Thursday, August 4, 2016

महावितरणाच्या दरवाढीस वसईत विरोध

 महावितरणाच्या दरवाढीस वसईत विरोध

वसई : अन्य राज्यात वीज दर ३५ ते ५0 टे असताना महाराष्ट्र राज्यात आधीच जास्त असलेले वीज दर आणखीन वाढवण्याची मागणी ग्राहकांना लुटणारी असून महावितरण कंपनीस वाढ मुळीच देऊ नये अशी मागणी प्रदेश जनता दलाचे नेते व राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे आणि महासचिव मनवेल तुस्कानो यांनी वीज नियमाक आयोगासमोर सुनावणीत बोलताना केली. अन्य राज्यातील वीज दराच्या पातळीवर येईपर्यंत वीज दर कमी करावेत (१0१ ते ३00 युनिटपर्यंतचे दर कमी करावेत) अशीही मागणी त्यांनी केली. महावितरणे ५६३७२ कोटी रुपये दरवाढीसाठी वीज नियमाक आयोगासमोर पिटीशन दाखल केला आहे. त्याची सुनावणी नेरुळ येथे तीन न्यायमुर्तींसमोर झाली.
यावेळी मनवेल तुस्कानो यांनी भ्रष्टाचार, गलथान कारभार, वीज गळती, वीज चोरी, थकबाकीदार यांच्यामुळे आलेली तुट भरुन काढण्यासाठी सर्व ग्राहकांवर वीज दरवाढ करु नये, देशात समान वीज दर असावेत, मुंबईत तीन वितरण कंपन्या आहेत, त्यांचे दर कमी मग राज्यात जास्त कसे असे मुद्दे आयोगासमोर मांडले. ५५ हजार कोटीचे कर्ज फिटल्यानंतर वीज दर कमी करु असे वीज मंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. म्हणजे कर्ज फेडण्याची जबाबदारी वीज ग्राहकांच्या माथी मारणार काय? असेही मनवेल तुस्कानो यांनी सुनावणीत विचारले. वसईत लोकांना भरमसाठ बिले आली असल्याचे सांगत सदोष वीज मीटरमुळे बिले अधिक आली आहेत असे १0 लाख वीज मीटर सदोष आढळले आहेत. रोलॅक्स कंपनीचे सदोष मीटर कुणी घेतले त्याची चौकशी व्हावी. रोलॅक्सची २९ कोटीची बँक गॅरंटी जप्त करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सदोष यंत्रणा यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. महावितरण स्टॅण्डर्ड ऑफ परफॉर्म्स पाळत नाही. महाग वीजेमुळे उद्योग गुजरात वा अन्य राज्यात गेले. त्यामुळे बेरोजगारी वाढली. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही असे वसई वीज ग्राहक संघटनेचे जॉन परेरा यांनी सुनावणीत म्हटले. (प्रतिनिधी)
या दरवाढीस विरोध करणारे ४६६ अर्ज दाखल झाले होते. या सुनावणीस वसईतून जनता दल (से.), निर्भय जन मंच, वसई वीज ग्राहक संघटना असे तीन अर्ज दाखल झाले होते
पालघर, बोईसर, नवी मुंबई, सातारा, ठाणे असे राज्यभरातून अर्ज दाखल झाले होते आणि सुनावणीसाठी मोठय़ा संख्येने ग्राहक उपस्थित होते.

पालघर, विक्रमगड: पुरामुळे बांधासह भातशेती गेली वाहून

पालघर, विक्रमगड: पुरामुळे बांधासह भातशेती गेली वाहून

बळीराजा मेटाकुटीला : अनेक भागातील भातरोपे कुजली

विक्रमगड : पावसाचा जोर कायम असून गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून याचा परिणाम सर्वच स्तरावर होतांना दिसत आहे. अतवृष्टीमुळे भातशेती धोक्यात आली असून विक्रमगड तालुक्यासह खुडेद, बोरसेपाडा, कुंडाचापाडा, महालेपाडा आदी भागांतील शेतीचे बांध पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने शेतीसह वाहून गेले आहेत. तर अनेकांची भातशेती पाण्याखाली व जास्त पावसामुळे लागवडीखाली भातरोपे कुजण्याचा संभव असून त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहेत..

