Wednesday, October 26, 2016

पालघर न्यूज २६ ऑक्टोबर

वसई किल्ल्याला मद्यपींचा वेढा

बेभान झालेले मद्यपी, चित्रविचित्र कपडय़ांत फिरणारे प्रेमीयुगुल, शॉर्टफिल्मच्या निमित्ताने अश्लील नृत्य, गर्द झाडीत लपलेले गर्दुल्ले.. हे भीषण चित्र आहे वसईच्या किल्ल्याच्या. ज्या किल्ल्याला मराठय़ांच्या इतिहासात मानाचे स्थान आहे, तोच किल्ला आता मद्यपी आणि प्रेमीयुगुलांचा अड्डा बनला आहे. त्यामुळे या किल्ल्याच्या गौरवशाली इतिहासाचा अवमान होत आहेच, त्याशिवाय अभ्यास व संशोधनासाठी येणाऱ्या गिरिप्रेमी व दुर्गमित्रांची संख्याही मोठय़ा प्रमाणावर कमी होत आहे. वसईच्या किल्ल्यात दर रविवारी आणि सुटीच्या दिवशी मद्यपींचा धिंगाणा असतो. भरदुपारी आणि संध्याकाळी येथे मद्याच्या पाटर्य़ा होतात आणि पार्टीनंतर मद्यपींकडून अन्य पर्यटकांना त्रास देणे सुरू होते. मद्याच्या बाटल्या आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या यांचा तर खच पडतो. त्यामुळे सुटीच्या दिवशी तर प्रचंड कचरा किल्ल्यावर होतो आणि त्यामुळे किल्ल्याची शान कमी होत आहे. प्रेमीयुगुलांचे तर बिनधास्तपणे अश्लील चाळे करताना येथे आढळतात आणि त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. किल्ल्यावरील झाडाझुडपांमध्ये गर्दुल्ले बिनधास्तपणे अमली पदार्थाचे सेवन करीत असतात. या गर्दुल्ल्यांकडून झाडाझुडपांना आगी लावण्याच्या घटनाही घडल्या आहेत. किल्ल्यातील ताडीमाडी उद्योगाचा विकास व मद्यपींची सोय अशा भयानक वास्तव्यात किल्ला सापडलेला असून ज्या स्वराज्याच्या रक्षणासाठी व गडकोटांच्या स्वातंत्र्यासाठी नरवीरांनी सर्वस्वाचे बलिदान दिले, त्या गडकोटांवर मद्यपी व प्रेमीयुगुले यांचा नंगानाच सुरू आहे आणि याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप दुर्गप्रेमींनी केला आहे.

कारवाईची मागणी
किल्ल्यातील पोर्तुगीजकालीन कोर्ट, पोर्तुगीजकालीन नगरपालिका, चक्री जिना परिसर, सेंट गोन्सालो गार्सिया चर्च, मुख्य ध्वजस्तंभ या वास्तूंवर असणारा दारूबाजांचा धिंगाणा आणि प्रेमीयुगुलांचे चाळे यावर योग्य वेळी योग्य पावले न उचलल्यास किल्ला केवळ अनैतिक कामासाठीच प्रसिद्ध पावेल, असेही राऊत म्हणाले. किल्ल्यातील छायाचित्रणावर पुरातत्त्व विभागाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून याबाबत पुरातत्त्व विभागाने जागोजागी माहितीफलक लावण्याची मागणी तसेच किल्ल्यातील सर्वच सुरक्षारक्षकांना योग्य ते ओळखपत्र देऊन किल्ल्यातील गैरप्रकारांवर आळा घालावा आणि स्थानिक पोलिसांनी किल्ल्यातील या मनमानीवर व स्वैराचारावर कठोर उपाययोजना करून किल्ल्याचे पावित्र्य राखण्यास मदत करावी, अशी मागणी ‘किल्ले वसई मोहीम’ने केली आहे.

