Wednesday, October 12, 2016

पालघर न्यूज १२ ऑक्टोबर
 महिलांच्या सुरक्षेसाठी वसईत दामिनी पथक
वसई : शहरातील वाढत्या विनयभंग आणि बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी पालघर जिल्हा ग्रामीण पोलीसांनी दामिनी पथकाची स्थापना केली असून,त्यात विशेष प्रशिक्षित महिलांचा समावेश करण्यात आला आहे.
भर रस्त्यावर, गल्लीबोळात तरुणींची रोड रोमियोंकडून छेड काढली जाते. गर्दीचा फायदा घेवून अनेक जण महिलांशी लगटही करतात. त्यांची तक्रार करण्यास महिलांकडून संकोच केला जातो. तक्रार केल्यास पोलीसांच्या चौकशीचा फेरा आणि त्यानतंर दुखावलेल्या रोड रोमीयोकडून होणार्‍या दगाफटक्याच्या चिंतेमुळे कित्येक तरुणी गप्प बसतात. त्यामुळे छेड काढणार्‍यांची हिंमत वाढत जाते.ही बाब लक्षात घेवूनच दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. १४ बुलेट गाड्यांवरून विशेष प्रशिक्षित अशा महिला शाळा, महाविद्यालये बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी या महिला गस्त घालणार आहेत. त्यासाठी पोलीसांनी १४ बुलेटची मागणी महापालिकेकडे केली आहे.बीट मार्शलच्या धर्तीवर हे पथक कार्य करणार आहे. या महिला पोलीसांना फक्त गस्त घालण्याचे काम देण्यात येईल.त्यांना मार्शल आर्टचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे वेळप्रसंगी त्या गुंडांशी सामनाही करू शकतील, असे पालघरच्या पोलीस अधिक्षिका शारदा राऊत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी,लोकमत)

पालघर स्थानकात सहा प्लॅटफॉर्म
पालघर रेल्वे स्थानकात सहा प्लॅटफॉर्म उभारले जातील, असे ठोस आश्वासन रेल्वे मंत्रालयाने दिल्याची माहिती खासदार चिंतामण वनगा यांनी दिली. पालघर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर अत्यल्प दरात पाणी उपलब्ध करून देणाऱ्या पाणपोईचे उद्घाटन सोमवारी वनगा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. डहाणू ते विरारदरम्यानच्या विविध विकासकामांसाठी सुमारे १२०० कोटी निधी उपलब्ध होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. स्थानकासोबत प्रवाशांच्या सोयी-सुविधांसाठीही प्रयत्नशील असून सोमवारपासून सुरू केलेली जादा लोकल हे त्याचे उदाहरण आहे, असे वनगा यांनी सांगितले. इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझमच्या माध्यमातून ही पाणपोई आरओ, युवी ट्रीटमेंट व थंड पाणीयुक्त असून प्रवाशांना अत्यल्प दरात शुद्ध पिण्याचे पाणी याद्वारे मिळणार आहे. ३००मिली ग्लासासाठी १ रुपया, ५००मिलीसाठी ३ रुपये, १ लिटरसाठी ५ रुपये, २ लिटरसाठी ८ रुपये व ५ लिटरसाठी २० रुपये मोजावे लागणार आहेत. हे पाणी सीलबंद बाटलीत मिळणार आहे. (म. टा. वृत्तसेवा, पालघर)