अनेक भागात भातरोपे कुजल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झालेले आहे. खांड खरपडपाडा रस्त्यांची मोरी(पुल)तुटल्याने जवळजवळ ३00 लोकसंख्या असलेल्या या गावाला जाण्याचा मार्गच उरलेला नाही. तसेच आंबेघर पुलाचे बांधकाम नवीन असतांनाही पुलाच्या सुरुवातीला व शेवटी असलेला रस्ता पाण्याबरोबर पाहून गेला आहे. याबाबत खुडेद येथील ग्रामस्थांनी व खांड-खरपडपाडा ग्रामस्थांनी तत्काळ नुकसानभरपाई व दुरुस्तीकामी अर्ज सादर केला असल्याची प्रत पत्रकांना दिली आहे.

यंदा जूनच्या पंधरवड्यापासूनच सर्वत्र पावसाची दमदार सुरुवात झाली आहे. त्यानुसार शेतकर्‍यांनी कोणताही विलंब न करता भातशेतीची कामे हाती घेतली. पावसाचे प्रमाण चांगले असल्याने भातरोपेही चांगल्या प्रकारे झाली. मात्र, सततच्या या पावसाने काही दिवस उघडीप न घेतल्याने भातांच्या खाचरात पाणी साठून या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने भातरोपे कुजण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. (वार्ताहर) 

खांड-खरपडा रस्त्यामध्ये असलेली मोरी पावसाचे अतवृष्टीने वाहून गेल्याने गावातील ३00 लोकांचा संपर्क तुटलेला आहे. त्यांना रहदारीसाठी दुसरा मार्ग नाही यावर त्वरित उपाययोजना करण्याकामी मी अर्ज सादर केलला आहे.
- विजय खुताडे, माजी सरपंच, ओंद. 

मंगळवारी झालेल्या अतवृष्टीमुळे शेतामध्ये नदीसारखे पाणी वाहत होते. त्यामध्ये आमचे गावपाड्यातील शेतीची बांधबंधिस्ती वाहून गेल्याने आमचे मोठे नुकसान झालेले आहे.
- विष्णू नवसू चौधरी, खुडेद.

 गत दोनचार दिवसांत पावसाने थैमान केल्याने त्यामध्ये अनेकांची भातरोपे पाहून गेली आहेत. तर अनेकांचे भात कुजल्याने मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने पंचनामे करावे व विमा योजनेचा लाभ शेतकर्‍यांना द्यावा
- गणपत नवसू हरपाले,
खुडेद.

