल्वेच्या प्रवाशांची संख्या या भागात वाढत असताना वाहन नोंदणीनेही या भागात नवनवीन उच्चांक ओलांडले आहेत.
* २०१३ या वर्षांत वसई आरटीओमध्ये ४३,३१४ वाहनांची नोंद झाली होती. २०१६ मध्ये हीच संख्या २,६३,१५० एवढय़ावर पोहोचली. ही वाढ तब्बल ५२१ टक्के एवढी प्रचंड आहे.

=============================================

पालघर जि.प.चा सावळा गोंधळ :  नर्सरी शिक्षक ४ महिने पगाराविना! , दिवाळी होणार कशी?

विक्रमगड : ठाणे जिल्हा परिषद असतांना २०१०-११ या शैक्षणिक वर्षात प्रायोगिक तत्वावर सुरु केलेल्या नर्सरी, ज्युनिअर केजीच्या शिक्षकांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. गेल्या तीन ते चार वर्षापासून हे वर्ग सुरळीत सुरू होते. परंतु गेल्या वर्षापासून पालघर जिल्हा परिषदेच्या बजेट मध्ये तरतूद नसल्याने त्यांची स्थिती डगमळली होती. मागील वर्षी शाळा सुरू होणार की नाही? अशा संभ्रमावस्थेत विद्यार्थी होते. या शैक्षणिक वर्षातही अजूनपर्यंत शिक्षकांना ४ महिन्यांपासून पगार नाहीत तसेच या नर्सरी वर्गांना मंजूरी नाही. एकीकडे इंग्रजी शिक्षणाची ओढ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना लागावा. यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मंजूरी दिली. परंतु जिल्हयाची निर्मिती नंतर या इंग्रजी शाळांना घरघर लागली आहे पालघर जिल्हयात ग्रामीण भागात या शाळा सुरू आहेत परंतु त्यांना मंजूरी के व्हा मिळणार? व या मानधन तत्वावर काम करणार्‍या शिक्षकांना कधी पगार मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर) याबाबत तालुका शिक्षणाधिकारी भगवान मोकाशी यांना विचारले असता अजून मंजूरी मिळाली नसल्याने या शिक्षकांचा पगार नाही परंतु आम्ही सर्व कागदपत्रे वरीष्ठ पातळीवर पाठविली आहेत ही मंजूरी जिल्हा नियोजनमध्ये मान्यता मिळत त्यामुळे उशीर होतो, असे सांगितले. परंतु शिक्षण खात्याचे हे धोरण कधी बदलणार व या शिक्षकाना व विद्यार्थ्यांना न्या मिळणार कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

=============================================

विरारला मच्छीमार-प्रशासन संघर्ष
वसई : विरार शहरातील आठवडा बाजार पुन्हा सुरु करण्यावरून मच्छिमार स्वराज्य समिती आणि पालिका प्रशासनामध्ये संघर्ष सुरु झाला आहे. प्रशासनाने प्रारंभी सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर घुमजाव केल्याने समितीने आठवडा बाजारासाठी आंदोलन छेडणचा निर्णय घेतला आहे. पालिका मुख्यालया शेजारी असलेल्या मैदानात ब्रिटीश काळापासून आठवडा बाजार भरत होता. याठिकाणी स्थानिकांसह जिल्ह्यातील पालघर, डहाण, जव्हार, मोखाडा याठिकाणाहून भूमीपूत्र भाजीपाला, सुकी मासळी, शेतमाल विकावयास येत असत. पण, काही वर्षांपूर्वी पालिकेने आठवडा बाजार बंद केला. त्यानंतर आता मैदानात वाहनांची पार्किंग आणि परिवहनचा बस स्टँड केला आहे. हा आठवडा बाजार पुन्हा सुरु व्हावा, यासाठी समितीचे अध्यक्ष राजू तांडेल यांनी विक्रेत्या महिलांसह पुढाकार घेतला आहे. त्यासाठी तांडेल यांनी आयुक्त सतीश लोखंडे आणि महापौर प्रवीणा ठाकूर यांची भेट घेतली होती. पहिल्या भेटीत आठवडा बाजार पुन्हा सुरु करण्यासाठी लोखंडे आणि ठाकूर यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, आता बाजाराला विरोध केला असल्याची माहिती तांडेल यांनी दिली. मैदानाचा उपोग ठोक्यावर चालणाऱ्या परिवहन सेवेला होतो. त्यातून पालिकेला उत्पन्नही मिळत नाही अथवा स्थानिकांना रोजगारही मिळत नाही. तसेच याठिकाणी पार्किंगने जागा व्यापली आहे. तर बाजाराला विरोध करण्यासाठी प्रशासनाने आता बुलडोझर, अवजड मशिनरी, जेसीबी, मोठी वाहने उभी केली आहेत. मात्र, हा विरोध डावलून आठवडा बाजार सुुरु करणारच. त्यासाठी उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा तांडेल यांनी दिला आहे. त्यामुळे आता मच्छिमार विरुद्ध प्रशासन असा नवा वाद चिघळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

