Thursday, July 21, 2016

वसई-विरार बस प्रवास महाग!

 वसई-विरार बस प्रवास महाग!

परिवहन सेवा २ रुपयांनी महागली; आयुक्त, महापौर, अधिकाऱ्यांच्या वाहनभत्त्यात वाढ

वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेने प्रवाशांवर महागाईचा बोजा टाकला आहे. परिवहन सेवेच्या दरवाढीला महासभेत मंजुरी मिळाली असून, प्रत्येक टप्प्यातील प्रवास दोन रुपयांनी महाग झाला आहे. या दरवाढीने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली असली तरी त्याचा फायदा बडय़ा अधिकाऱ्यांना झाला आहे. महापौर, आयुक्त आणि अधिकाऱ्यांच्या वाहनभत्त्यात भरघोस वाढ करण्यात आली आहे.

२०१२ पासून वसई-विरार महापालिकेने स्वत:ची परिवहन सेवा सुरू केली. या परिवहन सेवेचे कंत्राट मे. भगीरथी ट्रान्स कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. पालिकेच्या ताफ्यात सध्या १४९ बस आहेत, त्यापैकी कंत्राटदाराच्या ३० आणि पालिकेच्या ११९ बसचा समावेश आहे. पालिकेने परिवहन सेवेच्या दरात वाढ सुचविली होती. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने त्याला मंजुरी दिल्यानंतर मंगळवारी झालेल्या महासभेत दरवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला महासभेने मंजुरी दिली आहे. या नव्या दरवाढीनुसार दोन किलोमीटर ते १४ किलोमीटरसाठी दोन ते पाच रुपये दरवाढ मंजूर करण्यात आली आहे. पहिल्या दोन किलोमीटरसाठी एक रुपया कमी करण्यात आला आहे. १२ किलोमीटरच्या पुढे दरवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे वसई-विरार शहरातील अंतर्गत प्रवास महागला आहे.

प्रवासी तोटय़ात, अधिकारी फायद्यात

एकीकडे पालिकेने परिवहनच्या बसची दरवाढ केली आहे, मात्र दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या वाहनभत्त्यात वाढ केली आहे. भाडेतत्त्वावरील वाहनांसाठी जास्त खर्च होत असल्याने वाहनभत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ही वाढ करण्यात आली आहे. आता आयुक्तांना ४० हजार रुपयांऐवजी ७५ हजार रुपये, महापौरांना ४५ हजार रुपयांऐवजी ७५ हजार रुपये दरमहा वाहनभत्ता मिळणार आहे. याशिवाय स्थायी समिती सभापतींना ४० हजार रुपयांऐवजी ४५ हजार रुपये, विरोधी पक्षनेत्यांना ४५ हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. उपायुक्तांच्या वाहनभत्त्यातही दरमहा पाच हजार रुपयांची वाढ झाली असून त्यांनाही दरमहा ४५ हजार रुपये वाहनभत्ता मिळणार आहे. याशिवाय सर्व साहाय्यक आयुक्त, उपअभियंता, प्रभारी साहाय्यक आयुक्त, नगर सचिव, वैद्यकीय अधिकारी, विभागप्रमुख यांनाही वाहनभत्ता लागू करण्यात आला आहे. या सर्वाना वाहनभत्त्यापोटी आता दरमहा ३५ हजार रुपये मिळणार आहेत. या सर्वाना वाहने पुरविल्यास अधिक खर्च होईल हे लक्षात घेऊन हा वाहनभत्ता लागू केल्याचे उपायुक्त अजिज शेख यांनी सांगितले.

प्रथमत: आम्ही ही नाममात्र दरवाढ सुचवली आहे. पहिल्या दोन किलोमीटर प्रवासासाठी आम्ही एक रुपया कमी केला आहे. लवकर जेएनयू योजनेच्या ७० नव्या बस पालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर बसच्या फेऱ्या आणि मार्ग वाढविले जाणार आहेत.

– किशोर गवस, पालिकेचे उपायुक्त

Labels: , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home