Labels: , , ,

वसईत रेल्वे अपघातात ६ महिन्यांत ११३ बळी

वसईत रेल्वे अपघातात ६ महिन्यांत ११३ बळी
४४ मृतदेह बेवारस, ओळख पटविण्याचे रेल्वेचे आवाहन
वसई-विरार प्रवासात रेल्वे अपघातांमध्ये वाढ होत असून गेल्या सहा महिन्यांत तब्बल विविध अपघातांमध्ये ११३ जणांना मृत्यू झाला आहे. त्यापैकी ४४ मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी मृतांचे छायाचित्र असलेले फलक प्रत्येक स्थानकावर लावले आहेत.
वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मीरा रोड, भाईंदर, नायगाव, वसई रोड, नालासोपारा, विरार आणि वैतरणा अशी आठ रेल्वे स्थानक  येतात. वसई-विरार तसेच मीरा-भाईंदर शहरातून दररोज लाखो प्रवासी मुंबईला प्रवास करत असतात. दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी वाढत असून अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०१६ ते जून २०१६ या सहा महिन्यांच्या कालावधीत या आठ रेल्वे स्थानकाच्या हद्दीत एकूण ११३ जणांचा मृत्यू झाला तर १५८ जण जखमी झाले आहेत. याचाच अर्थ महिन्याला सरासरी २० आणि आठवडय़ाला सरासरी ४ ते ५ जणांचा अपघातात मृत्यू होत आहे. सर्वाधिक अपघात हे रूळ ओलांडताना, लोकल ट्रेनचा धक्का लागून, गर्दीमुळे तोल जाऊन खाली पडून होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बेवारस मृतदेहांची स्थानकांवर छायाचित्रे
                ११३ मयत प्रवाशांपैकी १५ महिला आणि ९८ पुरुष
प्रवासी आहेत. परंतु त्यातील ४४ मयत प्रवाशांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे या बेवारस मृतदेहांची छायाचित्रे असलेले फलक रेल्वे पोलिसांनी सर्व फलाटांवर लावले आहेत. मुंबईत हा प्रयोग यशस्वी झाला होता. याबाबत बोलताना बागवे यांनी सांगितले की, अनोळखी मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी आम्ही विविध मार्गाने प्रयत्न करत असतोच. परंतु फलाटावर जाहीरपणे बेवारस मृतदेहांची छायाचित्रे लावली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल. रेल्वेतून विविध भागातील लोक प्रवास करत असतात. ते आपल्या परिचितांना या मृतदेहांमधून ओळखू शकतील. मुंबईत अनेक बेवारस मृतदेहांची अशाच पद्धतीने ओळख पटली होती.
वाढते अपघात ही आमच्यासाठी  चिंतेची बाब आहे. रूळ ओलांडताना अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी आम्ही रूळ ओलांडू नये याचे आवाहन प्रवाशांना करून जनजागृती करत असतो. रेल्वेने पुरसे जिने बांधले असून आता स्वयंचलित जिनाही तयार होत आहे. या मार्गावर काही धोकादायक विद्युत खांब आहेत. त्याचा धक्का लागून प्रवाशांचा मृत्यू होत होता. असे धंोकादायक खांब बदलण्यात आले आहेत.
–  महेश बागवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रेल्वे पोलीस ठाणे

वसई तालुक्यातील बोगस पदव्यांचे प्रकरण तापले

वसई तालुक्यातील बोगस पदव्यांचे प्रकरण तापले
वसई तालुक्यातील जिल्हा परिषदशाळेच्या १३२ शिक्षकांनी विविध विद्यापीठांतून बोगस पदव्या मिळवून त्याआधारे नियम बाह्य वेतन वाढ व पदन्नोत लाटल्या प्रकरणीचे पडसाद पावसाळी अधिवेशनात उमटले आहेत. या प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त होऊन सव्वा महिना उलटूनही दोषी शिक्षकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्‍या जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांविरोधात सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
वसईतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील १३२ शिक्षकांनी राजतील व राजबाहेरील विविध विद्यापिठातून बोगस पदव्या मिळवताना नियमानुसार आवश्यक रजा शाळेतून घेतलेली नाही. सदर शिक्षक एकाच वेळी शाळेत कामावरही हजर असताना त्याचवेळी ते बीएड व बी.पीएड. या अभसक्रमाच्या परिक्षा देत असल्याचा घोटाळा वसईचे भाजपा अध्यक्ष मारुती घुटुकडे यांनी उजेडात आणला होता. याप्रकरणी वसईच्या गटशिक्षणाधिकार्‍यांनी चौकशी अहवाल जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांकडे पाठवला आहे. मात्र, त्यावर जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांकडून अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.
या प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात हे प्रकरण खरे आहे का? असा प्रश्न सदस्यांकडून विचारण्यात आला असता. त्यावर अशंत: खरे असे अपूर्ण व अस्पष्ट उत्तर देण्यात आले आहे. याप्रकरणी दोषी विरोधात कोणती कारवाई करण्यात आली? या दुसर्‍या प्रश्नावर १३ जुन २0१६ रोजी कारवाईसीठी प्रस्ताव पालघर जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांकडे सादर केल्याचे उत्तर देण्यात आले आहे. मात्र कारवाईस विलंबनाची कारणे का? या तिसर्‍या प्रश्नावर निरंक असे उत्तर देण्यात आले आहे. यावरुन घोटाळ्या प्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचे घुटुकडे यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) दोषी शिक्षकांना पाठीशी घालण्याचा प्रकार या प्रकरणी आधी देण्यात आलेल्या दोषी शिक्षकांची संख्या १३२ वरुन नंतरच्या यादीत १२६ दाखवण्यात आली आहे. सहा नावे कशी वगळली गेली? बीपीएड हा शारिरीक शिक्षणाचा अभ्यासक्रम विद्यालयात न जाता व शाळेतून रजाही न घेता कसा पूर्ण झाला? कार्यालयाकडून अहवालात देण्यात आलेल्या यादीत कोणत्याही मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखाचे नाव नाही. मग ते पदवीधर नाहीत का? अशा प्रश्नांचा खुलासा चौकशी अहवालात झालेला नाही. अहवाल येऊन ४५ दिवस उलटल्यावरही पाच महिने चाललेल्या या प्रकरणात सतत वेळ काढूपणा अवलंबण्यात येत असल्याने जिल्हा परिषदेच शिक्षणाधिकार्‍यांविरोधात सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी घुटुकडे यांनी केली आहे. शिक्षकांनी फसवणूक केल्याने त्यामुळे त्यांचवर तातडीने कारवाई होणे गरजेचे असताना शिक्षणाधिकारी दोषी शिक्षकांना पाठिशी घालण्याचे काम करीत असल्याचा घुटुकडे यांचा आरोप आहे.

