Friday, July 1, 2016

सूर्या कालवा तोडून बांधकामे

 • शशिकांत ठाकूर,
  डहाणू/कासा- सूर्या कालव्यांचे मार्ग तोडून त्या ठिकाणी अतिक्रमण करत बांधकामे उभी केल्याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे जिल्हा चिटणीस अनिल शेलार यांनी सूर्या प्रकल्प कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
  सूर्या डावा मुख्य कालव्याला जोडणाऱ्या लघु कालव्यांना तोडून तर काही ठिकाणी शेतीला पाणीपुरवठा करणारे लघु कालवे बुजवून तेथे अतिक्रमणे झाली आहेत. त्यामध्ये नानीवली, चरी, वेळगाव, निहे, नागझरी, बोरशेती, वाळवे, गुंदले, वारंगडे मान आदि ठिकाणी कालवे तोडल्याचे निवेदनात नमूद केले असून काही जेसीबीच्या साहयाने लघू कालवे तोडून छोटया मोठया चाऱ्या काढल्याचे म्हटले आहे.
  यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळत नसून लाखो लिटर पाणी वाया जाते. परिणामी शासनाचे व शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली असून याबाबत डहाणूचे आमदार पास्कल धनारे यांनी लक्ष घालावे असे पत्र आमदारांना दिल्याचे त्यांनी सांगितले. सिंचन हा प्रमुख उद्देश ठेवून गेल्या ४० वर्षापूर्वी कासा जवळील धामणी येथे सूर्या धरण बांधण्यात आले आहे. या धरणाच्या पाण्याद्वारे १४ हजार पाचशे हेक्टर क्षेत्र जमीन ओलिताखाली आणले आहे. डहाणू, पालघर तालुक्यातील सुमारे ७५ ते ८० गावांना या प्रकल्पाद्वारे उन्हाळयात कालव्यातून पाणी पुरवठा केला जातो.
  > हे कालवे काढताना जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला दिला आहे.
  व जमीन जलसंपदा विभागाकडे हस्तांतरीत केली आहे. सूर्याच्या पाण्यावर उन्हाळयात शेतकरी मोठया प्रमाणात भातशेती करतात. त्यामुळे आदिवासी भागात उन्हाळयात बाहेरगावी रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी झाले आहे.
  कालवे तोडून जेथे अतिक्रमणे झाली असतील अशा ठिकाणची माहिती संबंधीत क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून मागविली आहे. त्यामध्ये कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.
  -निलेश दुसाने, कार्यकारी अभियंता

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home