Tuesday, October 25, 2016

पालघर न्यूज २५ ऑक्टोबर

वसईत वाहनचोरांचा सुळसुळाट
विरार : विरार, नालासोपारा, तुळींज, वालीव, माणिकपूर, अर्नाळा, वसई या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी आणि चार चाकी वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. २१ महिन्यांमध्ये तब्बल ५२९ दुचाकी आणि १०२ चार चाकी मिळून ६३१ वाहनांची चोरी झाली आहे. गेल्या २१ महिन्याच्या कालावधीत वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २७,विरारमधून १३४,माणिकपूरमधून १४३,नालासोपार्‍यातून ८५, वालीवमधून ६८, अर्नाळातून २७ आणि तुळींजमधून १०३ मिळून तब्बल ५२९ दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. तर वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १,विरारमधून १३, माणिकपूरमधून १६, नालासोपार्‍यातून ४,वालीवमधून ४३,अर्नाळ्यातून ५ आणि तुळींजमधून २० मिळून तब्बल १०२ चारचाकी वाहने चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल आहेत. जानेवारी २०१५ ते सप्टेंबर २०१६ या २१ महिन्यात विरार, माणिकपूर, नालासोपारा या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३६२ दुचाकी वाहनांची चोरी झाली आहे. यातील सर्वाधिक १४३ वाहने माणिकपूर ठाणच्या हद्दीतून चोरीला गेली आहेत. (वार्ताहर,लोकमत)

मोखाडा : ब्रिटिशकालीन गारगाई पूल झाला धोकादायक
रविंद्र साळवे,लोकमत
मोखाडा तालुक्यातील खोडाळ्याहून इगतपुरी, घोटी आदी महत्वाच्या बाजारपेठांना व मुंबईला जोडणार्‍या मध्य रेल्वेचे शेवटचे ठिकाण कसारा या शहराला तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ३७ ला जोडणार्‍या खोडाळा-कसारा मार्गा वरील गारगाई नदी वरील पूल जीर्ण झाला आहे. या पुलाच्या वरच्या बाजूच्या संरक्षक भिंतीचा कठडा तुटलेला असून खालच्या बाजूने दीड ते दोन फूटीचा मोकळा भाग आहे. यामुळे एखाद्या बाइकस्वार किंवा वाहनास अपघात झाल्यास अपघात ग्रस्त व्यक्ती किंवा वाहन नदीत कोसळू शकते यामुळे भविष्यातील अशा अपघाताची वाट न बघता दुरुस्ती का केली जात नाही असा सवाल केला जातो आहे. या पुलाचे अनेक भाग तुटलेले असून भग्ना अवस्थेत आहेत तसेच हा पूल ब्रिटीशकालीन बांधकाम शास्त्राचा एक उत्तम नमुणा असून तो आजच्या घडीला शेवटची घटका मोजत आहे. यामुळे भविष्यात महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये कारण या मार्गावरु न दररोज हजोरो प्रवासी व वाहनांची वर्दळ असल्याने दुर्देवी दुर्घटना होण्याची भीती वाहनचालक व प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. गारगाई नदी वरील पुलाच्या दोन्ही बाजुने १०० ते १२० फूट खोल दरी असून या पुलावरील रस्त्यावर व दीड दोन किलो मीटर पर्यंतच्या रस्त्यावर १ फूट खोल तर ४ ते ५ फूट रुं द असे खड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे पहावयास मिळत असल्याने हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने आत्मघातकी असल्यांचे मत व्यक्त होत आहे.

