Thursday, October 13, 2016

पालघर न्यूज १३ ऑक्टोबर


१४ ऑक्टोबरला एसटीचे आंदोलन
पालघर/वसई : विविध मागण्यांंसाठी एस.टी.कामगार संघटनेद्वारे १४ आॅक्टोबरला राज्यस्तरीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालघर येथील विभागी कार्यालासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील कामगार धरणे आंदोलन करणार आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून मनमानी कारभार केला जात आहे. आर्थीक प्रश्नांची अंमलबजावणी निधीअभावी वेळेवर केली जात नाही. संघटनेच्या हक्कांवर बाधा आणली जात आहे. पदाधिकाऱ्यांवर आकसपुर्वक कारवाई केली जात आहे.शिस्त व आवेदन पद्धतीचा भंग करून निरनिराळी परिपत्रके प्रसारीत केली जात आहेत. नफ्याची नियते बंद केल्यामुळे तोटा येत आहे. कामगारांच्या वेतनात अपेक्षित वाढ केली जात नाही. या सर्व बाबींमुळे कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे कामगारांच्या मागण्यांची पुर्तता समबद्ध काळात होणे आवश्यक आहे. ही पुर्तता न झाल्यामुळे १४ आॅक्टोबरला महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेद्वारे हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी सांगितले.
राज्य परिवहनाच्या कामगारांना सातवा वेतन लागू करावे, त्यांना शासनात विलीन करण्यात यावे.कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करावी, नवीन कामगार करार होईर्पंत २५ टक्के अंतरिम वाढ लागू करावी.महागाई भत्त्याची ७५ टे थकबाकी दिवाळीपुर्वी देण्यात यावी. तसेच दिवाळी भेट म्हणून पंधरा हजार रुपये देण्यात यावे. थेट प्रवासी नसल्याचे कारण देवून बंद केलेल्या जादा नफ्याच्या गाड्या पुन्हा सुरु करण्यात याव्यात अशा मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत. अशी माहिती विभागी अध्यक्ष भरत पेंढारी यांनी दिली. (प्रतिनिधी,पालघर)

वर्सोवा पुलाची दुरुस्ती कागदावरच!
वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीकामामुळे ठाणे, भिवंडी आणि नवी मुंबई परिसरात भीषण वाहतूककोंडी होत असून हा पूल वाहतुकीसाठी बंद करून ४० दिवस लोटले असले तरी प्रत्यक्ष कामास अद्याप सुरुवातच झाली नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. दुरुस्तीबाबत नेमलेल्या सल्लागाराने अद्याप आपला अहवालच सादर केला नसून काम कधी सुरू होणार आणि कधी संपणार, याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडेही उत्तर नाही. त्यामुळे वाहतूककोंडीमुळे होणाऱ्या त्रासाचा उद्रेक होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई, ठाणे आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचे मार्गक्रमण होणारा वर्सोवा पूल ३ सप्टेंबर रोजी दुरुस्तीच्या कारणास्तव बंद करण्यात आला होता. या पुलावरील हलक्या वाहनांना प्रवेश दिला जात असला तरी अवजड वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या वाहनांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत असून ठाणे, भिवंडी आणि नवी मुंबई परिसरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर अभूतपूर्व वाहतूककोंडी होत आहे. या कोंडीत तासन् तास खोळंबा होत असल्याने वाहनचालकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. तसेच, या वाहतुकीचे नियमन करताना पोलिसांचे कंबरडेही मोडले असून आता हे काम करणे त्यांच्या आवाक्याबाहेर चालले आहे. ही सर्व कोंडी लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण केले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, वाहतूक बंद करून ४० दिवस लोटले तरी प्रत्यक्ष कामाला सुरवातच झाली नसून अद्याप प्राधिकरण सल्लागाराच्या अहवालाचीच प्रतीक्षा करत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. तीन दिवसांत अहवाल
या पुलाची दुरुस्ती नक्की, कशा पद्धतीने आणि कितपत करायची आहे, याचा अभ्यास करण्यासाठी रामभोळ या ब्रिटिश कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या तज्ज्ञांनी पुलाचे सखोल सर्वेक्षण केले असून १५ ऑक्टोबर रोजी ते अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतरच प्रत्यक्ष दुरुस्ती कामाचे स्वरूप निश्चित करून ते पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल, यावर भाष्य करता येईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. त्यामुळे या पुलावरील वाहतूकबंदीचा त्रास आणखी किती दिवस सोसावा लागेल, हे कुणालाही सांगता येत नाही.
वाहतूककोंडी दूर करता करता वाहतूक पोलिसांची यंत्रणा सपशेल कोलमडली आहे. अडकलेली वाहने उलट दिशेने मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करत असल्याने कोंडीत आणखी भर पडली आहे. त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या पोलिसांना मारहाण होत आहे. काम कधी पूर्ण होणार, याचे उत्तरही पोलिसांना देता येत नाही. त्यामुळे वाहनचालकांकडून अक्षरशः शिव्यांचा भडीमार होत आहे. ही परिस्थिती एवढी चिघळत चालली आहे की एक दिवस या भागांमध्ये दंगल उसळली तरी आश्चर्य वाटणार नाही, अशी प्रतिक्रिया वाहतूक शाखेच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. या कामामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे पत्रही प्राधिकरणाला पोलिसांच्या वतीने पाठविण्यात आल्याची माहिती हाती आली.(म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे)

