Sunday, July 3, 2016

सिंहगडावर सहा ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता !- वन विभागाचा इशारा


 सिंहगड

पुणे, दि. २ जुलै (हिं.स.) : पावसाची मजा घेण्यासाठी सिंहगडावर जायचा विचार करताय..? थांबा. कारण सिंहगडावरील पाच ते सहा ठिकाणी दरड कोसळण्याची शक्‍यता असल्याचे खुद्द वनविभागानेच सांगितले आहे. त्यामुळेच सिंहगडावर जाण्याआधी सावधानता बाळगणेच गरजेचे आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने घाटांतील रस्त्यांवर दरड सत्र सुरू झाल्याचे दिसत आहे. त्यातच गड किल्ले तरी किती सुरक्षित आहेत? असा प्रश्‍न आता उपस्थित होतो आहे. कारण वनविभागाने मागील काही दिवसांत केलेल्या पाहणीत सिंहगडावरील पाच ते सहा ठिकाणे अशी आहेत जिथे दरड कोसळण्याची शक्‍यता आहे. आता दोन ते तीन दिवसांपूर्वीच दरड कोसळण्याची घटना तिथे घडल्याची माहिती पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक सत्यजित गुजर यांनी दिली. ते म्हणाले, ही दरड कोसळल्यामुळे सिंहगड एक दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता.दरम्यान, ही दरड कोसळल्यानंतर वनविभागाने तिथे उपद्रव शुल्कातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ज्या कर्मचाऱ्यांची निवड केली आहे, त्या कर्मचाऱ्यांनीच रस्ता मोकळा करण्याचे काम केले; परंतु जर मोठी घटना घडली तर तेवढे मनुष्यबळ व त्यासाठी लागणारी सामग्री आमच्याकडे नाही.दरम्यान, सिंहगडावरील दरड कोसळण्याची ठिकाणे ही वनविभागाने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच निश्‍चित केली होती. मात्र, निधीअभावी ही कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. यासाठी वनविभागाकडून ८५ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र, या एकूण जाळी टाकण्याच्या कामासाठी चार कोटी रुपये आवश्‍यक होते. मात्र, निविदा काढणे, निधी मंजुरी या सर्व प्रक्रियेमुळे हे जाळी लावण्याचे काम आता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पावसाळ्यानंतर होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, सिंहगडावर रोज येणाऱ्या नागरिकांची संख्याही हजारोंच्या घरात आहे. त्यातच पावसाळ्यात ही संख्या अधिकच वाढलेली दिसते. शनिवार-रविवार तर येथे नागरिकांची झुंबड उडालेली पाहायला मिळते. त्यामुळे इतक्‍या गर्दीच्या ठिकाणी जर दरड कोसळली तर ती अनेकांसाठी जीवघेणी ठरू शकते. त्यामुळेच याबाबत आता प्रशासनाने तत्परता दाखवत जाळी लावण्याचे काम पूर्ण करणे आवश्‍यक झाले आहे. हिंदुस्थान समाचार / २.७.२०१५ / पी.भोसले/ आर.कुवेसकर

Labels: ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home