Saturday, October 29, 2016

पालघर वार्तापत्र २९ ऑक्टोबर

पालघर वार्तापत्र २९ ऑक्टोबर

================================================

नालासोपाऱ्यातील नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, महिलेकडे पाहून अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप

नालासापोरा येथील महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३५चे नगरसेवक मार्शल लोपिस यांच्यावर एका महिलेस अश्लील शेरेबाजी केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा कुठलाच प्रकार झाला नसून हा मला बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचा दावा नगरसेवक लोपिस यांनी केला आहे.

पीडित महिला पेशाने अभियंता असून समाजसेविका आहे. त्या नालासोपारा पश्चिमेच्या नानभाट येथे राहतात. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार १७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी त्या आपल्या मैत्रिणीसह नानभाट येथील पालिकेच्या तलावाजवळ फिरण्यासाठी गेल्या होत्या.

त्या वेळी नगरसेवक मार्शल लोपिस आपल्या मित्रांसह तेथे आले होते. मला उद्देशून त्यांनी अश्लील शेरेबाजी केली आणि त्यामुळे माझ्या मनात लज्जा उत्पन्न झाली, अशी तक्रार त्यांनी पोलिसात केली आहे. या प्रकाराने पीडित महिला भांबवली होती. त्यांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. मात्र नंतर त्यांनी वसईच्या विभागीय पोलीस उपअधीक्षकांकडे तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरसेवकाने आरोप फेटाळले
नगरसेवक मार्शल लोपिस यांनी विनयभंगाचा आरोप फेटाळून लावला आहे. असा कुठलाही प्रकार घडलेला नाही. मी कुठलीच शेरेबाजी केलेली नाही, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी कुठलीही खातरजमा न करता हा गुन्हा दाखल केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. हा राजकीय षड्यंत्राचा भाग असल्याचेही लोपिस यांनी सांगतिले.

पीडित महिलेची तक्रार आमच्याकडे आली होती. त्या तक्रारीनुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. अद्याप अटक करण्यात आलेली नाही
– रवींद्र बडगुजर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा

वैमनस्यातून शेरेबाजी
पीडित महिला आणि नगरसेवक लोपिस हे एका पक्षात होते. निवडणुकीत पीडित महिलेने त्यांचा प्रचारही केला होता. परंतु दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झाले होते. याच वैमनस्यापोटी त्यांनी माझ्यावर मानहारीकारक अश्लील शेरेबाजी केल्याचे पीडित महिलेने सांगितले.

मी हा प्रकार पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातला होता. प्रकरण संपले होते. पण नगरसेवकाने माझी समाजमाध्यमावर बदनामी केली. त्यामुळे मला तक्रार करावी लागली.
– पीडित महिला

================================================

सागरी किनार्‍यावरील रिसॉर्टमध्ये देहविक्री
वसई : वसई तालुक्यातील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिसॉर्टमध्ये मोठय़ा प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरू असून गावाला बट्टा लावणारे हे रिसॉर्ट कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकूर यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
तालुक्याच्या पश्‍चिम पट्टय़ात असलेल्या अर्नाळा, कळंब, राजोडी या सागरीकिनारी असंख्य रिसॉर्ट फोफावले आहेत. पर्यटकांची संख्या अगदीच नगण्य असतानाही हे रिसॉर्ट तुफान धंदा करीत आहेत. त्यातील असंख्य रिसॉर्ट हे बेकायदेशीर आहेत. त्यांच्याकडे कोणताही परवाना नसताना अल्पदरात खोली उपलब्ध करून दिली जात असल्यामुळे शारीरिक संबंधांसाठी त्याचा वापर केला जात आहे. अनेक किशोरवयीन मुले-मुली त्यामुळेच अशा रिसॉर्टकडे आकर्षित होऊ लागली आहेत. त्यामुळे त्यांचे भवितव्याबरोबरच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राजोडी गावकर्‍यांनी तर वेशीवर फलक लावून विरोध सुरु केला आहे. तर रविवार आणि सुटीच्या दिवशी गावकरी संशयास्पद प्रेमीयुगुलांना पिटाळून लावत असतात.काही रिसॉर्टवाल्यांनी तर खोल्यांबरोबरच वेश्याही पुरवण्याचा धंदा सुरू केला आहे. त्यामुळे मुंबईकरही या रिसॉर्टकडे वळू लागले आहेत. अशा रिसॉर्टमध्ये गुंगीचे औषध पाजून बलात्कारही करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या चार महिन्यांत अशा तीन केसेस दाखल झाल्या आहेत. प्रेमीयुगुलांचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्याही रिसॉर्टमध्ये घडल्या आहेत. तर पोलिसांनी काही मुलींना वेश्या व्यवसाय करतानाही पकडले होते.
काही स्थानिक पोलिसांचा अशा रिसॉर्टला पाठिंबा असल्यामुळे कारवाई होत नसून रिसॉर्ट कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकूर यांनी पालघरच्या पोलीस अधीक्षक शारदा राऊत यांच्याकडे केली आहे. दुसरीकडे, अनेक रिसॉर्टचालकांनी सरकारी जमीन लाटली आहे. कळंब-राजोडी परिसरात तर समुद्रकिनार्‍यावरच्या बेकायदेशीरपणे रिसॉर्ट बांधण्यात आलेली आहे. बहुतेकांकडे कोणतेही परवाने नाहीत. (प्रतिनिधी)

================================================

किनारपट्टींच्या सुरक्षेसाठी वसईत तीन नवी सागरी पोलीस ठाणी
पोलीस अधीक्षकांकडून गृहखात्याकडे प्रस्ताव
वसईतील सागरी किनारपट्टीचा भाग लक्षात घेऊन सागरी सुरक्षेच्या दृष्टीने वसईत तीन नवीन सागरी पोलीस ठाणी निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांनी गृहखात्याकडे पाठवला आहे. यामुळे वसईतील पोलीस दलात वाढ होण्यासही मदत होणार आहे. वसई-विरार शहरात सध्या सात पोलीस ठाणी आहेत. वसईच्या पश्चिम किनारपट्टीचा भाग हा सागराने वेढलेला आहे. सागरी किनारपट्टी ही नेहमीच सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जाते. मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा सागरी मार्गाने झाला होता.

१९९३ मध्ये मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळी बंदरातून स्फोटके आणली गेली होती. तेव्हापासून सागरी सुरक्षा महत्त्वाची मानली जातात. संपूर्ण पालघर जिल्ह्य़ात २३ पोलीस ठाणी असून त्यापैकी १० पोलीस ठाणी ही सागरी आहेत. त्यात वसईतील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचा समावेश आहे. त्यामुळे वसईची सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी तीन नवीन सागरी पोलीस ठाणी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी सागरी पोलीस ठाणी नायगाव, बोळींज आणि वैतरणा या  परिसरात उभारण्यात येणार आहेत.

पदे रिक्त
वसई-विरार शहरातील सात पोलीस ठाण्यात पोलीस बळ कमी आहे. सात पोलीस ठाण्यांना मिळून २०० हून अधिक मंजूर पदे रिक्त आहे. तसेच दोन हजार लोकसंख्येमागे अवघा एक पोलीस असे सध्याचे प्रमाण आहे. नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती झाल्यास पोलीस बळ वाढेल, तसेच साधनसामग्रीत वाढ होणार आहे. पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी यापूर्वी मीरा-भाईंदर आणि वसई-विरार आदींना मिळून स्वत्रंत सागरी आयुक्तालय स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही.

