Saturday, October 22, 2016

पालघर न्यूज २२ ऑक्टोबर

रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची पालघर येथील प्रवाशांची मागणी

रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची पालघर येथील प्रवाशांची मागणी
चर्चगेट-डहाणू लोकलमध्ये रेल्वे सुरक्षा दलाने पालघरच्या प्रवाशांवर केलेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद उमटले आहेत. वसई रेल्वे पोलिसांनी याची चौकशी सुरू केली आहे. पालघरच्या प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याविरोधात तक्रार दिली असून त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
चर्चगेट स्थानकातून रात्री ८ वाजून २७ मिनिटांनी डहाणूकडे निघणारी नवीन लोकल सुरू करण्यात आली आहे. १० ऑक्टोबरला ही लोकल सुरू झाली होती. पालघर-डहाणूंच्या प्रवाशांच्या सोयीसाठी ही लोकल असताना नालासोपारा आणि विरारचे प्रवासी या लोकलमधून प्रवास करू लागल्याने पालघर आणि विरारच्या प्रवाशांमध्ये खटके उडू लागले होते. त्याबाबत पवन तिवारी नावाच्या विरारच्या प्रवाशाने पालघरचे प्रवासी दादागिरी करीत असल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार बुधवारी रात्री रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी विरार स्थानकात पालघरच्या प्रवाशांवर कारवाई केली.
रेल्वे सुरक्षा बलाने पालघरच्या प्रवाशांना बेदम मारहाण केल्याचा आरोप प्रवाशांनी केला. एक प्रवासी बेशुद्ध पडला होता. अनेकांना बंदुकीच्या दंडुक्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीची चित्रफीत सर्वत्र प्रसारित झाल्याने प्रवाशांच्या संतापात भर पडली.

पालघरच्या प्रवाशांनी गुरुवारी रात्री वसई रेल्वे पोलिसांत जाऊन रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांविरोधात आणि कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दिली. रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई करताना आम्हाला बेदम मारहाण केली. याबाबत पोलीस आयुक्तांकडेही तक्रार केली आहे. रेल्वे सुरक्षा बलाची ही अमानुष मारहाण होती. मारहाण करणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. ही मागणी पूर्ण झाली नाही, तर तीव्र आंदोलन करू. 
– शिल्पा जैन, प्रवासी प्रतिनिधी

चर्चगेट डहाणू लोकलमध्ये प्रवाशांच्या तक्ररी सोडवताना रेल्वे सुरक्षा बलाकडून झालेल्या मारहाणीच्या प्रकरणासंदर्भात पालघरच्या प्रवाशांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार कलेली आहे. या मारहाण प्रकरणात आम्ही दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवून घेणार आहोत. या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल.  चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल. कारवाईचा निर्णय वरिष्ठांच्या सूचनेनंतर घेतला जाईल. सध्या आम्ही पुरावे गोळा करीत आहोत.
– महेश बागवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रेल्वे पोलीस

‘पालघरकरांच्या गाडीत विरारचे प्रवासी का?’
विरार, नालासोपाऱ्याच्या प्रवाशांसाठी दर पाच-दहा मिनिटांनी गाडय़ा असतात विरारवरून रात्री ९.०३ ची गाडी सुटल्यानंतर थेट १०.५० वाजता गाडी आहे. त्यामुळे पालघरचे प्रवासी बोरिवलीहून बलसाडने प्रवास करतात. परंतु या बलसाड गाडीत ५० टक्के प्रवासी विरारचे असतात, असे पालघर येथे राहणारे नीरज राऊत यांनी सांगितले. विरारचे प्रवासी वैतरणा आणि सफाळेपर्यंत पास काढतात आणि सर्रास सौराष्ट्र, लोकशक्ती तसेच बलसाडने प्रवास करतात, असे त्यांनी सांगितले. ते आत बसल्याने त्यांना वैतरणाला उतरावे लागले. याचा अर्थ आम्ही दादागिरी केली असा होत नाही, असेही त्याने स्पष्ट केले.