जव्हार : विद्यार्थ्यांना सडकी सफरचंदे अन केळी
आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत चालविण्यात येणार्‍या शासकीय आश्रम शाळेत सडक्या व कुजक्या सफरचंद व केळींचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे आश्रम शाळेतील निवासी वसतीगृहात राहणार्‍या विद्यार्थ्यांनी खाण्यास नकार दिला आहे.जव्हार आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा असा चार तालुक्याचा समावेश असून. जव्हार प्रकल्पाअंतर्गत ३० निवासी आश्रम शाळा आहेत. या शाळेत १७ हजार ३०० विद्यार्थी निवासी वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत. आदिवासी विभाग अप्पर आयुक्त ठाणे यांच्या आदेशाने, आदिवासी विकास प्रकल्पातील आश्रम शाळांत करण्यात येणारा सफरचंद व केळींचा पुरवठा अचानक बंद करण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त करीत शासनाच्या विरोधात आंदोलन करण्याची तयारी चालविली होती. याबाबत वृत्तेही प्रसिद्ध झाली होती.याची दखल घेत आदिवासी विकास विभागाने जव्हार प्रकल्पातील आश्रमशाळांना सफरचंदे व केळींचा पुरवठा चालू करण्यात आला खरा, मात्न ती सडकी आणि कुचकी असल्याचे आढळून आले.
त्यामुळे मोखाडा व जव्हार तालुक्यातील नांदगाव, हिरवे, चास, गोंदे, विनवळ, वांगणी, देहरे, झाप, साकूर, या आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी ती खाल्यास आमचे आरोग्य धोक्यात येईल असे सांगून खाण्यास नकार दिला. सडके व कुजके व खराब फळ कुठल्याही परिस्थितीत उतरवून घेवू नये अशा सूचना मुख्याध्यापक व अधिक्षकांना देण्यात आल्या आहेत.
-किरण माळी, प्रकल्प अधिकारी, जव्हार

ग्रामीण दिवाळी कराष्टमीला होते सुरू, त्रिपुरारी पौर्णिमेला संपते
विक्रमगड : आधुनिक काळामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार अनेकविध बदल झालेले दिसत आहेत. परंतु विक्रमगड व परिसरातील गाव खेडयापाडयात आजही पूर्वापार चालत आलेली वंश-परंपराच जोपासली जात असून त्याच परंपरेनुसार सण साजरे केले जात आहे. शहरामध्ये काही ठराविक दिवस लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, भाऊबीज, पाडवा अशी दिवाळी साजरी केली जाते. परंतु विक्रमगड व ग्रामीण भागात अदल्या दिवसापासुन ते सणाच्या शेवट पर्यत सर्वच दिवस पारंपारिक पध्दतीनेच सण साजरा केला जातो. त्या अनुषंगांने कराष्टमीपासून दिवाळी सुरू होते ती त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत सुरू राहते. कराष्टमी म्हणजे रविवारपासून रोज सायंकाळी व पहाटे घरामध्ये व घराच्या अंगणात सर्व परिसरात दिवे लावले जात आहेत. या दिवशी सायंकाळी महिला घरासमोरील अंगण झाडून साफ करुन ते सारविले जाते, अंगणात सायंकाळच्या सुमारास लाकूड पेटवून तयार होणा-या राखेपासून आठविंदे काढतात. आठविंदे म्हणजे थोडक्यात धान्य साठवून ठेवले जाणारे कणगे ग्रामीण भागात पूर्वीपासून चालत आलेली ही एक चांगली जोपासून ठेवलेली पंरपरा. कणगे दारासमोर काढून त्याची पूजा करण्याचा उददेश म्हणजे घरात अन्न धान्यांची कधी कमतरता पडू नये व धान्य कणग्याप्रमाणे भरभरुन राहीले पाहीजे. अशा आठविंदे काढून त्यांची विधीवत पूजा तर काही जण ब्राम्हणांकडून पूजा करुन घेतात. त्यांना दुधाचा व गव्हाच्या पिठात काकडी किसून टाकून गूळ तूप घालून त्याचे मिश्रण तयार करुन पोळी सारखी लाटुन तुपात काकडी-पोळी तव्यावर तयार करुन प्रसाद केला जातो आणि ती पोळी खूप स्वादिष्ट असते. थोडक्यात शहरापेक्षा ग्रामीण भागात दिवाळीची सुरुवात ही जवळजवळ आठवडाभर अगोदरच सुरु होते. या दिवसा पासून वर्षभर अडगळीत पडलेल्या मातीच्या पणत्या बाहेर येतात व सर्वत्र गावात, खेडयात दिव्यांनी प्रज्वलीत असलेले दृश्य दिसते. या दिवसापासून दिप प्रज्वलीत केले जातात. त्यामुळे आजही विक्रमगड व परिसरात पारंपारिक पध्दतीनेच दिपावली सण मोठया भक्ती भावाने आनंदात साजरा केला जातो.
