Tuesday, September 27, 2016

२७ सप्टेंबर , शहिद भगतसिंग जयंती

२७ सप्टेंबर , शहिद भगतसिंग जयंती
*२७ सप्टेंबर , शहिद भगतसिंग जयंती* 🇮🇳

 भगतसिंग यांचा जन्म २७.९.१९०७ या दिवशी पंजाब राज्यातील एका सरदार घराण्यात झाला.

भगतसिंग ६-७ वर्षांचा असतानाची गोष्ट. तो शेतावर गेला असता शेतकरी गहू पेरत असलेला पाहून त्याचे कुतुहल जागृत झाले. त्याने विचारले “शेतकरीदादा, तुम्ही या शेतात गहू का टाकत आहात ?'' शेतकरी म्हणाला, “बाळ, गहू पेरले की, त्याची झाडे होतील आणि प्रत्येक झाडाला गव्हाची कणसेच कणसे येतील.'' त्यावर तो म्हणाला, “मग जर बंदुकीच्या गोळया या शेतात पेरल्या, तर त्याचीही झाडे उगवतील का ? त्यालाही बंदुका येतील का ?'' `या गोळया कशाला हव्यात', असे शेतकऱ्याने विचारल्यावर `हिंदुस्थानचे राज्य बळकावणाऱ्या इंग्रजांना मारण्यासाठी', असे क्षणाचा विलंब न टाळता त्याने आवेशपूर्ण उत्तर दिले.

१९२८ मध्ये भारतीय घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडहून `सायमन कमीशन' नावाचे शिष्टमंडळ भारतात आले. भारतात सर्वत्र या शिष्टमंडळाचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. त्या वेळी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. `सायमन परत जा' च्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. जमाव पांगवण्यासाठी आरक्षकांनी केलेल्या अमानुष लाठीआक्रमणात लाला लजपतराय घायाळ झाले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. देशभक्तीने भारावलेल्या क्रांतीकारकांना हे सहन झाले नाही. क्रांतीकारकांनी लालाजींच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या लाहोर आरक्षक ठाण्यातील इंग्रज अधिकारी स्कॉट याला मारण्याचीयोजना आखण्यात आली. मालरोड पोलीस स्टेशनवर जय गोपाळ पहारा ठेवून स्कॉटच्या हालचालींवर लक्ष ठेवेल आणि भगतसिंग व राजगुरू त्याच्या इशार्‍यावर गोळीबार करतील. पण ४ दिवस स्कॉट त्या भागात फिरकलाच नाही. शेवटी पाचव्या दिवशी कार्यालयातून एक गोरा अधिकारी बाहेर आला. जय गोपाळने भगतसिंहांना खूण केली की हाच स्कॉट असावा, यावर भगतसिंहांनी खुणेनेच सांगितले की, ‘हा नसावा’, पण ही ‘नसावा’ ची खूण राजगुरूंच्या लक्षातच आली नाही. राजगुरूंनी साहेबाच्या दिशेने गोळी झाडली. लगेचच भगतसिहांनी आपल्या पिस्तुलातून ८ गोळ्या झाडून साहेबाला पूर्ण आडवे केले. दुस-या दिवशी ‘मेला तो स्कॉट नसून साँडर्स होता´ हे कळल्यावर त्या तिघांना विशेष दु:ख झाले नाही. इंग्रज सरकारने तिघांना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. तसेच त्यांना पकडून देणाऱ्याला पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणाही केली; परंतु बरेच दिवस आरक्षकांना हुलकावणी देत ते तिन्ही क्रांतीकारक भूमिगत राहिले. पुढे फितुरीमुळे ते पकडले गेले.

19 मार्च 1929 रोजी ब्रिटिश राजवटीविरुद्ध कटकारस्थान केल्याबद्दल साम्यवादी नेत्यांची देशभर धरपकड झाली. राजबंद्यांच्या अभियोगासाठी आणि वर्गकलहाच्या बंदोबस्तासाठी पब्लिक सेफ्टी बिल, ट्रेड डिस्प्युटस बिल, प्रेस सेडिशन बिल या अन्यायकारी व जनविरोधी कायद्यांविरुद्ध भागतसिंग व त्यांच्या साथीदारांनी प्रचंड जनआंदोलन उभारले. ब्रिटिश राजवटीला धडा शिकविण्‍यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी 'इन्किलाब झिंदाबाद,' साम्राज्यशाही मुर्दाबाद' अशा गगनभेदी घोषणा देत केंद्रीय असेंब्लीत बॉम्ब फेकले. या खटल्याची सुनावणी 10 जून 1929 रोजी झाली आणि या दोन्ही क्रांतिकारकांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.
भगतसिंग व अन्य क्रांतिकारकांविरुद्ध असलेल्या विविध आरोपांवर अंतिम निकाल देण्यासाठी गव्हर्नर लॉर्ड डरविन यांनी जस्टीस जे. कोल्डस्ट्रीम यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधिशांचे एक स्पेशल ट्रायब्युनल नियुक्त केले. लाहोर खटला 5 मे 1930 रोजी सुरु झाला. हा खटला भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक रोमांचक प्रकरण होते. हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना, पंजाबपासून कोलकत्यापर्यंत क्रांतिकारकांच्या उठावाच्या कारवाया, पंजाब नॅशनल बँक लूट प्रकरण, सँडर्सचा खून खटला, आग्रा येथे बॉम्ब बनविण्याच्या प्रकरणात सहभाग, दिल्लीच्या विधिमंडळावर बॉम्ब फेकणे तसेच बॉम्ब बनविणे, खूनी हल्ले करणे, सरकार उलथून टाकण्याच्या विध्वंसक कारवाया करणे आदी गंभीर गुन्ह्यांखाली भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