सागरी पोलीस ठाण्यांचे काम इतर पोलीस ठाण्यांपेक्षा वेगळे असते. कारण सागराशी संबंधित बंदोबस्त, गुन्हे हे वेगळ्या प्रकारचे असतात. केंद्र सरकारचेही त्यावर नियंत्रण असते. आपली किनारपट्टी अधिकाअधिक सुरक्षित आणि भक्कम करण्याचा हा प्रयत्न आहे.
– शारदा राऊत, पोलीस अधीक्षक

================================================

अतिसारामुळे आदिवासी बालमृत्यूत वाढ
संदीप आचार्य
२४ जिल्ह्य़ांमधील अंगणवाडय़ांमधून ‘ओआरएस’ बेपत्ता
राज्यातील अतिसारामुळे मोठय़ा प्रमाणात आदिवासी बालकांचे मृत्यू होत असताना चिक्की खरेदीसाठी आटापीटा करणाऱ्या महिला व बालकल्याण मंत्रालयाकडून अंगणवाडय़ांसाठी क्षार संजीवनीची (ओआरएस) खरेदी करण्यास गेले दीड वर्ष टाळाटाळ होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त विनिता सिंघल यांनी ‘ओआरएस’ची खरेदी जुलैमध्ये प्रधान सचिवांना लेखी पत्र पाठवूनही कोणतीही खरेदी आजपर्यंत खरेदी करण्यात आली नाही.
राज्यातील सोळा जिल्ह्य़ातील आदिवासी भागात पावसाळ्यात पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही. प्रामुख्याने आदिवासी पाडे, तांडे, वाडी येथे दुषित पाणी असते. यामुळे कॉलरा- अतिसाराचे प्रमाण वाढते. ऑक्टोबरमध्ये तसेच मे महिन्यात उन्हाळ्यामुळे दुषित पाण्यामुळे  अतिसार होतो. यामध्ये सहा वर्षांपर्यंतच्या बालकांचे प्रमाण अधिक असून अशी बालके अत्यंत कमी वजनाच्या श्रेणीत दाखल होतात. त्यातूनच ही कुपोषित बालके मृत्यूमुखी पडतात. गावात मुलांना अतिसार झाल्यास स्थानिक पातळीवर दवाखान्यात पोहोचेपर्यंत कोणतेही औषध उपलब्ध नसते. त्यामुळे आंगणवाडय़ांमध्ये ‘ओआरएस’ उपलब्ध करून देण्याचे सुस्पष्ट धोरण केंद्र शासनाने आखले आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून आंगणवाडय़ांसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या दरकरारावर ओआरएसची खरेदी करण्यात येत होते.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांमध्येही आंगणवाडय़ांमध्ये ओआरएसचा साठा असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. डायरियामुळे मानवी शरीरातील महत्त्वाची पोषण तत्त्वे निघून जातात. परिणामी सहा वर्षांखालील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे विनिता सिंघल यांनी प्रधान सिचिवांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

‘ओआरएस’ची गरज..
आंगणवाडय़ांमध्ये महिला व बालकल्याण विभागाने ओआरएस उपलब्ध करून दिल्यास शेकडो बालमृत्यू रोखणे शक्य असतानाही कोणतेही खरेदी करण्यात आली नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

परिस्थिती काय?
राज्यात ९७ हजार बालके कमी वजनाची किंवा अत्यंत कमी वजनाची असून एकटय़ा पालघरमध्ये ६०० बालमृत्यू झाल्यानंतरही आंगणवाडय़ांसाठी ओआरएसची खरेदी करण्यात आलेली नाही. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ५५३ ग्रामीण व आदिवासी प्रकल्पांमध्ये सहा महिने ते सहा वर्षांपर्यंत ५९ लाख ४५ हजार बालके असून गर्भवती व स्तनदा मातांची संख्या ११ लाख १३ हजार १३७ एवढी आहे. एकूण ९३ हजार आंगणवाडय़ा व मिनी आंगणवाडय़ांसाठी ३६ लाख ५७ हजार ५४० ओआरएस सॅचेटची आवश्यकता असून यासाठी अवघे सहा कोटी ७० लाख रुपये खर्च येणार आहे.

================================================

मोखाडा तालुक्यातील बालमृत्यू
प्राजक्ता कासले, वाडा/मोखाडा
मोखाडा तालुक्यातील बालमृत्यूंची ओरड झाल्यावर शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली. मंत्र्यांचे दौरे सुरू झाले अन् रुग्णालये चकचकीत करण्यात आली. सारे काही ठीकठाक असल्याचे चित्र निर्माण केले गेले. पण पावसाळा ओसरला तशी परिस्थिती बदलली. रुग्णालये पुन्हा भकास पडली. पुढील पावसाळ्यात कुपोषणाची समस्या वाढल्यावर पुन्हा धावाधाव. वर्षांनुवर्षे हेच सुरू आहे. मूळ समस्येच्या खोलात मात्र जाण्यात शासकीय यंत्रणा कमी पडत आहे.

गेल्या महिन्यात मोखाडाच्या सरकारी रुग्णालयात पोहोचलो होतो तेव्हा मंत्र्यांच्या भेटीसाठी रुग्णालये सज्ज झाली होती. कार्टूनच्या चित्रांनी सजवलेल्या भिंती आणि चादरी, चकचकीट टाइल्स यामुळे कुपोषणग्रस्त मुले व त्यांच्या आई बावरलेल्या चेहऱ्याने वावरत होत्या.

आजूबाजूच्या परिसरातून शोधून आणलेल्या मुलांना दहा खाटा पुरत नसल्याने जमिनीवर आणखी १६ गाद्या घालण्यात आल्या होत्या. या खाटांची सवय नसलेले मायलेक बाहेरच बसकण मारून बसले होते. आपल्याला इथे किती दिवस ठेवणार याचीही त्यांना कल्पना नव्हती.

परिचारिका प्रत्येकीच्या हातात साबण, तेल देऊन बाळाला नीट आंघोळ घालायला सांगत होत्या. महिन्याभरानंतर  हा विभाग अगदी सुनसान आहे. अवघ्या ३५ दिवसांपूर्वी इथे जत्रा भरली होती की भास झाला होता असे वाटावे अशी स्थिती सध्या तिथे आहे. खाटांवरच्या चादरी नाहीशा झालेल्या, गाद्या एका बाजूला रचून ठेवलेल्या. भकास वाटणाऱ्या या विभागात नाही म्हणायला दोन खाटांवर दोघीजणी बाळाला घेऊन बसल्या होत्या. परिचारिकांचा पत्ता नव्हता. कोण येतेय, जातेय त्याची चौकशी करावी असेही कोणाला वाटत नव्हते. डॉक्टरही टेबलवर पाय सोडून गप्पा मारत बसले होते.

रोजगार देणे गरजेचे
गेल्या महिन्यात आंदोलन झाल्यावर जव्हार मोखाडातील अंगणवाडी सेविकांचे गेल्या सहा महिन्यांचे अध्रे पगार देण्यात आले. वाडा, विक्रमगड येथे जुलपासून अध्रे पगारही झालेले नाहीत. अंगणवाडी मदतनीसांचेही पगार आलेले नाहीत. अंगणवाडी सेविका, डॉक्टर, परिचारिका हे सरकारचे हात आहेत पण तेच दुबळे ठेवले आहेत. आहारचे पसे आले आणि अंगणवाडीत आठवडय़ातून चार दिवस अंडी व केळी देण्यास सुरुवात झाली. याव्यतिरिक्त रुग्णालयाच्या स्तरावर व त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे स्थलांतर रोखण्यासाठी तातडीने रोजगारनिर्मिती उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कागदावरही योजना झालेली नाही, असे पालघरमधील श्रमजीवी संघटनेचे प्रमुख व माजी आमदार विवेक पंडित म्हणाले.

    >वाडा ग्रामीण रुग्णालयातील स्थिती वेगळी नाही. पण कुपोषित मुलांच्या छोटेखानी खोलीत पाय ठेवताच डॉक्टर धावत आले. पाच खाटांचा विभाग कमी पडतो म्हणून डॉक्टरांच्या राहण्याच्या खोलीत दहा खाटांचा नवीन विभाग सुरू करायचा होता.
    >त्यासाठी खोली रिकामी करण्यातच महिना गेला. डॉक्टरांनी ती खोलीही आवर्जून दाखवली. आता ही नवीन खोली आठवडाभरात सजवू, अशी आशा डॉक्टरांना वाटत होती. पण मुळात पाच खाटांचा वॉर्डही रिकामाच पडला होता. अवघे एक बाळ इथे उपचार घेत होते.
    >सप्टेंबर महिन्यात १३ तर ऑक्टोबरमध्ये ९ बालके येथे उपचारांसाठी आली. दिवाळीनंतर अध्र्याहून अधिक आदिवासी मुलांना घेऊन नाशिकच्या वीटभट्टी आणि खडी फोडण्याच्या कामावर जाण्यासाठी तयारीला लागले आहेत. तेव्हा तर हे नव्याने सुरू केलेले वॉर्ड आणखीच भकास दिसतील.