सध्या काही महिन्यांपासून किल्ल्यातील वास्तूंच्या संरक्षणासाठी काही रक्षक तैनात करण्यात आलेले आहे. पण ते पूर्णत: हतबल व असहाय असल्याचे दिसत आहे. किल्ल्यातील गोन्सालो गार्सिया ख्रिस्त मंदिराचे आवार आणि मैदान मद्यपींच्या बैठकींनी बंदिस्त झालेले आहे. या उपाययोजना करण्याचे शासकीय व स्थानिक प्रयत्नही पूर्णत: शून्य स्वरूपाचे दिसत आहे.
– डॉ. श्रीदत्त राऊत, किल्ले वसई मोहीम

=========================================================

कंत्राटी कामगारांची दिवाळी अंधारात?

 महापालिकेकडून बिले वेळेवर निघत नसल्याचे कारण पुढे करीत गेल्या सहा-सात महिन्यांपासून वसई विरार पालिकेतील कंत्राटी कामगारांचे पगार उशिराने होऊ लागले आहेत. आता दिवाळी तोंडावर असताना गेल्या महिन्याचा पगार अद्याप न मिळाल्याने कंत्राटी कामगारांची दिवाळी अंधारात जाण्याची चिन्हे आहेत. तर बोनसबद्दल नेहमीप्रमाणे ठेकेदार काही बोलायलाच तयार नसल्याने जे हातात पडेल ते घेण्याची कामगारांची तयारी आहे.वसई-विरार महापालिकेने पाणीपुरवठा, उद्याने, बांधकाम, दिवाबत्ती, आरोग्य, साफसफाई, आस्थापना अशा विविध विभागांतील कामे कंत्राटी पद्धतीने दिली आहेत. यासाठी महापालिकेकडून अनेक कंत्राटदार नियुक्त करण्यात आलेले आहेत. या कामांसाठी कंत्राटदारांनी कर्मचारी व कामगार नियुक्त केलेले असून त्याची संख्या चारशेच्या घरात आहे. मात्र या कर्मचारी व कामगारांचे मागील सहा-सात महिन्यांपासून पगार अनियमितपणे होत आहेत. काही विभागातील कर्मचाऱ्यांना तर गेल्या दोन महिन्यांपासून पगार दिले गेलेले नाहीत. आता ऐन दिवाळीच्या तोंडावरही कंत्राटदारांनी कर्मचारी-कामगारांना पगार देण्यास नाखुशी दर्शवून वेठीस धरल्याने या कर्मचारी-कामगारांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. महापालिकेने आमची बिले थकवल्याचा दावा कंत्राटदारांनी केला आहे. तर महापालिकेने कर्मचारी-कामगारांचे पगार काढणे कंत्राटदारांचे काम आहे, असे सांगून पलटवार केला आहे. पालिकेकडून बिले वेळेत निघाली नाही तरी ठेकेदारांनीच वेळेत पगार दिले पाहिजेत असे बंधन पालिकेने घातले आहे. मात्र, ठेकेदार बिले निघत नसल्याचे कारण पुढे करीत कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देत नसल्याच्या तक्रारी आहेत. दिवाळी तोंडावर आली असताना ठेकेदारांनी २५ आॅक्टोबर उलटून गेल्यानंतरही पगार दिलेले नसल्याने कर्मचारी नाराज झाले आहेत. मध्यंतरी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे कारण सांगून आयुक्तांनी कंत्राटी कामगारांची संख्या कमी केली होती. त्यावेळी ठेकेदार प्रचंड घोटाळे करीत असल्याचे उजेडात आले होते. पण, धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठेकेदारांकडे संशयाने पाहिले जात होते, त्याच ठेकेदारांना पुन्हा ठेके दिले गेले आहेत. अनेक ठेक्यांमध्ये सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा थेट संंबंध असल्याचेही उजेडात आले आहे. मात्र, त्यांच्याकडूनच कामगारांची पिळवणूक होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, वर्षभर पिळवणूक करणारे ठेकेदार दिवाळीत बोनसच्या नावाखाली दोन-तीन हजार रुपये देऊन कर्मचाऱ्यांना वाटाण्याचा अक्षता लावतात. आता तर या महिन्यांचा पगार न देणाऱ्या ठेकेदारांकडून दिवाळी बोनसची

