Sunday, July 17, 2016

चिंचोटी, तुंगारेश्‍वर धबधबा धोक्याचा : तीन वर्षांत १0 पर्यटकांचा मृत्यू, तरीही ठाणे, मुंबईकरांची मोठी गर्दी

 चिंचोटी, तुंगारेश्‍वर धबधबा धोक्याचा : तीन वर्षांत १0 पर्यटकांचा मृत्यू, तरीही ठाणे, मुंबईकरांची मोठी गर्दी
वसई पूर्वेकडील डोंगराच्या दाट अभयारण्यात असलेल्या तुंगारेश्‍वर आणि चिंचोटी येथील धबधबे सध्या पर्यटकांनी फुलून गेले आहेत. शनिवार आणि रविवारी याठिकाणी पर्यटकांच्या रांगा लागत आहेत. मात्र, अतीउत्साही पर्यटकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिशय धोकादाक असलेल्या या धबधब्यांमध्ये बुडून गेल्या तीन वर्षांत दहा जणांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी धबधब्याचा आनंद लुटताना स्वत:च्या जीवाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शनिवारी आणि रविवारी तर सकाळपासूनच गर्दी ओसंडून वाहत असते. फेसाळणारे पाणी आणि चोहोबाजूंनी दाट वनराई यामुळे इथला निसर्ग मनमोहून टाकणारा असतो. धबधब्याची मजा लुटून दाट वनराईत फेरफटका मारण्याचा आनंद काही औरच असतो. दिवसभर निसर्गाच्या सानिध्यात घालवल्यानंतर संध्याकाळ कधी होते याचे भान रहात नाही.
धबधब्यात डुंबण्याचा आनंद घेणार्‍या पर्यटकांना पोलीस आणि वनखात्याने सावधानतेचा इशारा दिला आहे. धबधबे सुंदर आणि मनमोहक असले तरी धबधब्याच्या खोलीचा व त्यात असलेल्या कपारींचा अंदाज येत नाही. त्यामुळे अती उत्साहात पाण्यात उड्या मारल्यास जीव गमावण्याचा धोका असतो.
सुरक्षेच्या अभावी २0१३ ते २0१५ या कालावधीत तुंगारेश्‍वर धबधब्यात ३ तर चिंचोटी धबधब्यात बुडून ७ पर्यटकांना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे हे दोन्ही धबधबे पिकनिक स्पॉट बनण्याऐवजी डेथ स्पॉट बनत आहेत.
याठिकाणी येणार्‍या पर्यटकांकडून वनखाते प्रवेश फी आकारते. मात्र, पर्यटकांसाठी कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत. याठिकाणी सुरक्षिततेसाठी पोलीस अथवा वनखात्याचे रखवालदार नसतात. मुंबई-अहमदाबाद हायवेपासून अतिशय दूरवर डोंगरात असलेल्या धबधब्यांपर्यंत काही अपघात झाल्यास सहज पोहोचणे अतिश कठीण आहे.
या परिस्थितीमुळे पर्यटक बुडाल्यास त्याला तात्काळ मदत मिळत नाही. चिंचोटी धबधब्यात बुडणार्‍या पर्यटकांचे मृतदेह दूरवर असलेल्या नदीत वाहून जातात. त्यामुळे बुडालेल्यांचा शोध घेणे जिकीरीचे काम असते. म्हणूनच स्वत: मजा लुटताना काळजी घ्या, स्वत:चा जीव धोक्यात घालू नका आणि इतरांना त्रास होईल, असे वर्तन करू नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home