Tuesday, July 5, 2016

अर्नाळा किल्ला, सातपाटीला भरतीचा तडाखा, समुद्राला मोठे उधाण, ४ ते ७ जुलै , २२ जुलै ते २४ जुलै , २ ते ४ आॅगस्ट व १९ ते २२ आॅगस्ट

अर्नाळा किल्ला, सातपाटीला भरतीचा तडाखा


विरार :

दुपारी समुद्रात आलेल्या उधाणाच्या जोरदार लाटांनी अर्नाळा किल्ल्यातील समुद्रकिनारी असलेल्या २० झोपड्या वाहून गेल्या . तर गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून लोकांचे मोठे नुकसान झाले.
चारी बाजूने पाण्याने वेढलेल्या अर्नाळा किल्ला गावात गेल तीन वर्षात आलेले आजचे तिसरे मोठे उधाण होते. यावेळी उसळलेल्या मोठ्या लाटांनी समुद्रकिनारी असलेल्या २० झोपड्या वाहून गेल्या. तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. याआधी तीन वेळा असेच उधाण आले होते. त्यावेळीही किनाऱ्यालगतच्या झोपडय वाहून गेल्या होत्या.
गावाला चारीबाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. दरवर्षी उधाण आले की समुद्राचे पाणी गावात शिरते. यासाठी बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी गेल्या तीन वर्षांपासून केली जात आहे. मात्र, मेरीटाईम बोर्डाने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. आजचे उधाण मोठे होते. त्यामुळे अनेकांच्या घराचे नुकसान झाले. गरीबाच्या झोपड्या वाहून गेल्या. तीन वर्षातील ही तिसरी घटना. पण, मागणी करूनही गावकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही, असे सरपंच भारती वैती यांनी सांगितले.

घरांची हानी किनाऱ्यावर हाहाकार

पालघर: उधाणामुळे ४ जून पासून सातपाटी किनाऱ्यावरील अनेक घरामध्ये समुद्राचे पाणी शिरून त्याचे संसार उध्वस्त झाल्यानंतर अनेक लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने फोल ठरल्यामुळे संतापलेल्या महिलांनी आज जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांना साकडे घातले.
समुद्राला १९ दिवस मोठे उधाण येणार असून त्यामध्ये ४ ते ७ जुलै असे ४ दिवस , २२ जुलै ते २४ जुलै असे ३ दिवस, २ ते ४ आॅगस्ट असे ३ दिवस व १९ ते २२ आॅगस्ट असे सलग ४ दिवस समुद्राच्या पाण्याला मोठे उधाण येणार होते.
सातपाटीचा बंधारा फुटल्याने ४ जून पासूनच किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरायला सुरूवात झाली होती. ते शिरू नये म्हणून प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये माती भरून मच्छिमारांनी आपल्या घरासामोर संरक्षीत भिंत उभारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ४.७२ मिटर उंचीच्या लाटांच्या तडाख्यापुढे ती टिकली नाही. लाटा संरक्षक बंधारा ओलांडून थेट किनाऱ्या लगतच्या घरांना धडका देत होत्या. त्यामुळे दांडापाडा, क्रांतीमंडळ, भाटपाडा, इ. भागातील घरामध्ये पाणी शिरून त्यांच्या जीवन उपयोगी साहित्याची नासाडी झाली. बंधाऱ्याच्या दुरूस्तीचा प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडून असल्याने जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी जिल्हा नियोजनच्या निधीमधून आपत्कालीन निधी तात्काळ मंजूर करावा अशी मागणी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, मनिषा निमकर प्रशांत पाटील, आमदार अमित घोडा, उत्तम पिंपळे, इ. नी केली होती. परंतु कोणत्या तरतूदीमधून तात्काळ निधी देता येईल यासंदर्भात आज मी अधिकाऱ्यांशी चर्चा करतो असे जिल्हाधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितले. परंतु आज नंतर उद्या ५ जुलै, ६ जुलै व ७ जुलै रोजी सतत चार दिवस समुद्राचे उधाण वाढत जाणार असल्याने व बंधाऱ्याचे झिजलेले दगड लाटे सोबत उडून घराजवळ पडत असल्याने प्राणहानीची शक्यताही वाढली आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी ग्रा.पं. ला घेराव घातला व आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यायची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार सर्व महिलांनी जिल्हाधिकाऱ्याची भेट घेतली.

Labels: , , , , , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home