Wednesday, July 13, 2016

वसई अर्नाळा, रानगाव, भुईगाव, कळंब, राजोडी आणि सुरुची समुद्रकिनारे धोकादायक!

वसई अर्नाळा, रानगाव, भुईगाव, कळंब, राजोडी आणि सुरुची  समुद्रकिनारे धोकादायक!

वसई-विरारमध्ये सुरक्षेचे उपाय नाहीत, वाळू उपशामुळे किनारे खचले


विरारच्या अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर वसईच्या सर्वच समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षेच्या उपाययोजना नसणे, जीवरक्षक नसणे आदी बाबींकडे दुर्लक्ष झालेले आहे, त्याशिवाय वाळू उपशामुळे येथील समुद्रकिनारे धोकादायक झालेले आहेत. त्यामुळे वसईच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहणे मृत्यूला कवटाळण्यासारखे झालेले आहे.

वसईत अर्नाळा, रानगाव, भुईगाव, कळंब, राजोडी आणि सुरुची ही काही प्रमुख समुद्रकिनारे आहेत. या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक मोठय़ा संख्येने येत असतात. बरेचसे पर्यटक तरुण असतात. समुद्रकिनारा पाहताच समुद्रात पोहण्याची इच्छा होते आणि समुद्रात उतरतात. बहुधा मद्यप्राशन करून पोहण्यास उतरतात. भरती असेपर्यंत कोणताही धोका निर्माण होत नाही. परंतु ओहोटीच्या वेळी पोहणारी व्यक्ती विद्युतवेगाने खोल समुद्रात खेचली जाते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या सर्व भागांत इशारेवजा फलक लावले आहेत. परंतु या फलकाकडे दुर्लक्ष करत हे उत्साही तरुण समुद्रात उतरतात आणि आपला जीव गमावतात. समुद्रात उतरणे हे धोकादायक असते आणि तरीही काही वसईतील उत्साही तरुण-तरुणी समुद्रात पोहण्यासाठी उतरत असतात.

वाळूचोरीमुळे किनारे खचले

तालुक्यात वाळूचोरांनी धुमाकूळ घालत समुद्रकिनारे ओरबाडून काढले आहेत. महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने यापासून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाण्यात गेलेल्या एखाद्या पर्यटकाला तेथील किनाऱ्यावर अचानक आलेल्या खड्डय़ाचा अंदाज न आल्याने त्यात बुडून त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे या वाळूचोरांवर कारवाई करण्याची मागणी अर्नाळा येथील स्थानिक हर्षद घरत यांनी केली आहे. वाळूचोरीमुळे वसईतील समुद्रकिनारे खचले असून त्याचा फटका येथील समुद्रकिनाऱ्यावर होतो. परिणामी पाण्याचा अंदाज न आल्याने या ठिकाणी आलेल्या पर्यटकांपैकी काही जीव समुद्रात बुडून मरण पावण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.

जीवरक्षकाची मागणी

अर्नाळा समुद्रकिनारी देखरेखीसाठी बनवण्यात आलेल्या अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस चौकी येथे एकही पोलीस कर्मचारी दिसून आलेला नसून त्या जागी प्रेमीयुगलांचा वावर जास्त प्रमाणात दिसून आलेला आहे, तसेच रानगाव, भुईगाव, कळंब, राजोडी, अर्नाळा आणि सुरुची या किनाऱ्यांवर ध्वनिवर्धकावरून पर्यटकांत जनजागृती किंवा सागरी जीवनरक्षक तैनात केले तर अशा घटनांना आळा बसू शकतो.

भरतीचा इशारा असतानाही..

प्रत्येक पावसाळ्यात हवामान खात्याकडून भरतीचा आणि उंच लाटा उसळण्याचा इशारा दिला जातो. भरतीच्या वेळी समुद्रातील लाटा सुमारे ८ ते ९ मीटर उंचीने उसळत असतात. अशा वेळी समुद्रात उतरणे हे धोकादायक असते आणि तरीही काही उत्साही तरुण-तरुणी समुद्रात पोहण्यासाठी उतरत असतात आणि आपला जीव गमावतात.

’ अर्नाळा समुद्रकिनारी वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांपैकी दोन जण पाण्यात वाहून गेल्याची घटना नुकताच घडली.
’ वसई येथील सुरुची बाग येथे काही दिवसांपूर्वी सहलीसाठी गेलेल्या तीन मित्रांपैकी दोन मित्रांना पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने जीव गमवावा लागला.
’ अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अर्नाळा समुद्रकिनारी वर्षभरात पाच जणांचा बुडून मृत्यू झाला असल्याचे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी सांगितले.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home