Friday, July 29, 2016

मुरबाड : आदिवासींना मिळाला हक्काचा आधार, वनहक्क पट्ट्यांचे वाटप

मुरबाड : आदिवासींना मिळाला हक्काचा आधार, वनहक्क पट्ट्यांचे वाटप

आदिवासीचे संपूर्ण जीवन वनसंपत्तीवर अवलंबून असते. मात्र या आदिवासींना कसण्यासाठी स्वतःच्या मालकीची जमीन नसल्यामुळे त्यांचे जगणे असह्य झाले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुरबाडमधील आदिवासींना सुमारे १२०० हेक्टर वनजमिनींचे वनहक्क प्रदान करण्यात आले. यामुळे आदिवासींना हक्काचा आधार मिळाला आहे. मुरबाडमध्ये जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते या वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले.


ठाणे जिल्ह्यात विशेषत: मुरबाड, शहापूर भागांत आदिवासींची मोठी संख्या आहे. आदिवासी बांधवांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना वनहक्क मिळाले पाहिजेत. याशिवाय वनउपज, आणि वनसंपत्ती यावर त्यांचा अधिकार आहे. या दृष्टीने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून सामूहिक वनहक्क पट्टे प्रदान करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती. या मागणीची दखल घेत गुरुवारी प्रातिनिधीक स्वरुपात १५ गावांच्या ग्रामस्थांना वनहक्क पट्टे वाटप करण्यात आले. यातून आदिवासींना उपजीविका करता येणार आहे. त्याचबरोबर जंगलांचे चांगल्या पद्धतीने संवर्धन होण्यास मदत होणार आहे. वाटप करण्यात आलेला सर्वात मोठा वनहक्क पट्टा ३३४ हेक्टरचा तर सर्वात कमी पट्टा २९ हेक्टरचा आहे.


वनहक्क म्हणजे काय?

केंद्र सरकारकडून २००६मध्ये अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) आदिवासींचे हक्क आणि अधिकार जपण्यासाठी कायद्याची तरतूद करण्यात आली आहे. पर्यावरण संतुलन आणि जैवविविधतेचे व्यवस्थापन, आदिवासीच्या सहभागाशिवाय अशक्य आहे, ही जाण ठेवून या कायद्यात त्यांच्या उपजीविकेसाठी वनातले पट्टे कसण्यासाठी देण्याचे नमूद करण्यात आले आहे. वैयक्तिक आणि सामूहिक अशा दोन्ही प्रकारांनी हे वनहक्क पट्टे आदिवासींना दिले जातात. जिल्हा समिती यासंदर्भात आलेल्या दाव्यांवर निर्णय घेते. यामुळे आदिवासींना जंगलातील गौण उपजावरदेखील हक्क मिळतो. तसेच पर्यावरणाचेही संरक्षण होते.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home