Friday, July 29, 2016

पालघर आश्रमशाळेतील रिक्त पदे भरणार

आश्रमशाळेतील रिक्त पदे भरणार


आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तसेच निवास व्यवस्था इत्यादी मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून त्याबाबत विचार विनिमय सुरू असल्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी सांगितले.

आदिवासी आश्रमशाळेतील आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या आश्रमशाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक आहे, त्याबाबत सर्वंकष विचार करून अमलबजावणी करण्यास प्राधान्य देण्यात येईल असे विष्णू सवरा यांनी सांगितले.

मंत्रालयातील सवरा यांच्या दालनात आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव शिंदे, आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, सरचिटणीस बी. टी. भामरे, जी. एस. हमरे, किसन गुजर आदींसह संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.

सवरा म्हणाले की, आदिवासी विकास विभागात विविध स्तरावर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्देवाने विविध कारणाने अपघाती मृत्यू होतात. त्यामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या वारसास शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भात तात्काळ कारवाई, रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणे आणि विभागातील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पध्दतीने सुरू करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत रिक्त पदे त्वरित भरणे, स्त्री अधीक्षकांची रिक्त पदे भरणे, आश्रमशाळा परिसरात सर्व कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय करणे, एसएससी पास चतुर्थ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे, गणवेश शिलाई, धुलाई भत्ता वाढविणे, गॅस शेगड्या नवीन देणे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत 'काम नाही, वेतन नाही' चा आदेश रद्द करणे, मुख्याध्यापक पदी पदोन्नतीतील पद रिक्त गणने, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना पदोन्नतीची संधी देणे, क्रीडा व कला शिक्षकांची भरती करणे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. 
 
नरेंद्र पाटील, पालघर 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home