Tuesday, October 18, 2016

पालघर न्यूज १८ ऑक्टोबर

वसईत १०१ क्रमांक बिनकामाचा
संकटकाळी १०० क्रमांक फिरवून पोलिसांना पाचारण केले जाते तर १०१ क्रमांक फिरवून अग्निशमन दलाकडे मदत मागितली जाते. परंतु वसई-विरार शहरात १०१ हा क्रमांक कार्यरत नसल्याची धक्कादायक बाब एव्हरशाईन सिटीत लागलेल्या आगीनंतर समोर आली आहे. सावियो इमारतीत लागलेल्या आगीनंतर रहिवाशी १०१ क्रमांकावर संपर्क करत होते. तब्बल १५ मिनिटे रहिवसी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु या क्रमांकावर कुणीच प्रतिसाद दिला नाही. शेवटी एक रहिवासी मोटारसायकलवरून अग्निशमन दलाच्या केंद्राकडे गेला आणि अग्निशमन जवानांना घेऊन आला.
आमच्याकडे १०१ क्रमांक नाही. परंतु सर्व अग्निशमन दलाचे क्रमांक आम्ही वेळोवेळी जनतेला देत असतो. हे क्रमांक त्यांनी आपापल्या रहिवासी संकुलाच्या नोटीस बोर्डावर लावायचे असतात. सहा अग्निशमन प्रमुखांचे खासगी मोबाइल क्रमांकही आम्ही सर्वत्र लावलेले आहेत.
– दिलीप पालव, अग्निशमन विभाग प्रमुख, वसई-विरार महापालिका.
लोकांनी अग्निशमन दलाचे क्रमांक बाळगायला हवे. आपत्कालीन केंद्रात हे क्रमांक आहेत.  हे सर्व क्रमांक २४ तास सुरू असतात. नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये किंवा जवळच्या डायरीत ते नमूद करून ठेवायला हवेत. माहिती उशीरा मिळाली तरी आम्ही वेळीच आग नियंत्रणात आणली. – सतीश लोखंडे, आयुक्त
पालिकेच्या वेबसाईटवर मात्र आपत्ती व्यवस्थापन अग्निशमन विभाग : १०१ / ०२५०-२४६४८११ नमूद केले आहे.

खानिवडेच्या पिलरचे काम चार दिवसांत सुरू
यंदा वसई तालुक्यात झालेल्या अतवृष्टीमुळे पूर्व भागातून वाहून समुद्रास मिळणार्‍या तानसा खाडीला पाच ते सात वेळेस पूर आल्याने ती तीव्र प्रवाहाने दुथडी भरून वाहत होती. त्यामुळे खाडीवर १९८४ साली बांधलेल्या कोकण टाईप खानिवडे बांधार्‍याचे दगडी पिलर कोसळले आहेत. आगामी काळात ते दुरुस्त न केल्यास पाणी साठवण्यासाठी अडचण येऊ शकते. यामुळे या परिसरात भाजीची लागवड करणार्‍या शेतकर्‍यांपुढे समस्या निर्माण होऊ शकतात हे लक्षात घेऊन येत्या चार दिवसांत त्याचे काम सुरू होणार आहे.
बंधारा बंदिस्ताचे कामही हंगाम सुरु होण्याच्या अगोदर करण्यात येणार आहे. दरम्यान, हे नुकसान थांबविण्यासाठी संबंधित विभागाने असे लिकेज काढावेत असे येथील शेतकरी सांगत आहेत. याबाबत पाटबांधारे विभाग पंचायत समिती वसई पाटबांधारे विभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार १९८४ साली बांधलेल्या या बंधार्‍याचे काम बरेच जुने झाले असून नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे दिला आहे. त्यांच्या मंजुरी नंतर हे काम त्वरित सुरु करण्यात येईल. मात्न तोपर्यंत डागडुजी करूनच बांधारा वापर करावा लागेल असेही सांगण्यात आले.
तानसा खाडीवरील खानिवडे येथील कोकण टाईप दगडी बंधार्‍याला फळ्या लावून त्याच्या आतमध्ये माती भराव करून समुद्राला मिळणारे गोडे पाणी अडवले जाते. दरवर्षी पावसाळा संपताच हे काम सुरु होते. मात्न, यंदा अनेक वेळा झालेल्या अतवृष्टीमुळे नदीच्या पाण्याची पातळी आजूनही वाढलेली आहे. खानिवड्याच्या या बांधार्‍यामुळे वरच्या भागातील शेतकर्‍यांसह, खराट तारा, चांदीप, शिवणसई, भालीवली, जांभूळ पांड , नवसई, भाताणे व मडके पाडा येथील शेतकर्‍यांना फायदा होतो.  भातकापणी नंतर येथील शेतकरी पांढरा कांदा, टोमेटो, कलिंगड, मूग, तूर, वाल, चणा ही पिके व भाजीपाल्याची लागवड करतात. १९८४ साली बांधलेल्या हा कोकण टाईप बंधारा पाझरु लागल्याने मार्च अखेरीस कोरडा होतो. साठवलेल्या पाण्यात समुद्राचे पाणी हळू हळू मिसळते आहे. खाडीमध्ये मासेमारी करणारे मासे मिळवण्यासाठी मुद्दाम बंधारा लिकेज करत असावेत असा येथील शेतकर्‍यांना संशय आहे. या प्रकारामुळे अडवलेले पाणी क्षारयुक्त बनले आहे.

