Tuesday, July 19, 2016

डहाणूच्या किनारपट्टीवर प्लास्टिकला उधाण

डहाणूच्या किनारपट्टीवर प्लास्टिकला उधाण

डहाणू/बोर्डी- डहाणू तालुक्याचा समुद्रकिनारा सध्या प्लास्टिक पिशव्यांनी व्यापला असून जिकडे तिकडे कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने किनाऱ्याचे विद्रुपीकरण झाले आहे. त्यामुळे विकेंडला समुद्री पर्यटनासाठी आलेल्या परगावातील पर्यटकांचा हिरमोड होत आहे. या अवकळेमुळे स्थानिक मच्छीमार, पर्यावरणप्रेमी आणि व्यायामाला येणाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
डहाणू तालुक्याला ३५ किमी लांबीची समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. रुपेरी वाळू, कांदळवन आणि किनाऱ्याला लाभलेली नारळाच्या झाडांची झालर या निसर्गसौंदर्याने समुद्री पर्यटन स्थळांमध्ये डहाणूला विशेष पसंती दिली जाते. बोर्डीसह घोलवड, चिखले, नरपड, आगर आणि पारनाका या चौपट्यांवर पर्यटकांची गर्दी दिसून येते. सध्या पावसाळा सुरू असल्याने धबधबे पर्यटकांना आकर्षित करीत असले तरीही विकेंडला समुद्री पर्यटनाचा ओघ ओसरलेला नाही. मात्र नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे पुरासह प्लास्टीक समुद्रात वाहून गेले आणि मागील आठवड्यापासून भरतीच्या पाण्यासह किनाऱ्यावर कचरा साचण्यास सुुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून रविवारी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला.
व्यायामाकरिता येणाऱ्या नागरिकांची संख्याही घटू लागल्याचे चिखले गावातील समुद्रकाष्ठ मित्र मंडळाच्या अशोक गावड, लक्ष्मण गावड, उमेश चुरी यांनी सांगितले. प्लास्टिकचा विळखा समुद्रातील तिवरांच्या झाडांना बसून आगामी काळात कांदळवनांचे अस्तित्व धोक्यात येण्यासह सागरी जैव विविधतेची हानी होणार आहे. समुद्री कासवांचा हा विणीचा हंगाम असल्याने अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येणाऱ्या कासवांसाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्याने पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
>किनाऱ्यावर प्लास्टिकचे साम्राज्य पसरल्याने पर्यावरणाची हानी, परिसराचे विदु्रपीकरण तसेच स्थानिकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम होत आहे.
- उमेश चुरी, चिखले गावातील नागरिक

अनिरुद्ध पाटील,http://www.lokmat.com/storypage.php?catid=302&newsid=13543312

Labels: , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home