Sunday, June 26, 2016

वसई विरार पालिकेचा नालेसफाईचा दावा फेल

काल रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसाने नालासोपारा शहर जलमय केले. रेल्वे उड्डाणपूलाखालून जाणारा आणि सेंट्रल पार्क मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तर अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले होते. नवघर एसटी स्टँडमध्ये पाणी साचून राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले होते. तर पश्‍चिम पट्टयात काही रस्त्यांवर पाणी तुंबले होते. एकंदरीत पावसाच्या तडाख्याने वसई विरार पालिकेचा नालेसफाईचा दावा फेल गेला.

गेल दोन दिवसांपासून हजेरी लावलेल्या पावसाने काल रात्रभर जोरदार तडाखा दिला. नालासोपारा पूर्वेकडील तीनही मुख्य रस्ते पाण्याखाली गेले होते. आचोळे रस्ता, हावे रस्ता आणि सेंट्रल पार्क रस्ता या चारही मुख्य रस्त्यांवर दुपारपर्यंत गुडघाभर पाणी तुंबून राहिले होते. सेंन्ट्रलपार्क, तुळींज, टाकीपाडा रोड, नगिनदासपाडा, संतोषभुवन, बिलालपाडा, मोरेगाव, आचोळे गाव या ठिकाणी रेल्वे स्थानकातून जाण्यासाठी तीन मुख्य रस्ते आहेत. याच रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनधारकांना आणि नागरिकांना जीवघेणी कसरत करीत जावे लागत होते.  तुळींज डोंगरावरून येणारे पाणी वाहून जाण्यासाठी मोठे नाले आणि गटारे नसल्याने हे तीनही मुख्य रस्ते दरवर्षी पाण्याखाली जातात. तुळींज पोलिस ठाण्यासमोरील गटारीचा स्लॅब तुटला आहे. त्याठिकाणी पाणी जाण्यासाठी मार्गच शिल्लक राहिला नाही.
 तुळींज पोलीस ठाण्याची इमारत मुख्य रस्त्यालगत असलेल्या गटारावर बांधलेली आहे. पालिकेने गेल्याच महिन्यात पोलीस ठाण्याला नोटीसही बजावली होती. नेमक्या याच परिसरात आज गुडघाभर पाणी साचल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती
 सेंन्ट्रलपार्क रस्त्यावर गुडघाभर पाणी साचून राहिले असून रस्त्यालगत असलेल्या गटाराच्या स्लॅबला तडे गेल्याने पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे गटाराचे काम निकृष्ट असल्याचे उघड झाले. 
 नवघर एसटी स्टँड पुन्हा पाण्याखाली गेल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. संध्याकाळर्पंत गुडघाभर पाणी तुंबून राहिले होते. त्यामुळे वाहतूकीवर परिणाम होत होता. वसई पश्‍चिम पट्ट्यातील अनेक भागात पाणी साचून राहिल्याने लोकांची गैरसोय झाली होती. एकंदरीत पहिल्याच पावसाने वसई विरार पालिकेच्या नालेसफाईच्या कामाचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले.

संपूर्ण तालुक्यात शुक्रवारी सायंकाळपासूनच पावसाने मुसळधार हजेरी लावली असून परवा पर्यंत जे शेतकरी आकाशाकडे टक लावून होते त्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे. नांगरणी अगोदरच झाली होती मात्र जोरदार पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी चिखलणीला सुरुवात केली आहे. तारापूरच्या मुरंबेभागात शेतकर्‍यांनी चिखलणीसाठी बैलाजोडी शेतात उतरविल्याचे चित्र पहायला मिळत होते. मनोर : सकाळ पासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे मनोर परिसरात जनजीवन विस्कळीत झाले असून मनोर पालघर रस्त्यावर असलेल्या वाघोबा मंदिराच्या शेजारी असलेल्या दुकानावर झाड पडल्याने नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकरी मात्न समाधानी आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने ग्रामीण भागातील नदी, नाले, शेती भरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे तर दुकानदारांची माल वाचविण्यासाठी धावपळ उडाली आहे. तसेच रस्त्यावर पाणी सचल्याने पादचार्‍याना मार्ग काढणे अवघड झाले आहे.
-पंकज राऊत , हनिफ पटेल

Labels:

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home