Sunday, July 3, 2016

इसिस, अल कायदा : कुराणातील आयत म्हणता येत नाही ढाक्यात दहशतवाद्यांचा भयंकर हल्ला

ढाका, दहशतवाद, बांगलादेश, इसिस, अल कायदाकुराणातील आयत म्हणता येत नाही ढाक्यात दहशतवाद्यांचा भयंकर हल्ला
ढाका, दि. २ (वृत्तसंस्था) - बांगलादेशची राजधानी ढाका येथे दहशतवाद्यांनी रेस्टॉरंटवर हल्ला करून ओलीस ठेवलेल्या २० विदेशी नागरिकांची गळा चिरून हत्या केली. कुराणमधील आयत म्हणता येत नसल्यामुळे विदेशी नागरिकांचे हत्याकांड करण्यात आले. मृतांमध्ये हिंदुस्थानी तरुणी तरूषी जैन चा समावेश आहे. दरम्यान, १३ तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये ६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. बांगलादेशात हायअलर्ट जारी केला आहे. ढाक्यासह अनेक ठिकाणी लष्कर तैनात आहे. ढाका येथे मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याची पुर्नरावृत्ती झाली. शुक्रवारी रात्री ९.२० च्या सुमारास डिप्लोमॅटीक झोन असलेल्या गुलशन परिसरातील अर्टीसन बेकरी रेस्टॉरंटमध्ये अल्लाह-हो-अकबरचा नारा देत ९ दहशतवादी घुसले. बेछूट गोळीबार आणि क्रुड बॉम्बस्फोट करीत ४० वर नागरिकांना ओलीस ठेवले. गुलशन परिसरात अनेक देशांचे उच्चायुक्त कार्यालये आहेत. अर्टीसन रेस्टॉरंटमध्ये नेहमीच विदेशी नागरिकांची गर्दी असते. विदेशी नागरिकांना टार्गेट करण्यासाठीच हा हल्ला करण्यात आला. बांगलादेशचे लष्कर, निमलष्कर आणि पोलीस जवानांनी रेस्टॉरंटला घेराव टाकला. रात्रभर येथे गोळीबार सुरु होता. सकाळी ७.२० च्या सुमारास लष्करी जवान आत घुसले आणि ६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले असून, दोनजण फरार आहेत. रेस्टॉरंटमध्ये घुसल्यानंतर अवघ्या १३ मिनिटात ऑपरेशन संपल्याचे ब्रिगेडीयर जनरल नईम अश्फाक चौधरी यांनी सांगितले. १३ ओलीसांची सुटका करण्यात आली.  
बांगलादेशात फिरायला गेलेल्या तरूषीचा मृत्यू
१८ वर्षीय तरूषी जैन हिचा दहशतवाद्यांचा हल्ल्यात झालेल्या मृत्यूबद्दल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. सुषमा स्वराज यांनी तरुषीचे वडील संजीव जैन यांच्याशी फोनवरून संपर्क साधून दु:ख व्यक्त केले. या दु:खद प्रसंगी देश तुमच्या पाठीशी असल्याचे त्या म्हणाल्या. अमेरिकेतील बर्कले विद्यापीठात शिक्षण घेणारी तरूषी सुट्टी असल्यामुळे बांगलादेशात फिरण्यासाठी आली होती. तिच्या वडिलांचा बांगलादेशात गेल्या २० वर्षांपासून कपड्यांचा व्यवसाय आहे. मैत्रीणींबरोबर रेस्टॉरंटमध्ये गेली असता तिला दहशतवाद्यांनी ओलीस ठेवून ठार मारले.  
लंडन, अमेरिकेतील विमानतळांवर उद्या हल्ले
इस्तंबूल विमानतळावरील दहशतवादी हल्ल्यापाठोपाठ अमेरिकेतील लॉस एंजलिस, जॉन एफ केनडी आणि ब्रिटनमधील हिथ्रो या विमानतळांवर सोमवारी ४ जुलै रोजी दहशतवादी हल्ले चढवण्याची धमकी 'इस्लामिक स्टेट' या खतरनाक दहशतवादी संघटनेने ट्विटरवरून दिली आहे. त्या दिवशी अमेरिकेत स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष असणार आहे. दहशतवादी हल्ल्यांचे टार्गेट विमाने असून हिथ्रो विमानतळावरून अमेरिकेला जाणार्‍या विमानांवर हल्ले चढवू, असे ट्विटवर म्हटले आहे. बॉम्बस्फोटांसाठीचे उपकरण विमानतळावर बसवले जाईल, असेही इस्लामिक स्टेटने म्हटले आहे.  
प्रत्येकाची ओळख परेड घेऊन गळे चिरले
दहशतवाद्यांनी अत्यंत क्रुरपणे विदेशी नागरिकांना ठार केले. प्रत्येक विदेशी नागरिकाला कुराणमधील आयत म्हणण्यास सांगितले. विदेशी नागरिकांना ते म्हणता न आल्याने २० जणांना वेचून गळे चिरले. यामध्ये तरूषी जैन ही हिंदुस्थानी आहे. १९ जणांमध्ये इटली आणि जपानचे नागरिक आहेत. २ पोलीस अधिकार्‍यांना गोळ्या घालून ठार केले. ३५ जण जखमी झाले आहेत.
 इसिस, अल कायदा, अन्सार इस्लामचा हात
या दहशतवाद्याची जबाबदारी इसिसने घेतली आहे. मात्र हल्ल्यामागे बांगलादेशातील अल कायदा आणि अन्सार इस्लाम सारख्या कट्टरपंथी इस्लामी दहशतवादी संघटना असल्याचा गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात इसिससह कट्टरपंथी इस्लामी संघटनांनी अनेक रक्तपात घडविले. अर्टीसन रेस्टॉरंटवर हल्ला करून जगाचे लक्ष वेधण्याचा दहशतवाद्यांचा कट होता असेही सांगितले जाते.  
हजार राऊंड गोळ्या, १०० स्फोट
दहशतवाद्यांकडे मोठा शस्त्रसाठा होता. रायफल्समधून तब्बल १ हजार राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या आणि १०० बॉम्बस्फोट केले.  
'रमजान'मध्ये निष्पाप लोकांना ठार मारणारे हे कसले मुसलमान?
पवित्र रमजान महिन्यात निष्पाप नागरिकांची हत्या कशी काय करू शकतात? हत्याकांड करणारे सच्चे मुस्लिम असूच शकत नाहीत, अशा संतप्त भावना पंतप्रधान शेख हसीना यांनी व्यक्त केल्या आहेत. ढाक्यातील हल्ला हा अत्यंत निंदनीय आणि अमानुष आहे. हत्या करणारे दहशतवादी हे मुस्लिम असू शकत नाही. दहशतवाद्यांना कुठलाही धर्म नाही. दहशतवाद हाच त्यांचा धर्म आहे. दहशतवाद्यांना कोणीही थारा देऊ नये. बांगलादेशातून दहशतवाद्यांचा आणि कट्टरवाद्यांचा समूळ नायनाट केला जाईल, असा निर्धारही पंतप्रधान हसीना यांनी व्यक्त केला.

Labels: , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home