Thursday, August 4, 2016

पालघर, विक्रमगड: पुरामुळे बांधासह भातशेती गेली वाहून

पालघर, विक्रमगड: पुरामुळे बांधासह भातशेती गेली वाहून

बळीराजा मेटाकुटीला : अनेक भागातील भातरोपे कुजली

विक्रमगड : पावसाचा जोर कायम असून गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून याचा परिणाम सर्वच स्तरावर होतांना दिसत आहे. अतवृष्टीमुळे भातशेती धोक्यात आली असून विक्रमगड तालुक्यासह खुडेद, बोरसेपाडा, कुंडाचापाडा, महालेपाडा आदी भागांतील शेतीचे बांध पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने शेतीसह वाहून गेले आहेत. तर अनेकांची भातशेती पाण्याखाली व जास्त पावसामुळे लागवडीखाली भातरोपे कुजण्याचा संभव असून त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहेत..

अनेक भागात भातरोपे कुजल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झालेले आहे. खांड खरपडपाडा रस्त्यांची मोरी(पुल)तुटल्याने जवळजवळ ३00 लोकसंख्या असलेल्या या गावाला जाण्याचा मार्गच उरलेला नाही. तसेच आंबेघर पुलाचे बांधकाम नवीन असतांनाही पुलाच्या सुरुवातीला व शेवटी असलेला रस्ता पाण्याबरोबर पाहून गेला आहे. याबाबत खुडेद येथील ग्रामस्थांनी व खांड-खरपडपाडा ग्रामस्थांनी तत्काळ नुकसानभरपाई व दुरुस्तीकामी अर्ज सादर केला असल्याची प्रत पत्रकांना दिली आहे.

यंदा जूनच्या पंधरवड्यापासूनच सर्वत्र पावसाची दमदार सुरुवात झाली आहे. त्यानुसार शेतकर्‍यांनी कोणताही विलंब न करता भातशेतीची कामे हाती घेतली. पावसाचे प्रमाण चांगले असल्याने भातरोपेही चांगल्या प्रकारे झाली. मात्र, सततच्या या पावसाने काही दिवस उघडीप न घेतल्याने भातांच्या खाचरात पाणी साठून या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने भातरोपे कुजण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. (वार्ताहर) 

खांड-खरपडा रस्त्यामध्ये असलेली मोरी पावसाचे अतवृष्टीने वाहून गेल्याने गावातील ३00 लोकांचा संपर्क तुटलेला आहे. त्यांना रहदारीसाठी दुसरा मार्ग नाही यावर त्वरित उपाययोजना करण्याकामी मी अर्ज सादर केलला आहे.
- विजय खुताडे, माजी सरपंच, ओंद. 

मंगळवारी झालेल्या अतवृष्टीमुळे शेतामध्ये नदीसारखे पाणी वाहत होते. त्यामध्ये आमचे गावपाड्यातील शेतीची बांधबंधिस्ती वाहून गेल्याने आमचे मोठे नुकसान झालेले आहे.
- विष्णू नवसू चौधरी, खुडेद.

 गत दोनचार दिवसांत पावसाने थैमान केल्याने त्यामध्ये अनेकांची भातरोपे पाहून गेली आहेत. तर अनेकांचे भात कुजल्याने मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने पंचनामे करावे व विमा योजनेचा लाभ शेतकर्‍यांना द्यावा
- गणपत नवसू हरपाले,
खुडेद.

Labels: , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home