Tuesday, June 28, 2016

वसई विरार महापालिकेच मुख्यालयालगत असलेल्या स्कायवॉकची दुर्दशा

विरार :

 वसई विरार महापालिकेच मुख्यालयालगत असलेल्या स्कायवॉकची दुर्दशा झाली आहे. गर्दुले आणि भिकाऱ्यांनी स्कावॉकचा कब्जा घेतला आहे. उरलीसुरली जागा जोडप्यांनी अश्लिल चाळे करण्यासाठी व्यापली आहे. मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून अनेक ठिकाणी टाईल्स तुटल्या आहेत. मोठे खड्डे पडले आहेत. नियमित सफाई होत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे.

विरार पूर्वेकडील टोटाळे तलावावरून जाणाऱ्या स्कायवॉकचा उपयोग रेल्वे प्रवासी आणि नागरीकांसाठी होईल अशी अपेक्षा होती. मात्र, सध्या स्कायवॉकचा ताबा जोडप्यांनी घेतला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत ठिकठिकाणी जोडप्यांचे अश्लिल चाळे सुरु असतात. रात्रीच्या वेळी विजेची सोय नसल्याने अनेक समाजकंटक स्कायवॉकचा वापर गैरधंदे करण्यासाठी करीत असतात. याठिकाणाहून दोन वेळा तरुण मुलींनी तलावात उडी मारून आत्महत्येचाही प्रयत्न केला आहे. रखवालदार नसल्याने स्कायवॉक बेवारस होऊन त्याचा ताबा गैरधंदे करणाऱ्यांनी घेतला आहे. गर्दुले आणि भिकाऱ्यांनी स्कायवॉकला आपला अड्डाच बनविला आहे. मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने ये-जा करताना लोकांना भीती वाटत असते. यामुळे स्कावॉकवर प्रचंड दुर्गंधी पसरली आहे, अशी तक्रार माजी नगरसेवक विलास चोरघे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. आता आयुक्त कोणता प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

तलावातील मासे प्रदूषणामुळे मृत

दरम्यान, स्कावॉकखाली असलेल्या तलावातील शेकडो मासे पाणी दुषित झाल्याने मरुन पडत आहेत. पालिकेच्या मुख्यालयाशेजारी असलेल्या तलावाच्या दुर्दशेबाबत आपण पालिका आयुक्तांना अनेक वेळा लेखी कळवले आहे. मात्र, त्याची दखल आयुक्तांनी अद्याप घेतलेली नाही.
पूर्वी लोकांना नियमितपणे भेटणारे आयुक्त भेटेनासे झाले आहेत. आमच्या तक्रारींची दखलही घेत नाहीत. आयुक्त सध्या कुणाच्या तरी दबावाखाली तर काम करीत नाहीत ना? असे सवाल चोरघे यांनी उपस्थित केला आहे.

Labels: , , , , , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home