भारतीय नौदलांत करिअर करण्याची उत्तम संधी

भारतीय नौदलांत करिअर करण्याची उत्तम संधी
अभियांत्रिकी पदवीच्या शेवटच्या वर्षांत शिकत असलेल्या स्त्री आणि पुरुषांना युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमअंतर्गत भारतीय नौदलांत करिअर करण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे. २५ जून-०१ जुलै २०१६च्या एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये या प्रवेशाविषयी निवेदन प्रसिद्ध झाले आहे.
पात्रता :
१) बी.ई./ बी.टेक. पदवीचे शेवटच्या वर्षांत शिकणारे स्त्री व पुरुष.
२) कोणत्याही वर्षी एकही विषयाचा बॅकलॉग नसावा.
३) बी.ई./ बी.टेक.च्या आतापर्यंत झालेल्या परीक्षांमध्ये सरासरी ६० टक्क्य़ां हून अधिक गुण.
४) बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषय घेऊन बारावी पूर्ण केलेला तरुण/ तरुणी.
५) जून २०१७ पर्यंत बी.ई./ बी.टेक. पूर्ण होऊन अभियांत्रिकी पदवीच्या सर्व वर्षांचे सरासरी गुण ६० टक्क्यांहून अधिक.
६) वय २३ वर्षांचे आतील (अर्ज करताना) जन्मतारीख ०२ जुलै १९९३ नंतर असणे जरुरी.
७) पायलट तसेच ऑब्झव्‍‌र्हरसाठी १६२.५ सेंटिमीटर (५ फूट ४ इंच)हून अधिक उंची असणे आवश्यक (स्त्री/ पुरुषांसाठी)
८) पायलट आणि ऑब्झव्‍‌र्हर ब्रँच/ केडरव्यतिरिक्त असलेल्या ब्रँचेसकरिता पुरुषांची उंची १५७ सेंटिमीटर (५ फूट २ इंच) हून अधिक तर स्त्रियांची उंची १५२ सेंटिमीटर (५ फूट ) हून अधिक.
ब्रँच / केडर
युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमअंतर्गत/ पुरुषांना जनरल सव्‍‌र्हिस (एक्स) ब्रँचमध्ये परमनंट कमिशन मिळू शकते. महिलांना या एंट्रीअंतर्गत पायलट, ऑब्झव्‍‌र्हर, नेव्हल आर्किटेक्चर या ब्रँचेसमध्ये शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन मिळू शकते तर पुरुषांसाठी शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन पायलट, ऑब्झव्‍‌र्हर, जनरल सव्‍‌र्हिस (एक्स), आय. टी. टेक्निकल (इंजिनीअरिंग), टेक्निकल (इलेक्ट्रिकल), टेक्निकल (नेव्हल आर्किटेक्चर), सबमरीन (इंजिनीअरिंग) आणि सबमरीन (इलेक्ट्रिकल) या ब्रँचेसमध्ये मिळण्याची सुविधा आहे.
वरील दिलेल्या सर्व ब्रँचेसमध्ये अभियांत्रिकी पदवीच्या सर्व ब्रँचेसचे तरुण/ तरुणी अर्ज करू शकत नाहीत. पायलट आणि ऑब्झव्‍‌र्हर ब्रँचसाठी बी.ई./ बी.टेकच्या सर्व ब्रँचचे तरुण / तरुणी अर्ज करण्यास पात्र आहेत. मात्र इतर ब्रँचेसमध्ये जाण्यासाठी विशिष्ट ब्रँच असणे आवश्यक आहे. या सर्व माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूज पाहावा अथवा भारतीय नौदलांच्या www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर पाहावे.
अर्ज करण्याची पद्धत – १) उमेदवाराने ०७ ऑगस्टच्या आत अर्ज करणे जरुरी आहे.
२) अर्ज ऑनलाइन (ई- अ‍ॅप्लिकेशन) भरणे जरुरी आहे.