वाडा : 'जि.प. सीईओंनी आरोपींना वाचविले'येथील ग्रामपंचायतीमधील पदाधिकारी व अधिकारी यांनी संगनमताने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, यासाठी १४ ते २० ऑगस्ट यादरम्यान संघर्ष समितीतर्फे पुराव्यांसह उपोषण सुरू करण्यात आले. ठोस लेखी आश्‍वासनानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले. मात्न, ग्रामपंचायत अपहार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गांभीर्य नसून त्या आरोपींना वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करण्यास मदत करत असल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी कोकण आयुक्तांना तक्रारी निवेदन दिले असून बुधवारी झालेल्या वाडा येथील चौकशीदरम्यान, काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला. वाडा शहराची लोकसंख्या आता जवळपास ३५ हजारांवर जाऊन पोहोचली असून ग्रामपंचायत लोकांच्या समस्या दूर करण्यात असर्मथ ठरत असल्याचा आरोप आहे. त्यातच, वाडा ग्रामपंचायतीला भ्रष्टाचाराची बाधा झाली असल्याने याविरोधात सबळ पुरावे घेऊन संघर्ष समितीतर्फे अनंत सुर्वे व निलेश चव्हाण हे १४ ते २० ऑगस्टदरम्यान उपोषणाला बसले. खरेतर, गेल्या दोन वर्षांपासून भ्रष्टाचाराबाबत तक्रारी असतानाही दुर्लक्ष केले आहे. सीईओंनी चौकशीचे आश्‍वासन दिल्यानंतर सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्यावर आरोप होत असताना त्यांच्याकडील दप्तर सील न करता त्यांच्याच ताब्यात ठेवल्याने मोठय़ा प्रमाणात फेरफार व खोटी बिले जोडण्यात आल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. बुधवारी वाडा ग्रामपंचायतीत चौकशी अधिकारी, गटविकास अधिकारी राहुल धूम हे उपस्थित होते. या वेळी तक्रारदारांनी काळ्या फिती बांधून निषेध केला. सात दिवस उपोषण सुरू असताना सीईओ निधी चौधरी यांनी लेखी आश्‍वासन देत उपोषण मागे घेण्यास सांगितले होते. मात्न, गेल्या दोन महिन्यांपासून ३ स्मरणपत्ने देऊनसुद्धा या भ्रष्टाचार प्रकरणाची कुठलीही ठोस चौकशी करण्यात आली नाही.

डहाणू : नगर परिषदेचाच वीजपुरवठा खंडित होण्याची वेळ डहाणूच्या बाडापोखरण पाणीपुरवठा योजनेचा साखरे येथील वीजपुरवठा खंडित झाल्याने डहाणू नगर परिषदेने ग्रामीण भागांतील लोकांची गैरसोय होऊ नये, म्हणून त्यांच्या ट्रान्सफॉर्मरमधून वीजपुरवठा उपलब्ध करून दिला. त्यामुळे पालिकेला अतिरिक्त वीजबिल आले. परंतु, हे वीजबिल भरण्यास जिल्हा जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग गेल्या सहा महिन्यांपासून चालढकल करीत असल्याने डहाणूत मोठा वाद निर्माण झाला असून आता नगर परिषदेचाच वीजपुरवठा खंडित होण्याची वेळ आल्याने पालिका प्रशासन अडचणीत सापडले आहे. डहाणूच्या बंदरपट्टी भागातील २९ गावांना साखरे धरणातून पाणीपुरवठा करणार्‍या बाडापोखरण प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचा विद्युतपुरवठा बंद झाल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली होती. ती होऊ नये, म्हणून आमदार आनंद ठाकूर यांनी डहाणू नगरपालिकेला त्यांच्या ट्रान्सफॉर्मरमधून वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची शिफारस केल्याने डहाणू पालिकेच्या विजेवर बाडापोखरणच्या २९ गावांना सुरळीत पाणीपुरवठा सुरू झाला. त्यामुळे डहाणू नगर परिषदेचे विजेचे बिल दोन लाख अतिरिक्त आले.
दरम्यान, मार्च, एप्रिल महिन्यांत बाडा पोखरण पाणीपुरवठा योजनेचा ट्रान्सफॉर्मर बंद असतानादेखील वीज महावितरण कंपनीने नेहमीप्रमाणे दोन, अडीच लाख रुपये बिल डहाणू पाणीपुरवठा विभागाला पाठवल्याने आमचे बील का कमी झाले नाही, असा पवित्रा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतल्याने डहाणू नगर परिषद व पाणीपुरवठा विभाग यांच्यात जुंपली आहे. एकंदरच या प्रकारामुळे जिल्हा परिषद व नगरपरिषद प्रशासनामध्ये पेच निर्माण झाला आहे. (वार्ताहर,लोकमत) या अतिरिक्त बिलाची मागणी पालिकेने सातत्याने जिल्हा परिष्देच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली. परंतु, जिल्हा परिषदेने गेल्या सहा महिन्यांपासून वीजबिल भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने आता वीज कंपनीनेच नगर परिषदेच्या साखरे धरणाजवळील ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा खंडित करण्याची हालचाल सुरू केल्याने नगर परिषद प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. शौकत शेख

