Thursday, August 4, 2016

वैतरणा पूल धोकादायक!

वैतरणा पूल धोकादायक!

बेकायदा वाळू उपशामुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न
विरारजवळील वैतरणा खाडीवर असलेला रेल्वे पूल धोकादायक बनलेला आहे. या पुलाखाली खाडीतून बेकायदा वाळू उपसा होत असल्याने या पुलाला धोका निर्माण झालेला आहे. पुलाचा पाया कमकुवत झाला असून तो कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर पुन्हा वैतरणा पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
पश्चिम रेल्वेचा वैतरणा नदीवर पूल आहे. १९७० च्या दशकात हा पूल बांधण्यात आला असून गुजरात राज्य आणि त्यापुढे उत्तरेत जाणारा हा महत्त्वाचा आणि एकमेव रेल्वे पूल आहे. वैतरणा खाडीत मोठय़ा प्रमाणात बेकायदा वाळूउपसा होत असते,  मात्र त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. वाळूमाफिया सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करत असतात. अगदी पुलाच्या खालीही वाळू उपसा सुरू असल्याने त्याचा परिणाम पुलावर झालेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाळू उपसा सुरू असल्याने पुलाचा पाया कमकुवत झाला आहे. याबाबत अनेकदा स्थानिक नागरिकांना रेल्वे आणि प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या, परंतु वाळूमाफियांवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. दीड वर्षांपूर्वी या पुलाची संरक्षक भिंत खचल्याने पुलाची वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर पुलाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला होता. मात्र वाळूमाफियांची पुलाखालील वाळूचोरी आजही सुरू आहे.
रात्रीच्या वेळी वाळू उपसा
सक्शन पंपाने वाळू उपसा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सक्शन पंपाने एकाच वेळी हजारो ब्रास वाळू उपसली जाते. वाळूमाफियांनी वाळू उपसा करत वैतरणा, नारिंगी आदी किनारे पोखरले आहेत. आता त्यांनी जास्त फायदा मिळविण्यासाठी पुलाच्या खालील वाळू उपसा सुरू केलेला आहे. या भागात खूप वाळू साठा आहे. वाळूमुळेच पुलाच्या पायाला मजबुती मिळते, पण वाळूमाफिया येथीलच वाळू उपसत असल्याचे नारिंगी येथील रेती व्यावसायिकांनी सांगितले.
वैतरणा पूलाच्या खाली मोठय़ा प्रमाणावर बेकायदा वाळूउपसा होत आहे. आम्ही गेल्या पाच वर्षांपासून या गंभीर प्रश्नावर पालघर जिल्हाधिकारी आणि केंद्रीय महसूल सचिवांशी पत्रव्यवहार करत आहोत. या वाळू उपशामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलत असून त्यामुळे पुलाला मोठा धोका आहे. पूल पडल्यास जीवितहानी तर होईलच शिवाय मुंबईचा उत्तरेकडील राज्यांशी संपर्क तुटेल.
– रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

Labels: , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home