Sunday, July 3, 2016

पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस

पालघर, बोईसर, वसई, विरार, विक्रमगड, नालासोपारा, वैतरणा, वाडा 

येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास भरतीच्या वेळी पुराच्या पाण्याचा निचरा समुद्रात होऊ न शकल्यास किनाऱ्यालगत गावातील वस्त्यांमध्ये पाणी भरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तथापि तालुक्यातील प्रशासकीय व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. तसेच स्थानिकांनीदेखील अशीच जागरुकता राखण्याची गरज आहे.

*वसई विरार महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन*
टोल फ्री क्रमांक : 18002334353
पोलीस स्थानक : १००
अग्निशमन विभाग : १०१ / ०२५०-२४०२१०५
वैद्कीय मदत : १०८
ठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७
*जिल्हाधिकारी कार्यालय* ०२५२५-२५३१११
*पालघर पोलीस* ०२५२५-२५११०

वसई/पालघर :

अवघ्या काही मिनिटांची उसंत घेत शुक्रवारपासून बरसत असलेल्या पावसाने अवघ्या पालघर जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत केले आहे. शुक्रवारी नालासोपाऱ्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने आज वसईलाही झोडपले. नायगाव रेल्वे सब वेत पाणी शिरले. तर सनसिटी-गास रस्ता पाण्याखाली गेल्याने सकाळपासून वाहतूक ठप्प झाली होती. नालासोपाऱ्यात अनेक भागात आजही पाणी तुंबून राहिले होते. जव्हार, मोखाडा, तलासरी, वाडा, विक्रमगड या जिल्ह्याच्या ग्रामिणभागातही धो-धो पाऊस बरसत असल्याने पेरण्यांचा खेळखंडोबा झाला असून अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. आज सकाळी वसईत २०७ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत वसईत ८३४ मिमी पाऊस पडला. शुक्रवारपासून कोसळत असलेला पाऊस काही मिनिटांची उसंत घेत जोरदार बरसत आहे. त्यामुळे वसईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे सनसिटी परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. सनसिटी ते गास रस्ता सकाळपासून पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नवघर-माणिकपूर शहरातील पूर्वकडील मीठागर पाड्याला कालपासून पूराच्या पाण्याने वेढले आहे. कालपासून गुडघाभर पाणी साचून राहिल्याने याभागातील लोकांची गैरसोय होऊन त्यांचा संपर्क तुटला आहे.

धामणी थोडे भरले


पालघर : जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी कवडास धरणामध्ये आजच्या दिवसापर्यंत अनुक्रमे ७६.०६ व ९६ दलघमी इतका उपयुक्त पाणीसाठा असून धरणक्षेत्रात ३७१ मी.मी. इतका पाऊस झालेला आहे. तर वांद्री प्रकल्पात आजच्या दिवशी १०.६८ दलघमी इतका पाणीसाठा असून ५९५ मी.मी. इतका पाऊस झालेला आहे. यावरील तीनही क्षेत्रात पाऊस कमी जरी असला तरी त्यात मोठी तफावत दिसून येत नसल्याने पाऊस समाधानकारक पडत असल्याचे म्हणता येईल.
पालघर जिल्ह्यात तेरा दिवस उशीराने का होईना २० जूनपासून पावसाने दमदार सुरूवात केली असून पालघर तालुक्यात गेल्यावर्षी २ जुलै २०१५ रोजी ६७१ मिमी पाऊस पडला होता तर आतापर्यंत ९१६.२ मी मी पाऊस पडला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण पावसाच्या ८.७ मी.मी. पाऊस कमी असला तरी समाधानकारक म्हणावा लागेल.
वसई तालुक्यात गेल्यावर्षी ७८२.९ मिमी पाऊस पडला होता तर आतपर्यंत ७९७.६ मिमी पाऊस पडला आहे. वाडा तालुक्यात गेल्यावर्षी ५०८.२ मिमी पाऊस पडला होता तर आता ३६९.९ मिमी पाऊस पडला आहे. डहाणू तालुक्यात गेल्यावर्षी ६०६.७ मि.मी. पाऊस पडला होता तर आतापर्यंत ६३३.१ मि.मी. पाऊस पडला आहे. जव्हार तालुक्यात सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी ५४४.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. तर आजपर्यंत अवघ्या २२१.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मोखाडा तालुक्यात गेल्यावर्षी ३८६.६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली होती. तर आजपर्यंत २२४.७ मिमीची नोंद झाली आहे तर विक्रमगड तालुक्यात गेल्यावर्षी ५२४ मि.मी.ची नोंद तर आजपर्यंत ४०१.५ मि.मी. नोंद करण्यात आली आहे.


