Monday, October 10, 2016

पालघर न्यूज १० ऑक्टोबर


वैतरणा, पारगाव पुलांना धोका!, माफियांकडून रात्रंदिवस उत्खनन, तहसीलदारांकडून किनारपट्टीच्या गावांमध्ये जनजागृती, लोकांचा प्रतिसाद.
पालघर : वैतरणा खाडीतून बेकायदेशीर रेती उत्खननामुळे वैतरणा रेल्वे पुलासह पारगाव पुलाला धोका निर्माण झाला आहे. सअपघाताच्या शक्यतेचा विचार करुन भविष्यात रस्ते, रेल्वे पुलाच्या सुरक्षिततेची बाब शासन स्तरावरून गांभीर्याने घेतली गेली आहे. पालघर तालुक्यातील सफाळे-वैतरणा खाडीवरील रेल्वे पूल क्र . ९२ व ९३ च्या दोन्ही बाजू कडील ६00 मीटर परिसरातून बेकायदेशीररित्या रेती उत्खनन केले जात असल्याने रेल्वे गाड्यांना होणारा धोका लक्षात घेता रेल्वे प्रशासनाच्या सुचने वरून जिल्हाधिकार्‍यांनी अशा रेती उत्खननास पूर्णत: बंदी घातली आहे.

नालासोपारा पुलावर मोठाले खड्डे
वसई : नालासोपारा रेल्वे उड्डाणपूलावर मोठाले खड्डे पडल्याने याठिकाणी वाहतुक कोंडी होऊ लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पडलेल्या खड्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नालासोपारा पूर्व-पश्‍चिमेला जोडणार्‍या रेल्वे उड्डाणपूलावर अनेक ठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. पश्‍चिमेला पूलाच्या सुरुवातीलाही मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

टेंभी कोल्हापूर ग्रामपंचात लाचखोर ग्रामसेवक निलंबित, लाचखोर आरोग्य सेविकेची चौकशी सुरु
वसई : प्रॉपर्टी कार्डावरील नाव बदलण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणार्‍या टेंभी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नरेश मोकाशी यांना जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे. आरोग्य खात्यातील आरोग्य सहाय्यिका जयश्री गाढे यांना लाच लुचपत खात्याने मार्च २0१४ मध्ये अटक केली होती.  याप्रकरणी गाढे यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली आहे.

देवतलाव-अर्नाळा रस्त्यावरील खड्डे बुजवा
वसई : देवतलाव ते अर्नाळा रस्त्यावर ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले असून ते ताबडतोब बुजवण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे करण्यात आली आहे.
पावसामुळे देवतलाव ते अर्नाळा या पश्‍चिम पट्ट्यातील मुख्य आणि एकमेव रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. 

 मुंबईच्या डबेवाल्यांची आदिवासींसाठी कपडा बॅंक
मुंबई - रोटी बॅंक सुरू केल्यानंतर मुंबईचे डबेवाले आता कपडा बॅंक सुरू करत आहेत. या कपडा बॅंकेतून पालघर जिल्ह्यातील आदिवासींना कपडे देण्यात येणार आहेत. मुंबईकरांनी आपले जुने कपडे डबेवाल्यांना द्यावेत, असे आवाहन डबेवाल्यांच्या संस्थेने केले आहे. हे जुने कपडे दिवाळीत पालघर, जव्हार, मोखाडा, तलासरी येथील आदिवासींना देण्यात येणार आहेत. आदिवासी आणि त्यांच्या मुलांना अंगभर कपडेही मिळत नाहीत. सणासुदीच्या दिवसांत तर नवीन कपडे मिळणे तर दुरापास्त. आपल्याकडील जुने किंवा आपण वापरत नसलेले कपडे आदिवासींना दिल्यास त्यांना निदान अंगभर कपडे तरी मिळतील, असे डबेवाल्यांनी म्हटले आहे. कपडा बॅंकेला जुने कपडे देऊ इच्छिणाऱ्यांनी प्रत्येक रेल्वे स्टेशनवर सकाळी 8 ते 10 आणि दुपारी 4 ते संध्याकाळी 6 या वेळेत असलेल्या डबेवाल्यांच्या प्रतिनिधीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणीच राहावे लागेल!
ग्रामीण भागात जिल्ह्याच्या सरकारी नोकरीत असतानाही अनेक कर्मचारी जवळच्या खेड्यातून, मूळ गावातून येत असतात. त्यांना घरभाडे (एचए) यापूर्वी मिळत होते. यासाठी कामाच्या ठिकाणीच राहण्याची सक्‍ती अथवा अट नव्हती. मात्र, त्यामुळे ऐनवेळी सरकारला एखादी अधिकारी अथवा कर्मऱ्याची जनकल्याणकारी भावनेतून तात्काळ गरज भासली तर अशावेळी संबधित अधिकारी अथवा कर्मचारी वेळेत उपलब्ध होणे अशक्‍य ठरत होते. याबाबतच्या कर्मचारी-अधिकारी यांच्याविरोधात अनेक तक्रारी नागरिकांकडून झालेल्या आहेत. यावर मात करण्यासाठी अर्थ विभागाने ज्या ठिकाणी नोकरीस आहे, त्याच ठिकाणी राहणे सक्‍तीचे केले आहे. जो कोणी अधिकारी-कर्मचारी याचे पालन करणार नाही, तर त्यास घरभत्ता मिळणार नाही. त्यामुळे यापुढे ग्रामीण भागात नोकरी करताना घरभाडे मिळवण्यासाठी ज्या ठिकाणी नोकरी करत आहात, त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना राहण्यावाचून पर्याय राहिला नाही.

आदिवासींचा रोजगार : काकडी, रताळे व दोडक्यांनी त्यांना दिला आधार, ग्राहकांचीही ऑरगॅनिक फूडला पसंती
जव्हार : तालुक्यातील रायतळे हद्दीतील जव्हार-नाशिक महामार्गावर तेथील आदिवासीबांधव आपली छोटेखानी दुकाने लावून पावसाळ्यात मिळणारी गावठी काकडी, रताळे, दोडके, कारले, पालेभाज्या इत्यादी वस्तू विक्रीकरिता आणत असून छोटेखानी व्यवसाय करून आपले व कुटुंबाचे पालनपोषण करताना दिसत आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home