गेल्या महिन्यात कुपोषित बालकांच्या मृत्यूमुळे आंदोलन आणि त्यानंतर मंत्र्यांची भेट ठरली तेव्हा गोळाउपचारांसाठी तब्बल ९१ कुपोषित मुलांना आणले गेले होते. त्यापकी ५८ तीव्र कुपोषित तर ३९ कुपोषित होती.

मंत्र्यांचा दौरा आटोपला आणि ऑक्टोबरमध्ये उपचारांसाठी आलेल्या बालकांची संख्या २६ वर घसरली. जवळच्याच चासा गावातून रमा जाधव यांना काíतक या एका वर्षांच्या मुलासह इथे आणले आहे. अंगणवाडी सेविकेने रुग्णालयात जायला सांगितले, असे रमा म्हणाल्या.

आणखी किती दिवस ठेवणार त्याची माहिती नव्हती. मंत्री आल्यावर घाईघाईने सुरू केलेल्या दुसऱ्या वॉर्डमध्ये दाखल असलेल्या जानी माळी त्यांच्या दोन वर्षांच्या- युवराजसह उपचार घेताहेत. उन्हाळी कामावर नाशिकला जायचेय, त्याआधी इथे येऊन राह्य़लोय, असे त्या म्हणाल्या.

================================================

५0 वृद्धाश्रमांत मिठाई वाटप
वसई : वांद्रेपासून वसईपर्यंतच्या ५0 वृद्धश्रमांना भेट देवून लायन्स ्नलब इंटरनेशनलने वृद्धांना मिठाईचे वाटप करुन मदिवाळी साजरी केली. विचारी,अनुभवी,संस्कारी आणि आपल्या कुटुंबाचे प्रमुख आधारवड असलेले जेष्ठ नागरिक सद्या वृद्धश्रमात आश्रयाला आहेत. उन,पाऊस,वारा यापासून आपल्या कुटुंबाचे रक्षण करताना त्यांना अन्न,वस्त्र आणि निवार्‍यासह मजबुत भविष्य देणार्‍या व्यक्तीं आता स्पर्धेच्या युगात कुटुंबालाच नकोशा झाल्या आहेत.भरगच्च पगार घेणारी त्यांची मुले शॉपींग, लाँग ड्राईव्ह, हॉटेलींगची चंगळ करीत दिवाळी धुमधड्याक्यात सादरी करताहेत. वृद्धाश्रमातून ही दिवाळी पाहताना जेष्ठांना आपले जुने दिवस आठवू लागतात. आणि त्यांचे दु:ख आणखीनच गड होत जाते. वृद्धावस्थेत बाल्यावस्था येते या उक्तीप्रमाणे त्यांचे मनही गोडधोड खाण्याकडे धावू लागते.

================================================

नालासोपार्‍यात चिनी वस्तूंची केली होळी
वसई : नालासोपारा शहरात उत्तरांचल वेल्फेअर असोसिएशनने चिनी वस्तूंची होळी करून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. एकीकडे चिनी बनावटीच्या वस्तूंना विकत न घेण्याचे आवाहन संपूर्ण देशात केले जात असले तरी प्रत्यक्षात बाजारात या वस्तूंची विक्री सुरू आहे. त्यामुळे चिनी वस्तूंचा जोरदार विरोध करण्यासाठी नालासोपार्‍यात या वस्तूंची जाहीर होळी करण्यात आली.
दिवाळीमध्ये बाजारात चिनी बनावटीच्या वस्तू मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी आलेल्या आहेत. चीन पाकिस्तानला छुपा पाठिंबा देत आहे. उरी हल्ल्यानंतर जनतेत ही भावना तीव्र झालेली आहे. भारतीय बाजारपेठेत आपल्या वस्तू विकून चीन आपली आर्थिक ताकद वाढवत आहे. त्यामुळे चिनी वस्तू विकत न घेण्याचे आवाहन सध्या केले जात आहे. त्यामुळे नालासोपार्‍यातील उत्तरांचल वेल्फेअर असोसिएशनने चिनी मोबाइल, दिवे व अनेक वस्तूंची होळी केली. (वार्ताहर)

चीन पाकिस्तानप्रमाणेच आपलाही शत्रू आहे. म्हणूनच चिनी वस्तू खरेदी करू नका अथवा विक्री करू नका, असे आवाहन सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष विलास चोरघे यांनी केले आहे.

================================================

तारापूर औद्योगिक क्षेत्रात ४0 टक्के पाणीकपात
राष्ट्रीय हरित नवादाने तारापूर एमआयडीसीतील कारखान्यांमधून निर्माण होणार्‍या सांडपाण्यामध्ये चाळीस टक्के कपात करण्याचे आदेश दिल्यानंतर एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाने उद्योगांच्या पाणी पुरवठय़ात चाळीस टक्के कपात सुरु केल्याने त्याचा फटका परिसरातील सोळा ग्रामपंचायतीच्या लाखो नागरीकांना बसला असून ऐन दिवाळीत नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तर पास्थळ गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. दरम्यान या पाणी कपाती विरोधात परिसरातील ग्रामपंचायती आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात सध्या कार्यान्वीत असलेल्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रीया केंद्र (सी.इ.टी.पी.)ची क्षमता पंचवीस एमएलडी असून तेथे क्षमतेपेक्षा अतिरिक्त येणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रीया न करताच ते सांडपाणी सरळ नवापूरच्या समुद्रात सोडले जात असल्याने त्यापासून मच्छिमारी, शेती व आरोग्याला धोका उद्भवत असल्याने अखिल भारतीय मांगेला समाजाने पर्यावरण विषयक सर्व संबंधित यंत्रणेसह राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केल्यानंतर सुनावणीनंतर लवादाने खरी वस्तूस्थिती जाणून घेण्याकरीता जिल्हा व तालुकास्तरीय अधिकार्‍यांची समिती नेमून प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या पाहणीत पंधरा ते वीस एमएलडी सांडपाणी प्रक्रीया न करताच सोडले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने सांडपाण्यामध्ये चाळीस टक्के कपातीचे आदेश दिले होते.
तारापूर एमआयडीसीचा पाणीपुरवठा विभाग सुर्यानदी मधून पाणी उचलून ते गुंदते येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून १0५0 मिली मिटर (३५ इंच) व्यासाच्या पाइपद्वारे चोवीस तासात प्रतिदिन सुमारे ७५ एमएलडी पाणीपुरवठा सुरु होता. परंतु राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानंतर रात्री १0 ते सकाळी ५ पर्यंत पाणीपुरवठा (चाळीस टक्के) बंद केल्याने आता ४५ एमएलडी पाणीपुरवठा तारापूर औद्योगिक क्षेत्रासह परिसराला होतो.

तारापूर एमआयडीसी तील औद्योगिक क्षेत्रातील पंधराशे परिसरातील सालवड, बोईसर, पास्थळ, खैरापाडा, कुरगाव, नांदगाव, आळेवाडी, मुरबे, कुंभवली, सरावली, कोलवडे, नवापूर, पाम, टेंभी, गुंदले, बेटेगाव या सोळा ग्रामपंचायतींना एकाच पाइपद्वारे पाणी पुरवठा होत असल्याने चाळीस टक्के पाणी कपातीचा फटका सोळा ग्रामपंचायती क्षेत्रातील लाखो नागरीकांना सहन करावा लागत आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रा लगतच्या कुंभवली, सालवड, पास्थळ, कोतवडे, सरावली, खैरापाडा, बोईसर, पास-टेंभी इ. सर्व ग्रामपंचायती क्षेत्रातील विहिरींचे भुगर्भाचे पाणी दूषित झाल्याने ते पाणी पिण्यासाठी व वापरायोग्य नसल्याने १00 टक्के एमआयडीसी च्या पाण्यावरच अवलंबून राहवे लागते मुळातच या संपूर्ण क्षेत्राला कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत असतानाच ४0 टक्के पाणी कपातीमुळे पाण्याचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. पास्थळ गावात सरपंच मंजुळा गोवारी व उपसरपंच गोपीनाथ घरत यांनी ग्रामपंचायतीच्यावतीने तर विदूर पाटील व गणेश घरत यांनी चार टँकर द्वारे पाणी पुरवठा केला. तारापूर येथील सामुदायिक सांडपाणी प्रक्रीया केंद्राची क्षमता २५ एमएलडी असल्याने एमआयडीमध्ये नवीन उद्योग व उद्योगांचा विस्तार करताना झिरो डिस्जार्ज (सांडपाणीमुक्त) असलेल्या या अटीवरच अलिकडच्या मोठय़ा उद्योगांना परवानगी दिली. मात्र त्याच उद्योगांनी परवानगीपेक्षा अधिक पाण्याचा वापर तर काहीनी टँकरद्वारे तसेच अनधिकृत कुपनलिकेद्वारे पाण्याचा उपसा करून अतिरिक्त पाणी वापरल्यानेच ही आजची पाणी कपातीची परिस्थिती उद्भवली आहे. यामध्ये पर्यावरणा संदर्भात कायदे पायदळी तुडवून पर्यावरणाचा र्‍हास करणारे तसेच परिसरातील शेती, बागायती, मच्छिमारी व्यवसाय उद्धवस्त केलेल्यांना कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. परंतु मोठे उद्योजक आपली संपूर्ण ताकदपणाला लावून संबंधीत यंत्रणेला झुकायला लावतो. मात्र यात भरडला जातो तो सर्वसाधारण नागरीक.

