Monday, July 4, 2016

डहाणू/बोर्डी- डहाणू तालुक्यास भातशेतीवर यंदाही दुबार पेरणीचे संकट

डहाणू/बोर्डी- डहाणू तालुक्यास भातशेतीवर दुबार पेरणीचे संकट

डहाणू/बोर्डी- डहाणू तालुक्यास मुसळधार पावसाने चांगलेचे जोडपले असून, भात बियाण्याची पेरणी केलेली खाचरे अनेक दिवसांपासून पाण्याखाली गेल्याने बियाणे कुजून दुबार पेरणीचे संकट बळीराजाला सतावू लागले आहे. दरम्यान या बाबत शासनाने भात उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

डहाणू तालुक्यातील भात हे प्रमुख पीक असून सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावर त्याची खरीपात लागवड केली जाते. तालुक्यात २१ जून नंतर पावसाने हजेरी लावल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी भात पेरणीला प्रारंभ केला. मात्र गेल्या दहा दिवसांपासून पावसाचा जोर वाढून नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. पाणथळ जमिनीप्रमाणेच बोर्डी आणि परिसरातील किनाऱ्यालगत गावच्या भात खाचरांमध्ये पुराचे पाणी साचले आहे.

त्यामुळे पेरलेले बियाणे अनेक दिवस पाण्याखाली राहिल्याने कुजले आहे. तर, काही प्रमाणात उगवण झालेली रोपे सुस्थितीत नाहीत. सततच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही. त्यामुळे किनाऱ्यालगतच्या गावातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट सतावते आहे. शासनाने पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून केवळ कर्जत ३ या भात वाणाची विक्र ी डहाणूतील शेतकऱ्यांना केली होती. अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी महागाईचा फटका सहन करून ८५ ते ११० रुपये प्रतिकिलोने मिळणारे संकरीत बियाणे खरेदी केले होते. मात्र सततच्या पावसाने पेरणी वाया जाऊन आर्थिक फटका बसला असून लावणीचा हंगाम लांबणीवर गेला आहे. त्याचा परिणाम भात उत्पादनावर होणार असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
-अनिरुद्ध पाटील,लोकमत

Labels: , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home