अपेक्षा का धराची? असा सवाल कर्मचारी उपस्थित करु लागले आहेत.
महापालिकेकडून सर्व कंत्राटदारांची बिले मंजूर करण्यात आलेली आहेत. ही बिले काढण्यासाठी महापालिकेच्या मुख्य व लेखा विभागाकडे पाठवण्यात आलेली आहेत. त्यामुळे पुढील कार्यवाही तो विभाग करीत आहे. बिले वेळेवर मिळाली नाही तरी कामगारांचे पगार नियमितपणे करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असते.
- सदानंद सुर्वे, सहाय्यक आयुक्त, आस्थापना विभाग

काही तांत्रिक कारणांमुळे बिले रखडली होती. दोन-तीन दिवसात ही बिले काढली जातील. केवळ तीन-चार कंत्राटदारांची बिले काढणे बाकी आहेत. मात्र कंत्राटदारांनी कर्मचारी-कामगारांचे पगार थकवणे चुकीचे आहे. कर्मचारी-कामगारांना पगार देता येतील इतक्या आवश्यकतेची बिले काढलेली आहेत.
- प्रवीण वडगाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी

आरोग्य विाागात ही समस्या नाही. आम्ही आमच्या कर्मचारी-कामगारांचे पगार महिन्याच्या ७ ते १० तारखेपर्यंत देतो.
- रविंद्र चव्हाण, ठेकेदार

आम्ही आमच्या कर्मचारी-कामगारांचे पगार बुधवार-गुरुवारपर्यंत देणार आहोत. महापालिकेने आमची जानेवारीपर्यंतची बिले थकवल्याने आम्हाला कर्मचाऱ्यांचे पगार देता आलेले नाहीत.
- अमित पाटील, ठेकेदार

=========================================================

भाडय़ाच्या वाहनांसाठी कोटय़वधींचा चुराडा
वसई-विरार महापालिका अधिकाऱ्यांच्या वाहन भत्त्यावर कोटय़वधी रुपये खर्च करत असताना भाडय़ाने घेतलेल्या ११९ वाहनांवरही कोटय़वधी रुपये खर्च करत असल्याची बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे पालिकेकडे स्वत:च्या मालकीची वाहने नसतानाही त्यांनी पोलिसांना वाहने भेट देण्याचा सपाटा लावलेला आहे. वसई-विरार महापालिकेचे आयुक्त, महापौर, अधिकारी तसेच विभागप्रमुख वाहने वापरत होती. त्यांच्या वाहनांवर खर्च होतो म्हणून पालिकेने ती वाहने बंद करून वाहन प्रतिपूर्ती भत्ता देण्यास सुरुवात केली. आमच्याकडे वाहने नसल्याने आम्ही वाहन भत्ता वाढविला, असा दावा पालिकेने केला होता. मात्र अद्याप पालिकेकडे ११९ भाडय़ाची वाहने असून त्यासाठी वर्षांला कोटय़वधी रुपये ठेकेदारांना द्यावे लागत आहेत. वसई-विरार महापालिकेच्या ९ प्रभाग समित्या आहेत. या सर्व प्रभागांमध्ये विविध विभागांना लागणाऱ्या दैनंदिन कामाकरिता तीनचाकी व चारचाकी मिळून अशी ११९ वाहने भाडेतत्त्वावर आहेत. भाडेतत्त्वावर वापरण्यात येणाऱ्या या वाहनांचा मासिक खर्च हा ४७ लाख ४५ हजार रुपये येतो. म्हणजे वर्षांला ५ कोटी ४२ लाख ४२ हजार रुपये एवढी रक्कम पालिकेच्या तिजोरीतून जात असते. पालिकेने १ वर्षांसाठी हा करार केलेला आहे. पण दरवर्षी त्याला मुदतवाढ दिली जात असते. जुलैच्या महासभेत वाहन प्रतिपूर्ती भत्ता अनुज्ञेय झाल्यानंतर अधिकारी स्वत:चे वाहन वापरू लागले आहेत. परंतु अद्याप आयुक्त आणि उपायुक्त भाडय़ाचे वाहन वापरत आहेत. त्यांचा वाहनचालक, इंधनाचा व दुरुस्तीचा खर्च हा मेसर्स एस. आर. असोसिएट्स या ठेकेदारामार्फत केला जातो. उपायुक्त-२ हेदेखील महापालिकेचे वाहन वापरतात. त्यांच्या चालक, वाहनासाठी लागणारे इंधन तसेच वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च हा महापालिकेतर्फे केला जातो. जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते प्राध्यापक विन्सेट परेरा यांनी माहिती अधिकारातून ही बाब उघडकीस आणली आहे.

