Tuesday, September 27, 2016

२७ सप्टेंबर , शहिद भगतसिंग जयंती

२७ सप्टेंबर , शहिद भगतसिंग जयंती
*२७ सप्टेंबर , शहिद भगतसिंग जयंती* 🇮🇳

 भगतसिंग यांचा जन्म २७.९.१९०७ या दिवशी पंजाब राज्यातील एका सरदार घराण्यात झाला.

भगतसिंग ६-७ वर्षांचा असतानाची गोष्ट. तो शेतावर गेला असता शेतकरी गहू पेरत असलेला पाहून त्याचे कुतुहल जागृत झाले. त्याने विचारले “शेतकरीदादा, तुम्ही या शेतात गहू का टाकत आहात ?'' शेतकरी म्हणाला, “बाळ, गहू पेरले की, त्याची झाडे होतील आणि प्रत्येक झाडाला गव्हाची कणसेच कणसे येतील.'' त्यावर तो म्हणाला, “मग जर बंदुकीच्या गोळया या शेतात पेरल्या, तर त्याचीही झाडे उगवतील का ? त्यालाही बंदुका येतील का ?'' `या गोळया कशाला हव्यात', असे शेतकऱ्याने विचारल्यावर `हिंदुस्थानचे राज्य बळकावणाऱ्या इंग्रजांना मारण्यासाठी', असे क्षणाचा विलंब न टाळता त्याने आवेशपूर्ण उत्तर दिले.

१९२८ मध्ये भारतीय घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडहून `सायमन कमीशन' नावाचे शिष्टमंडळ भारतात आले. भारतात सर्वत्र या शिष्टमंडळाचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. त्या वेळी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. `सायमन परत जा' च्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. जमाव पांगवण्यासाठी आरक्षकांनी केलेल्या अमानुष लाठीआक्रमणात लाला लजपतराय घायाळ झाले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. देशभक्तीने भारावलेल्या क्रांतीकारकांना हे सहन झाले नाही. क्रांतीकारकांनी लालाजींच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या लाहोर आरक्षक ठाण्यातील इंग्रज अधिकारी स्कॉट याला मारण्याचीयोजना आखण्यात आली. मालरोड पोलीस स्टेशनवर जय गोपाळ पहारा ठेवून स्कॉटच्या हालचालींवर लक्ष ठेवेल आणि भगतसिंग व राजगुरू त्याच्या इशार्‍यावर गोळीबार करतील. पण ४ दिवस स्कॉट त्या भागात फिरकलाच नाही. शेवटी पाचव्या दिवशी कार्यालयातून एक गोरा अधिकारी बाहेर आला. जय गोपाळने भगतसिंहांना खूण केली की हाच स्कॉट असावा, यावर भगतसिंहांनी खुणेनेच सांगितले की, ‘हा नसावा’, पण ही ‘नसावा’ ची खूण राजगुरूंच्या लक्षातच आली नाही. राजगुरूंनी साहेबाच्या दिशेने गोळी झाडली. लगेचच भगतसिहांनी आपल्या पिस्तुलातून ८ गोळ्या झाडून साहेबाला पूर्ण आडवे केले. दुस-या दिवशी ‘मेला तो स्कॉट नसून साँडर्स होता´ हे कळल्यावर त्या तिघांना विशेष दु:ख झाले नाही. इंग्रज सरकारने तिघांना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. तसेच त्यांना पकडून देणाऱ्याला पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणाही केली; परंतु बरेच दिवस आरक्षकांना हुलकावणी देत ते तिन्ही क्रांतीकारक भूमिगत राहिले. पुढे फितुरीमुळे ते पकडले गेले.

