Wednesday, July 20, 2016

वसई विरार : बुजवण्यात कुचराई, तीन निलंबित

वसई विरार  : बुजवण्यात कुचराई, तीन निलंबित
विरार :रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यात हलगर्जी केल्याचा ठपका ठेऊन महापालिकेने विरार आणि नालासोपारा विभागातील तीन अभियंत्यांना निलंबित केले. हे तीनही अभियंते ठेका पद्धतीवर काम करणारे आहेत. त्यांच्यावर ठपका ठेऊन जबाबदार असलेल्या कायमस्वरुपी अभियंत्यांना मात्र अभय देण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
वसई विरार परिसरातील अनेक मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि नागरीक त्रस्त झाले आहेत. याप्रकरणी तक्रारी आल्यानंतर पालिकेने खड्डे बुजवण्यात कुचराई केल्याप्रकरणी अमित पाटील, विजय चव्हाण आणि किरण नाईक या तीन ठेका पद्धतीवर काम करणार्‍या ठेकेदारांना निलंबित केले आहे. अभियंत्यांनी वेळेत आणि योग्य पद्धतीने खड्डे भरले नाहीत असा ठपका त्यांचवर ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, वसई विरार पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारांचे वर्चस्व असून अनेक कायमस्वरुपी अभियंते आणि ठेकेदार यांच्यात बहुतेक ठेक्यांमध्ये छुपी भागीदारी आहे. त्यामुळे बांधकाम खात्यात निकृष्ट कामे, बिले काढताना हेराफेरी होत असल्याचा आरोप केला जातो. मध्यंतरी शिवसेनेचे गटनेते धनंजय गावडे यांनी आधीच झालेल्या कामांच्या पुन्हा निविदा काढल्याची सात प्रकरणे चव्हाट्यावर आणली होती. त्यामुळे ठेकेदारांशी भागीदारी आणि हितसंबंध असलेल्या अभियंत्यांना अभय देऊन ठेका पद्धतीवर काम करणार्‍या अभियंत्यांचा बळी घेतला गेल्याचा आरोप केला जातो. (प्रतिनिधी, लोकमत)

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home