५९ लाख ५० हजाराचा बोजा
वसई-विरार महापालिकेकडे स्वत:च्या मालकीची वाहने नसताना त्यांनी पोलिसांना सात बलेरो गाडय़ा भेट दिल्या आहेत. प्रत्येकी ७ लाख २० हजार रुपयांच्या या सात वाहनासांठी पालिकेला ५९ लाख ५० हजार रुपयांचा आर्थिक बोजा सहन करावा लागला आहे. पालिकेकडे स्वत:च्या मालकीची वाहने नसताना पोलिसांना वाहने देणे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. पालिकेकडे वाहन दुरुस्ती विभाग नाही. त्यासाठी आम्ही तरतूद केल्याचे उपायुक्त डॉ. किशोर गवस यांनी सांगितले. पालिकेने स्वत:च्या वाहन दुरुस्ती विभाग किंवा गॅरेज काढले तर स्थानिकांना रोजगार मिळेल आणि भाडय़ांच्या वाहनावर होणारा कोटय़वधी रुपयांचा खर्च टळेल, असे काँग्रेसचे कॅप्टन नीलेश पेंढारी यांनी म्हटले आहे.

या ठेकेदारांकडून वाहनपुरवठा
मे. वीणा ट्रॅव्हल्स, मे. सद्गुरू ट्रेडिंग कंपनी, मधुरा एण्टरप्रायझेस, श्रीगणेश ट्रेडर्स, मे. एस आर असोसिएटस, मे. ओमकार टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स, मे. आदित्यनाथ टूर्स ट्रॅव्हल्स आणि ट्रान्सपोर्ट

=========================================================

वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीकामाला मुहूर्त मिळेना

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथील जुन्या खाडी पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त अद्याप मिळालेला नाही. पुलाच्या तपासणी अहवालात आणखी दोन चाचण्या करण्याचे सुचविण्यात आले असून या चाचण्या पार पडल्यानंतरच दुरुस्तीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, जुन्या पुलावरून केवळ हलकी वाहनेच सोडण्यात येत असल्याने या मार्गावर वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा दररोज सामना करावा लागत आहे. वाहतूक नियंत्रण करताना वाहतूक पोलिसांची मात्र आता दमछाक होऊ लागली आहे.वसई खाडीवरील वर्सोवा येथील जुन्या खाडी पुलाच्या गर्डरला तडे गेल्याने त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला असून पुलावरून केवळ हलकी वाहनेच सोडण्यात येत आहेत. अवजड वाहने जुन्या पुलाशेजारी असलेल्या नव्या पुलावरून सोडण्यात येत असल्याने या मार्गावर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी विलंब होत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पुलाला झालेल्या नुकसानीची तपासणी करणाऱ्या पथकाने आपला अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुख्यालयात सादर केला आहे. या अहवालात आणखी दोन चाचण्या करण्याची आवश्यकता असल्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती प्रधिकरणाचे व्यवस्थापक दिनेश अगरवाल यांनी दिली. येत्या एक-दोन दिवसांत या चाचण्यादेखील करण्यात येऊन त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुलाच्या दुरुस्तीचा पुढील दिशा नक्की करण्यात येईल, असे अगरवाल यांनी सांगितले.
दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त मिळत नसल्याने वाहनचालक मात्र कमालीचे त्रस्त झाले आहेत, शिवाय वाहतूक नियंत्रित करताना वाहतूक पोलिसांच्या देखील नाकी नऊ येऊ लागले आहेत. आधीच वाहतूक विभागाकडे पुरेसे कर्मचारी नाहीत. अधिकारी व कर्मचारी यांची एकत्रित संख्या केवळ ७७ असून यातील चाळीस पोलीस कर्मचारी व अधिकारी वर्सोवा पुलाच्या बंदोबस्तासाठी दिवसरात्र तैनात करण्यात आले आहेत. याचा थेट परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर झोला आहे. वाहतूक पोलीसच नसल्याने सिग्नल यंत्रणेला न जुमानता वाहनचालक सुसाट वेगाने वाहने हाकताना दिसून येत आहेत. दुसरीकडे पोलिसांनी मध्यंतरी सुरू केलेली हेल्मेट न घालणारे दुचाकीस्वार, मद्याच्या अमलाखाली व सिग्नल तोडून वाहने दामटणाऱ्या वाहनचालकांवरील मोहिमा कर्मचाऱ्यांअभावी पारच बारगळल्या आहेत. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचाही पार बोजवारा उडताना दिसत आहेच शिवाय शासनाच्या महसुलावरही परिणाम झाला आहे.
नव्या पुलाचे काम सुरू करण्याची मागणी
जुन्या खाडी पुलाला ४३ वर्षे होऊन गेली आहेत. दोन वर्षांपूर्वीदेखील पुलाच्या एका गर्डरला तडे गेले होते. त्याच वेळी खाडीवर आणखी एक पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु नव्या पुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. स्थानिक नगरसेविका दक्षता ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. या महामार्गावरील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन नव्या पुलाच्या कामालादेखील लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.