19 मार्च 1929 रोजी ब्रिटिश राजवटीविरुद्ध कटकारस्थान केल्याबद्दल साम्यवादी नेत्यांची देशभर धरपकड झाली. राजबंद्यांच्या अभियोगासाठी आणि वर्गकलहाच्या बंदोबस्तासाठी पब्लिक सेफ्टी बिल, ट्रेड डिस्प्युटस बिल, प्रेस सेडिशन बिल या अन्यायकारी व जनविरोधी कायद्यांविरुद्ध भागतसिंग व त्यांच्या साथीदारांनी प्रचंड जनआंदोलन उभारले. ब्रिटिश राजवटीला धडा शिकविण्‍यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी 'इन्किलाब झिंदाबाद,' साम्राज्यशाही मुर्दाबाद' अशा गगनभेदी घोषणा देत केंद्रीय असेंब्लीत बॉम्ब फेकले. या खटल्याची सुनावणी 10 जून 1929 रोजी झाली आणि या दोन्ही क्रांतिकारकांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.
भगतसिंग व अन्य क्रांतिकारकांविरुद्ध असलेल्या विविध आरोपांवर अंतिम निकाल देण्यासाठी गव्हर्नर लॉर्ड डरविन यांनी जस्टीस जे. कोल्डस्ट्रीम यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधिशांचे एक स्पेशल ट्रायब्युनल नियुक्त केले. लाहोर खटला 5 मे 1930 रोजी सुरु झाला. हा खटला भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक रोमांचक प्रकरण होते. हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना, पंजाबपासून कोलकत्यापर्यंत क्रांतिकारकांच्या उठावाच्या कारवाया, पंजाब नॅशनल बँक लूट प्रकरण, सँडर्सचा खून खटला, आग्रा येथे बॉम्ब बनविण्याच्या प्रकरणात सहभाग, दिल्लीच्या विधिमंडळावर बॉम्ब फेकणे तसेच बॉम्ब बनविणे, खूनी हल्ले करणे, सरकार उलथून टाकण्याच्या विध्वंसक कारवाया करणे आदी गंभीर गुन्ह्यांखाली भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

फाशीची शिक्षा सुनावल्यावर हे क्रांतिकारक शहीद व्हायला उतावीळ झाले होते. भगतसिंग म्हणत, ''भारतमातेसाठीचे इतिकर्तव्य संपले. आमच्या बलिदानाने शेकडो युवक पेटून उठले पाहिजेत. त्यांनी आमचे अपुरे क्रांतिकार्य वेगाने व नेटाने चालवावे. मी खुशीने फासावर लटकून जगाला दाखवून देईन की, क्रांतिकारक आपल्या आदर्शांसाठी केवढ्या धीरांने बलिदान देतात.''
कारावासात कधी रिकामा वेळ मिळाला की, भगतसिंग हे शहीद रायप्रसाद बिस्मिल्ला यांच गाणं मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे........ मोठ्या तन्मयतेने म्हणत असत. त्यामुळे राजकैद्यांमध्ये देशाप्रति निष्ठा व स्वाभिमान वाढीस लागे. भगतसिंग आपल्या आईला (बेबेजी) म्हणत, ''फाशी झाल्यावर तू माझं शव घ्‍यायला येऊ नको, कुलबीरला पाठव, कारण तू रडायला लागली तर लोक म्हणतील, भगतसिंगची आई रडत आहे'' राष्ट्राला उद्देशून लिहिलेल्या शेवटच्या पत्रात भगतसिंग म्हणतात ''आम्ही अंतिम प्रवासाला निघाला आहोत, आमचा नमस्कार घ्या.
प्रत्येक भारतीयाला भगतसिंग यांच्या रुपात साक्षात मृत्युंजय दिसत होता. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या हौतात्म्याविषटी नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, ''हे क्रांतीवीर जरी आपल्यातून निघून गेले असले तरी, त्यांच्या राष्ट्रप्रेमाची भावना अजिंक्य असून ती अमर आहे.'' जयकौर ( भगतसिंगची आजी) जेलमध्ये भेटायला आली असता हसत-हसत गंमतीने, भगतसिंग म्हणाले, ''ये आजी ! तुला एवढ्या लांबून भला भेटायला यायला फार त्रास होतो ना? तू असं कर, या जुलुमी सरकारविरुद्ध काहीतरी गंभीर गुन्हा कर, म्हणजे तुला माझ्या जवळच कैदी म्हणून कायमचं राहायला मिळेल'' भगतसिंग यांच्या महान क्रांतिकार्याची गाथा ऐकून रशियाचे सर्वेसर्वा स्टॅलिन यांनी भगतसिंग यांना मास्कोला येण्याचे निमंत्रण दिले होते.
फाशीच्या आधी तुम्हाला काही शेवटी सांगायचं आहे का? असं मॅजिस्ट्रेटने विचारले असता, भगतसिंग म्हणाले ''क्रांती ये मानव का निसर्गदत्त हक है ! तो, आझादी ये उसका जन्मसिद्ध हक है ! आझादी और जिंदगी एक बात है ! तो गुलामी और मौत एक बात है'' हाच अखेरचा संदेश त्यांनी राष्ट्राला दिला. मॅजिस्ट्रेटला उद्देशून ते म्हणाले, मॅजिस्ट्रेट महोदय तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. आज तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे की, भारतीय क्रांतीकारक आपल्या सर्वोच्च आदर्शासाठी मृत्युचं स्वागत कसं करतात.''