३) अर्ज करण्याआधी ww.joinindiannavy.gov.in संकेतस्थळांवर भेट द्यावी तसेच २५ जून – ०१ जुलै २०१६च्या एम्प्लॉयमेंट न्यूजमधील निवेदनातील फॉर्म भरण्याविषयी दिलेल्या सूचना वाचाव्यात. ४) अर्जदाराने एकच अर्ज करायचा आहे. जरी तो दोन किंवा अधिक ब्रँच/ केडरसाठी पात्र असला तरीदेखील एकच अर्ज करावयाचा आहे. दोन अर्ज केल्यास उमेदवारी रद्द केली जाते. जर दोन / तीन ब्रँच / केडरला पात्र असल्यास उमेदवाराने प्राधान्यक्रम द्यावा. ५) अर्ज केल्यानंतर तो सिस्टीम जनरेटेड अ‍ॅप्लिकेशन नंबरसह तो अर्ज तयार होतो. त्याची एक प्रिंट घ्यावी. कॅम्पस इंटरव्हय़ूच्या वेळी तो फॉर्म व १० वी, १२ वी तसेच अभियांत्रिकी पदवीचे सर्व मार्कशीट्सबरोबर ठेवाव्यात. ६) अर्जाच्या शेवटी असलेल्या जाहीरनाम्यावर प्राचार्य अथवा हेड ऑफ डिपार्टमेंट (एचओडी)ची स्वाक्षरी घ्यावी.
निवड पद्धती –
अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवारांना नेव्हल कॅम्पस सिलेक्शन टीमच्या मुलाखतीस सामोरे जावे लागेल. कॅम्पस इंटरव्हय़ू क्वालिफाय करणाऱ्या उमेदवारांना त्यांनी दिलेल्या ब्रँच/ केडरच्या पसंतीच्या आधारावर एस.एस.बी. मुलाखतीसाठी शॉर्ट लिस्ट करण्यात येईल. ब्रँड/ केडरची निवड नेव्हल हेडक्वॉर्टर व्हेकन्सीजच्या आधारावर करेल. एस.एस.बी. मुलाखत बंगळुरू/ भोपाळ/ कोइम्बतूर/ विशाखापट्टनम येथे डिसेंबर २०१६ ते एप्रिल २०१७ या काळात होईल. एस.एस.बी. मुलाखत दोन टप्प्यांत घेतली जाते. पहिल्या टप्प्यात इंटेलिजन्स टेस्ट आणि पिक्चर परसेप्शन अ‍ॅण्ड डिस्कशन टेस्ट हे सेंटरवर पहिल्या दिवशी घेण्यात येते आणि या टप्प्यात क्वालिफाय न झालेल्या उमेदवारांना त्याच दिवशी घरी पाठविण्यात येते. पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात पहिल्या दिवशी मानसिक चाचणी व पुढील दोन दिवसांत सामूहिक परीक्षणाला सामोरे जावे लागते. याच तीन दिवसांत एके दिवशी वैयक्तिक मुलाखत घेतली जाते, जी साधारणत: तासभर चालते. या परीक्षणानंतर म्हणजे चौथ्या दिवशी सर्व उमेदवारांना १०-१२ ऑफिसर्सच्या पॅनेलसमोर दोन ते तीन मिनिटांसाठी एका छोटय़ा मुलाखतीला सामोरे जावे लागते, ज्यास कॉन्फरन्स (conference) म्हणतात. कॉन्फरन्स झाल्यानंतर दोन-चार तासांत मुलाखतीचा निकाल जाहीर करण्यात येतो. पायलट एंट्रीसाठी असलेल्या उमेदवारांना एस.एस.बी. मुलाखतीव्यतिरिक्त पायलट अ‍ॅप्टिटय़ूड बॅटरी टेस्ट (पी.ए.बी.टी.) द्यावी लागते आणि ती क्वालिफाय झाल्यास ते पात्र ठरतात. एस.एस.बी. मुलाखतीत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी वैद्यकीय चाचणी सैनिकी रुग्णालयात करण्यात येते. वैद्यकीयदृष्टय़ा पात्र ठरलेले उमेदवार ब्रँच/ केडरमध्ये रिक्त जागांच्या आधारावर त्यांच्या मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारावर बनलेल्या गुणवत्ता यादीप्रमाणे भारतीय नौदलात प्रवेश मिळतो.