=============================================

अवैध रेतीसाठय़ांवर उसगावला कारवाई

वसई/पारोळ : पारोळ तलाठी कार्यालयाच्या हद्दीतील उसगाव या रेती बंदरात तलाठी सुधाकर जाधव, शिरसाडचे तलाठी शैलेंद्र तिडके, पेल्हार तलाठी शरद पाटील व खानिवडे तलाठी किरण कदम या महसूल कर्मच्यार्‍यांनी मांडवी पोलीस दूरक्षेत्नाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ढोणे व स्टाफ यांच्यासह २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.१५ च्या सुमारास उसगाव रेती बंदरात धाड टाकली. यावेळी अवैधरित्या साठा केलेली १७४ ब्रास रेती व ती उत्खनन करण्यासाठी वापरण्यात येणारे १२ सक्शन पंप, रेती किनार्‍यावर आणण्यासाठी वापरात येणार्‍या १२ बोटी, १ जेसीबी मशीन, ५ ट्रक असा १,६५,०७,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून जमीन महसूल १९६६ चे कलम ४८ (७),(८) अन्वये व पर्यावरणाचा र्‍हास होणार्‍या कलमाप्रमाणे विरार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास करीत आहेत . (वार्ताहर)

=============================================

चौकी बंद,लैला-मजनू सैराट
निर्मळ-कळंब रस्त्यावर सुळेश्‍वर पाड्यालगत कित्येक वर्षांपासून ही चौकी कार्यरत होती.  वसई पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणारी ही चौकी आता अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. कळंब समुद्र किनारी मौजमजा करणसाठी जाणार्‍या टारगट टोळ्यांना आणि प्रेमी युगलांना या चौकीतील पोलीस लगाम लावत होते. बेफाम धावणार्‍या गाड्यांचीही चौकशी हे पोलीस करित होते. तसेच निर्मळ नाक्यावर होणार्‍या भानगडीही सोडवण्यात या चौकीचा फायदा होत असे. अशी ही पोलीस चौकी गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. वसई: समुद्र किनार्‍याच्या रिसॉर्टमध्ये मौजमजा करण्यासाठी जाणार्‍या लैला-मजनूंना लगाम घालणारी व अवैध लॉजेसमधील जोडप्यांच्या वावराला चाप लावणारी निर्मळ पोलीसचौकी गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद असून ती लवकरात लवकर सुरु करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने पोलीस उपअधीक्षकांकडे केली आहे. त्यामुळे अल्पवयीन जोडप्यांसह मद्यपी चालकांनी निर्मळ-कळंब रस्त्यावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ड्रंक अँन्ड ड्राईव्ह करणार्‍या दुचाकी स्वारांनी मर्देस-वाघोली-निर्मळ रस्त्यावरील अनेक पादचार्‍यांना धडका दिल्या आहेत. अनेकांना तर अशा अपघाताने अपंगत्व आले आहे. तसेच चेन स्नॅचिंगच्या घटनेतही वाढ झाली आहे. त्यामुळे ही पोलीस चौकी पुन्हा सुरु करून बेताल पर्यटकांना लगाम लावण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख हरिश्‍चंद्र पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांकडे केली आहे.

=============================================

 बीएसएनएलला वसईचे ग्राहक वैतागले
वसई : वसई स्टेशन पश्‍चिम परिसरात भारत संचार निगम (बीएसएनएल ) नेटवर्कच्या एरव्ही बहुतांशी दररोज कुरबुरी सुरु असतातच, पण आता ऐन दिवाळीत दीर्घ काळपर्यंत नेटवर्क कनेक्टिव्हीटी गायब होत असल्याने येथील रहिवासी, ग्राहक, आस्थापना, बँका, दुकानदार हैराण झाले आहेत. यामागे दिवाळीचे अर्थकारण दडले असल्याची तक्रार उघडपणे व्यक्त केली जात आहे. बीएसएनएलच्या केंद्रीय प्रशासन आपल्या ग्राहकांची गळती रोखली जावी म्हणून दररोज रात्नी ९ ते सकाळी ७ आणि आता दर रविवारी मोफत कॉलसेवेचे गाजर दाखवून इंटरनेटचे ग्राहकही बांधू पाहत आहे. पण वसईतील निकृष्ट सेवेमुळे बीएसएनएलच्या या योजनांवर पाणी फेरले जात आहे. रहिवासी, ग्राहक इतर खाजगी इंटरनेट सेवांकडे वळत आहेत तर आस्थापना-बँका-दुकानदार ग्राहकांच्या असंतोषाला तोंड द्यावे लागू नये म्हणून बीएसएनएलला दुय्यम स्थानी ठेवत इतर खाजगी इंटरनेट सेवांचा अधिकाधिक लाभ घेत आहेत. तर हल्ली ग्राहक दुकानांत खरेदी करताना डेबिट / क्रेडिट कार्डांचाच बहुतांशी वापर करत असल्याने ग्राहकांच्या रोषाला बळी पडू नये व हातचे ग्राहक जाऊ नये म्हणून दुकानदार, व्यापारी दोनदोन ई डी सी स्वाईप मशिन्स ठेऊन इतर खाजगी इंटरनेटचा लाभ घेतात (प्रतिनिधी) या दु:स्थितीची विभागीय व केंद्रीय प्रशासनाने वेळीच गंभीर दाखल घेतली नाही तर उरल्यासुरल्या ग्राहकांचीही गळती रोखणे जड जाईल.


=============================================
(वृत्त संकलन : दैनिक लोकसत्ता , दैनिक लोकमत , दैनिक महाराष्ट्रटाईम्स)

सविस्तर वृत्त http://www.palgharlive.com/2016/10/blog-post_28.html

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home