एमआयडीसी ने ४0 टक्के पाणी कपात सुरु करण्यापूर्वी ग्रामपंचायतींना विश्‍वासात घेणे तसेच कळविणे गरजेचे होते. ऐन दिवाळीत पाण्याचा तुटवडा झाल्याने आम्हाला नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
- मंजुळा गोवारी, सरपंच, पास्थळ ग्रामपंचायत.
ग्रामपंचयातींना पुरेसा पाणी मिळावा म्हणून आम्ही औद्योगिक क्षेत्रातील वॉल नियंत्रीत करतो. ८ ते १0 वर्षांपासूनचा जूना कोटा आहे. आता नागरीकरण वाढले आहे. त्यामुळे पाणी अपुरा पडत असावा.- नंदकुमार कारवा,
उपअभियंता एमआयडीसी पाणी पुरवठा विभाग.

================================================

ड्रंक अँड ड्राइव्हमुळे अपघात वाढले
डहाणू : दिवाळीनिमित्त डहाणूत परगावतील पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. दरम्यान, शांतता व सुरिक्षत वातावरणात उत्सव पार पाडण्यासाठी पोलिसांवर ताण येणार आहे. वाहतूक कोंडीप्रमाणेच ड्रंक अँड ड्राइव सारख्या घटना टाळण्यासाठी रात्नी उशिरापर्यंत चालणारे बीयर शॉप, बार आणि हॉटेल्स यांच्यावर करडी नजर ठेवण्याची गरज स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
दिवाळीनिमित्त डहाणू आणि बोर्डी या समुद्रपर्यटन स्थळी परगावतील पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. आठवडाभर मिळणार्‍या सुट्टीमुळे खाजगी वाहनातून शहरातील पर्यटक दाखल होतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पर्यटकांची मांदियाळी दिसून येते. या उत्सव काळात सार्वजनिक ठिकाणी एकित्रत येऊन येथील स्थानिक समूहाने सण साजरा करतात. आदिवासींचा तारपा आणि गुजराती समाजातील घोर या पारंपरिक समूह नृत्य प्रकारांचा या मध्ये समावेश आहे. त्यामुळे डहाणू-बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावर वाहतूक कोंडी आणि अपघाताचे प्रसंग टाळण्यासाठी पोलीस यंत्नणेला विशेष जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. रात्नी उशिरापर्यंत बीयर शॉप, बार आणि हॉटेल्स सर्रास चालू ठेवले जातात. त्यामुळे शांतता व सुव्यवस्थेसह ड्रंक अँड ड्राइव सारखे प्रकार घडण्याची भीती स्थानिकांना सतावते आहे.
म्हणून वाहतूक कोंडी
डहाणू बोर्डी मार्गावरील पारनाका, ते झाई या समुद्रकिनार्‍यालगत बीयर शॉप, बार आणि हॉटेल्स आदींवर करडी नजर ठेवावी लागणार आहे. या हॉटेल्स बाहेर पार्क करण्यात येणारी वाहने अपघातला निमंत्नण देणारी असून वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण आहे.

================================================

बोर्डीमध्ये प्रत्येक सैनिकासाठी एक पणती
डहाणू/बोर्डी : बोर्डीतील चाफावाडी मित्न मंडळाने लक्ष फाउंडेशनच्या सहयोगाने प्रत्येक सैनिक एक पणती हा उपक्र म शनिवार दि. २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३0 ते ८-३0 बार्डी चाफावाडी येथे आयोजित केला आहे. देशाच्या सीमेवर अखंड तैनात असणार्‍या, सणवार व स्वकीयांपासून दूर रहाणार्‍या आणि प्रसंगी आपल्या प्राणांची आहुतीही देणार्‍या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्र म आयोजित केला आहे

================================================

सर्वधर्मीय स्नेहमिलन
वसई : शिवसेना वसई तालुक्याच्या वतीने शनिवार २९ ऑक्टोबर २0१६ रोजी वसई गावात न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणांवर संध्याकाळी सर्वधर्म स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
वसई तालुक्यातील सर्व धर्मीय सलोखा संपूर्ण देशात आदर्शवत आहे. धर्म, पंथ,पक्ष वेगवेगळे असूनही येथील जनतेमध्ये कायमच सौहार्द व स्नेहाचे सबंध राहिले आहेत. मनाला भुरळ घालणार्‍या निसर्ग सौंदर्याबरोबर वसईच सर्वधर्म मैत्रीचे संचित मोलाचे आहे. माणसामाणसात प्रेमाचे बंध अधिक दृढ व्हावेत म्हणून शिवसेनेतर्फे दिवाळीनिमित्त सर्वधर्म स्नेहमिलनाचे आयोजन केले आहे. यावेळी शिरीषदादा चव्हाण, मौलाना समशेर आलम,कवी सायमन मार्टिन, बौद्ध भंते दिपूनि एस संघमीत्रा, भरत पेंढारी, मनोज आचार्य उपस्थित राहणार आहेत.

सोहळ्यात नृत्य नाट्याद्वारे वसईबरोबरच महाराष्ट्राच्या लोकधारेच दर्शन वसईतील नामवंत गायक कलाकार घडवणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, असे शिवसेना तालुका प्रमुख निलेश तेंडोलकर यांनी कळवले आहे. (प्रतिनिधी)

================================================

वाडा पं. समिती परिसरात दुर्गंधी
वाडा : स्वच्छ भारत मिशन कार्यक्र मानुसार वाडा पंचायत समिती प्रशासनातर्फे गावोगावी जाऊन लोकांना शौचालय बांधण्यासाठी जनजागृती केली जात आहे. या उपक्र माची माहिती आणि फोटो वृत्तपत्नांमधून अनेक वेळा प्रकाशित झाले आहेत. हा उपक्र म राबवणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांचे सर्व स्तरांतून कौतुकदेखील झाले.
मात्न पंचायत समितीच्या वाडा कार्यालयाच्या शौचालयाची टाकी फुटून गेल्या अनेक दिवसांपासून घाण पाणी पाठीमागे रस्त्यावर येऊन साठत असल्याने अशोक वन, शिवाजीनगरातील रहिवासी, भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी यांना नाक मुठीत दाबून जावे लागत आहे. तर याच इमारतीच्या मागील बाजूस भिंतीला लागून एक झाड तर मागे व पुढे गवत उगवल्याने इमारतीचे रूपडे पालटल्याचे दिसत आहे.
पंचायत समितीच्या झालेल्या दुरवस्थेबद्दलही या अधिकार्‍यांचा सत्कार करावा का, असा कुत्सित प्रश्न नागरिकांकडून करून संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