(वार्ताहर,लोकमत)

वसईला लाभली सुसंस्कृत ओळख
वसई : "गुंडांचे शहर म्हणून आजवर मी वसईला ओळखत होतो. मात्र नरवीर चिमाजी आप्पा साहित्य संमेलनात आलो नि ती आज ओळख मिटल्याची" मी कबुली देत असल्याचे ८९ व्या अ.भा.म.सा संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सांगितले. शब्दवेल कला, साहित्य, सांस्कृतिक परिषदेने आयोजिलेले तिसरे नरवीर चिमाजी आप्पा साहित्य संमेलन वसईत पार पडले. यावेळी बोलताना सबनीस पुढे म्हणाले की, वसईकर आपल्या मातीचा आदर करू लागला व संस्कृती, कला, राजकीय क्षेत्रात तो अग्रेसर होऊ लागल्यानेच आज साहित्य संमेलन येथे भरले व महाराष्ट्र भरातून साहित्यिक तसेच कवी मंडळी इथवर आली आहे. धर्मीय भेदभाव साहित्य व साहित्यिक मानत नाहीत म्हणूनच आज या संमेलनात विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या सर्व धर्मतील लोकांचा सत्कार झाला आहे. एरवी एक कविता वाचण्यासाठी कवीला लाचारी करावी लागते. शब्दवेलने या साहित्य संमेलनात महाराष्ट्रातून तब्बल १२०हून अधिक कवींना आमंत्रण देऊन कवींचे महासंमेलन भरवले असल्याचे मत त्यांनी मांडले.
अहिंसक देश म्हणून भारताची ओळख असली तरी गरज पडल्यास भगत सिंग येथे घडतात हे अलीकडेच भारताने शेजारच्या देशांना दाखवून दिले आहे. स्वागताध्यक्ष संदेश जाधव यांनी आपल्या भाषणात वसईचा परिचय करून दिला. सोनल खानोलकर, वसई विरार पालिकेच आय प्रभाग समितीचे सभापती प्रविण शेट्टी यावेळी उपस्थित होते. वसईतील कला व साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कामागिरी केलेल्या सिंथिया बाप्टीस्टा, गणेश चंदनशिवे, अनंत म्हात्रे, भागवत मुर्हेकर, हरिभाऊ म्हात्रे यांचा यावेळी गौरव करण्यात आला. लेखक, नाटकार अरविंद औंधे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम, कविसंमेलन आदी भरगच्च साहित्य कार्यक्रमाचा आस्वाद महाराष्ट्र भरातून आलेल्या साहित्य रसिकांनी घेतला. वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेल्या स्वरवसंत या कार्यक्रमाने तर दिवाळी पहाटेचा सुगंध पेरला. संमेलन यशस्वी करण्यासाठी संयोजक डॉ. प्रवीण बनसोडे, दीपक बडगुजर, प्रा. शिवाजी कालवले यांनी मेहनत घेतली. रश्मी महांबरे आणि जेती बालीगा राव यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी,लोकमत) चिमाजी आप्पाने वसई जिंकली व इतिहास घडवला. वसई विजय झाला नसता तर बाजीरावांच्या पराक्रमाला नक्कीच काळीमा लागली असती. शिवाजी महाराजांच्या सैन्यात विविध धर्माची लोक कार्यरत होती. तसेच शब्दवेल आयोजित या साहित्य संमेलनात सर्व धर्मियांची कार्यरत असल्याचे पाहून मन भरून आल्याचे त्यांनी सांगितले.