=========================================================

२०० डॉक्टरांची आदिवासींसोबत दिवाळी!

पालघरमधील कुपोषणग्रस्त आदिवासी भागात आरोग्य यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. त्यातच दिवाळीच्या निमित्ताने आदिवासींमध्ये व्यापक जागृती व उपचार करण्यासाठी थेट आदिवासी पाडय़ांवर राहून त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी घेतला असून त्यांच्यासह २०० डॉक्टर आदिवासींसमवेत दिवाळी साजरी करणार आहेत. जव्हार व मोखाडय़ातील सत्तर पाडय़ांमध्ये हे दोनशे डॉक्टर आदिवासींच्या घरी राहून दिवाळी साजरी करणार आहेत. यासाठी डॉक्टर स्वत: फराळाचे सामान घेऊन आदिवासींच्या घरी मुक्काम करणार आहेत. साधारणपणे एका पाडय़ावर तीन डॉक्टर राहणार असून त्यांच्यासमवेत वनवासी कल्याण केंद्राचे स्थानिक कार्यकर्ते व काही सामाजिक संस्थांचे पदाधिकारीही राहणार आहेत. धनत्रयोदशीला, २८ ऑक्टोबर रोजी हे सर्व डॉक्टर पालघरला जाणार असून यामध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मृदुला फडके, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. तात्याराव लहाने, केईएमचे माजी अधिष्ठाता व संचालक डॉ. संजय ओक, वाडिया हॉस्पिटलचे डॉ. मोहन आमडेकर, डॉ. मोहन खामगावकर, डॉ. मुकुंद कसबेकर, आयुषचे संचालक डॉ. कोहली आदी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. आदिवासींबरोबर दिवाळी साजरी करताना त्यांच्यामध्ये आरोग्यविषयक जनजागृतीचा तसेच आरोग्य तपासणीचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे. त्यामुळे आशा कार्यकर्त्यां, अंगणवाडी सेविका यांनाही सामावून घेण्यात आले आहे. या मोहिमेत युनिसेफ संस्था, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वनवासी कल्याण आश्रम, जनकल्याण समिती, आरोग्य भारती आदी संस्थाही सहभागी होणार असून वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आदिवासींसाठी ही आरोग्यदायी दिवाळी कल्पना राबविण्यात येत आहे. कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग पुढे सरसावला असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच खासगी क्षेत्रातील डॉक्टरांनाही कुपोषित आदिवासी भागात उपचारासाठी जावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदिवासींबरोबर दिवाळी साजरी करताना सर्व डॉक्टर हे पाडय़ावर राहणार असून ते आपल्याबरोबर आदिवासींसाठी दिवाळीचा फराळही नेणार आहेत. दिवाळीच्या दिवशी लहान मुले, गरोदर महिला तसेच कुमारिकांच्या आरोग्याची तपासणीही हे तज्ज्ञ डॉक्टर्स करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचा मुक्कामही पाडय़ावर!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी विशेष टास्क फोर्स नेमण्याचे आदेश जसे आरोग्य विभागाला दिले आहेत तसेच वैद्यकीय शिक्षण विभागानेही याकामी पुढाकार घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा जास्तीत जास्त प्रमाणात दुर्गम आदिवासी भागात उपलब्ध राहावी यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. मुख्यमंत्री स्वत: आदिवासींसमवेत दिवाळी साजरी करणार आहेत, तर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हे डॉक्टरांसमवेत आदिवासी पाडय़ावर राहणार आहेत.