शहापुरात भानभित्नांनी भरलंय सारं रान, रानमेवा : औषधी गुण, टॉन्सिलवर उपयुक्त
भातसानगर : शहापूर तालुक्याच्या जंगलात सर्वत्न रानातील रानमेवा म्हणून परिचित असलेली काळीभोर भानभित्ने नावाची लहानलहान फळे सर्वत्न पाहवयास मिळत असून शेतावर कापणीसाठी गेलेले शेतकरी त्यावर ताव मारत असल्याचे पहावयास मिळत आहे.
तालुक्यातील जंगलमय भागात मोठय़ा प्रमाणात दिसणारी भानभित्ने ही झाडावर गुच्छाच्या रु पात आढळतात. सुरुवातीला ती हिरवीगार असतात. एका एका गुच्छ्यात ती दीडशे ते दोनशे फळे असतात. ती भातिपकाच्या कापणीच्या वेळी पिकून काळीभोर होतात. ती खायला गोड पण थोडीशी तुरट असतात. परंतु, ती खायची मजा मात्न औरच असते. या फळात लहानलहान चार बियाही असतात, त्या टाकून दिल्या की भानभित्ने खाल्ल्याचे समाधान वेगळेच.
आज तालुक्याच्या भातसानगर, कसारा, तानसा, वैतरणासह सार्‍याच जंगलमय भागात ती मोठय़ाप्रमाणात आढळत आहेत. ती खाण्यासाठी गुरे चारणारी, बकर्‍या चारणारे दररोज दाट जंगलात जात आहेत. येताना पानाच्या डोम्यात (द्रोण) आणून आनंद घेत असल्याचे पहावयास मिळत आहे.
या फळामुळे घशाचे आजार होत नाहीत, असे जाणकार लोक सांगतात. त्याचा जो गोड रस असतो तो कफाचे पाणी करून शरिराला ताजेतवाने करतो, असे शेतकरी सांगतात. (वार्ताहर,पालघर)

जव्हारच्या वैभवशाली दरबारी दसऱ्याची कुस्त्यांनी सांगता
जिल्ह्यातील जव्हारच्या वैभवशाली दरबारी दसऱ्याची सांगता परंपरेनुसार कुस्त्यांच्या सामन्यांनी होते. त्यानुसार यंदाही जुना राजवाडा येथील प्रांगणात नगरपालिकेने कुस्त्यांचे सामने भरवले होते. यात आशिया खंडातील सुवर्ण पदकविजेती हर्षदा सैदाणे सहभागी झाली होती. पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेशसह राज्यातील तब्बल ४५० ते ५०० मल्लांनी या सामन्यांत भाग घेतला, तर कुस्तीप्रेमीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळपासून सुरू झालेल्या कुस्त्या उशिरापर्यंत सुरू होत्या. जव्हार केशरी पुरस्कारासाठी विजय दुबळे (मनमाड) व गोटीराम चव्हाण (ईगतपुरी) यांच्यात रोमहर्षक लढत झाली. यात बाजी मारत दुबळे जव्हार केशरीचा मानकरी ठरला. महिलांचा पहिला सामना मुस्कान डाबर (मध्य प्रदेश) विरुद्ध हर्लीन कौर (पंजाब) यांच्यात झाला. हर्लीनने हा सामना जिंकला. महिलांची दुसरी कुस्ती सैदाणे (धुळे) व किरण धनगर (नाशिक) यांच्यात झाली. या चुरशीच्या लढतीत सैदानेने बाजी मारली.vजव्हार नगर परिषदेकडून पहेलवानांना हजारोंची बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संदीप वैद्य, मुख्याधिकारी वैभव विधाते, नगरसेवक, कुस्ती स्पर्धा आयोजक, नगर परिषद कर्मचारी, पंच, मान्यवर, पोलिस अधिकारी होते.
संस्थानकालीन इतिहास
संस्थान काळात जव्हारचे तत्कालीन राजासाहेबांना कुस्ती व कुस्तीप्रेमींबाबत विशेष आस्था होती. जुना राजवाड्याच्या प्रांगणातील पूर्वेला एक भूखंड खास कुस्त्यांच्या आखाड्यासाठी राखीव होता. राजे स्वत: पहिलवानासाठी कसदार खुराक देण्यासाठी आखाड्यात येत त्यांना प्रोत्साहित करत. वेळोवेळी कुस्त्यांचे फड आयोजित करून परिसरातील व जिल्ह्याबाहेरील नामवंत मल्लांना पाचारण करीत. संस्थानाच्या विलिनीकरणानंतर बऱ्याचशा संस्थाकालीन परंपरा बंद झाल्या असल्या तरी कुस्त्यांची आजही सुरू आहे. (म. टा. वृत्तसेवा, पालघर)