.भातपेरण्या खोळंबल्या


वाडा तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दमदार सुरुवात केली. भातशेती पूर्ण पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे नांगरणीचे काम होत नसल्याने भात पेरणीची कामे खोळंबली आहेत.
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भातशेती करण्यात येते. संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या वाडा कोलम या जातीच्या भाताचे विक्रमी उत्पादन वाडा तालुक्यात घेतले जाते. यंदा बी बियाणे व खते मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने शेतजमीनीची चांगल्या प्रकारे मशागत करून बळीराजा पावसाची वाट बघत होता. पेरण्यांचा मोसम निघून गेल्यावर पाऊस सुरु झाला. परंतु आठ दिवसांपासून संततधार पडू लागल्याने शेतकऱ्याला भात पेरणी करता येत नाही. त्यामुळे त्याच्या हातून भात पेरणीचा हंगाम निघून जाण्याची भीती येथील शेतकऱ्यांना वाटत आहे.
तालुक्यातील १७६ गावे २०० हून अधिक पाड्यातील १३ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. त्या खालोखाल २५० हेक्टर क्षेत्रात नागलीचे उत्पादन तर १६० हेक्टर क्षेत्रात गळीत धान्य घेतले जाते. यावर्षी पाऊस उशिरा सुरु झाल्याने शेतकऱ्यांना मशागतीसाठी भरपूर वेळ मिळाला मात्र सुरु झालेला पाऊस थांबतच नसल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे करता येत नाहीत. त्यामुळे भात पेरण्या खोळंबल्या आहेत.
शेतीच्या कामांना लागणारा मजूरवर्ग विक्रमगड, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी, नाशिक येथून आणण्यात येतो. ज्या किंमतीत खते व बियाणे वापरून उत्पादनास खर्च केला जातो. तो उत्पादन केलेल्या माल विकून होत नसल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांनी रब्बी पीक घेण्यास सुरुवात केली आहे.

बोर्डीत रस्ते जलमय; बंधारे ओव्हर फ्लो

यंदा कोकणात पावसाचे प्रमाण सरसरीच्या २७ टक्के अधिक असल्याच्या वर्तविलेला अंदाज खरा ठरताना दिसत आहे. डहाणू तालुक्यात जुलैच्या पाहिल्याच आठवड्यात हजार मिमीचा टप्पा पार होत असल्याची आकडेवारी आतापर्यंतच्या नोंदीनुसार प्राप्त झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून डहाणू तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेती, लहान नाले जलमय झाले आहेत. १ आणि २ जुलै रोजी अनुक्र मे ६१ मिमी व ९२ मिमी पाऊस पडल्याने तालुक्यातील एकूण पर्जन्यमान ९१० मिमी इतके नोंदविले आहे.
शनिवारी दिवसभरच्या पाऊसाने बोर्डी आणि परिसरातील गावचे ओहळ आणि बंधारे दुथडी भरून वाहत आहेत. डहाणू-बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावरील नरपड गावच्या कुंभारखाडी मोरीवरून पुराचे पाणी वाहत असून, बोर्डीतील खुटखाडी पूलाच्या रस्त्यापर्यंत पाण्याची पातळी पोहचली आहे.
घोलवड गावातील रस्ता जलमय होऊन वाहतूक धीम्यागतीने सुरू होती. इंजिनात पाणी शिरल्याने अनेक वाहने बंद पडल्याच्या घटना घडल्या.

येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास भरतीच्या वेळी पुराच्या पाण्याचा निचरा समुद्रात होऊ न शकल्यास किनाऱ्यालगत गावातील वस्त्यांमध्ये पाणी भरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तथापि तालुक्यातील प्रशासकीय व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. तसेच स्थानिकांनीदेखील अशीच जागरुकता राखण्याची गरज आहे.

Labels: , , , , , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home