विरार : सुधारगृहातून पळालेला पोलिसांच्या ताब्यात
विरार/वार्ताहर : एका अल्पवीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी भिवंडी बालसुधार गृहात पाठवण्यात आल्यानंतर तिथून फरार झालेल्या आरोपीला नालासोपारा पोलिसांनी रविवारी अटक केली. सूरज ऊर्फ कालू मोहनसिंग (१६) असे आरोपीचे नाव आहे. सूरजला बलात्कारप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. कोर्टाच्या आदेशानुसार सूरजची भिवंडी येथील बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली होती. मात्र, ३ ऑक्टोबरला सूरज बालसुधार गृहातून पसार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. सूरज नालासोपारा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

वसई : सरकारी कर्मचार्‍यांच्या नावे रिक्षापरवाने
वसई : सरकारी नोकरीत असतानाही खोटी माहिती देऊन परिवहन खात्याकडून अनेकांनी रिक्षा परवाने घेतल्याचा आरोप पालघर जिल्हा ऑटो रिक्षा मालक-चालक संघटनेने केला असून याप्रकरणी परवाने रद्द करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
परिवहन खात्याने २०१४ आणि २०१६ मध्ये ऑनलाईन सोडत काढून हे परवाने दिले आहेत. रिक्षा परवाना सरकारी सेवेत असलेल्यांना दिला जात नाही. तशी अट परिवहन खात्याने घालून संबंधितांकडून तशी प्रतिज्ञापत्रेही घेतलेली आहेत. असे असताना सोडतीत अनेकांनी सरकारी नोकरी अथवा अन्य व्यवसाय करीत असतानाही अटीशर्तींचा भंग करून रिक्षा परवाने घेतले असल्याचे चव्हाट्यावर आले आहे.
नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात रेल्वे, पोलीस, शिक्षक, महापालिका कर्मचारी यासह अनेक सरकारी खात्यातील नोकरदारांनी परवाने घेतल्याचे उजेडात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यासाठी परिवहन खात्याने याची चौकशी करुन परवाने रद्द करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)  बेरोजगारांना व्यवसाय मिळावा यासाठी सरकारने हे परवाने दिले आहेत. मात्र, पूर्वीपासूनच अनेक सरकारी नोकरी असलेल्यांनी माहिती लपवून परवाने मिळवले आहेत. त्यानंतर सदरचे परवाने दलालांमार्फत पाच वर्षांच्या कराराने भाडे तत्वावर दिले आहेत.