बोळींज गावात पाण्यासाठी रास्ता रोको
म. टा. वृत्तसेवा, वसई विरार जवळील बोळींज गावातील स्थानिक रहिवाशांना पिण्याचे पुरेसे पाणी मिळत नाही, आतापर्यंत घरोघर नळजोडण्या मिळाल्या नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी सोमवारी सकाळी उत्स्फुर्तपणे रास्ता रोको आंदोलन केले. या ठिकाणी आलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत महिलांनी जाब विचारला. त्याचवेळी तीन महिन्यात पुरेसे पाणी देऊ या सत्ताधारी पक्षाने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, असा प्रश्नही विचारण्यात आला. बोळींज गावातील स्थानिक रहिवासी व जुन्या इमारतींना गेल्या अनेक वर्षांपासून नळजोडण्या देण्यात आलेल्या नाहीत. स्थानिक रहिवाशांना हक्काचे पाणी हवे आहे. ज्यांनी नळजोडण्या मिळाव्यात यासाठी पैसे भरले आहेत त्यांना तात्काळ प्राधान्याने नळजोडण्या देण्यात याव्यात, अशी मागणी महिलांनी केली. बोळींजमधील अनेक रहिवासी पाण्याच्या स्टँडपोस्टवरून पाणी भरतात. मात्र आता या स्टँडपोस्टवरही पाणी मिळत नाही. दिवाळी तोंडावर असताना पाणी मिळत नसल्याने त्रासलेल्या महिला सकाळी ८ वाजता बोळींज रस्त्यावर उतरल्या व त्यांनी रस्ता अडवला. अर्धा तास रस्ता अडवल्यानंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढली. सव्वा दहा वाजता पालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी, प्रभारी सहाय्यक आयुक्त जागेवर आले व त्यांनी ग्रामस्थांची बाजू ऐकून घेतली. संतप्त महिलांच्या रोषाला अधिकार्यांना सामोरे जावे लागले. स्थानिक नगरसेवक व पालिकेच्या विरोधात महिलांनी घोषणा दिल्या. बोळींज गावावर पाण्याच्या बाबत कळत-नकळत अन्याय झाला असला तरी तो दूर केला जाईल, असे नगरसेवक अजित नाईक यांनी सांगितले. बोळींजच्या स्थानिक भूमिपुत्र, रहिवाशांना गेल्या १० वर्षात पालिकेकडून नळजोडण्या मिळाल्या नाहीत मात्र नव्याने उभ्या राहिलेल्या संकुलांना, इमारतींना नळजोडण्या झटपट कशा मिळाल्या याचे उत्तर पालिकेने द्यावे, गेल्यावर्षी पालिका निवडणुकीच्या प्रचारात तीन महिन्यात नळजोडण्या व पुरेसे पाणी देण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले, असे प्रश्न महिलांनी बविआ नगरसेवक व अधिकार्यांपुढे उपस्थित केले. पालिकेचे पुरेसे पाणी नसल्याने आम्हाला बाहेरून विकत पाणी आणावे लागते, आमचा किती अंत पाहणार आहेत असे सांगत पाणी न मिळाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला. स्टँडपोस्टवर पाणी देण्याचे व गावातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन पालिकेच्या पाणी अधिकार्यांनी दिले. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बी.एम.माचेवाड, नगरसेवक सखाराम महाडिक व अजित नाईक यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणीही केली

वसई : पार्किंगची समस्या जटील