आता ‘मराठी’विना रिक्षांचे परवाने

‘मराठी’विना रिक्षांचे परवाने

राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

रिक्षा परवाना मिळण्यासाठी परिवहन विभागाने मराठी भाषेची सक्ती  करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने आता मराठीची अट वगळून परवाने देण्यात येतील, असे आश्वासन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिले. राज्य सरकारचे वक्तव्य उच्च न्यायालयाने नोंदवून घेतले असून निर्णयाची ताबडतोब अंमलबजावणी करण्याची सूचना केली.

महाराष्ट्र परिवहन विभागाने २३ ऑक्टोबर २०१५ ला एक परिपत्रक जारी केले. त्या परिपत्रकानुसार ऑटोरिक्षा चालविण्यासाठी आवश्यक परवाना मिळविण्याकरिता मराठी भाषा बोलता, लिहिता आणि वाचता येणे आवश्यक आहे. राज्याच्या परिवहन उपायुक्तांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक जारी करण्यात आले. या परिपत्रकानुसार गेल्या २० आणि २४ फेब्रुवारीला नागपूरच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ऑटोरिक्षा परवानाधारकांना नोटीस पाठविली. त्यानुसार २९ फेब्रुवारी ते ५ मार्च २०१६ या कालावधीमध्ये ऑटोरिक्षा चालकांचे मराठी ज्ञान तपासण्यासाठी मुलाखत आणि चाचणी परीक्षा घेण्यात येत असल्याचे सांगितले. त्यासाठी मुलाखत आणि चाचणी परीक्षा घेण्याचे ठरले. ज्या ऑटोचालकांना मराठी वाचता किंवा बोलता येत नाही त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेराव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. याचिककर्त्यांनुसार मोटर वाहन कायद्याच्या कलम २४ नुसार ऑटो चालविण्यासाठी परिवहन विभागाकडून बॅच बिल्ला देण्यात येतो. त्यासाठी मराठी भाषेचे ज्ञान आणि त्या भागातील प्रचलित भाषा येणे आवश्यक आहे. परंतु या निमयाचा परिवहन विभागाने चुकीचा अर्थ काढून मराठी भाषा येणे बंधनकारक केले आहे.
- See more at: http://www.loksatta.com/nagpur-news/can-get-an-auto-rickshaw-licence-without-knowing-marathi-language-1278675/#sthash.GIL4OyHK.dpuf

वैतरणा पूल धोकादायक!

वैतरणा पूल धोकादायक!