वसईत झाडांची खुलेआम कत्तल
वसई : वसई पूर्वेकडील एव्हरशाई परिसरात मुख्य रस्त्यावर असलेली असंख्य झाडे रात्रीच्या वेळी कापण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणावर झाडांची नक्की कत्तल कुणी केली याची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. एव्हरशाईन येथील मशिद परिसर मोठ-मोठय़ा झाडांनी बहरलेला होता. याभागातील झाडे पंधरा ते वीस वर्षे जुनी होती. मात्र शनिवार आणि रविवारी सुट्टीचा दिवस पाहून रात्रीच्या वेळी याभागातील किमान शंभरहून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे हा परिसर आता उजाड दिसू लागला आहे. मुख्य रस्त्याकडेला असलेली झाडे मशीनने कापण्यात आलेली आहेत. कापून अनेक झाडे रातोरात गायब करणत आलेली आहेत. (प्रतिनिधी,लोकमत)

उपनगरीय सेवेवरील ताण वाढला
दर दिवशी ७५ लाखांपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मुंबईच्या उपनगरीय सेवेवरील ताण आणखी वाढल्याचे एप्रिल ते सप्टेंबर २०१६ या सहा महिन्यांच्या कालावधीच्या आकडेवारीतून समोर आले आहे.  पश्चिम रेल्वेवर प्रवासी संख्येत एका टक्क्याने वाढ झाली आहे. पश्चिम रेल्वेवर एप्रिल ते सप्टेंबर २०१६ या दरम्यानची प्रवासी संख्या ६२.१३ कोटी एवढी होती. गेल्या वर्षी या कालावधीत या मार्गावर ६१.७१ कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. राज्य सरकार विविध प्रकल्पांद्वारे उपनगरीय रेल्वेसेवेवर आलेला ताण कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र यापैकी बहुतांश प्रकल्पांना मूर्त रूप आले नसल्याने अजूनही मुंबई प्रदेशातील लाखो प्रवासी या उपनगरीय रेल्वेमार्गावरच अवलंबून आहेत. त्यातही पश्चिम रेल्वेवर भाईंदरच्या पुढे रस्तेजोडणी अत्यंत बिकट असल्याने तेथील प्रवाशांना रेल्वेशिवाय दुसरा पर्याय नाही. रेल्वेमार्गालगत रस्ते नसल्याने रेल्वे सेवेवर वाढणारा भार प्रामुख्याने या आकडेवारीच्या माध्यमातून समोर येत आहे. त्यातच वांद्रे-कुर्ला संकुलात वाढलेल्या रोजगाराच्या संधी, वसई, नायगाव भागात वाढलेली लोकवस्ती यांचे प्रतिबिंबही या आकडेवारीवर उमटले आहे.