23 मार्च 1931 हा अमर दिवस उजाडला. तिघांना फाशी होणार म्हणून सारं राष्ट्र व्याकुळ झालं होतं. उजव्या बाजूला सुखदेव तर डाव्या बाजूला राजगुरु आणि भगतसिंग मधोमध उभे. त्यांच्यात प्रथम कोणी फासावर चढायचं, याबाबत प्रेमकलह होता. शेवटी आपसात तडजोड करुन सुखदेव, भगतसिंग आणि मग राजगुरु अशा क्रमाने फासावर चढण्याचं ठरलं. भगतसिंग म्हणाले ''दिल से निकलेगी न मरकर भी वतन की उलफत ! मेरी मिट्टी से खुशबू-ए-वतन आएगी'' मृत्युकडे नेणार्‍या फासाचं त्यांनी चुंबन घेतलं. 'इन्किलाब झिंदाबाद, वंदे मातरम, भारत माता की जय' असा जयघोष देत हे तिन्ही क्रांतिकारक हसत-हसत फासावर चढले. आणि भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी तिचे हे सुपूत्र शहीद होऊन अमर झाले.

Wednesday, September 21, 2016

कुपोषण व बालमृत्यू रोखण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्नशील - जिल्हाधिकारी अभिजीत बांगर

पालघर : कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यामध्ये ग्राम बाल विकास केंद्र, बाल उपचार केंद्र व पोषण पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून कुपोषणाचे प्रमाण रोखण्यासाठी कालबद्ध उपाययोजना करण्यात येत असून १०० टक्के जिल्ह्यातील बालकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील आदी उपस्थित होते.

कुपोषणाचे जिल्ह्यातील प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती श्री. बांगर यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांची वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत तपासणी करून त्यांना आवश्यकतेनुसार ग्राम बालविकास, बाल उपचार व पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकूण सर्वेक्षण झालेल्या 2 लाख 24 हजार 293 बालकांपैकी साधारणत: 60 % बालकांची वजन व उंची मोजण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरीत तपासणी पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक अंगणवाडी व उपकेंद्रास भेट देऊन बालकांची तपासणी करण्यात येणार असून त्या बालकांना आवश्यकतेनूसार वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. कुपोषण व बालमृत्यु रोखण्यासाठी सॅम व मॅम मधील बालकांची दरमहा वैद्यकीय तपासणी केली जाते. तसेच 0 ते 6 वयोगटातील बालकांना वर्षातून दोन वेळा अ जीवनसत्व व जंत नाशक औषधे दिली जातात. तसेच अंगणवाडी मधील सर्व बालकांचे वेळापत्रकानुसार लसीकरण करण्यात येत असल्याचे सांगितले.

जिल्ह्यामध्ये ऑगस्ट अखेर पर्यंत सॅम मध्ये 1319 बालके असून मॅम मध्ये मोडणाऱ्या बालकांची संख्या 4715 आहे. या एकूण 6034 बालकांना तात्काळ वैद्यकीय मदत तसेच पोषण आहार पुरवठा चालू करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्याने नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ग्राम बाल विकास केंद्राने खास निधीची तरतूद केली आहे. जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड या चार तालुक्यातील 3 ते 6 वयोगटातील सर्व मुलांना आठवड्यातून दोन वेळा केळी व अंडी यांचा आहार पुरविला जात आहे. यासाठीही जिल्हास्तरावर आदिवासी उपयोजनेतून दीड कोटी रुपयांची खास तरतूद करण्यात आली आहे. हा सर्व निधी आहार समिती मार्फत खर्च करण्यात येत आहे.