नवघर-माणिकपूरातील बांधकामांना संरक्षण
 वसई : एका बेकायदा बांधकामप्रकरणी चुकीचे कारवाई करून त्याला संरक्षण देणारे सहाय्यक आयुक्त राजेश घरत यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार आनंद ठाकूर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. नवघर-माणिकपूर शहरातील १00 फुट रोड येथील सुप्रसिद्ध एव्हरशाईन इस्टेट सोसायटीमध्ये झुझर इस्माईल पटेल यांनी त्यांच्या घरासमोर सोसायटीच्या आवारात केलेल्या अनधिकृत आलिशान बांधकामाविरुद्ध सोसायटीने गेल्या ९ महिन्यापूर्वी रितसर तक्रार करूनही त्याची दखल सहाय्यक आयुक्त राजेश घरत यांनी घेतली नाही. याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकूर यांनी आयुक्त सतीश लोखंडे यांच्याकडे या बाबतीत विचारणा केल्यावर आयुक्तांनी अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या सूचना दिल्यावरून घरत यांनी अनधिकृत बांधकाम करणार्‍या झुझर पटेल यांना अनधिकृत बांधकाम पाडण्याकरता नोटीस बजावली होती. मात्र, जाणीवपूर्वक जुजर पटेल असे चुकीचे नाव लिहून नोटीस बजावली. जेणेकरून कोर्टामध्ये स्टे मिळेल. त्यानंतर स्टे मिळाल्याचे कारण सांगून वेळ मारून नेली. अशाप्रकारे नाव चुकवणे, सातबारा नंबर चुकवणे इ. प्रकार पालिकेतील सहा.आयुक्त करीतच असतात, याकडे आमदार ठाकूर यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. नोटीस चुकीची असल्याने झुझर पटेल यांच्या बांधकामांना अपेक्षेप्रमाणे कोर्टातून स्टे मिळाला. परंतु सोसायटीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि आमदार आनंद ठाकूर यांच रेट्यामुळे महापालिकेने न्यायालयीन प्रक्रिया करून स्टे उठवला. स्टे उठल्यानंतरही घरत कारवाही करीत नव्हते. शेवटी पुन्हा एकदा आमदार ठाकूर यांनी आयुक्त लोखंडे यांना पत्र देऊन या अनधिकृत बांधकामावर कारवाही करावी अन्यथा आम्हाला दखल घ्यावी लागेल असा इशारा दिल्यानंतर हे बांधकाम पाडण्यात आले. ..तरी एमआरटीपीचा गुन्हा नाही? बांधकाम पाडते वेळी झुझर पटेल यांनी पालिका अधिकारी नितीन वनमाळी यांच्या अंगावर धाऊन गेले. कॉलर पकडून धक्काबुक्की केली आणि बघून घेईन, सोडणार नाही अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. त्याचबरोबर दुसरे अधिकारी कौस्तुभ ताबोरे यांचाही गळा पकडून धमकी दिली. यावेळी अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी संरक्षण देण्याकरीता असणारी पोलीस यंत्रणा हजर असतनाही झुझर पटेल यांचेवर एम.आर.टी.पी. कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला नाही.  यावेळी घरत स्वत: घटनास्थळी हजर होते. पण, कारवाई झाल्यानंतर पटेल यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा नोंदवणे आवश्यक असताना नोंदवण्यात आला नाही. त्यामुळे याप्रकरणात घरत कर्तव्य बजावण्यात कसूर करत असून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी आमदार ठाकूर यांनी आयुक्तांकडे केली आहे.

फेरीवाल्यांमुळे नाकीनऊ
वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात रस्त्यावर बसून रहदारीला अडथळा करणाऱ्या फेरीवाल्यांवर दररोज कारवाई करा, रस्ते व फूटपाथ मोकळे ठेवा, असे आदेश पालिका आयुक्तांनी वेळोवेळी प्रशासनाला दिले आहेत. रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांना ठरलेल्या फेरीवाला झोनमध्ये बसविण्याचा प्रयत्न पालिकेकडून केला जात आहे. मात्र ते रस्त्यावरच बसत असून, पालिका कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. रस्ते-फूटपाथवर फेरीवाले बसत असल्याने वाहतूककोंडी कायम आहे. फेरीवालाराज असेच सुरू राहिल्यास रस्ते व फूटपाथ मोकळे श्वास कधी घेणार, असा सवाल नागरिक विचारत आहेत. (मयुरेश वाघ, म. टा. वृत्तसेवा,वसई )

समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेची मोहीम
विरारजवळील राजोडी समुद्रकिनारा पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. या किनाऱ्यावर ‘आमची वसई’ समूहाकडून नुकतीच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. वसईचे सर्व समुद्रकिनारे स्वच्छ राहावेत, यासाठी अशा मोहिमा सुरूच ठेवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ‘स्वच्छ वसई, सुंदर वसई, आमची वसई’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘आमची वसई’ने वसईतील सातही समुद्रकिनारे स्वच्छ करण्याचा संकल्प केला आहे. त्याअंतर्गत आधी दोन किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबविली गेली होती. राजोडी किनाऱ्यावर जवळपास तीन तास स्वच्छता करण्यात आली. त्यात ४० गोणी कचरा जमा करून त्याचे वर्गीकरण करण्यात आले. गावातील तरुण तसेच ग्रामस्थांनी या मोहिमेला सहकार्य केले. पर्यटक, नागरिकांना पर्यावरण स्वच्छता, संवर्धन, संरक्षण आणि जनजागृतीचे महत्त्व सांगण्यात आले. देशभत्तीपर गीते व जयघोषाने राजोडी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेची सांगता करण्यात आली. वसईतील समुद्र किनाऱ्यांचे अनेक प्रकारे विद्रुपीकरण होत आहे. अनैतिक व्यवसाय, वाळूचा उपसा, किनारपट्टीची खारफुटी झाडी आणि सुरूच्या बागेत होणारी वृक्षतोड असे प्रकार किनाऱ्यावर होत आहेत. धूपप्रतिबंधक बंधारा नसल्याने समुद्राचे जमिनीवर आक्रमण वाढत आहे. रानगाव समुद्रकिनाऱ्याच्या वाळूत कच्च्या तेलाचे प्रमाण जास्त आहे. अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मांसाची चटक लागलेल्या कुत्र्यांची संख्या प्रचंड आहे. भुईगावला प्लॅस्टिक कचरा सर्वात जास्त आहे. किनाऱ्याला लागून अवैध रिसॉर्ट व लॉज असल्याने तेथे अनैतिक प्रकार सुरू असतात. एकूणच बेशिस्ती व यंत्रणांचे दुर्लक्ष झाल्याने किनारे अस्वच्छ बनले आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्व वसईकरांनी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. (म. टा. वृत्तसेवा, वसई)