================================================

वाडा स्थानकात प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल
वाडा : वाडा बसस्थानक हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने साहजिकच येथे प्रवाशांची गर्दी असते. शिवाय, विद्यार्थ्यांची संख्याही अधिक असते. असे असताना मात्न वाडा स्थानकातील प्रवासी प्रतीक्षालय एवढय़ा प्रवाशांची गर्दी सामावून घ्यायला असर्मथ असल्याने विद्यार्थ्यांना व प्रवाशांना स्थानकातील संरक्षक भिंतीवर किंवा बोर्डाच्या सावलीत विसावा घ्यावा लागत असल्याने स्थानकात प्रवाशांसाठी शेड उभारावे, अशी मागणी केली जात आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य असणार्‍या वाडा आगाराला या वाक्याचा सोयीस्कर विसर पडलेला दिसत आहे. वाडा बस स्थानकात सतत प्रवाशांची रेलचेल सुरू असून वाडा शहरात शाळा व अनेक महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. यात बाहेरून येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांना वाडा आगाराच्या बससेवेचा लाभ घ्यावा लागतो. मात्न, वाडा आगार व्यवस्थापनाच्या त्नुटींमुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना मन:स्ताप सहन करावा लागतो, असा आरोप आहे.
वाडा स्थानकात असणार्‍या प्रतीक्षालयात अपुर्‍या जागेमुळे विद्यार्थी व प्रवाशांना स्थानकातील भिंतीलगत अथवा बोर्डाच्या सावलीत थांबून गाड्यांची वाट पाहावी लागते. त्यांना ना बसण्याची व्यवस्था आहे, ना डोक्यावर छताची व्यवस्था मात्न, याचे वाडा आगाराला काही देणंघेणं आहे, असं दिसत नाही.
वाडा स्थानकातील बरीचशी जागा भल्यामोठय़ा फलकांसाठी, अनधिकृत पार्किंग् व टपर्‍यांसाठी देण्यात आली आहे. पण प्रवासी मात्न उन्हातान्हात हाल सोसत आहेत.
या प्रकारामुळे विद्यार्थी व प्रवासी मात्न चांगलेच संतप्त झाले असून आम्हाला बसायला व सावलीसाठी शेडची व्यवस्था तत्काळ करून द्या, शिवाय स्थानकातील अडथळा दूर करा, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर) स्थानकात अन्य शेड उभारणीविषयी वरिष्ठांकडे लेखी मागणी करणार आहे. ती मिळताच स्थानकात अधिकृत व्यवस्था करता येईल. - एम.आर. धांगडा, प्रभारी आगार व्यवस्थापक.

================================================

पंचनामा बेकायदा
वसई : आगाशी येथील तिवरांच्या झाडांची कत्तल २0१४ रोजी करण्यात आली होती. तशी तक्रार करूनही कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र, मडळ अधिकार्‍यांनी आपल्याला अंधारात ठेऊन बेकायदा पंचनामा केल्याची तक्रार आगाशी येथील ग्रामस्थ महेश भोईर यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात येथील गावकर्‍यांच्या तक्रारीनंतर आगाशीचे मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी पंचनामा करून भोईर यांनी तिवरांच्या झाडांची कत्तल करून बेकायदा भराव केल्याचा पंचनामा केला होता. त्यावर भोईर यांनी आक्षेप घेऊन पंचनाम्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे. काही लोकांनी मे २0१४ मध्ये तिवरांची बेकायदेशिरपणे कत्तल केली होती. त्याविरोधात तक्रार करूनही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच माती भराव त्यावेळेचे जागेचे कब्जेदार स्वर्गीय रमेश बारीया यांनी केला होता, असे भोईर यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

================================================

आदिवासी स्थलांतरितांचे भयाण वास्तव
निखिल मेस्त्री■ पालघर/नंडोर
'हामच्या गावात फक्त भातशेताच आहा, खायापुरती भात लावायचा आन वरीसभर तोच खायाचा, गावाकडं हामचे काम नाहे, काम नाहे तय पैसा नाहे, तय तर मग हामी सगलींजना बोझा बांधून नं पोरा-बालाचें सगट इथं काम कराया ईतू , नं इथ नाक्यावर काम करतू. इथं हूं काम मिलाला तर बेस नाहे त एक दिस काम करायाचा ना दोन दिस बसून खायाचा' अशी आपली दिनवाणी परिस्थिती पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या स्थलांतरित कुटुंबातील एका महिलेने आपल्या शब्दात लोकमतशी बोलताना व्यक्त केली. जिल्ह्यातून माठय़ा प्रमाणात ही कुटुंबे रोजगारासाठी स्थलांतर होत असतात त्यातील काही कुटुंबे बोईसर रस्त्यावर आपले बस्तान मांडले असल्याचे व त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला असता त्याचे जिणे म्हणजे भयाण वास्तव असल्याचे निदर्शनास आले.
जिल्ह्यात कुपोषणाचे प्रश्न गंभीर असताना मोखाडा, विक्र मगड, वाडा, जव्हार सारख्या भागातून रोजगारासाठी होत असलेल्या स्थलांतरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हे स्थलांतरीत पोराबाळांसह रोजगारासाठी आपला मोर्चा पालघर, भिवंडी, नवी मुंबई, ठाणे,वसई-विरार सारख्या शहराकडे वळवताना लोकांचे स्थलांतरित होणे थांबवणे गरजेचे असून त्यासाठी रोजगार हमी योजना अजून प्रभावशाली करणार आहे. तसेच स्थलांतरितांनाआमच्या यंत्नणेमार्फत रेकॉर्ड ठेवलं जाणार आहेत त्याचप्रमाणे ज्या भागात ही लोकं स्थलांतरित झालेले आहेत. अशा भागातील तहसीलदारांना याकडे लक्ष घालण्यास आदेश देणार आहे. व त्या कार्यक्षेत्नातील आरोग्य यंत्नणे मार्फत मेडिकल कॅम्प लावण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी लोकमतला सांगितले. रोजगारासाठी स्थलांतरीत होऊन राबणार्‍या या लोकांचे दु:ख प्रसाशनाला नाही का ?

हे स्थलांतर कुठेतरी थांबेल का ? असा सवाल या स्थलांतरिताना बघितल्यावर कोणालाही पडेल असे त्यांचे जिकरीचे जिणे आहे. शहरात येऊन हि मंडळी छोट्या छोट्या ताडपत्नीच्या झोपड्या बांधून राहतात. झोपडीच्या एका खोप्यात संसार तर दुसरीकडे एखादी पाण्याने भरलेली हंडा-कळशी अशा अवस्थेत हे लोकं राहतात. या सर्वाना एकच खंत आहे की, स्वत: भूमिपुत्न असूनही असा प्रसंग ओढावा याचेच आश्‍चर्य वाटते.
2या बोईसर रस्तास्थित दांडेकर मैदानात अशाच स्थलांतर झालेली सुमारे शे-सवाशे कुंटुंबे दरवर्षी रोजगारासाठी येत असतात. या ठिकाणी मोठमोठय़ा योजनांची घोषणा करणारे प्रशासन मात्न स्थलांतर रोखण्यात सपशेल अपयशी ठरलेले दिसते. त्याची सर्मपकता या स्थलांतरीत होणार्‍याच्या वाढत्या संख्येवरून दिसून येते. अर्थातच ज्या ठिकाणी हे लोकं राहतात तिथे रोजगारच उपलब्ध नाही. 3रोजगार हमीची कामे मिळतात पण त्यातून मिळणारी मजुरी त्वरित व पुरेशी मिळत नाही. त्यावरही प्रशासन दुर्लक्ष करते असा आरोप या स्थलांतरितांकडून होत आहे. ही आदिवासी कुटुंबे स्थलांतर होत असताना आपली पोरे-बाळे बरोबर घेऊन येतात परिणामी या मुलांना ना धड शिक्षण, ना धड पोषण व ना धड आरोग्य सेवा अशी अवस्था होत असल्याने ही मुले कुपोषणास बळी पडतात. पण आमचे प्रशासन मात्न ठिम्म, आमच्या मुलांकडे इथे कोणीच लक्ष देत नाही लोकांनी दिलेले कपडे, खाद्य ते खातात आमची ऐपत नाही म्हणून आम्ही देऊ शकत नाही व आम्ही जसे राहतू तशी त्यांनाही हळूहळू सवय लागेल असे येथील एका कुटुंबातील महिलेने सांगितले.