वसई :  पोलला धडक देणार्‍या ड्रायव्हरविरोधात गुन्हामहापालिकेच्या गाडीने धडक देऊन महावितरणच्या पोलचे नुकसान केल्याप्रकरणी महावितरणच्या तक्रारीनंतर पालिकेच्या ड्रायव्हरविरोधात वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणने पालिकेकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. हर्षद पाटील या ड्रायव्हरने भरधाव वेगात गाडी चालवत १२ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजता सागरशेत येथील महावितरणच्या पोलला धडक दिली होती. याप्रकरणी संबंधित ड्रायव्हरवर कारवाई व्हावी, यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी पाठपुरावा केला होता. अखेर, एक महिन्याने महावितरणचे सहायक अभियंता अशोक बोरकर यांनी तक्रार दिल्यानंतर वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच महावितरणने नुकसानभरपाईपोटी पालिकेकडे १२ हजार ६५० रुपयांची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)

विक्रमगड : १४०० मजुरांना हवी रोजगार हमीविक्रमगड तालुक्यात रोजगार हमीची कामे प्रत्येक मजुरांना मागणीप्रमाणे देणे बंधनकारक असताना प्रशासन चालढकल करीत आहे. ऐन दिवाळीमध्ये हाताला काम नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी अंधारात जाणार आहे. तालुक्यातील केगवा, बालापूर, कुझ्रे, तलवाडा, ओंदे, बांधण, इंदगाव, मोह बु, सुकसाळे, सारशी, देहर्जे या ग्रामपंचायत हद्दीतील मजुरांनी तहसीलदार कार्यालयात कामाची मागणी केली, परंतु तहसील प्रशासनाकडून त्यांना पंचायत समितीतून रोजगार हमीची कामे द्यावीत, अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.
प्रत्येक ५० टक्के कामे ही ग्रामपंचायत स्तरावर व ५० टक्के कामे कृषी, वन विभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम या यंत्रणेकडून राबवली जातात. परंतु, ही यंत्रणा कामच करताना दिसत नाही. त्यामुळे १४०० मजुरांना रोजगार देणार तरी कोण, असा प्रश्न आहे. (वार्ताहर,लोकमत) सद्य:स्थितीत ना ग्रामपंचायत स्तरावर कामे ना दुसर्‍या यंत्रणेची कामे सुरू आहेत. तरी कामे कधी मिळणार, या प्रतीक्षेत मजूर आहेत. या मजुरांना रोजगार मिळाला नाही, तर त्यांचे मोठय़ा प्रमाणात स्थलांतर होणार असल्याचे चित्र आहे.