तक्रारीस नकार दिल्याने तरुणाची आत्महत्या
पत्नी व तिच्या प्रियकराविरोधात डहाणू तालुक्यातील वाणगाव पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याने कोटीम गावातील विकास अनंत पालेकर (३०) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
विकास पत्नीचे अनैतिक संबंध असल्याची तक्रार करण्यास शुक्रवारी वाणगाव पोलिस ठाण्यात गेला होता. मात्र पोलिसांनी त्याची दखल न घेता उलट खिल्ली उडवली. त्यामुळे निराश होऊन विकासने हे पाऊल उचलल्याचा आरोप त्याची आई गुलाब पालेकर यांनी केला आहे. दोनच्या सुमारास विकासने आत्महत्या केली. याप्रकरणी चौकशीचे आश्वासन वरिष्ठांकडून मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी २४ तासांनी मृतदेह ताब्यात घेतला. संबंधित महिला, तिचा प्रियकर व तक्रार न घेणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी विकासच्या कुटुंबीयांनी केली आहे. (म. टा. वृत्तसेवा, पालघर)

जुन्या वर्सोवा पुलामुळे अचानक उद्भवणाऱ्या कोंडीतून वाहनचालकांना तूर्तास दिलासा
गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणारी वाहने थांबवण्यासाठी पालघर जिल्ह्यातील तलासरी भागात एमएसआरडीसीच्या बॉर्डर चेक पोस्ट येथील उपलब्ध जागेवर 'पार्किंग तळ' उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. त्याठिकाणी अंदाजे एक हजाराहून अधिक अवजड वाहने उभी केली जाऊ शकतात, असा अंदाज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत व्यक्त केला होता. तेथील जागांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्याठिकाणी दापचरी भागात डेअरी विभाग आणि आरटीओ विभागाच्या अखत्यारित असलेल्या जागेचा अभ्यास करून तेथे अवजड वाहनांचे ‘पार्किंग तळ’ उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. १४ एकरांवर विखुरलेल्या या जागेत सुमारे १३०० ते १५०० अवजड वाहने उभी राहू शकतात. तसेच गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर रस्त्याच्या कडेला एक किलोमीटरचा भाग 'बॅरिकेडिंग' करून अवजड वाहनांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याठिकाणीही ३०० अवजड वाहने ओळीने उभी राहू शकतात. त्यामुळे गुजरातकडून येणारी २००० वाहने चेकपोस्ट आधीच रोखून त्यांना क्रमाक्रमाने पुढे सोडण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. खारेगाव टोलनाक्यावर ऐन वाहतूककोंडीदरम्यान टोलवसुली केली जात असल्याने वाहनांच्या लांबचलांब रांगा लागत होत्या. त्याबाबतही टोलनाका प्रशासनाला वाहतूककोंडीप्रसंगी वाहनांकडून टोल न घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत मुंबई-नाशिक महामार्गावर होणारे कोंडीचे प्रमाण कमी झाले आहे. (म. टा. प्रतिनिधी, ठाणे)


मनसेचे खड्डय़ांविरोधात अनोखे आंदोलन, खडड्यातील पाण्याने आंघोळ : महिलांनी काढल्या खड्डय़ांभोवती रांगोळ्या.
वसई : या शहरात ठिकठिकाणी पडलेल खड्ड्यांविरोधात मनसेने मंगळवारी अनोखे आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी खड्डय़ातील पाण्याने आंघोळ केली. तर महिला कार्यकर्त्यांनी खड्ड्यांभोवती रांगोळया काढल्या. वसई विरार परिसरात अनेक भागात मोठाले खड्डे पडले आहेत. गणोशोत्सवाच्या आधी पालिकेने काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतर आलेल्या पावसाने रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले असून ठेकेदाराचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. दोन दिवसांपूर्वी मनसेने पोलीस अधिकार्‍यांची भेट घेऊन खड्ड्याला जबाबदार असलेल्या अधिकारी आणि ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांविरोधात हे आंदोलन केले. (वार्ताहर,लोकमत)