सुरूंच्या बागा, किनारा स्वच्छ, टीम आमची वसईचा उपक्रम : प्रशासनाची निष्क्रियता झाली उघड.
वसई : टीम 'आमची वसई' ने वसईची शान असणारे सातही समुद्र किनारे स्वच्छ केलेत. रविवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी ५ वाजता म्हणजेच सुरुची बाग समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला. अकुशलतेने बांधलेल्या धूप प्रतिबंधक बांधामुळे या किनार्‍याची अवस्था फार बिकट झाली होती. ते नक्की सी-बीचच आहेत का असा प्रश्न येथे येणार्‍या पर्यटकांना पडत होता. ते चित्र आता बदलले आहे.
निसर्गाने वसई- विरार ला भरभरून दिले आहे. पूर्वेस उत्तुंग पर्वत रांगा, पश्‍चिमेस फेसाळणारा रत्नाकर, दक्षिणेस उल्हास नदी, उत्तरेस वैतरणा नदी, ११०८ पवित्न तीर्थांनी पावन झालेली ही शूर्पारक भूमी म्हणून इतिहासालाही परिचित आहे. अनेक प्रजातींची फळे, फुले, पालेभाज्या, फळभाज्या, दुग्धव्यवसाय, मीठव्यवसाय, मत्स्यव्यवसाय इत्यादी व्यवसायांनी समृध्द अशा या किनार्‍यांची स्वच्छता करतांना 'आमची वसई'ला उपक्रमा दरम्यान प्रत्येक किनारी वेग वेगळे अनुभव आले. अवैध रिसॉर्ट, पर्यटकांनी केलेला कचरा, अश्लील चाळे करणारी जोडपी, पिसाळलेली कुत्नी, ग्रामस्थांनी केलेला अवैध वाळू उपसा आणि झालेली वृक्षतोड तसेच प्रशासनाच्या निष्क्रि यता व उदासिनतेचे या वेळी विदारक दर्शन घडले. (प्रतिनिधी) आमची वसईच्या या उपक्रमास प्रत्येक समुद्रकिनारी स्थानिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. यापुढे किनारे स्वच्छ ठेवण्याची वसा ही घेतला. एवढेच नव्हे तर आता महाराष्ट्र सरकार व मेरीटाइम बोर्डाने ही किनारे स्वच्छ ठेवण्याचा वसा घेतला. कोस्टगार्ड व सागरी पोलिसांनीही समुद्रकिनारी सुरक्षा व्यवस्था चोख केली आहे. आता स्थानिक व पर्यटक किनारे स्वच्छ ठेवतील अशी आशा आहे.

जव्हारफाटा उड्डाणपुलासाठी रास्ता रोको
मनोर जवळील मुंबई अहमदाबाद महामार्गावर जव्हार फाठ्या जवळ नेहमी अपघात होत असून आतापर्यंत चाळीस ते पन्नास लोकांना आपले प्राण मुकावे लागले या आधीही ग्रामस्थ तसेच काही संघटना तर्फे उड्डाण पूल व्हावा यासाठी मागणी करण्यात आली होती मात्न त्या मागणीला संबंधित खात्याने केराची टोपली दाखवली म्हणून आज शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य पांडुरंग गोवारी यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको करण्यात आला होता त्यावेळी जगदीश धोडी यांनी सांगितले की, उड्डाण पूल झाले नाही तर आंदोलन तीव्र करू आजपासून अपघात घडला आणि माणूस मृत्यू पावला तर आय आर बी कंपनी व एन एच आय वर ३0२ कलमाखाली गुन्हा दाखल करू उप जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण शिवसेना म्हणाले की गेल्या पाच वर्षात हजारो अपघात होऊन शेकडो लोकांचे प्राण गेले आहे तरी उड्डाण पूल लवकर तयार करावा.
या मागणीसाठी सावरखंड, भोपोली, कोसबाड, नालसेत, टाकव्हल, टेण, नांदगाव येथील सेना रा. कॉंग्रेस भूमीसेना काँग्रेस सर्व पक्षीय कार्यकर्ते ग्रामस्थ सहभागी झाले होते. या वेळी मुंबई अहमदाबाद महामार्ग दहा ते वीस मिनीटे रोखले होते त्यानंतर आंदोलनकर्त्यांना उठवून वाहतूक सुरळीत केली मनोज चाळके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर) जव्हार फाटा व नांदगाव उड्डाणपुलाच्या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी दिल्ली येथील कार्यालयात मी पाठपुरावा करीत आहे.
-दिनेश अग्रवाल, एन एच आय अधिकारी ऑर्डर मिळाली की कंपनी लगेच कामाला सुरवात करेल. तसेच जव्हार फाट्यावर उड्डाण पूल होणे गरजेचा आहे नेहमी या ठिकाणी अपघात घडतात निष्पाप लोकांचे प्राण जातात.
- साठे , आय आर बी चे अधिकारी

