Friday, July 15, 2016

मोखाड्यातील खोडाळा येथील आदिवासींना जामिनासाठी उभे करणाऱ्या दोघांना अटक

मोखाड्यातील खोडाळा येथील आदिवासींना जामिनासाठी उभे करणाऱ्या दोघांना अटक

मुंबई - आदिवासींना इंदिरा आवास योजनेतील घर, पैसे अथवा शिधा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्या रॅकेटशी संबंधित दोघांना गुरुवारी पालघर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना 18 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

अस्लम पठाण आणि अनुसया मोरे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. आदिवासींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांच्या नावाची बनावट कागदपत्रे तयार करून त्यांना गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जामीन म्हणून उभे करणारे मोठे रॅकेट "सकाळ‘ने उघडकीस आणले. कासारवडवली पोलिसांनी 22 रायफली बाळगल्याप्रकरणी अटक केलेले सहा काश्‍मिरी तरुण तसेच काळाचौकी पोलिसांनी शस्त्रासह दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या मध्य प्रदेशातील टोळीमधील गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठी मोखाड्यातील खोडाळा येथील आदिवासींचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आल्यानंतर खळबळ उडाली होती.

परराज्यांतून मुंबई व परिसरात गुन्हेगारी कारवाया करायला आल्यावर पकडलेले अथवा पोलिसांनी परराज्यांतून गंभीर गुन्ह्यांप्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या जामिनासाठी प्रामुख्याने या आदिवासींचा वापर होत असे. पोटातील भुकेची आग विझविण्यासाठी दोन पैसे मिळतील या अपेक्षेने गंभीर गुन्ह्यांतील आरोपी आपले नातेवाईक आहेत असे हे आदिवासी सांगत. त्यासाठी अनुसया आणि अस्लम हे दोघे त्यांना इंदिरा आवास योजनेतून घर मिळवून देण्याचे, शिधा मोफत देण्याचे अथवा पैसे देण्याचे प्रलोभन दाखवत. पोलिस व न्यायव्यवस्थेतील कच्च्या दुव्यांचा आधार घेऊन सुरू असलेल्या या मोठ्या रॅकेटमधील अस्लम आणि अनुसयाच्या चौकशीला पोलिसांनी सुरुवात केली होती.

या प्रकाराची गंभीर दखल घेऊन राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पालघरच्या पोलिस अधीक्षक शारदा राऊत यांना सखोल चौकशीचे आदेश दिले होते. गुरुवारी सकाळी पोलिसांनी अस्लम आणि अनुसया यांना अटक केली. या प्रकरणाशी संबंधित आणखी काही आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पालघर पोलिसांनी दिली.

Labels: , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home