वसई : आगाशीत १०० वर्षे जुन्या तिवरांची कत्तलविरारपासून जवळच असलेल्या आगाशी येथील डबाखार कोल्हापूर गावातील १०० वर्षे जुन्या तिवराच्या झाडांची कत्तल करून त्या ठिकाणी मातीभराव करून बेकायदा बांधकाम केले जात आहे. याप्रकरणी मंडळ अधिकार्‍यांनी सर्वेक्षण करून अहवाल तहसीलदारांना पाठवला आहे. त्यामुळे तिवरांच्या झाडांची कत्तल करण्यात आल्याचे उजेडात आले आहे. एका राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या कुटुंबाने २००९ पासून तिवरांच्या झाडांची मोठय़ा प्रमाणावर कत्तल केली आहे. त्यानंतर, त्या ठिकाणी बेकादेशीरपणे मातीभराव करून बेकायदा बांधकामही केले आहे. याप्रकरणी गावकर्‍यांनी सातत्याने प्रांत, तहसीलदार, मंडळ अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. पण, प्रशासनाकडून उचित कारवाई झाली नव्हती. आता बारी वाड्याचे अनिकेत वाडीवकर यांनी गुगल अर्थवरून २०१४ आणि २०१६ चे फोटो व काही कागदोपत्री पुरावे सादर केल्यानंतर महसूल अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. या तक्रारीची दखल घेऊन बुधवारी आगाशी मंडळ अधिकारी संजय सोनावणे यांनी स्थानिक तलाठी, अनिकेत वाडीेवकर, जनआंदोलन समितीचे प्रफुल्ल ठाकूर, स्वप्नील कवळी, आगाशी बारीवाड्याचे गावकरी यांच्या समक्ष पंचनामा करून व जाबजबाब नोंदवून स्थानिक रहिवासी महेश भोईर यांनी तिवरांची कत्तल करून मातीभराव करून त्या जागेत अधिकृत बांधकाम मोठय़ा प्रमाणात (ली-१ जागेवर अतिक्रमण) केल्याचा अहवाल वसईच्या तहसीलदारांना सादर केला. (वार्ताहर,लोकमत) हा भराव काढून त्या जागेतील पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या तिवराच्या झाडांना पुनर्जीवित करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.

दिवाळी बाजारपेठ :
वसई-विरार शहर महापालिकांतर्गत महिला व बालकल्याण विभाग आयोजित दिवाळी बाजारपेठ माणिकपूर येथील समाजोन्नती मंडळ येथे सुुरू करण्यात आली आहे. उद््घाटन प्रसंगी महापालिकेचे स्थायी समिती सभापती नितीन राऊत, महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती प्राची कोलासो, प्रभाग समिती एचचे सभापती प्रकाश रॉड्रिक्स, सहायक आयुक्त राजेश घरत, नगरसेवक उमा पाटील, कल्पेश मानकर, नगरसेविका मनीषा जाधव, पुष्पा जाधव उपस्थित होते.
विरार:मुलीचे अपहरण :
विरारमधील कातकरीपाडा येथून १५ ऑक्टोबरला रात्री ८ च्या सुमारास मॉनिता सुगंतो बिश्‍वास ही सोळावर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. तिचे कुणीतरी अपहरण केल्याची तक्रार तिची आई जयंती बिश्‍वास यांनी विरार पोलीस ठाण्यात केली आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरार:मंगळसूत्र खेचले :
 विरार पूर्वेला राहणार्‍या कर्णिका गजानन कामणकर (७५) यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दोन जणांनी खेचून पळ काढला. त्या औषध घेऊन घरी परतत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून नेले.
वसई/पारोळ : पोलिसाची धमकी :
लाच घेतल्याचा आरोप असणार्‍या पालीस शिपाई बाबासाहेब शेलार यांने वृत्तसंकलन करणार्‍या स्थानिक पत्रकाराला विरार पोलीस स्टेशनमध्ये धमकी दिल्याची तक्रार अप्पर पोलिस अधीक्षक वसई, उपवि भागअधिकारी वसई यांच्या कडे करण्यात आली आहे.
वसई :तीन दिवसांच्या बाळाला सोडून आई पळाली :
वसईच्या सुरुची बाग समुद्रकिनारी एका आईने आपल्या तीन दिवसांच्या बाळाला सोडून पळ काढला. पोलिसांनी बाळाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून फरार आईचा शोध घेतला जात आहे. सकाळी बीचवर फिरायला गेलेल्या दोन महिलांना लहान मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home