नरवीर चिमाजी आप्पा साहित्यसंमेलन २३ ऑक्टोबर
म. टा. वृत्तसेवा, वसई शब्दवेल कला, साहित्य, सांस्कृतिक परिषदेच्या वतीने तिसऱ्या नरवीर चिमाजी आप्पा साहित्यसंमेलनाचे आयोजन २३ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. पल्लवी परुळेकर-बनसोडे यांनी दिली. तीन वर्षापासून नरवीर चिमाजी अप्पा साहित्यसंमेलनाचे आयोजन , तसेच सुरेश भट स्मृतीप्रित्यर्थ मराठी गझल मुशायरा अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी हे संमेलन २३ ऑक्टोबर रोजी वसई(प) येथील अनंतराव ठाकूर नाट्यगृह (भंडारी समाज हॉल) येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलन सोहळ्याचे उदघाटन ८९ व्या अ.भा.म.सा संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस करतील. तर ज्येष्ठ साहित्यिका डॉ. लिला गोविलकर संमेलनाध्यक्ष पद भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून कवी नाटककार गुरू ठाकूर उपस्थित राहणार आहेत. तर आय प्रभाग समितीचे सभापती प्रविण शेट्टी, जाणीव दिवाळी अंकाच्या संपादिका सोनल खानोलकर विभूती विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्थायी समितीचे माजी सभापती संदेश जाधव स्वागताध्यक्ष असतील.  दुपारी कवी नाटककार गुरू ठाकूर यांच्ी प्रदीप देसाई मुलाखत घेतील. तसेच अशीही एक मैफिल हा कविसंमेलन व व्यक्तिचित्रणाचा कार्यक्रम होणार असून चित्रकार सुभाष गोंधळे प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत. त्यानंतरस्वरवसंत हा गाण्याचा कार्यक्रम होईल. नचिकेत देसाई, सुचित्रा भागवत संगीतकार स्व. वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेली मराठी गाणी सादर करतील. सायंकाळी ५.३० वाजता काव्यसंध्या होणार असून साहित्य संमेलनाची सांगता ज्येष्ठ साहित्यिका वैजयंतीमाला मदने करतील.