गावात काम आहे असे ग्रामपंचायत मध्ये काम देऊ असे सांगतात. पण प्रत्यक्षात मात्न देत नाहीत कित्येक वर्षे घरकुल नाही असेही एका दुसर्‍या स्थलांतर झालेल्याने सांगितले. आपल्या समस्यांचा पाढाच या संगळ्यांनी वाचून दाखवला. पण या सर्व समस्या त्यांच्या सवयी झाल्या असल्याचे यावेळी दिसले. कुठलीही कोणाचीही मदतीची अपेक्षा न करता मागचे सर्व विसरून आपला बोझा बांधून पुन्हा आपल्या कामाकडे वळताना हे लोकं दिसतात.
स्थलांतरही कुठेतरी कुपोषणास कारणीभूत या शहरात हे लोकं मोठय़ा प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांकडे बिगारी, गवंडी, हमाली व विटभट्ट्य़ांवर मोलमजुरी तसेच गवत व्यापार्याकडे गवतकापणी सारखी कामे करतात. उन्हा-तान्हाची तमा न बाळगता हे सर्वजण मजुरीसाठी (पैशासाठी) मर मर राबतात. अशातच कमावून घेतलेली मजुरी जपून ठेवण्याच्या नादात कुटुंबातील गर्भार अवस्थेत असलेली महिला आपण काय पोषक खावे, कुठले पोषक अन्न घ्यावे हेही त्यांना त्यातले फारसे कळत नाही व कळले तरी पैसा खर्च होईल या कल्पनेने त्या यापासून चार हात दूर राहतात. व शेवटी त्यांना योग्य ती पोषणतत्वें न मिळाल्यामुळे या सर्वातून जन्माला येते ते महाभयंकर कुपोषण. स्थलांतरही कुठेतरी कुपोषणास कारणीभूत आहे. ज्या भागातून स्थलांतरण होत आहे. तेथे कायमस्वरूपी रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून येत्या नोव्हेंबरमध्ये लोकसभा अधिवेशनात यासाठी स्पेशल पॅकेजची मागणीही करणार आहे. केंद्राची मुद्रा योजनाही योग्य प्रकारे राबविली तर या भागातील लोकांना त्या पातळीवर रोजगार निर्माण होऊ शकतो व स्थलांतर थांबू शकते.
- चिंतामण वनगा, खासदार

ज्या ग्रामपंचायत मार्फत कामे दिली जात नाहीत अशांची चौकशी आम्ही करू. ग्रा.पं तून मिळणार्‍या मनरेगा ची कामे मिळणे हा ग्रामस्थानचाच अधिकार व हक्क आहे. त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.
- निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. पालघर

=============================================
(वृत्त संकलन : दैनिक लोकसत्ता , दैनिक लोकमत , दैनिक महाराष्ट्रटाईम्स)

सविस्तर वृत्त http://www.palgharlive.com/2016/10/blog-post_29.html

Friday, October 28, 2016

पालघर वार्तापत्र २८ ऑक्टोबर

पालघर वार्तापत्र २८ ऑक्टोबरकोस्टल रोड थेट विरारपर्यंत?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
नरिमन पॉईंट ते कांदिवलीपर्यंत कोस्टल रोडचा थेट विरारपर्यंत विस्तार करण्याची सूचना मएमआरडीएच्या नियोजन विभागाने मुंबई महापालिकेला केली आहे. मिरा-भाईंदरला जोडणाऱ्या वसई खाडी पुलापर्यंत हा रोड नेता येऊ शकतो, त्यानंतर अर्थातच विरारला जोड मिळू कते, असा हा प्रस्ताव आहे. विरार आणि अलिबागमधील उत्तर-दक्षिण भाग जोडण्याच्या दृष्टीने कोस्टल रोडचा विस्तार उपयुक्त ठरेल, असा या प्रस्तावामागचा उद्देश आहे. सध्या नरिमन पॉईंट पासून ते कांदिवलीपर्यंतच कोस्टल रोडचा आराखडा तयार करण्यात आला आहे. एमएमआरडीएची सूचना मुंबई महापालिकेने मान्य केल्यास कांदिवली ते वसई असा आराखडा तयार करावा लागेल.

=============================================

वसईतील उड्डाणपुलाला तडे
वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या जुन्या उड्डाणपुलाच्या खांबांना तडे गेल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत माणिकपूर पोलिसांनी पाहणी केली आहे. त्वरित या पुलाची पाहणी करून दुरुस्ती करावी, अशा सूचना पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम खाते, रेल्वे तसेच महापालिकेला केल्या आहेत. रेल्वेने मात्र पूल सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा रेल्वेवरील पूल १९७६मध्ये बांधण्यात आला होता. हा पूल जुना झाल्याने नवीन पूल तयार करण्यात आला होता. एमएमआरडीएने नुकताच या ठिकाणी नवीन पूल बांधून वाहतुकीसाठी खुला केला आहे. मात्र जुन्या पुलावरून अद्याप वाहतूक सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून माणिकपूर पोलिसांकडे काही वाहनचालकांनी पुलाच्या खांबांना तडे गेल्याचे सांगितले होते. त्यानंतर माणिकपूर पोलिसांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तेव्हा खांबांना तडे गेल्याचे दिसून आले. ही धोक्याची घंटा असल्याचे पोलिसांनी सांगितले. आम्ही त्वरित सार्वजनिक बांधकाम खाते तसेच महापालिका आयुक्तांना लेखी पत्र देऊन आवश्यक ती उपाययोजना करावी, असे लेखी पत्र दिल्याचे माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले.

वैतरणा पुलाचे बांधकाम परीक्षण नाही
विरारजवळ वैतरणा खाडीवरील पश्चिम रेल्वेचा ब्रिटिशकालीन वैतरणा पूल आहे. या पुलाचे बांधकाम परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) कधी झाले याची माहिती रेल्वेकडे उपलब्ध नाही. हा पूल ब्रिटिशकालीन असून  शंभरहून अधिक वर्षे जुना आहे. गुजरात तसेच उत्तरेकडील राज्यांना जोडणारा हा महत्त्वाचा
आणि एकमेव रेल्वे पूल आहे. सर्व मेल आणि एक्स्प्रेस गाडय़ा या पुलावरून जात असतात. वैतरणा पुलाच्या खालून मोठय़ा प्रमाणावर बेकायदा रेतीउपसा होत असतो, या रेतीउपशामुळे पुलाला धोका असल्याचे खुद्द रेल्वेने म्हटले आहे. गेल्या काही वर्षांपासून रेल्वे त्यासाठी पाठपुरावा करत आहे. त्यात खारेवारे, पाणी यामुळे पूल कमकुवत झाला होता. त्यासाठी पुलाचे बांधकाम परीक्षण करणे आवश्यक होते.
वाहतुकीसाठी पूल बंद करण्याची मागणी
जुन्या उड्डाणपुलावरून एकमार्ग वाहतूक आजही सुरू आहे. दररोज हजारो वाहने जात असतात. यापुर्वीच हा जुना पूल कमकुवत झाल्याने नव्या पुलाची निर्मिती करण्यात आली होती. जुना पूल वापरासाठी कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. खांबांना जे तडे गेलेले आहेत, ते प्लास्टरचे आहेत. खांबांचा मूळ गाभा सुरक्षित आहे. पुलाचे आम्ही वार्षिक सर्वेक्षण करत असतो आणि त्याची वेळोवेळी डागडुजी करत असतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पूल जुना असला तरी भक्कम आणि व्यवस्थित आहे.
एस. मीना, पूल विभागाचे अभियंता, रेल्वे
=============================================

पालघरमधील गोदामात स्फोटकांचा साठा जप्त
- हितेन नाईक/आरिफ पटेल, पालघर
मुंबई - अहमदाबाद महामार्गालगत सातिवली गावाजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका पडक्या इमारतीत स्फोटकांचा मोठ्या प्रमाणात साठा दडवून ठेवल्याची माहिती कळताच मुंबईतील काळाचौकी येथील दहशतवादविरोधी पथकाने छापा घालून डिटोनेटर, जिलेटीनच्या कांड्या अशी १४ ते १५ किलो वजनाची स्फोटके हस्तगत केली. या साठ्यामुळे येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी दहशतवादी पथकाने ताब्यात घेतलेल्या एका आरोपीने पालघर जिल्ह्यातील महामार्गालगतच्या सातिवली गावाच्या हद्दीत निर्मनुष्य ठिकाणी या गोदामात स्फोटके दडवून ठेवल्याची माहिती दिली होती. त्याआधारे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी ७ वाजता या पडक्या इमारतीच्या परिसरात पोहोचले. त्यावेळी लहान लहान पाकिटांमध्ये ही स्फोटके खड्डे खणून दडविल्याचे आढळले. मात्र याबाबत कोणतीही अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. दहशतवादी पथकाचे मुंबई युनिटचे उपायुक्त धनंजय कुलकर्णी, अधिक्षिका शारदा राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी अशोक होनमाने आदींसह सुमारे १०० अधिकारी, कर्मचारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत या ठिकाणी शोध घेत होते.