मयुरेश वाघ, वसई , वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात रेल्वे स्टेशन तसेच बाजाराच्या ठिकाणी वाहने उभी करण्याची समस्या दिवसेंदिवस जटील बनत आहे. गेल्या ७ वर्षात वाहन तळांचा विकास करण्यात आलेला नाही. सर्वसामान्य करदात्या नागरिकांसाठी पालिका वाहन तळ विकसित करून देत नाही आणि दुसरीकडे रस्त्यावर नागरिकांनी वाहने उभी केली की त्याची हवा सोडली जाते. विरार पश्चिमेला असा प्रकार दोन दिवस घडल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. पालिका क्षेत्राच्या लोकसंख्येबरोबरच वाहन संख्याही वाढत आहे. लोकसंख्या वाढली तरी शहरातील रस्ते तितकेच राहिल्याने स्वाभाविक पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. स्टेशन परिसरात नागरिकांना पार्किंगची पुरेशी सुविधा नाही. स्टेशन परिसरात खरेदी, बाजार करण्यासाठी लोक येतात. दुकानात जातात. अशावेळी रस्त्याच्या कडेला दुचाकी पार्क करण्याशिवाय नागरिकांपुढे पर्याय नसतो. मुंबईला जाणारे चाकरमानी स्टेशन जवळ आपल्या दुचाकी पार्क करून जातात. ही जागाही आता कमी पडू लागली आहे.रस्त्यावर कशाही पद्धतीने वाहने उभी केली जात असल्याने जागा व्यापते व वाहतूक कोंडी होते. त्यामुळे ही अनधिकृत पार्किंग बंद व्हायला हवी असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. विरार, नालासोपारा, नवघर-माणिकपूर येथे ही समस्या अधिक जाणवत आहे. विरारमध्ये आधी पालिकेकडून दुचाकी उचलण्याची कारवाई होत होती. आता ही कारवाई बंद केली गेली आहे. आता रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क केल्या जात असल्याने दुचाकी व चारचाकींची हवा पालिकेचे कर्मचारी काढत आहेत. विरार पश्चिमेला शुक्रवार व शनिवार दोन दिवस अशा पद्धतीने हवा काढण्यात आल्या. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांना एखाद्या ठिकाणी पटकन जायचे झाले व गाडीची हवा सोडल्यास करणार काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय. विरार पश्चिमेकडील ज्येष्ठ डॉक्टर विनय राव यांच्या कारची हवा काढण्यात आल्याने त्यांच्या पेशंटनी नाराजी व्यक्त केली. डॉक्टरांना तर अनेकदा हॉस्पिटलमध्ये किंवा इतर ठिकाणी दिवस-रात्र कधीही घाईने जावे लागते. हवा सोडल्याचे नंतर लक्षात येते व त्यावेळी करणार काय हा प्रश्न लोकांना पडतो. पालिकेने याबाबत आधी सूचना द्यायला हवी, रस्त्यावर अनधिकृत पार्किंग केल्यास कोणती कारवाई करणार याबाबत बोर्ड लाऊन जागृती करायला हवी. तसे न करता थेट हवा काढणे व नागरिकांना त्रास देणे हे योग्य नाही असा संताप लोक व्यक्त करीत आहेत. हवा काढताना कर्मचाऱ्यांसह पालिकेचे सुरक्षा रक्षक असल्याने त्यांना घेऊन नागरिकांवर दमदाटी व दादागिरी करणार का ? असा संतप्त सवालही केला जातोय. सर्वसामान्यांच्या गाड्या रस्त्यावर लागल्यास त्यांच्यावर अशी कारवाई केली जाते. मग ज्यांच्या कारचे नंबर परिचित आहेत अशा मोठ्या मंडळींच्या कार रस्त्यावर लागतात तेव्हा त्यांच्यावर कारवाई करणार का किंवा कारवाई केली जाते का हाही प्रश्न नागरिक विचारत आहेत.