वसईच्या तरुणाची आयएसच्या जाळ्यातून सुटका!
मुंबई : आयएस या सिरीयातील दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी निघालेल्या २२ वर्षीय तरुणाला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) वसई येथून ताब्यात घेतले आहे. जून महिन्यात त्याला आयएसच्या म्होरक्याने पैसे आणि ऐषोरामी जीवनाचे प्रलोभन देत आपल्या जाळ्यात ओढले होते. येत्या काही दिवसातच हा मुलगा सिरियाला जाण्याच्या तयारीत होता. मात्र वेळीच एटीएसने वसईतून मुलाला ताब्यात घेत, दहशतवादी संघटनेत जाण्यापासून रोखले आहे. या मुलाचे समुपदेशन करून त्याला पुन्हा त्याच्या गावी केरळ येथे पाठवण्यात आले आहे.  मूळचा केरळचा असलेला हा २२ वर्षीय तरुण इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. तीन वर्षांपूर्वी हा मुलगा मुंबई फिरण्यासाठी आला होता. त्यावेळी वसई येथे राहणाऱ्या काकाने त्याला नवीन मोबाइल सीमकार्डसह घेऊन दिला होता. हे सीमकार्ड काकाच्या नावावर होते. केरळमध्ये इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेला हा मुलगा जून २०१६ मध्ये इंटरनेटच्या माध्यमातून आयएसआय या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. त्याच्या फेसबुक पेजवर मुस्लिम धर्मावर अत्याचाराचा मजकूर पाठवण्यात आले. भावनेपोटी त्याने ते लाइकही केले. त्यानंतर फेसबुक पेजवर एका अनोळखी व्यक्तीने इस्लामबाबत त्याच्याशी बोलण्यास सुरुवात केली. त्यामध्ये त्याने इस्लामविषयी माहिती, मुस्लिम तरुणांवर होणारे अत्याचार, इस्लामच्या वाढीसाठी काय करायला हवे हे सांगू लागला. आयएस कशासाठी लढत आहे त्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच या संघटनेत सामील झाल्यास जगात वेगवेगळ्या देशांना भेटी देता येतील. भरपूर पैसा आणि ऐषोरामी जीवन, इंजिनीअरिंग क्षेत्रातील नामांकित कंपनीत नोकरी अशा अनेक गोष्टींचे प्रलोभन दाखवले. त्यानंतर मुलगा फेसबुक आणि मोबाइलवरील व्हॉट्सअॅपद्वारे दिवसातील ८ ते १० तास या दहशतवाद्यांच्या संपर्कात राहू लागला. या संभाषणाबाबत कोणालाही माहिती न देण्याचे त्याला सांगण्यात आले होते. लवकरच या मुलाला सिरियातील दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी नेले जाणार होते. त्यावेळी मुलाचे सिमकार्ड हे मुंबईचे असल्याने एटीएसने संशयित हालचाली ओळखल्या. त्यानुसार सीमकार्डची माहिती काढत २० ऑगस्टला एटीएस अधिकाऱ्यांनी तातडीने वसई येथे जाऊन चौकशी केली. संशयित नंबर हा केरळ येथील पुतण्याला दिल्याचे मुलाच्या काकाने एटीएस अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानुसार एटीएसच्या अधिकाऱ्यांनी काकाला संशयित मुलाला मुंबईला बोलावून घेण्यास सांगितले. मुलगा मुंबईत आल्यानंतर एटीएसने त्याला ताब्यात घेत त्याच्याजवळ चौकशी केली. त्यावेळी मुलाने मागील तीन महिन्यांपासून आयएसच्या संपर्कात असल्याची कबुली देत घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार मुलाचे अधिकाऱ्यांनी समुपदेशन करत त्याला क्लीनचिट देत सोडले. त्यानंतर मुलाने त्याचे फेसबुक आणि ट्वटिर अकाऊंटसह मोबाइल नंबरही बदलला आहे. संबंधित तरुणाने आता पूर्ण लक्ष त्याच्या इंजिनीअरिंगच्या अभ्यासाकडे वळवल्याचे एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी होमिओपॅथी
मुंबई : डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी होमिओपॅथीच्या साबुदाण्याच्या आकाराच्या गोळ्यांची मात्रा सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी (सीसीआरएच) या केंद्र सरकारच्या संस्थेने शोधून काढली आहे. होमिओपॅथीच्या गोळ्यांनी डेंग्यूला प्रतिबंध करण्याचा प्रयोग केरळमध्ये यशस्वी झाल्यानंतर केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने मुंबई महापालिकेच्या सहकार्याने चेंबूर-मानखुर्दमधील शिवाजीनगरमध्ये होमिओपॅथीच्या गोळ्या मोफत वितरित करून डेंग्यूला प्रतिबंध घालण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखला आहे.  केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी या संस्थेच्या वतीने होमिओपॅथीवर संशोधन सुरू आहे. सीबीडी बेलापूरमध्ये सीसीआरएचचे महाराष्ट्रातील एकमेव केंद्र आहे. या केंद्राच्या वतीने पुढील वर्षीपासून मुंबईत डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी होमिओपॅथीच्या गोळ्यांचे वाटप केले जाईल. केरळमधील कोट्टायममध्ये होमिओपॅथीच्या गोळ्यांनी डेंग्यूला प्रतिबंध घालण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्याचा अहवाल आयुष मंत्रालयाने इंडियन जर्नल रिसर्च इन होमिओपॅथी यामध्ये प्रसिद्ध केला आहे. त्यानंतर दिल्लीमध्येही होमिओपॅथीच्या गोळ्यांचे वाटप करून डेंग्यूला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला होता. त्याचाही फायदा झाल्याचे प्राथमिक पाहणीत निदर्शनास आले आहे. आता हा प्रयोग मुंबई व त्रिवेंद्रममध्ये करण्याची योजना आहे. त्यासाठी सीसीआरएचने मानखुर्दमधील शिवाजी नगरची निवड केली आहे. मुंबई महापालिका, राज्य सरकारचा साथ नियंत्रण विभाग व एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने शिवाजीनगर पुढील वर्षी गोळ्यांचे वाटप केले जाईल. कारण डेंग्यूची साथ फैलावण्यापूर्वीच या गोळ्यांचे सेवन करावे लागते. पुढील पावसाळ्यापूर्वी हा प्रयोग सुरू होईल. त्यासाठी लहान मुलांना कमी मात्रेच्या तर मोठ्यांना जादा मात्रेच्या गोळ्या दिल्या जातील. या गोळ्यांचा किती फायदा झाला त्याचा शिवाजीनगरमध्ये अभ्यास होईल. होमिओपॅथीला चालना देण्यासाठी सीसीआरएचच्या वतीने खारघरमध्ये पन्नास खाटांचे रुग्णालय उभारण्यात येत आहे. सध्या बेलापूरच्या सेंटरमध्ये ऑटीझमपासून, डेंग्यू व साथीचे आजार, गुडघेदुखी आणि इतर आजारांवर होमिओपॅथीच्या गोळ्यांनी उपचार होत आहेत. डेंग्यूची साथ सुरू होण्यापूर्वीच या गोळ्यांचे वाटप करावे लागते. गोळ्यांचे आधीच सेवन केले तर प्रतिबंध घालता येतो. या गोळ्यांचे कोणतेही साईट इफेक्टस नाहीत. अॅलोपॅथीमध्ये डेंग्यूवर प्रतिबंधात्मक लस नाही. पण होमिओपॅथीच्या गोळ्यांनी प्रतिबंध घातल्याचे केरळ, दिल्लीमध्ये दिसून आले आहे. मुंबईत पुढील वर्षी या गोळ्यांचे मोफत वितरण केले जाईल. - डॉ. के. सी. मुरलीधरन, ऑफीस इन्चार्ज, सीसीआरएच, नवी मुंबईतील विभागीय केंद्र

