Wednesday, July 20, 2016

ठाण्यापासून तासभरावर नवे पालघर शहर !!

ठाण्यापासून तासभरावर नवे पालघर४४० हेक्टर जमिनीवर सिडकोमार्फत नवीन शहराची उभारणी; नियोजनबद्ध विकास
३०० हेक्टर जमिनीचा विकास नवनगराच्या उभारणीसाठी करणार

ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करून नव्या पालघर जिल्ह्य़ाची निर्मिती पूर्ण केल्यानंतर राज्य सरकारने आता वसई-विरारच्या पलीकडे ठाणे शहरापासून तासाभराच्या अंतरावर नव्या पालघर शहराची उभारणी करण्याचे ठरविले आहे. मुंबई-ठाणे आणि गुजरातदरम्यान वाढीस लागलेला व्यापार उदीम लक्षात घेता गेल्या काही वर्षांत घोडबंदर ते मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या जमिनीला सोन्याचे भाव मिळू लागले आहेत. हे लक्षात घेऊन पालघर तालुक्यातील सात गावांमधील ४४० हेक्टर जमिनीवर पालघर नवनगर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या नियोजनबद्ध शहराची उभारणी सिडकोमार्फत केली जाणार आहे. त्यामुळे सध्याच्या नवी मुंबई शहरासारखेच नव्या पालघरमध्येही रस्ते, वसाहती, शाळा, महाविद्यालये नियोजनबद्धरीत्या विकसित होताना दिसतील.
१ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करून नव्या पालघर जिल्ह्य़ाची निर्मिती करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांच्या काळात नव्या जिल्ह्य़ातील प्रशासकीय व्यवस्थांचे बळकटीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर नोकर भरती तसेच पदनिर्मितीची प्रक्रियाही पूर्ण केली जात आहे. हे करत असताना पालघर जिल्हा मुख्यालयाचा सुनियोजित विकास करून विविध विभागांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हास्तरीय शासकीय कार्यालयांच्या इमारती आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थानांची उभारणी आणि त्या अनुषंगाने पायाभूत सुविधांचा एकत्रित विकास करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. प्रशासकीय कार्यालयांची उभारणी तसेच कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक निवासस्थाने एकाच ठिकाणी असावीत यासाठी सरकारने सिडकोकडे नियोजनाचे काम सोपविले असून त्यासाठी पालघर तालुक्यातील काही गावांमधील मोकळ्या जमिनीचे हस्तांतरण केले जाणार आहे. एकीकडे ही प्रशासकीय बांधणीची प्रक्रिया उभी केली जात असताना दुसरीकडे याच भागात एक छोटे पण टुमदार शहर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन पालघरसाठी ४४० हेक्टर क्षेत्रफळाची जमीन आरक्षित करण्यात आली आहे. पालघर तालुक्यातील मौजे पालघर, कोळगांव, मोरेकुरण, नंडोरे, दापोली, टेंभाडे व शिरगांव या सात गावात उपलब्ध असलेल्या जमिनीवर हे नवनगर उभे केले जाणार आहे.
सुमारे ४४० हेक्टर जमिनीपैकी पहिल्या टप्प्यात १०३ हेक्टर जमिनीवर शासकीय वापरासाठी आवश्यक सुविधांचा विकास केला जाणार आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयासह जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हा परिषद कार्यालय, नाटय़गृह तसेच विश्रामगृहाची उभारणी केली जाणार आहे. हे करत असताना उर्वरित ३०० हेक्टर जमिनीचा विकास नवनगराच्या उभारणीसाठी केला जाणार आहे.

नवी मुंबईप्रमाणे भूखंड विक्री
नवी मुंबईच्या धर्तीवर या जमिनीचे भूखंड पाडून त्याची विक्री केली जाणार आहे. सिडकोने तयार केलेल्या विकास आराखडय़ानुसार या उर्वरित शहराची उभारणी केली जाणार असून, येथील गृहसंकुलांची उभारणी खासगी विकासकांमार्फत केली जाईल, अशी माहिती सिडकोतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. या भूखंड विक्रीतून उभा राहणारा महसूल शासकीय निवासस्थाने तसेच कार्यालयांच्या विकासासाठी उपयोगात आणला जावा, असे ठरविण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी नव्या शहराचा विकास आराखडा तसेच संकल्प चित्र तयार करण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे, अशी माहिती सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी दिली.
- See more at: http://www.loksatta.com/thane-news/cidco-to-built-new-city-on-440-hectares-of-land-near-thane-1270285/#sthash.YLR1h2zY.dpuf

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home