नालासोपारा स्थानकावरी तिकीट खिडक्यांना उद्घाटनाची प्रतीक्षा
सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक अशी ओळख असलेल्या नालासोपारा स्थानकावरील तिकीट खिडक्या उद्घाटनाअभावी तशाच ठेवल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या तिकीट खिडक्या तातडीने सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. पालघर जिल्ह्यात नालासोपारा रेल्वे स्थानक हे सर्वाधिक महसूल देणारे स्थानक आहे. येथून सुमारे २,१५,००० प्रवासी दररोज प्रवास करतात. याठिकाणी तिकीट खिडक्या वाढविण्याची मागणी वारंवार होत होती. येथे चार नवीन तिकीट खिडक्या निर्माण करण्यात आल्या आहेत. मात्र उदघाटनाअभावी त्या तयार होऊनही तशाच ठेवल्या आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या खिडक्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी होऊन तासनतास तिकिटांची वाट बघावी लागते. प्रवाशांची दररोज येथे मोठी रांग लागलेली असते. त्यामुळे रेल्वे प्रशासन हे प्रवाशांची सोय बघणार आहे की, उदघाटनासाठी खासदारांची वाट बघणार आहेत असा प्रश्न राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे. खासदारांची वाट न बघता या तिकीट खिडक्या प्रवाशांच्या सोयीसाठी येत्या आठवड्यात सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादीचे वसई जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी केली आहे. त्यांनी मंडळ रेल प्रबंधक, मुंबई यांना निवेदन दिले आहे. येत्या आठवड्यात तिकीट खिडक्या सुरू न केल्यास राष्ट्रवादी कॉग्रेसतरअफे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (म. टा. वृत्तसेवा, वसई)
वाळूमाफिया हे धोकादायकच, उच्च न्यायालयाचे निरीक्षण; कारवाई ठरवली योग्यवाळूमाफिया हे सार्वजनिक शांततामय व सुरक्षित जीवनासाठी धोकादायक असतात, असे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने जळगावमधील एका वाळूमाफियावरील एमपीडीए कायद्याखालील प्रतिबंधात्मक कारवाई योग्य ठरवणारा निकाल नुकताच दिला. वाळू हे खनिज खुले असते आणि सार्वजनिक हितासाठी ते जपणे आवश्यक आहे. बेसुमार वाळू उत्खननाने भूगर्भातील जलपातळीवर परिणाम होतो आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो, हे निदर्शनास आले आहे. वाळूमाफिया हे आपल्या पैशाच्या व गुंडशाहीच्या बळावर लोकांमध्ये दहशत पसरवून वाळूची तस्करी करत असल्याचे अलीकडे दिसून आले आहे. त्यामुळे वाळूमाफिया हे सार्वजनिक शांततामय व सुरक्षित जीवनासाठी धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे. यादृष्टीनेच राज्य सरकारने ‘एमपीडीए’ कायद्याच्या कक्षेत वाळूमाफियांनाही आणले आहे. दंडाधिकाऱ्यांनी त्याअनुषंगाने वस्तुस्थिती लक्षात घेऊन काढलेला प्रतिबंधात्मक आदेश योग्य आहे, असे विजया ताहिलरामानी व न्या. मृदुला भाटकर यांच्या खंडपीठाने नुकतेच एका निकालात स्पष्ट केले. नीलेश ज्ञानेश्वर देसले या रेतीमाफियाविरुद्ध पोलिसांनी चार प्रकरणांत भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे नोंदवले होते. त्याच्याकडून गिरडा नदीच्या पात्रातून वाळू चोरली जात असल्याने त्याला विरोध करणाऱ्यांना तो धमकावत आहे. तसेच तो लोकांमध्ये दहशत पसरवत आहे, असे पोलिसांना कळले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायद्या’न्वये (एमपीडीए) कारवाई प्रस्तावित केली. त्यानुसार, जळगाव जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी १६ मार्च २०१६ रोजी ‘एमपीडीए’ कायद्याखाली आदेश काढून त्याला ताब्यात घेण्याचे आदेश काढले होते. या आदेशाला देसलेने त्याचा मित्र हरीष पाटील याच्यामार्फत फौजदारी रिट याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पोलिसांनी याप्रकरणी दोन साक्षीदारांच्या साक्षी ‘इन कॅमेरा’ नोंदवल्या होत्या. त्यात ‘वाळूचोरीबद्दल तक्रारी करणाऱ्यांना देसले मारहाण करतो, तसेच कोणी तक्रार केली तर जिवंत ठेवणार नाही, अशा धमक्या भरचौकात सर्वांना देतो’, असे साक्षीदारांनी नोंदवले. यामध्ये मारहाणीने पीडित असलेल्या एका साक्षीदाराचाही समावेश होता. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने साक्षींची सत्यता नीट तपासली नाही आणि दंडाधिकाऱ्यांना सर्व पुराव्यांची शहानिशा करण्यासाठी पुरेसा वेळच मिळालेला नसल्याने आदेश सदोष आहे, असा युक्तिवाद देसलेतर्फे अॅड. आयेशा अन्सारी यांनी केला. तर दंडाधिकाऱ्यांनी पूर्ण विचाराअंतीच योग्य आदेश काढला असल्याचा युक्तिवाद सहायक सरकारी वकील माधवी म्हात्रे यांनी मांडला. अखेर दोन्ही बाजू ऐकल्यानंतर खंडपीठाने दंडाधिकाऱ्यांचा आदेश योग्य ठरवला. (म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई)

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home