डॉ.रजनीश धेडियांची व्यथा
पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्याच्या वेवजी गावात महाराष्ट्र गुजरात सीमेवरील दुर्गम आदिवासी कुटुंबात रजनिश महादया धेडिया राहतो. घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर जिद्द आणि कठोर प्रयत्नाने मात करून एमबीबीएस आणि एमडीपर्यंतचे शिक्षण घेतले. या करिता अनेकवर्ष कुटुंबापासून लांब वसतिगृहात काढली. त्यानंतर कोल्हापूर येथील इचलकरंजीत वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती झाली. मात्न फार काळ आनंद टिकला नाही. १२ ऑक्टोबर रोजी रात्नीच्या वेळेस स्वारगेटहून इचलकरंजीकडे बसने प्रवासा दरम्यान लॅपटॉप, शैक्षणिक कागदपत्न आणि सामान ठेवलेली बॅग अज्ञात व्यक्तीने चोरली. रजनिश याने तत्काळ स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्न गहाळ सामान सापडलेले नाही. त्यामुळे नोकरीचा प्रश्न निर्माण झाल्याने तलासरी येथील त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचे सावट आहे. दुर्गम आदिवासी गावातल्या सामान्य घरातील मुलाने डॉक्टर होणे आजही अवघड गोष्ट आहे.सोशल मीडियाचे माध्यम आणि लोकमत बातमीतून कागदपत्न मिळविण्यात सहाय्य मिळेल असा विश्‍वास रजनिश, त्याचा भाऊ नितिन आणि धेडिया कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. कठोर प्रयत्नाने मात करून शिक्षण घेतले. नोकरीकरिता रुजू होण्यासाठी जात असताना प्रवासादरम्यान लॅपटॉपसह, शैक्षणिक कागदपत्न आणि समानाची चोरी झाली आहे. सामान सापडणे अत्यंत आवश्यक आहे. - रजनिश धेडिया

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home