 विक्रमगडमध्ये डासांचे साम्राज्य
विक्रमगड : सध्यस्थित विक्रमगड व विविध परिसरात डासांची मोठया प्रमाणावर पैदास झाली असून सकाळी-सायंकाळी व रात्री डासांच्या चाव्याने अंगावर गाठी उमटत असून या डासांच्या चाव्यामुळे वृध्द, महिला व लहान मुले यांच हाल दिसत आहेत. या समस्येने नागरिक त्रस्त झाले असले तरी आरोग्य विभागाचे सपशेल दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. जागोजागी साठलेल्या सांडपाण्याच्या डबक्यांवर डासांची मोठी पैदास होत असून घरातील कानाकोप-यांत डासांचे मोठे साम्राज्य असते त्यावर कितीही उपाय योजना करा. मात्र डास हटत नाही आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य अशी फवारणी केली जात नसल्याने डासांचे मूळ नष्ट होण्या एैवजी वाढीस लागलेले आहे. याचा परिणाम जनतेला मलेरियाशी सामना करावा लागण्यात होतो. सायंकाळच्या व सकाळच्या वेळेस जर डासांना मारण्याकरीता फेरफटका मारला तर त्यात अनेक डास मरतात. रुग्ण मलेरियातून बरा होईपर्यत किमान एक ते दिड महिना लागतो. (वार्ताहर,लोकमत) विक्रमगडच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्ण बरा होण्यासाठी जातो मात्र सायंकाळ सुरुवात झाली की डासांचा लौढाचे-लोंढा या रुग्णालयाला लक्ष करुन रुग्णालयातील कर्मचारी, रुग्णांच्या वार्डामध्ये शिरकाम करुन येथील रुग्ण व कर्मचार्‍यांना बेजार करुन टाकत असल्याची प्रतिक्रिया कर्मचारी व रुग्णांनी दिली. डासांच्या जाण्याकरीता धुर, कछुवा छाप अगरबत्ती वगैरे काही लावले तरीही ते हटत नाही. यांचे गांभीर्य लक्षात घेवून विक्रमगडच्या आरोग्य विभागाने त्वरीत धुरांडे व फवारणी करण्याची मागणी होत आहे.

चार दिवसात सहा अल्पवयीन बेपत्ता
विरार : वसई तालुक्यातून चार दिवसात सहा अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नालासोपाराच्या पूर्वेकडील वलईपाडा याठिकणी राहणारी अंकिता हिरोजी तुळसकर (१७) ही मुलगी गरबा खेळण्यास घरातून गेली होती. रात्नी गरब्याचा खेळ संपला तरी ती घरी परतली नाही. म्हणून तिचा शोध घेऊन ती सापडत नसल्याने तिचे वडील हिरोजी अंकुश तुळसकर यांनी तुळींज पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. गोखिवरेतील खडकपाडा येथून शामू मन्नीलाल सरोज (१२) हा शिकवणीसाठी गेला होता. शौचाचे कारण देत तो शिकवणीतून घरी गेला होता. पण तो कुठे गेला याचा तपासच लागला नाही. म्हणून त्याचे वडील मन्नीलाल बुडुल सरोज यांनी वालिव पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे. नालासोपारा पूर्वेकडील घरकुलनगर मोरेगाव नाका येथील सतरा वर्षीय हर्षदा रमेश पाटील ही रात्नीसाडे नऊ वाजता घरातून शौचासाठी बाहेर गेली. ती परतली नसल्याने बेपत्ता झाल्याची तक्र ार तुळींज पोलीस ठाण्यात रमेश दत्ताराम पाटील यांनी केली आहे. विरार मधील फुलपाडा येथील नारायण नगरमध्ये राहणारी माधुरी मंगेश खेडेकर (१६) ही घरातून गायब झाल्याची तक्र ार विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नालासोपारा डांगेवाडी येथील जमील शकील शेख यांची मेहुणी आफिया रईस खान (१६) आणि भाची कौशरजहाँ रिजवान खान (१४) या दोघी हजरत चाबूक शहा दर्गात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्या घरी परत आल्या नाहीत म्हणून नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर,लोकमत)
पोलिसांचा तपास सुरू, एक तर सर्वच प्रकरणांमध्ये थातूरमातूर कारणे देऊन अल्पवयीन मुले घरे सोडून गेल्याने पोलीस घटने मागची पूर्वपिठीका जाणून घेत आहेत. बर्‍याच वेळा मुले मित्रांना आपली मनस्थिती सांगतात, त्या दृष्टीनेही पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home