तसेच जिल्हा परिषद स्व: निधीतून सॅम व मॅम मधील बालकांच्या अतिरिक्त आहारासाठी विशेष तरतूद करणार आहे. तसेच सीएसआरच्या माध्यमातून जास्तीत जास्त बालकांचे पालकत्व कंपन्यांनी स्वीकारावे यादृष्टीकोनातून प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून शिक्षण व आरोग्य विषयक योजनासाठी निधी उपलबध करून दिला आहे. ज्यायोगे या योजनांचे प्रभावी अंमलबजावणीमुळे कुपोषण व बालमृत्युचे प्रमाण कमी होण्यास चालना मिळेल. मानव विकास योजनेअंतर्गत दाइचे व भगतांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. ज्याद्वारे आरोग्य संस्थाच्या माध्यमातून प्रसूती होण्यास चालना मिळेल. तसेच हायपोथरमिया प्रिवेशन कीट आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जात आहे. याचा कमी वजनाचे बालकांना निश्चितच ही फायदा होत असल्याचे सांगितले. कुपोषणाचे प्रमाण रोखण्यासाठी जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी नरेगा व कौशल्य विकास योजना माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहे. कामाची मागणी लक्षात घेऊन मागेल त्याला काम दिले जाणार असल्याचेही श्री. बांगर यांनी सांगितले. तसेच या भागातील आदिवासी कातकरी बांधवांना तात्काळ अत्योंदय योजनेच्या शिधापत्रिका देण्याबाबत पुरवठा विभागाला सूचना दिल्या आहेत. तसेच कातकरी कुटूंबाना घरकूल योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचेही सांगितले.

भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अंगणवाड्यामधील, स्त्री गरोदर असल्याचे निश्चित झाल्यापासून म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्र व जवळच्या अंगणवाडी/मिनी अंगणवाडी मध्ये नोंदणी झाल्यापासून गरोदर स्त्रियांना बाळंतपणापर्यंत व स्तनदा मातेस बाळंतपणानंतर 6 महिने एक वेळ चौरस आहार देण्यात येत आहे. तलासरी, जव्हार, जव्हार २, विक्रमगड, मोखाडा, डहाणु, कासा, वाडा, वाडा-२, पालघर, मनोर, वसई -२ या प्रकल्पांसाठी मंजुर करण्यात आली आहे. सदर योजना जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे.

भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना टप्पा 2 मध्ये कमी वजनाची बालके, वाढ खुंटलेली मुले (Stunting), उंचीच्या प्रमाणात कमी वजन असलेली बालके (Wasting) इत्यादी समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.अनूसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात असलेल्या अंगणवाड्यांतर्गत 7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील सर्व शाकाहारी मुलांना 2 केळी मांसाहारी मुलांना 1 उकडलेले अंडे आठवड्यातून 4 वेळा म्हणजेच महिन्यातून 16 दिवस एक वेळचा अतिरिक्त आहार पुरविण्यात येतो, असेही श्री बांगर यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी वास्तव्य करणे बंधनकारक

ग्रामीण भागातील शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी वास्तव्य करणे बंधनकारक    

गुणवत्तापूर्ण आणि वेळेत सेवेसाठी मुख्यमंत्र्यांकडून निर्णय

मुंबई : ग्रामस्थांना गुणवत्तापूर्ण आणि वेळेत सेवा उपलब्ध होण्यासाठी ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या आणि घरभाडे भत्त्याचा लाभ घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी वास्तव्य करणे बंधनकारक करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

ग्रामीण जनतेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या आरोग्य, शिक्षण, पशु वैद्यकीय यासारख्या सुविधा गावातच आणि वेळेत उपलब्ध होण्यासाठी शासनाच्या वैद्यकीय अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक, तसेच राज्याच्या विविध विभागाच्या अधिपत्याखालील राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागात नियुक्ती दिली जाते. ग्रामविकासासाठीच्या विविध योजना आणि कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याबरोबरच संबंधित सेवा ग्रामस्थांना वेळेत उपलब्धतेच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांनी पदस्थापना झालेल्या गावातच राहणे अपेक्षित आहे. मात्र, बहुतेक कर्मचारी जवळच्या मोठ्या गावात, शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहणे पसंत करतात. त्याचा ग्रामीण भागातील विविध सेवांवर विपरित परिणाम होताना दिसतो. सेवा हमी कायदा आणि आपले सरकारच्या माध्यमातून ठराविक कालावधीत सेवा देण्यासाठी राज्य शासनाने प्रभावी उपाययोजना आखल्या आहेत. त्यानुसार ग्रामीण जनतेला वेळेत दर्जेदार सेवा मिळण्यासाठी आज हा निर्णय घेण्यात आला.

पालघर परीसरात बहुतेक रस्ते पाण्याखाली.

