Wednesday, July 20, 2016

वनजमिनी लँड माफियांच्या घशात ?

 वनजमिनी लँड माफियांच्या घशात ?
अतिक्रमण करुन आलिशान बंगले ; वरिष्ठांच्या डोळ्यात धूळफेक
सहायक संरक्षकांचे अभय : शिरगाव समुद्र किनारी साटेलोटे, जिल्हाधिकार्‍याकडे तक्रार
 हितेन नाईक■ पालघर
 वन महोत्सवातून राज्यात दोन कोटी वृक्षांची लागवड करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी पालघरचे सहाय्यक वनसंरक्षक नंदकुमार कुप्ते यांनी मात्र शिरगावच्या समुद्रालगत असलेल्या आपल्या वनजमीनीचा काही भाग खाजगी लोकांच्या घशात घालण्यासाठी वृक्षरोपणा पासून वगळला. तसेच ते वनजमीनीवर झालेल्या अतिक्रमणा आणि बेकायदेशीर बांधकामांकडेही हेतूपुरस्कर दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्याकडे करण्यात आली आहे.
वैश्‍वीक उष्णतेमध्ये होणारी वाढ आणि हवामानातील बदल त्यामुळे उशीरा का होईना वृक्ष लागवड मोठया प्रमाणात करणे गरजेचे असल्याचे शासनाच्या लक्षात आले. उष्णतेची तीव्रता व परिणामकारकता कमी करण्याचा भाग म्हणून शासनाच्या वनविभाग व जनतेच्या सहभागतून वनमहोत्सव १ जुलै २0१६ रोजी मोठा गाजावाजा करून साजरा करण्यात आला खरा. परंतु पालघरच्या सहाय्यक वनसंरक्षक कार्यालयाकडून नंदकुमार कुप्ते यांच्या वतीने क.न. १९६८ या सुमारे २१ हेक्टर क्षेत्रावर १ जुलै रोजी ३७ हजार वृक्षरोपण करण्यात आली. मात्र हे वृक्षरोपण करतांना काही खाजगी लोकांच्या फायद्यासाठी एक मोठे क्षेत्र वृक्षरोपणापासून वंचित ठेवण्यात आल्याची तक्रार शिरगावच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. वृक्ष लागवड करण्यासाठी पालघरच्या सहाय्यक वनसंरक्षक कार्यालयाकडे ५ लाख ९ हजार ७५२ रू. चा निधी आला असून संरक्षीत वन क्षेत्राला कुंपण घालण्याचे आदेश वनविभागाकडून देण्यात आले आहेत. समुद्राकडील बंदरविभागाच्या जागेवरून म्हणजे सध्या मुक्त असलेल्या जागेवर कुंपण घालून अतिक्रमण धारकाना मोकळे सोडण्याची भूमिका नंदकुमार कुप्ते घेत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. यात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा संशयही ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍याकडे व्यक्त केला केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी बांगर यांनी उपवनसंरक्षक, डहाणू एन एस लडकत यांना स्पष्टपणे सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात पालघरचे सहाय्यक वनसंरक्षक कुप्ते यांच्याशी मोबाईलवरून अनेक वेळा संपर्क करूनही त्यांचा फोन लागला नाही. (प्रतिनिधी) 
अतिक्रमण करुन आलिशान बंगले ; वरिष्ठांच्या डोळ्यात धूळफेक 
शिरगाव-सातपाटीच्या समुद्र किनार्‍यावर वनविभागाच्या राखीव वनक्षेत्र हे सुमारे २१ हजार हेक्टर जागेवरून १९६५ साली सुरूच्या झाडची लागवड होऊन सुमारे एक ते दिड हजार झाडे. वनविभागाने १९८५ ते ९0 च्या दरम्यान कापून टाकली होती.
त्यानंतर या रिकाम्या जागेवर २५ वर्षात वृक्षरोपण करण्याचे वनविभागाने टाळल्यामुळे या समुद्र किनार्‍यावरील मोक्याच्या जागेवर काही स्थानिकांनी अतिक्रमणे करून खुंटे रोवले आहेत. त्यामुळे वनविभागाने मुळ कागदपत्राच्या आधारे आपल्या जागेचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. 
अनेक वर्षापासून हे सर्वेक्षण न करता काही स्थानिकांना नोटीसा पाठवून आपण कार्यवाही केल्याचे दाखवून वरिष्ठाच्या डोळयात धूळ फेकण्याचे काम पालघरचे सहाय्यक वनसंरक्षक करीत आहेत. त्यामुळे सातपाटी-शिरगावच्या रस्त्यापलीकडील (पश्‍चिमेकडील) वनविभागाच्या जागेवर अनधिकृत बंगले व वसाहती निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. वनविभगाच्या जागेवर आमदार फंडातून स्मशानभूमी बांधली जात असताना ते रोखण्यासही वनविभाग अपयशी ठरल्याने ग्रामस्थांनी सांगितले.

Labels: , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home