बेकायदेशीर गोदामे धोकादायक
आजवर अनेक स्फोटकांचा यशस्वी शोध घेणाऱ्या पोलिसांच्या श्वानपथकातील लकी आणि मोती या श्वानांनी हा साठा शोधला. नवनिर्मित पालघर जिल्ह्यात प्रथमच बेवारस स्फोटके सापडल्याने हा जिल्हा दहशतवाद्यांच्या कारवाईचे लक्ष्य करण्याचा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गालगत आदिवासी तसेच खाजगी जमिनींवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गोदामे उभारण्यात आली असून त्यातून अनेक प्रकारची बेकायदेशीर कृत्ये केली जात आहेत. त्यामुळे घातपाती कारवायांसाठी अशा गोदामांचा वापर केला जात असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

सहा महिन्यांपासून साठा दडविला
मनोर पोलीस ठाण्याच्या वरई चौकीपासून सातिवलीमधील हे गोदाम अवघ्या ६०० फुटांवर असून त्या चौकीवर २४ तास पहारा असतानाही ही स्फोटके उतरवण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा साठा दडविल्याचे समजते. त्यामुळे महामार्गालगतच्या पडक्या इमारती, अनधिकृत ढाबे, गोदामे यामुळे देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गोदामात मागील अनेक महिन्यांपासून काही जणांचे वास्तव्य असल्याचे घटनास्थळावरील दगडाच्या चुली, ब्लँकेट्स, जुने कपडे यावरून स्पष्ट होते.

=============================================

मुंबईबाहेरील गर्दीचा रेल्वेवर ताण
मुंबईतील उपनगरीय प्रवाशांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढ झाली असून, यापैकी सर्वाधिक गर्दी मुंबई महापालिकेच्या हद्दीपलीकडील स्थानकांमध्ये होत असल्याचे समोर आले आहे. पश्चिम रेल्वेवर नालासोपारा, विरार, वसई, भाईंदर या स्थानकांबरोबरच मध्य रेल्वेवरही बदलापूर, दिवा आणि टिटवाळा या स्थानकांतील प्रवाशांची गर्दी वाढली आहे. विशेष म्हणजे वसई प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या क्षेत्रात येणाऱ्या परिसरात गेल्या चार वर्षांत वाहन नोंदणीत ५२१ टक्क्यांची महाप्रचंड वाढ झाल्याचेही स्पष्ट होत आहे. या भागांमध्ये होणाऱ्या नवनवीन गृहसंकुलांमुळे ही संख्या वाढत असल्याचे आढळत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये घरांच्या किमती मुंबईतील गगनचुंबी इमारतींप्रमाणेच गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आपल्या स्वप्नाच्या कक्षा रुंदावून मुंबईबाहेरील घरांकडे आपला मोर्चा वळवावा लागत आहे. याचे प्रतिबिंब उपनगरीय लोकलच्या प्रवासी संख्येवरही पडत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पश्चिम रेल्वेच्या प्रवासी संख्येत ०.६७ टक्के आणि मध्य रेल्वेच्या प्रवासीसंख्येत दोन टक्के एवढी वाढ झाली आहे. या दोन्ही मार्गावरील प्रवासी संख्या अनुक्रमे ३८ आणि ४३ लाख एवढी प्रचंड असल्याने ही अल्प वाटणारी टक्केवारीही जास्त असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. मुंबईत मोठमोठय़ा गृहसंकुलांसाठी मोकळ्या जागा मिळणे अशक्य आहे, तसेच मुंबईत जागांच्या किमतीही प्रचंड आहेत. त्यामुळे गृहनिर्माण क्षेत्रातील बडे विकासकही आता वसई-विरार किंवा ठाणे जिल्ह्य़ातील काही महत्त्वाच्या ठिकाणी आपले प्रकल्प राबवत आहेत. येथे ग्राहकांनाही कमी किमतीत जास्त सोयीसुविधा प्राप्त होत असल्याने ग्राहकांचा कलही या जागांसाठी वाढला आहे. या भागांमध्ये सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या खूप जास्त आहे, असे जिओप्रिन्युअर ग्रुपचे संचालक अवि शहा यांनी सांगितले.

मुंबईतील जागांचे भाव, येथील व्यवसायांचे विकेंद्रीकरण वसई-विरार, पनवेल-कर्जत, बदलापूर, टिटवाळा आदी भागांमध्ये वाढलेल्या गृहसंकुल वसाहती यांमुळे यापुढे रेल्वेच्या प्रवाशांची संख्या या भागात वाढणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील विविध कंपन्या, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी-सीप्झ आदी भागांमध्ये दक्षिण मुंबईतील उद्योग आणि नोकरीच्या संधी एकवटू लागल्या आहेत. त्यामुळे वांद्रे, दादर या स्थानकांपर्यंतच्या प्रवाशांची संख्या भविष्यात जास्त असेल. त्या दृष्टीने आमचे नियोजन सुरू आहे.
मुकुल जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (पश्चिम रेल्वे, मुंबई)

वाहन नोंदणीतही प्रचंड वाढ
* रेल्वेच्या प्रवाशांची संख्या या भागात वाढत असताना वाहन नोंदणीनेही या भागात नवनवीन उच्चांक ओलांडले आहेत.
* २०१३ या वर्षांत वसई आरटीओमध्ये ४३,३१४ वाहनांची नोंद झाली होती. २०१६ मध्ये हीच संख्या २,६३,१५० एवढय़ावर पोहोचली. ही वाढ तब्बल ५२१ टक्के एवढी प्रचंड आहे.

=============================================

पालघर जि.प.चा सावळा गोंधळ :  नर्सरी शिक्षक ४ महिने पगाराविना! , दिवाळी होणार कशी?

विक्रमगड : ठाणे जिल्हा परिषद असतांना २०१०-११ या शैक्षणिक वर्षात प्रायोगिक तत्वावर सुरु केलेल्या नर्सरी, ज्युनिअर केजीच्या शिक्षकांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. गेल्या तीन ते चार वर्षापासून हे वर्ग सुरळीत सुरू होते. परंतु गेल्या वर्षापासून पालघर जिल्हा परिषदेच्या बजेट मध्ये तरतूद नसल्याने त्यांची स्थिती डगमळली होती. मागील वर्षी शाळा सुरू होणार की नाही? अशा संभ्रमावस्थेत विद्यार्थी होते. या शैक्षणिक वर्षातही अजूनपर्यंत शिक्षकांना ४ महिन्यांपासून पगार नाहीत तसेच या नर्सरी वर्गांना मंजूरी नाही. एकीकडे इंग्रजी शिक्षणाची ओढ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना लागावा. यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मंजूरी दिली. परंतु जिल्हयाची निर्मिती नंतर या इंग्रजी शाळांना घरघर लागली आहे पालघर जिल्हयात ग्रामीण भागात या शाळा सुरू आहेत परंतु त्यांना मंजूरी के व्हा मिळणार? व या मानधन तत्वावर काम करणार्‍या शिक्षकांना कधी पगार मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर) याबाबत तालुका शिक्षणाधिकारी भगवान मोकाशी यांना विचारले असता अजून मंजूरी मिळाली नसल्याने या शिक्षकांचा पगार नाही परंतु आम्ही सर्व कागदपत्रे वरीष्ठ पातळीवर पाठविली आहेत ही मंजूरी जिल्हा नियोजनमध्ये मान्यता मिळत त्यामुळे उशीर होतो, असे सांगितले. परंतु शिक्षण खात्याचे हे धोरण कधी बदलणार व या शिक्षकाना व विद्यार्थ्यांना न्या मिळणार कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