*पालघर न्युज*

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार २२ ते २४ सप्टेंबर या काळात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. २२ व २३ सप्टेंबर रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 पालघर परीसरात बहुतेक रस्ते पाण्याखाली आहेत.
 नागरीकांनी प्रवास करताना योग्य खबरदारी घ्यावी.

आपत्कालीन परीस्थितीत संपर्क:
पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पालघर
श्री नितिन ए.नाईक - ७७१००५५५१५
दूरध्वनी क्रमांक ०२५२५-२५३१११
Email Id:-collectorpalghar@gmail.com

Monday, September 19, 2016

पालघरचे शेतकरी इस्त्रायलला

*पालघरचे शेतकरी इस्त्रायलला*

देहेरी, बोर्डी, डहाणू भागातील चिकू बागा, लिचीची लागवड, फळबागा, चिंचणी, तारापूर, वाणगांव पट्टयातून भोपळी मिरची - केळीच्या बागा, फुलबागा आणि भाजीपाल्याचे मळे फुलवून वाणगांव पॅटर्न निर्माण केला. आगाशी, वसई भागांतील फुलबागा, राजेळी केळी व त्यापासून निर्माण होणारी सुकेळी अशा कितीतरी पॅटर्नने परिपूर्ण असलेला हा समाज आहे. सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे अध्यक्ष विलास चोरघे यांच्यामुळे २२ शेतकरी इस्त्रायलच्या दौर्‍यावर निघाले आहेत. आमच्या भागातील शेतकरी हा नेहमीच अभिमानाने म्हणतो की, कोण म्हणतो शेती परवडत नाही ? अतवृष्टी असो किंवा दुष्काळ असो आमचा शेतकरी हा उत्तमच पिक घेतो. आत्महत्या हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही किंबहुना असा विचार कोसो दूर असतो. ही सहल शेतकर्‍यांना बरेच काही देऊन जाईल असे चोरघे यांनी सांगितले. वसई: शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याकरता वसई तालुक्यातील २२ शेतकरी रविवारी इस्त्रायल दौर्‍यावर जात आहेत.

पालघर जिल्ह्यात सोमवंशी क्षत्रिय समाजाची लोकसख्या सर्वाधिक आहे. या समाजाचा मुख्य उद्योग म्हणजे शेतीवाडी आहे. आज ह्या समाजातील शेतकरी अभ्यासू आणि प्रयोगशील आहे. पिढीजात शेती करीत असताना कुटुंबाची गुजराण करण्याचे साधन असे न बघता आधुनिकतेची कास धरुन शेती हा उद्योग जास्तीत जास्त फायदेशीर कसा होईल, याकडे सतत पाठपुरावा निरनिराळ्या प्रयोगाद्वारे नेहमीच शेतीमध्ये प्रगती करीत आहे.

राहुरी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु पद्माश्री हरिश्‍चंद्र गोपाळराव पाटील यांनी जपानी शेती भारतात प्रथम रुजवणार्‍या समाजाच्या सुपुत्राने भाताच्या उत्पन्नात क्रांती घडवून आणली. जागतिक पातळीचे थोर कृषीतज्ञ व भारत सरकार नियोजन मंडळाचे माजी सदस्य डॉ. जयंतराव पाटील तसेच निसर्गशेतीचे गाढे पुरस्कर्ते गांधीवादी निसर्गमित्र व बजाज पारितोषिक सन्मानित स्व. भास्कर सावे अशा कितीतरी समाजातील कृषीतज्ञ व्यक्तींनी शेतीच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावतच नेला. शेतीमधील या महान व्यक्तींचा पाठपुरावा करुन देहेरी पासून वसई पर्यंतच्या या शेतकरी बांधवांनी तंत्रज्ञान, आधुनिकता व अभ्यासू वृत्ती अंगिकारुन शेती व्यवसायामध्ये एक निराळा ठसा उमटवला इतकेच नव्हे क्रांती घडवली. शेतीमध्ये जे जे काही नवीन आहे ते अंगिकारण्याची वृत्ती बाळगून नवीन तंत्रज्ञान समजून घेण्याच्या मागे अभ्यासू वृत्तीने प्रयत्नशील राहतात. आज समाजातील उच्च विद्याविभूषित तरुणही नोकरीच्या मागे न धावता मोठय़ा प्रमाणात शेती, भाजीपाला, फळे बागायती व्यवसाय करु लागला आहे.