Friday, June 24, 2016

आदिवासी पुन्हा जंगलाकडे रवाना

आदिवासी पुन्हा जंगलाकडे रवाना

लहान मुलांबरोबर मोठय़ा प्रमाणात महिलांचा समावेश आहे.


पाऊस सुरू झाल्याने नागरी वस्तीतून मूळगावी डहाणूच्या दुर्गम भागातील आदिवासी रोजगारासाठी दरवर्षी डहाणूच्या पश्चिम भागात स्थलांतर करत असतात आणि मे महिनाअखेर ते पुन्हा जंगलाकडे जातात. परंतु यंदा पाऊस लांबल्याने शेकडो आदिवासी मजूर या परिसरातच मजुरी करून राहत होते. अखेर २० जून रोजी बंदरपट्टी भागाच्या विविध गावातून आदिवासी मजूर जंगलाकडे निघाले आहेत. त्यात लहान मुलांबरोबर मोठय़ा प्रमाणात महिलांचा समावेश आहे. डहाणूसारख्या आदिवासीबहुल तालुक्यात कायमस्वरूपी रोजगार नसल्याने दरवर्षी सायवन, निंबापूर, दिवसी, दाभाडी, धरमपूर, शोणसरी, जांगुडी, कैनाड, ओसरवीरा, धुंदलवाडी, वंकास, शिलोंडा, इत्यादी भागातील आदिवासी रोजगारासाठी भिवंडी, वसई, अर्नाळा, मनोर, बोईसर तसेच डहाणूच्या पश्चिम भागातील वाणगाव, चिंचणी, डहाणू खाडी, तारापूर इत्यादी गावात येऊन बागायती, इमारत व्यावसायिक तसेच मिळेल ते काम करतात. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी हे आदिवासी दीपावली झाल्यानंतर आपल्या मुलाबाळांसह येथे राहून मजुरीची कामे करत असतात. यामध्ये मोठय़ा प्रमाणात तरुण मुली तसेच महिला असतात. हे आदिवासी मिरची, चिकूच्या वाडीत काम करत असतात. शिवाय या परिसरातील बांधकाम व्यावसायिकांकडे चांगली मजुरी मिळत असल्याने ते दरवर्षी येथे मोठय़ा प्रमाणात येत असतात. दरम्यान, पावसाळा जवळ आला की हे आदिवासी अधूनमधून घरी जाऊन त्यांचे राहते घर, झोपडी दुरुस्त करत असतात. यावर्षी पाऊस उशिराने दाखल झाल्याने गेल्या दोन-तीन दिवसांपासून आदिवासी मजुरांनी जंगलाकडे जाण्यास सुरुवात केली आहे. 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home