बेकायदा वाळू उपशामुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न
विरारजवळील वैतरणा खाडीवर असलेला रेल्वे पूल धोकादायक बनलेला आहे. या पुलाखाली खाडीतून बेकायदा वाळू उपसा होत असल्याने या पुलाला धोका निर्माण झालेला आहे. पुलाचा पाया कमकुवत झाला असून तो कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर पुन्हा वैतरणा पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
पश्चिम रेल्वेचा वैतरणा नदीवर पूल आहे. १९७० च्या दशकात हा पूल बांधण्यात आला असून गुजरात राज्य आणि त्यापुढे उत्तरेत जाणारा हा महत्त्वाचा आणि एकमेव रेल्वे पूल आहे. वैतरणा खाडीत मोठय़ा प्रमाणात बेकायदा वाळूउपसा होत असते,  मात्र त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. वाळूमाफिया सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करत असतात. अगदी पुलाच्या खालीही वाळू उपसा सुरू असल्याने त्याचा परिणाम पुलावर झालेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाळू उपसा सुरू असल्याने पुलाचा पाया कमकुवत झाला आहे. याबाबत अनेकदा स्थानिक नागरिकांना रेल्वे आणि प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या, परंतु वाळूमाफियांवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. दीड वर्षांपूर्वी या पुलाची संरक्षक भिंत खचल्याने पुलाची वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर पुलाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला होता. मात्र वाळूमाफियांची पुलाखालील वाळूचोरी आजही सुरू आहे.
रात्रीच्या वेळी वाळू उपसा
सक्शन पंपाने वाळू उपसा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सक्शन पंपाने एकाच वेळी हजारो ब्रास वाळू उपसली जाते. वाळूमाफियांनी वाळू उपसा करत वैतरणा, नारिंगी आदी किनारे पोखरले आहेत. आता त्यांनी जास्त फायदा मिळविण्यासाठी पुलाच्या खालील वाळू उपसा सुरू केलेला आहे. या भागात खूप वाळू साठा आहे. वाळूमुळेच पुलाच्या पायाला मजबुती मिळते, पण वाळूमाफिया येथीलच वाळू उपसत असल्याचे नारिंगी येथील रेती व्यावसायिकांनी सांगितले.
वैतरणा पूलाच्या खाली मोठय़ा प्रमाणावर बेकायदा वाळूउपसा होत आहे. आम्ही गेल्या पाच वर्षांपासून या गंभीर प्रश्नावर पालघर जिल्हाधिकारी आणि केंद्रीय महसूल सचिवांशी पत्रव्यवहार करत आहोत. या वाळू उपशामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलत असून त्यामुळे पुलाला मोठा धोका आहे. पूल पडल्यास जीवितहानी तर होईलच शिवाय मुंबईचा उत्तरेकडील राज्यांशी संपर्क तुटेल.
– रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

Labels: , , ,

Wednesday, August 3, 2016

ठाणे आणि पालघर ४५ गावांना पुराचा धोका! तानसा, वैतरणा, मध्य वैतरणा धरण ओसांडून वाहू लागले

 ठाणे आणि पालघर ४५ गावांना पुराचा धोका! तानसा, वैतरणा, मध्य वैतरणा धरण ओसांडून वाहू लागले

तानसा, वैतरणा धरणांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने आपत्कालीन यंत्रणा सज्ज

पालघर जिल्ह्यातील तानसा, वैतरणा, मध्य वैतरणा धरण ओसांडून वाहू लागले असून या धरणांचे दरवाजे मंगळवारी रात्री उघडण्यात आले आहेत. त्याचा फटका धरण परिसरातील आणि नदीकिनाऱ्यावरील ४५ गावांना बसणार असून, त्यात वसई तालुक्यातील १५ गावांचा समावेश आहे. पूरस्थिती नियंत्रणात राहावी आणि त्याचा जनजीवनावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी आपत्कालीन यंत्रणाही सज्ज झाली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे येथील धरणांच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे. यामुळे धरणांचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहापूर तालुक्यात तानता, वैतरणा आणि मध्य वैतरणा ही तीन धरणे आहेत. सध्या पडणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर पाहता ही धरणे आणखी भरतील त्यामुळेच धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे तानसा आणि वैतरणा धरणाच्या लगत असलेल्या पालघर आणि ठाणे जिल्ह्य़ातल्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