=========================================================

पालघर : बोनस सोडा, ३ महिने कंत्राटींना पगार नाही

कोकण विभागाच्या प्रादेशिक संचालकांनी महावितरण मध्ये काम करणार्‍या कंत्नाटी कामगारांना बोनस देण्याचे आदेश दिले असतांना त्यांना मागील तीन महिन्यापासून पगारच मिळालेला नसल्याने त्यांच्या कुटुंबाची दिवाळी अंधारात साजरी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आज भारतीय मजदूर संघ संलग्न महाराष्ट्र वीज कंत्नाटी कामगार संघाच्यावतीने पालघरच्या विद्युत वितरण कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये कंत्नाटी कामगार भरण्याची प्रक्रि या करणार्‍या अधिकार्‍यांनी वेळीच टेंडर प्रक्रि या पूर्ण न केल्याने तसेच कंत्नाटदारानेही कंत्नाटी कामगारांना हि ऑर्डर नसल्याने कामावर जाऊ नका, असे सांगून पगाराची हमी घेण्याचे टाळले होते. अशा वेळी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी कंत्नाटी कामगारांना कामावर बोलावणे, पगार दिला जाईल असे ठोस आश्‍वासन दिले जाईल असे सांगितले होते. त्या मुळे कामावर हजर झालेल्या कंत्नाटी कामगारांनी एप्रिल २०१६ पासून ते जून २०१६ पर्यंत असे तीन महिने काम करूनही त्यांना एक छदामही मिळालेला नाही. सध्या ५२ कंत्नाटी कामगारांचे प्रत्येकी ६ हजार ५०० रु पये प्रमाणे १० लाख १४ हजारची रक्कम जमा होत असून ज्या अधिकार्‍यांनी कंत्नाटी कामगारा कडून कामे करवून घेतली त्यांच्या कडूनच हि रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणी कामगार संघाचे पालघर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत नेवे यांनी सांगितले. त्यामुळे ऐन दिवाळी च्या तोंडावर पगार मिळत नसल्याने कंत्नाटी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात असून त्यांनी आज पासून विद्युत वितरण पालघर कार्यालयाच्या समोर आंदोलन सुरू केले आहे.(वार्ताहर,लोकमत)

