Wednesday, June 29, 2016

पालघरला गटार व्यवस्था पाण्यात

पालघर - गुरुवारपासून (ता. 23) शनिवार (ता. 25)पर्यंत येथे झालेल्या मुसळधारेने शहरातील रस्ते जलमय होऊन खोलगट भागातील घरांत पाणी शिरले. पालिकेने लाखो रुपये खर्चून केलेली रस्ते दुरुस्ती पाण्यात वाहून गेली, तर पालिकेची गटार व्यवस्थाच कोलमडली. त्यामुळे पालघरला पूरपरिस्थिती निर्माण झाली.

गुरुवारपासून संततधार कोसळणाऱ्या पावसाने यंदा पुन्हा नगरपालिकेची परीक्षा पाहिली. नवीन गटारे बांधून तसेच गटाराच्या साफसफाईसाठी मोठा निधी खर्च करूनही नगरपालिका उघडी पडली. शनिवारी माहीम रस्ता, लोकमान्यनगर, गोठणपूर, सुखसागर आदी परिसरात पाणी साचल्याने परिसराला तलावाचे स्वरूप आले होते. पालिकेचे कॉंग्रेसचे माजी नगरसेवक भावानंद संखे यांनी काल सुखसागर आणि ट्रिकल स्कूलजवळ रस्त्यावर साचलेले पाणी काढण्यासाठी सहकार्य केले. गटारे बांधताना उंच-सखल भागांचा विचार न केल्याने तसेच पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने आवश्‍यक नियोजन न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. विविध भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पालिकेच्या यंत्रणेला जेसीबी यंत्र घेऊन जागोजागी आपली कुमक पाठवावी लागली. दरम्यान, नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेली गटार सफाई हा विषय चेष्टेचा झाला आहे. पालिकेवर सध्या बळकट असा विरोधी पक्षच नाही. गटार बांधणी, रस्ते या भ्रष्टाचारात विरोधी पक्षाच्या काही नगरसेवकांनी वाहत्या गटाराच्या पाण्यात हात व तोंड चांगलेच धुवून घेतले आहेत, अशी टीका पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नितांत चव्हाण यांनी केली.

Labels: , ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home