Thursday, August 4, 2016

वसईत रेल्वे अपघातात ६ महिन्यांत ११३ बळी

वसईत रेल्वे अपघातात ६ महिन्यांत ११३ बळी
४४ मृतदेह बेवारस, ओळख पटविण्याचे रेल्वेचे आवाहन
वसई-विरार प्रवासात रेल्वे अपघातांमध्ये वाढ होत असून गेल्या सहा महिन्यांत तब्बल विविध अपघातांमध्ये ११३ जणांना मृत्यू झाला आहे. त्यापैकी ४४ मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी मृतांचे छायाचित्र असलेले फलक प्रत्येक स्थानकावर लावले आहेत.
वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मीरा रोड, भाईंदर, नायगाव, वसई रोड, नालासोपारा, विरार आणि वैतरणा अशी आठ रेल्वे स्थानक  येतात. वसई-विरार तसेच मीरा-भाईंदर शहरातून दररोज लाखो प्रवासी मुंबईला प्रवास करत असतात. दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी वाढत असून अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०१६ ते जून २०१६ या सहा महिन्यांच्या कालावधीत या आठ रेल्वे स्थानकाच्या हद्दीत एकूण ११३ जणांचा मृत्यू झाला तर १५८ जण जखमी झाले आहेत. याचाच अर्थ महिन्याला सरासरी २० आणि आठवडय़ाला सरासरी ४ ते ५ जणांचा अपघातात मृत्यू होत आहे. सर्वाधिक अपघात हे रूळ ओलांडताना, लोकल ट्रेनचा धक्का लागून, गर्दीमुळे तोल जाऊन खाली पडून होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बेवारस मृतदेहांची स्थानकांवर छायाचित्रे
                ११३ मयत प्रवाशांपैकी १५ महिला आणि ९८ पुरुष
प्रवासी आहेत. परंतु त्यातील ४४ मयत प्रवाशांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे या बेवारस मृतदेहांची छायाचित्रे असलेले फलक रेल्वे पोलिसांनी सर्व फलाटांवर लावले आहेत. मुंबईत हा प्रयोग यशस्वी झाला होता. याबाबत बोलताना बागवे यांनी सांगितले की, अनोळखी मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी आम्ही विविध मार्गाने प्रयत्न करत असतोच. परंतु फलाटावर जाहीरपणे बेवारस मृतदेहांची छायाचित्रे लावली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल. रेल्वेतून विविध भागातील लोक प्रवास करत असतात. ते आपल्या परिचितांना या मृतदेहांमधून ओळखू शकतील. मुंबईत अनेक बेवारस मृतदेहांची अशाच पद्धतीने ओळख पटली होती.
वाढते अपघात ही आमच्यासाठी  चिंतेची बाब आहे. रूळ ओलांडताना अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी आम्ही रूळ ओलांडू नये याचे आवाहन प्रवाशांना करून जनजागृती करत असतो. रेल्वेने पुरसे जिने बांधले असून आता स्वयंचलित जिनाही तयार होत आहे. या मार्गावर काही धोकादायक विद्युत खांब आहेत. त्याचा धक्का लागून प्रवाशांचा मृत्यू होत होता. असे धंोकादायक खांब बदलण्यात आले आहेत.
–  महेश बागवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रेल्वे पोलीस ठाणे

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home