फाशीची शिक्षा सुनावल्यावर हे क्रांतिकारक शहीद व्हायला उतावीळ झाले होते. भगतसिंग म्हणत, ''भारतमातेसाठीचे इतिकर्तव्य संपले. आमच्या बलिदानाने शेकडो युवक पेटून उठले पाहिजेत. त्यांनी आमचे अपुरे क्रांतिकार्य वेगाने व नेटाने चालवावे. मी खुशीने फासावर लटकून जगाला दाखवून देईन की, क्रांतिकारक आपल्या आदर्शांसाठी केवढ्या धीरांने बलिदान देतात.''
कारावासात कधी रिकामा वेळ मिळाला की, भगतसिंग हे शहीद रायप्रसाद बिस्मिल्ला यांच गाणं मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे........ मोठ्या तन्मयतेने म्हणत असत. त्यामुळे राजकैद्यांमध्ये देशाप्रति निष्ठा व स्वाभिमान वाढीस लागे. भगतसिंग आपल्या आईला (बेबेजी) म्हणत, ''फाशी झाल्यावर तू माझं शव घ्‍यायला येऊ नको, कुलबीरला पाठव, कारण तू रडायला लागली तर लोक म्हणतील, भगतसिंगची आई रडत आहे'' राष्ट्राला उद्देशून लिहिलेल्या शेवटच्या पत्रात भगतसिंग म्हणतात ''आम्ही अंतिम प्रवासाला निघाला आहोत, आमचा नमस्कार घ्या.
प्रत्येक भारतीयाला भगतसिंग यांच्या रुपात साक्षात मृत्युंजय दिसत होता. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या हौतात्म्याविषटी नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, ''हे क्रांतीवीर जरी आपल्यातून निघून गेले असले तरी, त्यांच्या राष्ट्रप्रेमाची भावना अजिंक्य असून ती अमर आहे.'' जयकौर ( भगतसिंगची आजी) जेलमध्ये भेटायला आली असता हसत-हसत गंमतीने, भगतसिंग म्हणाले, ''ये आजी ! तुला एवढ्या लांबून भला भेटायला यायला फार त्रास होतो ना? तू असं कर, या जुलुमी सरकारविरुद्ध काहीतरी गंभीर गुन्हा कर, म्हणजे तुला माझ्या जवळच कैदी म्हणून कायमचं राहायला मिळेल'' भगतसिंग यांच्या महान क्रांतिकार्याची गाथा ऐकून रशियाचे सर्वेसर्वा स्टॅलिन यांनी भगतसिंग यांना मास्कोला येण्याचे निमंत्रण दिले होते.
फाशीच्या आधी तुम्हाला काही शेवटी सांगायचं आहे का? असं मॅजिस्ट्रेटने विचारले असता, भगतसिंग म्हणाले ''क्रांती ये मानव का निसर्गदत्त हक है ! तो, आझादी ये उसका जन्मसिद्ध हक है ! आझादी और जिंदगी एक बात है ! तो गुलामी और मौत एक बात है'' हाच अखेरचा संदेश त्यांनी राष्ट्राला दिला. मॅजिस्ट्रेटला उद्देशून ते म्हणाले, मॅजिस्ट्रेट महोदय तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. आज तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे की, भारतीय क्रांतीकारक आपल्या सर्वोच्च आदर्शासाठी मृत्युचं स्वागत कसं करतात.''

23 मार्च 1931 हा अमर दिवस उजाडला. तिघांना फाशी होणार म्हणून सारं राष्ट्र व्याकुळ झालं होतं. उजव्या बाजूला सुखदेव तर डाव्या बाजूला राजगुरु आणि भगतसिंग मधोमध उभे. त्यांच्यात प्रथम कोणी फासावर चढायचं, याबाबत प्रेमकलह होता. शेवटी आपसात तडजोड करुन सुखदेव, भगतसिंग आणि मग राजगुरु अशा क्रमाने फासावर चढण्याचं ठरलं. भगतसिंग म्हणाले ''दिल से निकलेगी न मरकर भी वतन की उलफत ! मेरी मिट्टी से खुशबू-ए-वतन आएगी'' मृत्युकडे नेणार्‍या फासाचं त्यांनी चुंबन घेतलं. 'इन्किलाब झिंदाबाद, वंदे मातरम, भारत माता की जय' असा जयघोष देत हे तिन्ही क्रांतिकारक हसत-हसत फासावर चढले. आणि भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी तिचे हे सुपूत्र शहीद होऊन अमर झाले.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home