संपामुळे एसटीचे ६० हजारांचे नुकसान
म. टा. वृत्तसेवा, वसई, नुकत्याच झालेल्या नालासोपारा एस.टी. आगारातील १ दिवसाच्या संपामुळे आगाराचे अंदाजे ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील सोमवारी मध्यरात्रीपासून एस.टी आगारातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते. कर्मचाऱ्याला निलंबित केल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले होते. एका एस.टी वाहकाने तिकीट बॉक्स योग्य जागी न ठेवता ते विश्रांतीगृहात ठेवले होते या कारणावरून त्याला निलंबित करण्यात आले होते. हे निलंबन अन्याय्य असल्याचे सांगून हा संप पुकारण्यात आला होता. अखेर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पालघर विभागाचे प्रभारी अधिकारी आय.एम.वन्यालोलो यांनी नालासोपारा एस.टी डेपोत येऊन आपण हे निलंबन मागे घेत असल्याचे आश्वासन दिल्यावर कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. नालासोपारा या मोठ्या आगारातील एस.टी वाहतुकीवर संपाचा परिणाम होऊन शेकडो प्रवाशांचे हाल झाले. त्याचवेळी एक दिवसाच्या एस.टी बंदमुळे राज्य परिवहन महामंडळाला अंदाजे ६० हजार रुपयांचा महसुली तोटा आला, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. शाळेच्या विद्यार्थ्यांना व नियमितपणे एसटीने प्रवास करणाऱ्यांना अधिक त्रास झाला.

वसईतील मिठागरे खुली (लोकसत्ता)
पावसाळ्यात झाकून ठेवलेली वसईतील मिठागरे ‘ऑक्टोबर हीट’ सुरू झाल्यामुळे खुली झाली असून अनेक व्यापारी मीठ संकलित करण्यासाठी वसईमध्ये दाखल झाले आहेत. पावसाळ्याच्या काळात मीठ सर्वत्र गवताने झाकून ठेवले जाते. साधारण तीन महिन्यांनंतर हे मीठ खुले करण्यात येते. पालघर जिल्ह्य़ातील वसई-डहाणू पट्टय़ात १५ हजार एकर जागेवर मिठाचे उत्पादन होते. यातील अर्धी जागा राज्य सरकारची, तर अर्धी केंद्र सरकारच्या मालकीची असते. वसईतील स्थानिक भूमिपुत्र हे या मिठाचे उत्पन्न घेऊन आपली उपजीविका करत असतात. एकूण पाच हजाराच्या आसपास कुटुंबे या व्यवसायावर आपली उपजीविका करतात. वसई-विरारमधल्या १७०० एकर जागेवर नीट उत्पादन घेतले जाते. गेल्या काही वर्षांत मिठागर व्यावसायिकांना अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
उत्पादकांना तोटा
वसईच्या मीठ उत्पादकांना एक किलो मीठ उत्पादन करण्यासाठी १ रुपया ४० पैसे खर्च होतो. परंतु त्यांना १ रुपये १० पैसे दराने मीठ विकावे लागते. हेच मीठ नंतर बाजारात १६ ते १८ रुपये किलोने विकले जाते. एक टन मीठ उत्पादन करण्यास १४०० रुपये खर्च येतो, परंतु व्यापाऱ्यांना हेच मीठ १२०० रुपयांना विकावे लागते.
एके काळी मोठय़ा प्रमाणात असलेला हा उद्योग आता वसई भागात कमी होऊ  लागला आहे. इमारतीचे सांडपाणी, नाल्यातील सांडपाणी, रासायनिक सांडपाणी थेट खाडीत सोडले जाते. त्यामुळे मीठ आगारातील पाण्यावर परिणाम होऊन अपेक्षित मीठ घटू लागले आहे. त्यामुळे काही मिठागरे बंद करण्यात आली. दूषित पाण्यामुळे मिठावरच नव्हे, तर माशांवरही परिणाम झालेला आहे.
– मदन किणी, राज्य मीठ उत्पादक संघ.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home