मंगळवारी पहाटे दोन वाजता तानसा धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला. या दोन धरणांचे दरवाजे उघडल्यास वसईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्य़ातील एकूण ३२ गावांना धोका पोहोचू शकणार आहे.
मध्य वैतरणा धरणाने मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास २७९.९५ मी पातळी गाठली आहे. हे धरण भरून वाहण्याची शक्यता असल्याने मध्य वैतरणाचे दरवाजेही उघडले जाणार आहेत. यामुळे या धरणाच्या परिसरातील तसेच नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरील १३ गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुसळधार पाऊस आणि धरणांमधून सोडण्यात येणारे अतिरिक्त पाणी यामुळे या गावांमधील ग्रामस्थ भयभित झाले आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास जायचे कुठे असा प्रश्न दुर्गम भागांतील ग्रामस्थांना पडला आहे.
महापालिकेनेच मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

सध्या कुठलेही गाव पूरबाधित झालेले नाही, परंतु आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून सर्व तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना गावात थांबण्यास सांगण्यात आले आहे. ग्रामस्थांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे. जीवरक्षक, अग्निशमन दलाचे जवान, बोटी आदींची व्यवस्था किनारपट्टीवरील गावांमध्ये करण्यात आलेली आहे.
– स्मिता गुरव, नायब तहसीलदार, वसई.

या गावांना धोका

* वसई तालुका : खानिवडे, शिरवली, आडणे, भाताणे, सायवन, काशिद कोपर, कोपरगाव, हेदवडे, चिमणे, पारोळ, अंबाडे.
* मध्य वैतरणा धरण परिसर : सावरकूट, सावरडा, दापूरमाळ, शिरोड, धार, टाकीदेवगाव, करोड पाचघर, चिंचालखेरा, विहीगाव, कडचूवाडी, माळ.
* शहापूर तालुका : भावसे, मोहिली, वावेघर, अघई, टहारपूर, नेवरे, वेलबहाळ, डिबा, खैरे.
* भिवंडी तालुका : बोरशेती, एकसाल, चिंचवली, कुंडे, रावडी, वज्रेश्वरी, महांगुळे, गणेशपुरी.
* वाडा तालुका : निभावली, मेट, गोरांड.


सूर्या नदीला पूर

वसई-विरारला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाची क्षमता २८० दशलक्ष घनमीटर आहे. हे धरण ९० टक्के भरले आहे. नदीला पूर आल्याने परिसरातील गावे बाधित झाली आहेत.

Labels: , , , ,

Monday, August 1, 2016

एअर इंडियात 280 पदांसाठी भरती

 एअर इंडियात 280 पदांसाठी भरती

एअरलाईनमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिस लिमिटेडमध्ये 280 पदांसाठी भरती होणार आहे. ग्रॅज्युएट इंजिनीअर ट्रेनी पदाच्या या जागा आहेत. एआयईएसएलने यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे.

पात्र उमेदवार 08 ऑगस्ट 2016 ते 15 सप्टेंबर 2016 पर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात. यानंतर ऑनलाईन फॉर्मची हार्डकॉपी आवश्यक कागदपत्रांसह 30 सप्टेंबरपर्यंत संबंधित पत्त्यावर पाठवता येईल.

* पदाचं नाव : ग्रॅज्युएट इंजिनीअर ट्रेनी
* जागांची संख्‍या : 280
जनरल : 143 जागा
ओबीसी : 75 जागा
एससी : 41 जागा
एसटी : 21 जागा
* पात्रता : मान्‍यता प्राप्‍त संस्‍थेतून  BE किंवा B.Tech उत्तीर्ण
* पे स्‍केल : 25 हजार रुपये

महत्त्वाच्या तारखा –
*ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात – 08 ऑगस्ट, 2016
* ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत – 15 सप्टेंबर, 2016
*ऑनलाईन अर्जाची पाठवण्याची अंतिम तारीख – 30 सप्टेंबर, 2016

या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी http://www.airindia.in/careers.htm या लिंकवर क्लिक करा