=============================================

विरारला मच्छीमार-प्रशासन संघर्ष
वसई : विरार शहरातील आठवडा बाजार पुन्हा सुरु करण्यावरून मच्छिमार स्वराज्य समिती आणि पालिका प्रशासनामध्ये संघर्ष सुरु झाला आहे. प्रशासनाने प्रारंभी सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर घुमजाव केल्याने समितीने आठवडा बाजारासाठी आंदोलन छेडणचा निर्णय घेतला आहे. पालिका मुख्यालया शेजारी असलेल्या मैदानात ब्रिटीश काळापासून आठवडा बाजार भरत होता. याठिकाणी स्थानिकांसह जिल्ह्यातील पालघर, डहाण, जव्हार, मोखाडा याठिकाणाहून भूमीपूत्र भाजीपाला, सुकी मासळी, शेतमाल विकावयास येत असत. पण, काही वर्षांपूर्वी पालिकेने आठवडा बाजार बंद केला. त्यानंतर आता मैदानात वाहनांची पार्किंग आणि परिवहनचा बस स्टँड केला आहे. हा आठवडा बाजार पुन्हा सुरु व्हावा, यासाठी समितीचे अध्यक्ष राजू तांडेल यांनी विक्रेत्या महिलांसह पुढाकार घेतला आहे. त्यासाठी तांडेल यांनी आयुक्त सतीश लोखंडे आणि महापौर प्रवीणा ठाकूर यांची भेट घेतली होती. पहिल्या भेटीत आठवडा बाजार पुन्हा सुरु करण्यासाठी लोखंडे आणि ठाकूर यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, आता बाजाराला विरोध केला असल्याची माहिती तांडेल यांनी दिली. मैदानाचा उपोग ठोक्यावर चालणाऱ्या परिवहन सेवेला होतो. त्यातून पालिकेला उत्पन्नही मिळत नाही अथवा स्थानिकांना रोजगारही मिळत नाही. तसेच याठिकाणी पार्किंगने जागा व्यापली आहे. तर बाजाराला विरोध करण्यासाठी प्रशासनाने आता बुलडोझर, अवजड मशिनरी, जेसीबी, मोठी वाहने उभी केली आहेत. मात्र, हा विरोध डावलून आठवडा बाजार सुुरु करणारच. त्यासाठी उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा तांडेल यांनी दिला आहे. त्यामुळे आता मच्छिमार विरुद्ध प्रशासन असा नवा वाद चिघळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

=============================================

अवैध रेतीसाठय़ांवर उसगावला कारवाई

वसई/पारोळ : पारोळ तलाठी कार्यालयाच्या हद्दीतील उसगाव या रेती बंदरात तलाठी सुधाकर जाधव, शिरसाडचे तलाठी शैलेंद्र तिडके, पेल्हार तलाठी शरद पाटील व खानिवडे तलाठी किरण कदम या महसूल कर्मच्यार्‍यांनी मांडवी पोलीस दूरक्षेत्नाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ढोणे व स्टाफ यांच्यासह २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.१५ च्या सुमारास उसगाव रेती बंदरात धाड टाकली. यावेळी अवैधरित्या साठा केलेली १७४ ब्रास रेती व ती उत्खनन करण्यासाठी वापरण्यात येणारे १२ सक्शन पंप, रेती किनार्‍यावर आणण्यासाठी वापरात येणार्‍या १२ बोटी, १ जेसीबी मशीन, ५ ट्रक असा १,६५,०७,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून जमीन महसूल १९६६ चे कलम ४८ (७),(८) अन्वये व पर्यावरणाचा र्‍हास होणार्‍या कलमाप्रमाणे विरार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास करीत आहेत . (वार्ताहर)

=============================================

चौकी बंद,लैला-मजनू सैराट
निर्मळ-कळंब रस्त्यावर सुळेश्‍वर पाड्यालगत कित्येक वर्षांपासून ही चौकी कार्यरत होती.  वसई पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणारी ही चौकी आता अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. कळंब समुद्र किनारी मौजमजा करणसाठी जाणार्‍या टारगट टोळ्यांना आणि प्रेमी युगलांना या चौकीतील पोलीस लगाम लावत होते. बेफाम धावणार्‍या गाड्यांचीही चौकशी हे पोलीस करित होते. तसेच निर्मळ नाक्यावर होणार्‍या भानगडीही सोडवण्यात या चौकीचा फायदा होत असे. अशी ही पोलीस चौकी गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. वसई: समुद्र किनार्‍याच्या रिसॉर्टमध्ये मौजमजा करण्यासाठी जाणार्‍या लैला-मजनूंना लगाम घालणारी व अवैध लॉजेसमधील जोडप्यांच्या वावराला चाप लावणारी निर्मळ पोलीसचौकी गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद असून ती लवकरात लवकर सुरु करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने पोलीस उपअधीक्षकांकडे केली आहे. त्यामुळे अल्पवयीन जोडप्यांसह मद्यपी चालकांनी निर्मळ-कळंब रस्त्यावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ड्रंक अँन्ड ड्राईव्ह करणार्‍या दुचाकी स्वारांनी मर्देस-वाघोली-निर्मळ रस्त्यावरील अनेक पादचार्‍यांना धडका दिल्या आहेत. अनेकांना तर अशा अपघाताने अपंगत्व आले आहे. तसेच चेन स्नॅचिंगच्या घटनेतही वाढ झाली आहे. त्यामुळे ही पोलीस चौकी पुन्हा सुरु करून बेताल पर्यटकांना लगाम लावण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख हरिश्‍चंद्र पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांकडे केली आहे.

=============================================

 बीएसएनएलला वसईचे ग्राहक वैतागले
वसई : वसई स्टेशन पश्‍चिम परिसरात भारत संचार निगम (बीएसएनएल ) नेटवर्कच्या एरव्ही बहुतांशी दररोज कुरबुरी सुरु असतातच, पण आता ऐन दिवाळीत दीर्घ काळपर्यंत नेटवर्क कनेक्टिव्हीटी गायब होत असल्याने येथील रहिवासी, ग्राहक, आस्थापना, बँका, दुकानदार हैराण झाले आहेत. यामागे दिवाळीचे अर्थकारण दडले असल्याची तक्रार उघडपणे व्यक्त केली जात आहे. बीएसएनएलच्या केंद्रीय प्रशासन आपल्या ग्राहकांची गळती रोखली जावी म्हणून दररोज रात्नी ९ ते सकाळी ७ आणि आता दर रविवारी मोफत कॉलसेवेचे गाजर दाखवून इंटरनेटचे ग्राहकही बांधू पाहत आहे. पण वसईतील निकृष्ट सेवेमुळे बीएसएनएलच्या या योजनांवर पाणी फेरले जात आहे. रहिवासी, ग्राहक इतर खाजगी इंटरनेट सेवांकडे वळत आहेत तर आस्थापना-बँका-दुकानदार ग्राहकांच्या असंतोषाला तोंड द्यावे लागू नये म्हणून बीएसएनएलला दुय्यम स्थानी ठेवत इतर खाजगी इंटरनेट सेवांचा अधिकाधिक लाभ घेत आहेत. तर हल्ली ग्राहक दुकानांत खरेदी करताना डेबिट / क्रेडिट कार्डांचाच बहुतांशी वापर करत असल्याने ग्राहकांच्या रोषाला बळी पडू नये व हातचे ग्राहक जाऊ नये म्हणून दुकानदार, व्यापारी दोनदोन ई डी सी स्वाईप मशिन्स ठेऊन इतर खाजगी इंटरनेटचा लाभ घेतात (प्रतिनिधी) या दु:स्थितीची विभागीय व केंद्रीय प्रशासनाने वेळीच गंभीर दाखल घेतली नाही तर उरल्यासुरल्या ग्राहकांचीही गळती रोखणे जड जाईल.


=============================================
(वृत्त संकलन : दैनिक लोकसत्ता , दैनिक लोकमत , दैनिक महाराष्ट्रटाईम्स)

सविस्तर वृत्त http://www.palgharlive.com/2016/10/blog-post_28.html