=========================================================
 
स्पीडब्रेकरना अखेर ब्रेक 
 
मयुरेश वाघ, वसई वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील अनावश्यक गतिरोधक (स्पीडब्रेकर) काढण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. आतापर्यंत १५० हून अधिक स्पीडब्रेकर्स काढण्यात आले आहेत. सर्व जुने स्पीडब्रेकर्स काढल्यानंतर आवश्यक त्या ठिकाणीच नव्या नियमाप्रमाणे स्पीडब्रेकर लावले जाणार आहेत. पालिका क्षेत्रात छोटे-मोठे मिळून जवळपास ११५० हून अधिक स्पीडब्रेकर आहेत. त्यातील ६०० हून अधिक अनावश्यक स्पीडब्रेकर असल्याचे पालिकेच्या इंजिनीअरनी केलेल्या सर्व्हेमध्ये आढळून आले होते. सध्या बनविण्यात आलेले स्पीडब्रेकर नियामाप्रमाणे नाहीत. कमी-अधिक उंच, अधर्वट तुटलेले, कुठेही व कसेही बनविलेले असे स्पीडब्रेकर असून यामुळे वाहन चालकांना त्रास होतो. शिवाय वाहनांचेही नुकसान होते. कुठे स्पीडब्रेकर टाकावेत म्हणून नागरिकांचे अर्ज येतात तर कुठे काढावेत म्हणून अर्ज येतात. एकट्या विरार ते अर्नाळा मार्गावर अनेक स्पीडब्रेकर्स असल्याने नागरिकांना कंबरदुखी,पाठदुखीचे त्रास बळावत आहेत. वाहनचालकांसह एसटी, परिवहन बसेसनाही त्याचा त्रास होतो. स्पीडब्रेकर्स असल्याने त्या परिसरात पाणी साचून पावसाळ्यात रस्ते खराब होतात. स्पीडब्रेकर्स बसविण्याचेही काही नियम आहेत. मात्र स्पीडब्रेकर बसविताना त्या नियमांना फाटा दिला जात असल्याचे आतापर्यंत दिसले आहे. पालिका महासभेने सप्टेंबर महिन्यात एक ठराव मंजूर केला होता. त्याप्रमाणे आता अनावश्यक स्पीडब्रेकर्स काढण्यास सुरुवात झाली आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाकडून ते काढले जात आहेत. जेसीबीच्या सहाय्याने स्पीडब्रेकर्स काढले जात आहेत. स्पीडब्रेकर काढल्यानंतर तेथे रस्त्यावर लेव्हलिंग करावी लागत आहे. शहरातील सर्व स्पीडब्रेकर काढून झाल्यानंतर जिथे गरज आहे तेथेच नवीन नियमाप्रमाणे स्पीडब्रेकर्स लावण्यात येतील. त्याला रिफ्लेक्टरही लावण्यात येणार आहेत. नवीन स्पीडब्रेकर लावताना वाहतूक पोलिस व आरटीओ यांचा सल्ला घेतला जाईल. चौक, शाळा-महाविद्यालयाचे परिसर, धार्मिक स्थळे, वर्दळीची ठिकाणे येथे नवीन स्पीडब्रेकर्स असणार आहेत. कुठे स्पीडब्रेकर असावेत याबाबत बांधकाम विभागाचे इंजिनीअर निर्णय घेणार आहेत. नव्याने लागणारे स्पीडब्रेकर्स नॉर्म्सप्रमाणे व एकाच रंगाचे, एकाच आकाराचे असणार आहेत, असे पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी सांगितले. फायबरची झाकणे वसई-विरार पालिका क्षेत्रातील रस्त्यावर पॅचवर्कची कामे पूर्ण झाली आहेत. दिवाळीपूर्वी सर्व रस्ते सुस्थितीत करण्याचे आदेश बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे पॅचवर्कच्या कामांना वेग आला आहे. रस्ते चांगले ठेवण्याबरोबरच रस्त्याजवळ असलेल्या गटारांवर व फुटपाथवर फायबरची झाकणे बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. गटारावर तसेच चेंबरवर आरसीसी कव्हर झाकणे गेले काही वर्षे पालिकेकडून बसवली जातात. मात्र ही झाकणे जड वाहने त्यावरून गेल्यानंतर फुटतात. चेंबरची सफाई करताना कामगारांकडून ही झाकणे तुटतात. त्याचबरोबर या झाकणांमध्ये लोखंडी सळई असल्याने ती झाकणे चोरीलाही जातात. या पार्श्वभूमीवर फायबरची झाकणे बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याची टेंडर प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर फायबरची झाकणे बसवली जाणार आहेत. याचा निश्चितपणे फायदा होईल, असे सांगण्यात आले.

=========================================================

डॉ.मनोज बनसोडेंना लाच घेताना अटक
विरार : येथील ग्रामीण हॉस्पीटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज बनसोडे यांना १४ हजार रुपयांची लाच घेताना ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने हॉस्पीटलमध्येच रंगेहाथ अटक केली. डॉ. बनसोडे कार्यालयीन कामासाठी पैसे मागत असल्याची तक्रार हॉस्पीटलमधील एका कर्मचार्‍याने केली होती. त्यावरून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे डीवायएसपी अजय आफळे आणि पीआय दिलीप विचारे यांनी सापळा रचला होता. आज दुपारी बनसोडे यांना हॉस्पिटलमध्ये १४ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. यामुळे शहरात आणि वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home